Thursday, 29 September 2022

आदिशक्तीचे पूजन –घटस्थापना

 

  आदिशक्तीचे पूजन –घटस्थापना

 
ज घटस्थापना. शारदीय नवरात्रारंभ. आपल्या जीवनातल्या विशेष सर्व कार्यशक्ती स्त्रीलिंगी रूपातच आहेत.नावे वेगवेगळी असली तरी मूळ रूप आदिशक्तीचेच असते. म्हणूनच भारतीयांनी स्त्रीला समाजाच्या मर्यादा,लज्जा, संस्कृती यांचं प्रतीक मानलं आहे. शक्तीरूपातली देवी हीच सर्वांची आदिशक्ती असून ती अत्यंत सामर्थ्यवान आहे असेही मानले गेले आहे. याच कारणामुळे देवीची अनेक व्रते करण्याची प्रथा सुरू झाली. देवीचे नवरात्र हे त्या पैकीच एक. मातृरूपात असणार्‍या शक्तिचे पूजन करण्याचे आणि आदिशक्तीची आराधना करण्याचे, जागर करण्याचे पर्व आहे.

या देवी सर्वभूतेषू मातृरूपेण संस्थितः

नमस्तस्यै: नमस्तस्यै: नमस्तस्यै: नमो नमः।।

सर्व विश्वात मातृरूपात वास करणारी हे भगवती देवी तुला नमस्कार असो.

सर्व प्राणिमात्राच्या मध्ये शांतिरूपात राहणारी, शक्ति रूपात असणारी, बुद्धिरूपात असणारी, चैतन्य रूपात वास करणारी, निद्रारूपात, क्षुधा रूपात, छायारूपात, तृष्णारूपात, क्षमारूपात असणारी आणि लज्जा, श्रद्धा, सौन्दर्य आणि ऊर्जा रूपात, लक्ष्मी रूपात, वृत्ती, स्मृति, दया, समाधान, अशा विविध रूपात  वास असणार्‍या हे देवी तुला नमस्कार असो  असं वर्णन असणारी शक्ति ही स्त्री देवता आहे. हे आमच्या भारतीय संस्कृतीत स्त्रियांचे आदराचे स्थान दर्शवणारी, आमच्या हिंदू धर्म ग्रंथातली पुराण काळापासून चालत आलेली परंपरा आहे.

 
नवरात्रात लोक आपली आध्यात्मिक आणि मानसिक शक्ति वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करतात.  ते या काळात उपवास, संयम, नियम पाळणे, भजन व पूजन करणे, साधना करणे, व्रतस्थ राहणे या गोष्टींवर भर देतात.

पौराणिक कथेनुसार असुरांकडून सृष्टीचा नाश होताना देवदेवतांना बघवेना. मग ही सृष्टी वाचवण्यासाठी त्यांनी जगदंबेची आराधना केली आणि या सृष्टीला वाचवावं म्हणून विनंती केली, तेंव्हा  भगवती देवी व असुरांमद्धे युद्ध झालं. देवीने असूरांचा वध करून देव देवतांना निर्भय केलं, आश्वस्त केलं. तेंव्हापासून या व्रताची सुरुवात झाली असे मानतात. जगात जेंव्हा जेंव्हा असुर किंवा त्यांच्या सारखे क्रूर लोक स्वत:च्या बळाने सज्जनांना छळतात, तेंव्हा तेंव्हा जगज्जननी व विश्वाची पालनकर्ती देवी भक्तांच्या मदतीला धावून येते. म्हणूनच भक्त तिची आराधना, भक्ती करतात, उपासना करतात.

त्यात घटस्थापना, माळा चढविणे, अखंड नंदादीप लावणे आणि कुमारिका/ कन्या पूजन करणे. हे नवरात्राचे मुख्य भाग असतात. स्कंद पुराणात कुमारिकेचे वयाप्रमाणे प्रकार सांगितले आहेत.हे पूजन म्हणजे स्त्रीत्वाचा सन्मान च आहे एक प्रकारे.

      घटस्थापना करतात म्हणजे, कलशाखाली असलेल्या काळ्या मातीमध्ये सप्तधान्य पेरून नऊ दिवस त्याची नीट काळजी घेतात. या नऊ दिवसात ,नवव्या दिवशी त्या धान्याचे सुंदर तृणात रूपांतर झालेले दिसते.हे सृजन च असते, निर्मिती असते. आणि निसर्गाची खरी पुजा असते. हे देवी तू धन धान्याने आम्हा सर्व तुझ्या लेकरांना असेच समृद्ध कर अशी  कृतज्ञता या देवी जवळ भक्त व्यक्त करत असतात असे वाटते.

घटाला चढवण्यात येणारी माळ सुद्धा या ऋतुत येणार्‍या विविध फुलांच्या च असतात. शेवनती, सोनचाफा,अनंत,मोगरा,चमेली, गोकर्ण,कृष्ण कमळ, अबोली,तेरडा, तीलाची फुले, बेल,कर्दळ, झेंडू, कण्हेर,जास्वंद, गुलाब, अशा विविध रंगी व सुवासिक फुलांच्या माळा वाहण्याचा प्रघात आहे.

     जगातील दुष्ट लोकांचे प्राबल्य कमी करण्यासाठी, लोकांची त्यातून सुटका करण्यासाठी ईश्वर अवतार घेतो अशी समजूत आहे. ईश्वर निर्गुण असल्याने त्याला जेंव्हा कार्य करायचे असते तेंव्हा तो अवतार घेऊन आपल्या शक्तिदेवीला प्रेरित करतो आणि ही शक्ति वेगवेगळ्या रूपात प्रगट होते म्हणून त्या अवतारांची पुजा करतात. ज्या उर्जेतून तेजस्वी तार्‍यांचा, सूक्ष्म मानवी मनाचा, भावनांचा जन्म होतो ती ऊर्जा/शक्ति म्हणजे देवी असे म्हटले जाते. ब्रम्हा, विष्णु, महेश या प्रमाणे पार्वती, लक्ष्मी, सरस्वती ही शक्तीची तीन रुपे मानली जातात. या शक्तीचे मुख्य नऊ आणि इतर अनेक असे अवतार मानले जातात. 

    
    विविध महिन्यात महत्व असलेल्या चैत्र गौर, अन्नपूर्णा-चैत्र, ज्येष्ठ गौर व हरितालिका-भाद्रपद, मंगळागौर-श्रावण, अश्विनातील ललिता ही शक्तीची सौम्य रुपे मानली जातात. तर दुर्गा, काली, चंडी ही  देवीची रौद्र रूपं. पृथ्वीवरील राक्षसांच्या निःपातासाठी या शक्तीने / देवीने रौद्र रूप घेतले. नऊ दिवस युद्ध करून त्यांचा नाश केला.

   आम्ही एकेकाळी स्त्रीला अबला मानलं होतं. पण शक्तीरूपातली देवी हीच सर्वांची आदिशक्ती असून ती अत्यंत सामर्थ्यवान आहे असेही मानले गेले आहे. याच कारणामुळे देवीची अनेक व्रते करण्याची प्रथा सुरू झाली. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस चालणारा हिंदूंचा दुर्गा देवीचा उत्सव, अर्थात शारदीय नवरात्र’. ऋतुंवरून प्रचारात आलेला हा उत्सव धार्मिक उत्सव पण आहे.

  दुर्गा किंवा काली ही सर्वांची कुलदेवता असल्याने भारतात हा उत्सव एक कुलाचार सुद्धा असतो. यावर इथला प्रादेशिक ठसा उमटलेला आहे. 

  
   उत्तर भारतात नवरात्र उत्सव म्हणजे प्रभू रामचंद्रांनी दुष्ट शक्तिवर मिळविलेला विजय म्हणून साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्तीपासून वाचवणारी शक्ति म्हणून देवीचे पूजन होते. रजपूत लोकांनी उत्तर हिंदुस्थानात अनेक ठिकाणी आपली सत्ता स्थापन केली. ते लोक शिवोपासक होते. रजपूत लोक देवीच्या ऐवजी नवरात्रात तोफेची पुजा करतात. त्यावर त्रिशूळाचे चिन्ह काढतात.

   महाराष्ट्रातसुद्धा मराठ्यांच्या राज्यस्थापनेनंतर आपले उपास्य दैवत भवानीदेवीच्या पूजेचा प्रसार झाला. चारही दिशांना ही देवालये स्थापित झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा आई भवानी जगदंबेची पूजा बांधली होती हा इतिहास सर्व परिचित आहेच. पेशवे काळातसुद्धा दसर्‍याआधी वार्षिक दुर्गोत्सव साजरा करण्याची प्रथा होती. 


     पश्चिम भारतात गुजरातमध्ये नवरात्रात नऊ दिवस अखंड दीप लावून शक्ति जागर म्हणून गरबा मांडला जातो. यात गरबा म्हणजे गर्भदीप लावला जातो. सछिद्र मातीच्या घटात दिवा तेवत ठेवतात. हा घट म्हणजे मनुष्याच्या शरीराचे प्रतीक आणि आतला तेवत असलेला दिवा म्हणजे शुद्ध आत्म्याचे प्रतीक मानले जाते. ही आत्मरूपी ज्योत अखंड तेवत राहो, उदंड आयुष्य मिळो अशी प्रार्थना आदिशक्ती दुर्गादेवीकडे केली जाते.

     पुर्वेकडे पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडे नवरात्रीचे शेवटचे पाच दिवस दुर्गापुजा केली जाते. यातील सिंहावर आरुढ झालेली देवी हातात सर्व शस्त्र घेतलेली आहे. ती महिषासुरमर्दिनी आहे.

  दक्षिण भारतात बाहुल्यांचे प्रदर्शन कोलू असते. ते बघायला सर्वजण एकमेकांच्या घरी जातात. कर्नाटकात नवरात्रात रात्रभर पुराण कथांवर आधारित यक्षगानचे प्रयोग नऊ दिवस केले जातात. दुष्टांवर विजयाचे प्रतीक म्हणून मोठ्या थाटामाटात म्हैसूर दसरा साजरा केला जातो. काही भागात नवमीला आयुधांची पूजा करतात.

   केरळमध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर लहान मुलांचा विद्यारंभ केला जातो. भाषा आणि वेष नि आहार वेगवेगळा, पद्धती वेगवेगळ्या, पण या संस्कृतीतून दिला जाणारा संदेश एकच. विविधतेतून एकता हेच या संस्कृतीचे वैशिष्ट्य, हीच परंपरा. अनेक काव्यातून वाड्मयातून शक्ति देवीची स्तुती केलेली दिसते.               

प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी ।


तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।।

पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।

सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।

नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।

उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।।

     नऊ दिवसात देवीची म्हणजे आदिशक्तीची ही नऊ रुपे पूजली जातात. ऊर्जा हे देवीचे मूळ तत्व, संरक्षणाची देवता दुर्गादेवी, ऐश्वर्याची देवता लक्ष्मीदेवी आणि ज्ञानदेवता सरस्वतीदेवी या शक्ति रूपात आपण मानतो. हे मानणे म्हणजेच आपल्या मनातील द्वंद्वाच्या, त्रासदायक नकारात्मक भावनांना दूर सारून सकारात्मक दृष्टीचा स्वीकार करणे आहे. कारण जेंव्हा एखादा मनुष्य लहान, मोठ्या संकटाचा सामना करत असतो, तेंव्हा तो आधार शोधतो. मन:शान्ती कशात मिळेल हे शोधतो आणि ती त्याला अध्यात्मामधून, साधनेमधून, कुठल्याही रुपातल्या आराधनेमधून मिळते. ही रुपे अर्थातच शक्तीची असतात. त्याची मनुष्याने प्रतीके शोधली. कारण अमुर्ताला मूर्त स्वरूप दिले की आश्वासक वाटत असते. म्हणून वेगवेगळ्या प्रतिकातून सूचक अर्थ निघत असतात. प्रतिकांचा वापर आपल्या संस्कृतीत प्राचीन काळापासून दिसतो. प्रतीक म्हणजे एखादं चिन्ह किंवा खूण.

  देवीची नवरात्रे चार प्रकारची आहेत. शारदीय, वासंतिक, शाकंभरी आणि गुप्त नवरात्र. तर इतर नवरात्र म्हणजे चंपाषष्टीला खंडोबाचे नवरात्र असते आणि मार्गशीर्षात नृसिंहाचे नवरात्र असते.

मन:शान्ती मिळवण्यासाठी, विशेषता महिलांनो लक्षात घ्या की, मनात भाव व शुद्धता हवी, देवावर/ शक्तिवर विश्वास व श्रद्धा हवी, मन शरीर व परिसर स्वच्छता हवी, सात्विकता हवी. त्यासाठी नुसतं रोज वेगळ्या वेगळ्या रंगाच्या साड्या (नवरात्रीचे नऊ रंग, दांडिया, गरब्यासाठी ऊंची ड्रेस आणि अॅक्सेसरीज आणि त्याला जोडून होणार्‍या पार्ट्या) आणि दागिने परिधान करणं, आपल्या दिसण्या-असण्याचा भपका सादर करणं म्हणजे भक्ती नाही की पूजा होत नाही. तुम्ही स्वत:च एक शक्ति आहात, मातृदेवता आहात, मार्गदर्शक आहात ! जर तुम्हीच हे समजून नाही घेतलंत तर तुमची मुले व मुली /पुढची पिढी चुकीच्याच पायंड्यांवरून जात राहतील. आपल्या देशाची सांस्कृतिक प्रतिके आणि आपल्या हिंदू धर्मातील एक शक्तिपूजा, लोक परंपरा, त्यांचा निसर्गाशी असलेला मूळ कार्यकारण भाव, मूळ तत्व हे शोधा, डोळसपणे समजून घ्या आणि ते तुमच्या मुलांना सांगा, म्हणजे ती देखल्या देवा दंडवत असं करणार नाहीत.   

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हणूनच स्पष्ट केलय,

मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव  
देव अशा
नं, भेटायचा नाही हो।
    देव बाजारचा भाजीपाला नाही हो ॥धृ o
देवाच देवत्व नाही दगडातं ।
देवाच देवत्व नाही लाकडातं ।
सोन्या चांदीत नाही देवाची मात 
देव बाजारचा भाजीपाला नाही हो ॥

थोडक्यात, मनुष्य हा बुद्धीमान प्राणी आहे. त्याला बुद्धी आहे म्हणूनच तो चराचराचा, निसर्गाचा, प्राणिमात्रांचा विचार करतो. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, आदर व्यक्त करतो. तसाच तो या अमूर्त शक्तीची पूजा करतो. हे आपल्या देशाचे सांस्कृतिक महत्व आहे. ते मूळ भावात आपण जपले पाहिजे.            

       आपल्या संस्कृतीचा, परंपरांचा बाजार होत नाही ना याकडे आपणच जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. सध्या स्वत:च्या व्यवसायसाठी, स्वार्थासाठी, अधिक नफा कमवण्यासाठी नवे नवे फंडे तयार करून त्याचे मार्केटिंग करण्यात अनेकजण आघाडीवर आहेत. यात माध्यमेही पुढे आहेत.त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीचे  महत्व त्यांना आहे,  यात कुठेही स्त्रीयांचे / लोकांचे कल्याण किंवा देवाची भक्ती हा भाव नाही आणि नसतो. स्त्रियांच्या भावनांना आवाहन केले की स्त्रिया बळी पडतात. याचाच उपयोग करून घेतला जातो. तेंव्हा आयाबायांनो, मैत्रीणिंनो सणावारी आपल्या संस्कृतीशी बादरायण संबंध जोडून भुलवणार्‍याना लगेच ओळखा. बळी पडू नका. आणि शुद्ध भावाने यंदाची घटस्थापना करा, शक्ति देवतेची उपासना करा. तिच्यापासून संकटाचा सामना करण्याची आणि दुष्ट शक्तींचा बीमोड करण्याची प्रेरणा घ्या एव्हढंच सांगते.         

सर्व मंगल मांगल्ये शिवेसर्वार्थ साधिके |
 शरण्ये
त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते ||

 

लेखिका-  डॉ. नयना कासखेडीकर,


-------------------------------

Monday, 26 September 2022

संत मुक्ताबाई

 

संत मुक्ताबाई

(जन्म-आश्विन शुद्ध प्रतिपदा शके १२०१,आपेगाव,पैठण

वैशाख वद्य द्वादशी शके १२१९ मृत्यू तापीवरील मेहूण गाव).

                                        



मुंगी उडाली आकाशी ,तिने गिळिले सूर्याशी

थोर नवलाव झाला, वांझे पुत्र प्रसवला

विंचू पाताळासी जाय , शेष माथा वंदी पाय

माशी व्याली घार झाली , देखोनी मुक्ताई हासली...-संत मुक्ताबाई

      आश्विन शुद्ध प्रतिपदा ! आज घटस्थापना, आदिशक्तीचा जागर करण्याचे पर्व आणि संत मुक्ताबाई यांचा जन्म म्हणजे एका आदिमायेचाच जन्म दिवस म्हणायला हरकत नाही.आदिशक्ती असलेली मुक्ताई संत ज्ञानेश्वरांची प्रेरणा स्थान होती. तिचे ताटीचे अभंग हे संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी निर्मिती मागची प्रेरणा होती.निवृत्ती, ज्ञानदेव सोपान मुक्ताई ही चार भावंडे म्हणजे आपेगावच्या विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी यांची मुले. बुद्धिमान व विरक्त असलेले विठ्ठलपंत लग्नानंतर संन्यास घेतात आणि काशीला जाऊन राहतात. पण पतिव्रता पत्नी रुक्मिणी प्रयत्नपूर्वक त्यांना गृहस्थाश्रमात आणते.विवाह होऊन ही संन्यास घेतलेला समजताच त्यांना पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारण्याची आज्ञा काशीच्या गुरूंकडून मिळते. पण समाज त्यांना वाळीत टाकतो. परंतु याची शिक्षा समाज त्यांना देतो ती म्हणजे देहांत प्रायश्चित्त. चार चिमुकल्या मुलांसह कुटुंबाच्या होणार्‍या छळाला  कंटाळून विठ्ठल पंत व रुक्मिणी ठरवतात की आपल्या मुलांना समाज त्यामुळे स्वीकारणार असेल तर आपण हे प्रायश्चित्त घेऊ आणि खरच ते दोघेही ही शिक्षा म्हणून आत्मविसर्जन करतात. या वेळी मुक्ताबाई फक्त चार वर्षाची असते.

   भावंडांचा सांभाळ करण्याची जबाबदारी मोठ्या निवृत्तीवर येऊन पडते. निवृत्ती, ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ही सन्याशाची मुलं म्हणून समाज त्यांनाही वाळीत टाकतो.आईवडिलांचे छत्र गेले तरीही समाज मुलांना स्वीकारत नाही. जन्मापासून मुलांची परवड सुरूच असते. या कोवळ्या मुलांना स्वताला सतत सिद्ध करावे लागत असते. अशा परिस्थितीत छोटी मुक्ताबाई प्रौढ झाली नाही तरच नवल. असे अनेक प्रसंग घडलेले आहेत की मुक्ताबाईने आपल्या मोठ्या भावंडांनाही मार्गदर्शन केले आहे.

      समाजातून सतत उपेक्षा, अपमान सहन न होऊन एक दिवस स्वतावरच चिडून ज्ञानोबा उद्विग्न होऊन, पर्णकुटिचे दार बंद करून आत ध्यानस्थ बसले. सन्याशाच्या पोराचे दर्शन घडले म्हणून मोठा अपशकुन झाला असे ज्ञानोबाला पाहून एका ने म्हटले, त्यामुळे ज्ञानोबा खिन्न झाले. निवृत्ती आणि सोपान यांनी ही विनवण्या केल्या. पण ज्ञाना दार उघडेना. मुक्ताबाईने विनवणी करूनही ते दार उघडेनात. छोट्याशा बहिणीने मुक्ताइने लडिवाळ पणे ज्ञानाला समजावले.ज्ञाना दादा चिडलाय, त्याची मनस्थिती बिघडली हे मुक्ता बाईंना लक्षात आले. ज्ञानोबा पेक्षा लहान असलेली मुक्ता आता त्यांना मोठ्या अधिकाराने मोठी होऊन समजवायला लागली. लोक कितीही वाईट वागले तरी तुम्ही विचलित होऊ नका. आपला चांगला मार्ग सोडू नका. ताटी उघडा आता. या अवस्थेतून बाहेर या. असं ममतेने सांगून ज्ञानेश्वरांचे मन वळवले. संतांची लक्षणे काय आहेत.योगी कसा असावा ,आपले भूतलावरील अवतार कार्य काय आहे ते मुक्ता बाईंनी ताटीच्या अभंगात सांगितले आहे. ज्ञानोबांना जागृत केलं आहे.   

चिंता क्रोध मागे सारा
ताटी उघडा ज्ञानेश्वरा

 

योगी पावन मनाचा। साही अपराध जनाचा।
विश्व रागे झाले वन्हि। संते सुखे व्हावे पाणी।


शब्द शस्त्रे झाले क्लेश। संती मानावा उपदेश।

विश्वपट ब्रह्म दोरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा।

 

ब्रह्म जैसें तैशा परी आम्हा वडील भूतें सारी

अहो क्रोधें यावें कोठे अवघे आपण निघोटे

जीभ दातांनी चाविली कोणें बत्तीशी तोडीली
मन मारुनी उन्मन करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा

 

    ज्ञानदेव दिवसेंदिवस जास्तच आत्ममग्न होत चालले आहेत हे मुकताबाईना जाणवते . या वेळी ज्ञानोबाचे मन शांत करण्याचा प्रयत्न मुक्ता बाई करते. आणि स्वच्छ सात्विक पावन मनाच्या या योगी पुरुषाला तिच्या ज्ञानादादाला क्षणिक रागापासून परावृत्त करून त्याचे मन स्थिर करण्याचा प्रयत्न करते. आपल्या पेक्षा लहान असलेली लाडकी बहीण मुक्ताई आध्यात्मिक आणि ज्ञानाने ओतप्रेत भरलेली तिची प्रेमळ विनवणी ज्ञानोबा मान्य करतात ,शांत होतात आणि पर्णकुटी चे दार /ताटी उघडून बाहेर येतात. मुळातच योगी असलेल्या, तत्व चिंतक असलेल्या ज्ञानदेवांनासुद्धा मार्गदर्शन करण्याचं सामर्थ्य या चिमुकल्या मुक्ताबाईत होतं.याचा परिणाम ज्ञानेश्वरांवर झाला, ते कार्यप्रवृत्त झाले आणि नेवाशाला भावार्थ दीपिका च्या निर्मितीची सुरुवात झाली.

     गुरु संत निवृत्तींनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्य ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ता बाई घडत होत्या. नाथ संप्रदायाची दीक्षा निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईंना आणि ज्ञानेश्वरांना पण दिली होती. त्यामुळे दोघे आता गुरुबंधुभगिनी झाले होते, प्रेम,आदर, भक्ती, ज्ञान दोघांनाही बरोबरच मिळत राहिले. कधी कधी मनात आलेली शंका मुक्ताबाई ज्ञानेश्वरांना विचारत असे, ते शंका निरसन करत. निवृत्तीनाथ तर आईवडिलांचेही प्रेम लहान भावंडांना देत होते. तिन्ही भाऊ तसे मुक्ता बाईंचे गुरु बंधुच होते. पण तिची जडण घडण चालू असताना ती न कळत्या वयापासून कुटुंबावर होणार्‍या आघता मुळे अनेक प्रसंगांना सामोरी गेली होती. तिच्या छोट्याशा आयुष्यात अनेक घटना तिच्यासमोर घडल्या होत्या. शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी नुसार विठ्ठलपंत आणि रुक्मिणी बाईंची ही चारही मुले होती.

     मुक्ताई ने योगी असलेल्या ज्ञानदेवांच्या व्यक्तिमत्वाचा वेध आपल्या अभंगातून घेतला आहे. मुक्ताईच्या मते ज्ञानेश्वर योगी, संत.साधू, विरक्त, ज्ञानी, सद्गुरू, परमेश्वर आणि जगद्गुरू होते. असे वर्णन त्या अभंगातून करतात. 

     अशा अनेक घटना मुक्ता बाईंच्या आयुष्यात घडलेल्या दिसतात की, ज्यातून त्यांचा आध्यात्मिक अधिकार किती मोठा होता ते आपल्याला लक्षात येतं.यामुळेच मुक्ता बाई तेराव्या शतकातली संत परंपरेतली एक स्त्री गुरु होऊन गेली हे कळतं. गुरु शिष्य परंपरेत तर वयाने लहान असलेली पण चांगदेवांची गुरु मुक्ताबाई होती.चांगदेवांना तिने पासष्टीचा अर्थ सांगितला.हा मुक्ताबाईंचा पहिला शिष्य.   

     संत निवृत्तीनाथ मुक्ताईचे गुरु, गुरूंचे म्हणणे ती अजिबात खाली पडू देत नसे, एक दिवस त्यांनी मांडे खाण्याची इच्छा मुक्ताईला बोलून दाखविली. मुकताईने लगेच तयारी केली. कुंभारवाडयात ती मातीचे परळ आणण्यासाठी गेली असता, वाटेत विसोबा चाटी भेटले. तिच्या हातातले परळ हिसकावून घेतले आणि फोडून टाकले. कुंभारवाडयात सर्वांना ताकीद दिली की हिला कुणीही परळ देऊ नये. निराश होऊन मुक्ताई घरी आली. आपण निवृत्तींनाथांची इच्छा पूर्ण करू शक्त नाही याचा तिला खेद वाटला. दु:ख झाले. तिचा उतरलेला चेहरा पाहून ज्ञानोबा मदतीला आला. त्या योग्याने आपला जठराग्नी योग शक्तीने पेटवला आणि मुक्ता बाईंना सांगितले, “भाज आता पाठीवर मांडे” .

   मुक्ताबाई आता कशी मांडे करते हे पाहायला विसोबा आलाच. उलट फजिती न होता मुक्ताबाईने मांडे भाजले होते हे पाहून विसोबा आश्चर्य चकित झाला. ही भावंडे असामान्य आहेत  हे समजले . स्वत:ची चूक उमगली. आपल्याला प्रायश्चित्त मिळाले पाहिजे मगच आपला उद्धार होईल असे म्हणून तो त्यांचे उष्टे अन्न खाऊ लागला. ते पाहून,मुक्ताबाईने “विसोबा तू खेचरा प्रमाणे उष्टे का खातोस?” असे विचारले. आणि या प्रसंगानंतर विसोबा मुक्ताबाईंचे शिष्य झाले. अशी आख्यायिका आहे.

अशाच प्रकारे संत नामदेव यांना ही गुरु चे महत्व पटवून देऊन गुरुशिवाय तुला मोक्षप्राप्ती होणार नाही असे निर्भीडपणे सांगितले.

       तीर्थ यात्रेहून परतलेल्या ज्ञानेश्वरांची भेट घेतली आणि पुढे मुक्ताबाईनी आपला भाऊ ज्ञानेश्वर याची समाधी पाहिली.महिन्याभरातच  सासवडला सोपान आणि वटेश्वरांची समाधी पाहिली. पुणतांब्याला चांगदेवांची समाधी पाहिली.आपल्या बंधूंप्रमाणेच आपल्या शिष्याच्या,चांगदेवाच्या समाधीचा सोहळा व्हावा असे निवृत्तींनाथांना व सर्व संतांना मुक्ताई ने सांगितले. त्यांचीहि अवतार समाप्ती झाली.  आईवडीलांच्या छत्रा नंतर या भावांनीच तिला सांभाळले होते. जिवापाड प्रेम केले होते. त्यामुळे या दोघांची समाधी तिला सहन होणारी नव्हतीच.या सगळ्या घाटनांनंतर मुक्ताबाई आणखीनच विरक्त झाली. उदासीन झाली. मुक्ताबाई, निवृत्ती आणि इतर संतांबरोबर वेरूळ. घृष्णेश्वर करत,वैशाख वद्य द्वादशीला तापी काठावर, मेहुण या गावी आली. नदीवर स्नानासाठी गेले असताना अचानक वीज कडाडली आणि मुक्ताबाई कुणाला काही कळायच्या आत अंतर्धान पावली. निवृत्तींनाथ मुक्ताबाईना खूप जपत होते,तरी हे असे कसे झाले, मुक्ताई कुठेच दिसत नाही ? क्षणात त्यांनी ओळखले की आता अवतार समाप्ती आहे ही. संत नामदेवांनी पण हे अनुभवले आणि त्याचे वर्णन केले आहे ते असे-              

कडाडली वीज निरंजनी जेव्हा l
मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली l
वैकुंठी लक्ष घंटा वाजती एक घाई l
झाली मुक्ताबाई स्वरुपाकार l
एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी l
जेव्हा निरंजनी गुप्त झाली l
गेले निवारुनी आकाश आभुट l
नाम म्हणे कोठे मुक्ताबाई
l

संत जनाबाईंनी आदराने म्हटले आहे , आदिशक्ती मुक्ताबाई | दासी जनी लागे पायी ||'' !

अशी ही आदिशक्ती मुक्ताबाई !

 

ले- डॉ. नयना कासखेडीकर.

---------------------------------------

Monday, 19 September 2022

स्वातंत्र्य लढ्यातील राष्ट्रीय काव्य

 

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त लेख -

स्वातंत्र्य लढ्यातील राष्ट्रीय काव्य

      भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. भारतीय स्वातंत्र्य चळवळ भारताच्याच नाही तर जगाच्या इतिहासातील सर्वाधिक महत्वाची जनतेची चळवळ होती. स्वातंत्र्याचा लढा हा फक्त १५० वर्षांचा नव्हता, तर ते मिळवण्यासाठी भारताने जवळ जवळ १००० वर्षांपेक्षा जास्त काळ त्यासाठी संघर्ष केला आहे. अनेक आक्रमणे परतवून लावली आहेत. ब्रिटिश लोकांनी १८५७ च्या उठावात भारतीयांचा पराभव करून आपली सत्ता उभी केली.     
    मराठी मुलूखात इंग्रजी राजवट इ .स. १८१८ मध्ये सुरू झाली. ब्रिटिश राजवटीचा सर्वच क्षेत्रात समाजाला त्रास होऊ लागला. इंग्रजी शाळा आणि इंग्रजी शिक्षण यामुळे हिंदू संस्कृतीवरच घाला घालणारे वातावरण तयार होत होते. हिंदू लोकांचे ख्रिस्त धर्मात धर्मांतर याचा समाजावर विपरीत परिणाम होऊ लागला होता. गुलामगिरी, पिळवणूक, व्यापार्यांचे  खच्चीकरण, हस्तव्यवसायचा नाश, अशा अनेक बाजुंनी हिंदू समाज भरडला जात होता. त्या वेळचे समाज सुधारक वृत्तपत्रातून या जुलमी राजवटीवर कोरडे ओढत होते. पुढे पुढे तर इंग्रजी राजवटी विरोधात बंड होऊ लागले.

   भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, ब्रिटीशांना इथून हुसकावून लावण्यासाठी हिंदुस्थानात, १८५७ चे स्वातंत्र्यसमर, वंगभंग चळवळ, देशभक्ती चळवळ, मिठाचा सत्याग्रह, स्वदेशी चळवळ, असहकार चळवळ, छोडो भारत आंदोलन, क्रांतिकारकांचे बलिदान अखेरीस भारत पाकिस्तान अशी फाळणी. अशा घटना घडल्या.  विद्वान, पुरोहित, पंडित, मौलवी, लेखक, कलावंत, जमीनदार, शेतकरी, कारागीर असे सर्वजण ब्रिटिश सरकारच्या विरोधात गेले.

    लोकांमध्ये स्वातंत्र्याबद्दल जागृती निर्माण करणे, जुलमी कायद्यांविरूद्ध लढा लढणे, त्याचवेळी दुष्काळला सामोरं जाणे या घटनांनी हिंदू लोकात असंतोष माजला होता. राष्ट्रीय चळवळीचा प्रचार प्रसार, दि हिंदू , केसरी-मराठा, अमृतबाजार पत्रिका, सुधारक, बंगालचा खागीकटा, व्हॉईस ऑफ इंडिया या वृत्तपत्रातून होत होता. यातून ब्रिटिश सत्तेविरुद्ध  जनमत तयार करण्यासाठी व जागृती करण्यासाठी अनेक साहित्यिक, कवी यांनीही आपली लेखणी चालवली होती. यात वृत्तपत्रांचे समाजसुधारक पत्रकार, कामगार वर्ग, लेखक, कवी, सामाजिक पुढारी, उत्कट देशभक्तीने प्रेरित झालेल्या, स्वातंत्र्याच्या आशा-आकांक्षा असलेले क्रांतिकारक, आपापल्या परीने साहित्यातून सुद्धा आपले विचार मांडून जनजागृती करत होते. वृत्तपत्रांनी या काळात महत्वाची भूमिका बजावली होती. विचार व्यक्त करण्याचं आणि विचारांचा प्रसार करण्याचं वृत्तपत्र एक महत्वाचं माध्यम होतं. प्रखर देशभक्ती आणि प्रखर राष्ट्रीयत्व याचा पुरस्कार त्यांनी केला होता.

     वृत्तपत्रे ,पुस्तके ,मासिके, व्याख्याने, उत्सव यातून देशप्रेमाने भारलेल्या राष्ट्रीय कविता हे एक महत्वाचे अभिव्यक्तीचे माध्यम होते. सामान्य लोकांच्या मनात विषय सतत जागा ठेवण्याचा आणि स्फुल्लिंग चेतवायच काम कवींनी केल आहे. स्वातंत्र्य पूर्व काळात म्हणजे १९२० साल हे काव्याच्या इतिहासातले महत्वाचे वर्ष मानले जाते. काव्य हे अभिव्यक्तीचे एक अत्यंत चांगले प्रभावी माध्यम आहे हे अनेक पैलुंवरून सिद्ध होऊ लागले होते. तसतशी आधुनिक कविताही बहरत होती. त्यामुळे १९२०च्या आधीची कविता आणि त्या नंतरची १९५० पर्यंतची कविता यांची वैशिष्ठ्ये ठळक पणे जाणवत होती. त्या त्या परिस्थितीचे प्रतिबिंब या कवितातून उमटले आहे.

   स्वातंत्र्य लढ्यातील टिळकयुग आणि गांधीयुग या काळामध्ये, स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारी कविता लिहिली गेली. यातून सविनय कायदेभंग चळवळ, स्वदेशीचा स्वीकार, बहिष्कार, असहकार, कायदेभंग असे विषय या काळात लिहिले जात होते. धर्मभेद, जातिभेद बाजूला सारून इंग्रजांविरोधी सर्वांनी लढावे असे आवाहन होत होते. स्त्री शक्तीला गीतांमधून जागृत करणे हाही एक उद्देश कविता लिहिण्यामागे असे. शिवाय क्रांतीकार्याचा गौरव, क्रांतिकारकांचा गौरव, सशस्त्र प्रतिकाराची गरज हे विषय लिहिले जात. त्यामुळे इंग्रजी राजवटी विरुद्ध विषय असल्याने या कवितांवर बंदी घालण्यात येई, साहित्य सरकारकडून जप्त करण्यात येई.

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे महाराष्ट्रभाट या टोपण नावाने लिहिलेले  ‘गोमांतक’ या काव्यावर अशीच बंदी घातली गेली. त्यांचा ‘श्री बाजी देशपांडे आणि ‘सिंहगडचा पोवाडा’, कवि गोविंद यांचा ‘अफझलखान वधाचा पोवाडा’, अभिनव भारतमाला’, यांच्यावर बंदी घातली गेली. शाहीर अश्विनीकुमार यांचा ‘भगतसिंगचा पोवाडा’, लक्ष्मण खानविलकर यांची प्रभात फेरीची ‘राष्ट्रीय पद्यावली’, श्रीपाद सातवळेकर यांचे ‘वैदिक राष्ट्रगीत’ यावर बंदी घातली गेली. साने गुरुजींची सत्याग्रही’, देशभक्त किती ते मरती’, तूफान झालो’, स्वातंत्र्य’, सुसंस्कृत कोण? प्रतिज्ञा आणि खंडकाव्य या त्यांच्या पत्री काव्यसंग्रहातील कविता आक्षेपार्ह वाटल्याने, सरकारने या संग्रहावरच बंदी घातली होती. या शिवाय शंकर पूरोहित, दाजी आपटे, अनंत कुमार, त्रिविक्रम पित्रे, धोंडो देशपांडे, त्र्यंबक अभंग, अच्युत कोल्हटकर, नारायण पवार, सिद्राम मुचाटे, काशीनाथ यांच्या अनेक रचना जप्त केल्या गेल्या.       

     अशा सारखी गीते, काव्य रचना संपूर्ण भारतात त्या काळात प्रेरणा देत होते. ब्रिटिश सरकार अशा रचना, आणि त्याची पुस्तके जप्त करत होते, त्यावर बंदी घालत होते. ही सर्व काव्ये समाजात जनजागृती करत होती. राष्ट्राबद्दलची अस्मिता जागृत करत होती. त्यातल्याच काही रचना राष्ट्रीय गीत म्हणून सर्वमान्य झाल्या. त्यातलं वंदे मातरम..., जन गण मन...इत्यादी. आनंदमठ या कादंबरीतले गीत, वंदे मातरम स्वातंत्र्य लढ्यातील काळात घोषगीतच बनले. तर पुढच्या काळात काही गीतांना चाली लावून ती अजरामर झाली, लोकप्रिय झाली.

     स्वातंत्र्य लढ्यात जे जे भोगलं त्याचे हुंकार स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही  उमटत होतेच. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात सर्व भाषांमध्ये राष्ट्रप्रेम गीते लिहिली गेली. उदा. कवि प्रदीप यांचे गीत- ए मेरे वतन के लोगो .... राम सिंह ठाकुर यांचे कदम कदम बढाये जा..’, प्रेम धवन यांचे ए मेरे प्यारे वतन ...’, आणि इतर अनेकांची प्रेरणा देणारी वीरश्रीयुक्त गीते, स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आजच्या पिढीच्या डोळ्यासमोर उभा करतात. तर मधल्या पिढीला त्या काळाची आठवण करून देतात. आपल्या देशाला स्वातंत्र्य जरी १९४७ साली मिळाले असले तरी त्याचा लढा त्या आधीच्या काळात दिलेला होता आणि या प्रेरणेची राष्ट्रीय गीते आणि रचना त्या आधी पन्नास वर्षे लिहायला सुरुवात झाली होती. 

मराठी साहित्यातील देशभक्तीचा प्रवाह, कवि विनायक यांच्यापासून सुरू झाला. पूर्वजांचे वैभव आणि त्यांची वीर वृत्ती याचे लोकांना स्मरण करून देऊन त्यातून त्यांना स्फूर्ति देणे, पारतंत्र्याविषयी लोकांच्या मनात चीड उत्पन्न करणे याच ध्यासाने विनायक कविता लिहीत.

     लोकमान्य टिळकांचा कारावास, चाफेकर बंधूंची फाशी, शिवजयंती, गणेशोत्सव, रशिया- जपान युद्ध, जहाल-मवाळ यांचा वाद, या विषयवारसुद्धा त्यांनी कविता केल्या आहेत. त्यांनी हिरकणी, अहिल्या, पन्ना, रानी दुर्गावती, संयोगिता तारा, पद्मिनी, कृष्णकुमारी वीरमती इ. ऐतिहासिक स्त्रियांच्या जीवनांतील प्रसंगांवर आदर्श सुंदर काव्ये लिहिली आहेत. त्यांनी आपल्या राष्ट्रीय कवितेतून पूर्वजांच्या पराक्रमाची गौरवगाथा वर्णन केली आहे. ते म्हणतात, राष्ट्र भक्तांचे आणि हुतात्म्यांचे बलिदान कधीच व्यर्थ ठरत नाही.  महाराष्ट्रलक्ष्मी या आपल्या कवितेत,

पूर्व दिव्य ज्यांचे, त्यांना रम्य भावी काळ,

बोध हाच इतिहासाचा सदा सर्वकाळ

असा अभिमान ते आपल्या कवितेतून व्यक्त करतात.

     आधुनिक मराठी कवितेचा जन्म केशवसुतांपासून झाला असे मानतात. त्यांचे विषय लौकिक जीवन, वैयक्तिक भाव भावना, भोवताली घडणार्‍या घडामोडी असे असत.  सामाजिक  वातावरणामुळे त्यांना राष्ट्रीय स्वातंत्र्य व समाज सुधारणेचा ध्यास लागला होता. तुतारी, नवा शिपाई, स्फूर्ति, मूर्तीभंजन, गोफण केली छान, अंत्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्न, मजुरावर उपासमारीची पाळी, एका भारतीयाचे उद्गार यात केशवसूत आपला प्रक्षोभ व्यक्त करतात. त्यांची तुतारी ही कविता सामाजिक क्रांतिचे स्तोत्र ठरली आहे असे म्हटले जाते. ते त्यांच्या कवितेत राष्ट्रवादाबरोबर समाज, बंधुभाव, मानवता या मूल्यांचा पुरस्कार करतात. आपले राष्ट्र फक्त स्वतंत्र न होता ते बलसंपन्न आणि समतेच्या विचाराने एकत्र आले पाहिजे असा विशाल विचार ते कवितेत मांडतात.         

   श्रेष्ठ मराठी नाटककार व कवी राम गणेश गडकरी यांना महाराष्ट्राचे शेक्सपियर म्हटले जाते, एव्हढे त्यांचे साहित्य विशेष पैलू असणारे आहे. कविता, विनोदी कथा, नाटक असे साहित्य प्रकार त्यांनी हाताळले.गोविंदाग्रजया टोपणनावाने त्यांनी सुमारे दिडशे कविता लिहिल्या.लोकमान्य टिळक, स्वराज्याच्या मागणीसाठी इंग्लंडला गेले तेंव्हा गोविंदाग्रजांनी लोकमान्य टिळकांना उद्देशून भारत वर्षाचा आशीर्वाद  हे काव्य लिहिले होते. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना पोवाडा सदृश एक मोठी कविता पानपतचा फटका लिहिली. हा सर्व काळ राजकीय स्थित्यंतराचा काळ होता. गडकरींचा उमेदीचा काळ टिळक युगाने भारलेला होता. त्यांची आणखी एक कविता महाराष्ट्राचे गौरवगान करणारी सुप्रसिद्ध आहे.

मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा ।
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ॥ धृ. ॥

 

 दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी यांचे घराणे उत्तर हिंदुस्थानातले होय. रजपूत व मराठे यांच्या पराक्रमाने भारून गेलेल्या तिवारींनी देशभक्ती आणि वीरशक्ती यांचा गौरव करणारी स्फूर्तीपर गीते लिहिली. काव्यकुसुमांजलीकाव्यरत्नमालाया स्फुट कविता. यांव्यतिरिक्त तिवारींनी मराठ्यांची संग्राम गीते मनोहरलीला ऐतिहासिक खंडकाव्य’ ‘काव्यतुषार’, चंडीशतक अशी विविध प्रकारची दीर्घकाव्येही लिहिली. शौर्य, वीर्य, स्वातंत्र्य अशा भावनांची उत्कटता त्यांच्या काव्यात अवतरते. त्यासाठी झुंजलेल्या वीरांचा त्यांना अभिमान वाटे. झाशीची संग्रामदेवता या काव्यसंग्रहात, झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या पराक्रमाचे वर्णन येते. मेरी झाँसी नही दूंगीया प्रतिज्ञेपासून तिच्या बलिदानापर्यंतच्या पराक्रमावर त्यांनी दहा कवने लिहिली आहेत.

 कविवर्य बा. भ. बोरकर अत्यंत संवेदनशील. त्यांच्यावर देशातील अनेक घटनांचा प्रभाव पडला आणि तो त्यांच्या कवितेत दिसतो. त्यांना देशाबद्दल ज्वलंत अभिमान आहे आणि गुलामगिरीबद्दल चीड आहे ते कवितेत प्रतिबिंबीत होते. त्यांच्या महाराष्ट्र गीत  भगवती स्वतंत्रतेस’, स्वातंत्र्य लक्ष्मीस’, स्वातंत्र्याची सिंहगर्जना या कवितेत स्वातंत्र्याचा ध्यास दिसतो. त्याचप्रमाणे थोर हुतात्मे आणि महात्मेयांच्या बद्दल त्यांना वाटणारा आदर जाणवतो. सर्वस्वाचे बलिदान देणार्‍या वीरांना ते तेथे कर माझे जुळती या कवितेत वंदन करतात.

दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती ॥धृ.॥

 याच प्रमाणे कवि भा.रा.तांबे यांची कविता,

रे हिंदबांधवा, थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी,
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झांशिवाली
 ||

ही सर्वज्ञात आहेच. भा. रा. तांबे यांना पारतंत्र्याची अत्यंत चीड होती. इंग्रजी सत्तेविरूद्ध त्यांनी आपल्या कवितेतून आवाज उठवलेला दिसतो. घटोत्कच माया, तरुणाचे पाते, अर्जी ऐका हो सरकार, साम्राज्यवादि, मातृभूमीप्रत कोण रोधील? अशातून ती चीड व्यक्त होते.

नाशिकचे भूमीपुत्र कवी गोविंद त्र्यंबक दरेकर ऊर्फ स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंद- नाशिकचे भूमीपुत्र.  

राष्ट्रस्वातंत्र्य द्या, हिंदभूला नवे!
धर्म-स्वातंत्र्य तें हिंदभूला हवे!
ज्ञानस्वातंत्र्य ती प्रार्थुनी मागते!
हिंदभू वांछिते सकल स्वातंत्र्य तें!

आणि रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले’, अशा सारख्या काव्यांतून स्वातंत्र्याची ललकारी देणारे, राष्ट्रीय भावनेचे बीजारोपण करणारे आद्य कवी म्हणून कवी गोविंद ओळखले जातात. स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका वठविणाऱ्या सावरकरांच्या अभिनव भारत ऊर्फ मित्रमेळा संघटनेच्या कार्यात कवी व एक मुत्सद्दी म्हणून त्यांनी भूमिका निभावली होती.

    राष्ट्रीय जाणिवेच्या कविता लिहिणारे आपल्या सर्वांना माहिती असणारे या कालखंडातील महत्वाचे कवी म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. श्रीमंत सवाई माधवरावाचा रंग ही त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी लिहिलेली पहिली कविता. बाजीप्रभू, तानाजी यांच्यावरील पोवाडे रचना त्यांनी केली. त्यांच्या कवितेचा गाभा हा राष्ट्रप्रेम किंवा देशभक्ती हाच होता. त्यांच्या कवितेने मनामनात देशभक्तीची प्रेर णा जागवली आहे.त्यांचे हे  

शस्त्रगीत

व्याघ्र-नक्र-सर्प-सिंह हिंस्त्र जीव संगरी
शस्त्रशक्तीने मनुष्य ही जगे धरेवरी।।

 सारख्या सागरास, सांत्वन, बेडी, पहिला हप्ता, चांदोबा चांदोबा भागलास का?, मूर्ति दुजी ती, माझे मृत्यूपत्र, आत्मबल, सायंघंटा अशा दर्जेदार काव्यरचना मराठी साहित्याला बहाल केल्या. मृत्युपत्रात तर स्वातंत्र्य देवतेसाठी मरण म्हणजे जनन अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. सावरकरांच्या कवितेत राष्ट्रीय जाणीव अत्यंत दिव्य आणि दाहक स्वरुपात दिसते.

     याशिवाय माधव काटदरे, साने गुरुजी, आज्ञातवासी, कुसुमाग्रज, सेनापति बापट, माधव ज्युलियन, यशवंत, कवी अनिल, विंदा करंदीकर, वसंत बापट, कुंजविहारी, अमर शेख, आण्णा भाऊ साठे या कवींनी सुद्धा आपल्या कवितातून इंग्रजी राजवटीच्या विरोधात चीड, संताप व्यक्त केला. त्यातून राजकीय जागृती घडवून आणली.

सेनापती बापट यांची कविता-            

 येणार कोण बोला?

आईवरी विपत्ति, आम्ही  मुले कशाला

बंदित मायभू ही, आम्ही खुले कशाला,

जखडूनी बांधीयेली, बघवे तिच्या न हालां,

तिज फांस नित्य फट्के, हृदयात होय काला ,

रक्ताळले शरीर, भडका जिवांत झाला,

आईस सोडवाया, येणार कोण बोला ?||||

तर,साने गुरुजी यांच्या बलसागर भारत होवो, मनमोहन मूर्ति तुझी माते, देशासाठी मरू, एकाच वेड, भारत सेवा, भारत माता माझी लावण्याची खाण, दिव्य मी स्वर्ग निर्मीन या कवितेत व्यक्त होते.

 अशा कविता प्रसिद्ध होऊ लागताच इंग्रज सरकारने त्या जप्त करून नष्ट करायला सुरुवात केली. या कवितातून सत्याग्रह, असहकार अशा चळवळींना प्रेरणा मिळत असे. कवींनी आपल्याला पटलेले आणि भावलेले स्वातंत्र्य लढ्याच्या मार्गाचे वर्णन यातून केले आहे.

   एकोणीसाव्या शतकात जी परिस्थिति होती, देश पारतंत्र्यात होता, यातून समाजाला जागं करण्यासाठी कवींनी  काव्यलेखन केले. ते त्या काळात प्रभावी व परिणामकारक ठरलेले दिसते. या राष्ट्रीय कविता स्वातंत्र्यासाठी  इंग्रज सरकारच्या विरोधातल तीव्र अभिव्यक्तिचं साधन ठरल्या. अशा या काळातील काव्यातून आपल्या देशाचा वैभवशाली इतिहास उद्याच्या पिढीला समजू शकतो. लोकांमध्ये चैतन्य निर्माण करू शकतो. देशाच्या आणि लोकांच्या उन्नतीला पूरक ठरणारे हे काव्य स्वातंत्र्य लढ्यातील राष्ट्रीय वाड्मय म्हणून श्रेष्ठ दर्जाचे ठरते.

हा लेख नागपूरच्या 'विदर्भ हुंकार' या विशेषांकात प्रसिद्ध झाला. 



 लेखन-  डॉ.नयना कासखेडीकर.

                                                     -----------------------