Friday, 25 April 2014

सुपर गोल्डी चाय !

सुपर गोल्डी चाय !

 


          'चायवाले...चाय ... सुपर गोल्डी चाय' असं शांतपणे ओरडत डब्यातला चहावाला आधी एकदा येवून गेला होता.पहाटे पाच नंतर गाडी थांबेल तिथे रेल्वे स्टेशन वरील सुमारे १०चहावाले तरी ओरडत येवून चहाची ऑफर देवून गेले होते.पण रेल्वेचा चहा अजिबात नको म्हणून दुर्लक्षच केलं होतं.मागच्याच आठवड्यात पुणे- ग्वाल्हेर एक्सप्रेसने बडोद्याला चालले होते.बडोद्याला गाडी सकाळी १० वाजता पोहोचणार होती.उतरून पुन्हा चहा-पाण्यात वेळ घालवायचा नव्हता, हा विचार करते तेव्हढ्यात पुन्हा सुपर गोल्डी चाय वाला आला. त्याने खुणेनेच विचारले,चहा हवा का? मी विचारात पडले. तेव्हढ्यात माझा भाऊ म्हणाला आधी एक कप घेवून बघूया.तसा चहावाला म्हणाला, 'सुपर गोल्डी है, पीके देखो'. शेवटी घेतला आणि काय म्हणावं एव्हढा सुंदर चहा घराबाहेर पडल्यावर आजपर्यंत कधीच मिळाला नव्हता .चहाचा कप हातात घेतल्या बरोबर चहा न पिताच चहाच्या रंगावरून, मी भावाला म्हटलं चांगला आहे. घे दोन कप आणि... तो चहा पिऊन समाधान झालं. दहा रुपये प्रमाणे दोन चहाचे वीस रुपये घेऊन तो गेला.
         

         सुपर गोल्डीची स्वारी पुन्हा १५/२० मिनिटांनी आली. मी आणि भावाने एकमेकांकडे कटाक्ष टाकला. पुन्हा त्याचा सुंदर चहा घ्यावासा वाटला. दुस-यांदा चहा देताना तो म्हणाला, आज गाडीमे अच्छां पब्लिक नही है,खराब है.बापरे, हा एकदम गाडीतल्या पब्लिक वरच का घसरला? मी म्हटलं, क्यूं ? क्या हुआ ? "आज ग्वाल्हेर का पब्लिक नही है.ऐसाही है.नही तो सैकडो चाय बिक जाती एक घंटेमे.आज कबसे घूम रहा हूं, अभी तक ६/७ चाय ही बिक गयी" .बिचारा नर्व्हस झाला होता.तो नक्की ग्वाल्हेरचा असावा.म्हणूनच त्याला खानदानी पब्लिक कसं असत ते माहिती असणार.(चला आम्ही त्याच्याकडून ४ कप चहा घेऊन आमचं  ग्वाल्हेरचे नसूनही खानदानी पण सिद्ध केलं होतं याचा मनात आनंद झाला) कारण ग्वालिअर हे अखिल भारतातले एक खानदानी शहर. मैलोन मैलांवरचा बकालपणा इथे पोहोचू शकत नाही, शाही संस्थानिकांची शाही संस्कृती ग्वाल्हेर रेल्वे स्टेशन पासूनच सुरु होते.चहा विक्रेत्यालाही नुसत्या चहा वरून माणसं ओळखता येतात.यालाच म्हणतात संस्कृती.चहा हे नुसते पेय नाही, चहा ही संस्कृती आहे तीही जगभरातली .दैनंदिन व्यवहारात आणि लोकांचे आदरतिथ्य करण्यात चहाला महत्वाचे स्थान आहे. चहा हे भारतीय लोकांना एकत्र आणण्याच पेय आहे.

 
श्रीलंकेतला पारंपारिक "Tea Stall"
        याच्या उलट प्रसंग चहावरून संस्कार ओळखण्याचा.एका लग्नात वराकडची मंडळी उशीरा आल्याने,सीमन्त पूजनाआधी जेवणे उरकवून घेतली आणि सीमन्तपूजन रात्री साडे बाराला संपले .अर्थातच स्वयंपाक पाणी हा विषय संपला होता.आता वराकडच्या मंडळीनी आत्ता आम्हाला चहा पाहिजे अशी मागणी केली.रात्री साडेबाराला चहाची सोय होण कुठल्याच अर्थान शक्य नव्हत.वधू पक्ष अडचणीत आला.सर्व प्रथम दूध कुठे मिळेल? एक जण म्हणाला,अरे रेल्वे स्टेशन वर जावून ५० कप चहा घेऊन या पटकन ,कल्पना चांगलीच होती.चार दिशांना चौघांना पाठविले, दूध किंवा चहा जे मिळेल ते आणायला .कार्यालापासून रेल्वे स्टेशन, दूध डेअ-या, असे सर्व शोधून मंडळी रिकाम्या हाताने परतली होती .थोडयाशा वादावादीनंतर , समजूत घालून चहाचा विषय मिटवला होता. रात्री एक दीडला कसा मिळणार चहा? दुस-यांच्या लग्न कार्यात मान घेऊन मिरवणा-यांचा एक वर्ग असतो. तो अशा वेळी पुढे असतो.

अलाहाबाद रेल्वे स्टेशनवरील चहा विक्रेता 

      चहामुळे व्याह्यांचेच नाही तर अंतरराष्ट्रीय संबंध कसे बिघडतात याचा आणखी एक किस्सा , अमेरिकेत वसाहत केलेल्या लोकांवर इंग्लंडने इतर वस्तुंबरोबर चहावरही कर लावला. त्यामुळे लोक चिडले.याचा निषेध करण्यासाठी बॉस्टन मधील लोकांनी चहाच्या पेट्या तिथल्या समुद्रात फेकून दिल्या. ही घटना 'बोस्टन टी पार्टी' नावाने प्रसिध्द आहे. अमेरिकेतील क्रांती नंतर इंग्लंडची सत्ता संपली आणि अमेरिकेतील लोकांनी चहावर बहिष्कार घातला आणि कॉफीचा वापर जास्त प्रमाणात सुरु झाला.


काश्मीर चा 'पिंक' टी

       असो, पण चहा हे माणस ओळखण्याचं. नाती जोडण्याचं फक्कड माध्यम नाही का?  असा हा चहा जगात प्रसिध्द आहे. असं हे चहा पिणं एक निमित्त असतं आणि त्यातून आपला स्वार्थ साधायचा असतो. सार्वजनिक ठिकाणी म्हणाल तर, कुठे मिटिंग पॉईंट वर, कधी ऑफिस मध्ये टी टाईमला, कधीकार्यशाळांमध्ये, लग्न समारंभात, नाटक सिनेमाच्या मध्यंतरात, हे सर्व चहा असतात संवाद साधण्यासाठीचे. तेव्हढ्या वेळात ताज्या घडामोडींवर भाष्य करण्याचे. मत व्यक्त करण्यासाठीचे. तर वैयक्तिक चहाच निमित्त असतं ,डोके दुखी,सर्दी,चहाची लहर आली म्हणून, पावसाळ्यात खूप पाऊस पडतोय वातावरण आल्हाददायक आहे म्हणून, खूप थंडीत थंडी वाजते म्हणून आणि बरीच काही कारणे.  


        काळा चहा (ब्ल्याक टी ), हिरवा चहा (ग्रीन टी), उलोंग टी (हा फक्त तैवान मध्ये होतो) ब्रिक टी, लेप्पेट टी (हा फक्त लोणच्यासाठी किंवा भाज्यांसाठी वापरतात),झटपट चहा (इंस्टट चहा ), सुवासिक चहा. चहाचे एव्हढे प्रकार आणि चहा तयार करण्याच्या पद्धतीही अनेक.  जपान आणि चीन मध्ये दूध न वापरता किंवा कमी दुधाचा चहा पितात.रशियात दुधाऐवजी लिंबाचा रस वापरतात. तिबेट मध्ये चहात लोणी घालायची पद्धत आहे. अमेरिकेत कोल्ड टी घेण्याची पद्धत आहे.पण.. आपला चहाच सर्वांचा जास्त आवडता .भारतीय चहा परदेशात सुद्धा एका कंटाळवाण्या क्षणी उत्साह आणू शकतो. इतकी इंडिअन टी ची क्रेझ आहे.


         इंग्लंड मधील पूर्व आणि पश्चिम ससेक्स यांना जोडणा-या हेरीटेज मार्गावरची ब्ल्यू बेल रेल्वे. हा मार्ग १७.७ किलो मीटर लांबीचा आहे.या रेल्वेतून प्रवास करताना तुम्हाला संपूर्ण पारंपारिक दुपारचा चहा मिळतो.यात प्रामुख्याने असतो,भारतीय चहा,त्या बरोबर सँडविचेस,केक्स,फ्रुट ब्रेड,शॉर्ट केक.ही लाउंज कार ठराविक दिवशी धावते.म्हणजे स्पेशल valentines,mothers आणि Christmas यावेळी.तुम्ही हे बुकिंग गिफ्ट करू शकता. ते वर्षभर valid असते.आणि हो आगाऊ बुकिंग २ महिने आधी कराव लागत.बघितलंत customer service कशी आहे ते?



       कार्डिफ ही युकेमधल्या वेल्स देशाची राजधानी. इथे आहे पहिलं आगळ वेगळ ऑथेंटिक चाय हाउस 'चायहोलीक्स' .आपल्या देशातल्या मोठ्या शहरातल्या दिल्ली,मुंबई ,अलाहाबाद इथल्या बाजारातील,रेल्वे स्टेशनवरील, टी स्टोल वर दिसणा-या  चायवाल्याचे परदेशात भारी आकर्षण.त्यांची चहा विकण्याची शैली ,भाषा,हालचाली ,चपळता हे अगदी संस्कार केल्यासारखे आणि असाच पारंपारिक दृष्टिकोन ठेवून या चायहोलीक्सनं नव्या रुपात नवी टेक्नोलॉजी वापरून हे रेस्टॉरंट चालू केलंय.इथे तुम्हाला मिळेल लोकल आणि रिजनल कुठलाही चहा.नव्या कल्पना.उत्तम दर्जा ,उत्तम सेवा यासहीत.


       मेन्युत काय आहे माहित आहे? हाताने बनवलेल्या भारतातील विविध प्रदेशातल्या  विविध प्रकारच्या मसाला चहाचे कप .म्हणजे मुंबई बझार चाय, ट्रक स्टॉप चाय, इंडिअन रेल्वे चाय, क्लासिक मसाला चाय, अरोमॅटिक कार्डमम चाय,एनार्जीसिंग जिंजर चाय, रीफ्रेशिंग लेमन ग्रास चाय.शिवाय भारतातल्या प्रसिध्द चहाच्या मळ्यातला एकदम ताजा आणि शुद्ध .नैसर्गिक चहा अर्थात,दार्जीलिंग टी ,निलगिरी टी ,अप्पर आसाम टी, हिमालयन सिक्कीम टी .चहा एकच पद्धती अनेक .आपलाच चहा वेगळ्या संस्कृतीत वेगळ्या पद्धतीत सादर केला जातो ,आधुनिक ,आकर्षक, स्वच्छ असा.


         चहा हे उत्साह वर्धक पेय आहे. जगातील जवळ जवळ निम्मे लोक चहा पितात. सुखवस्तू तिबेटी लोक दिवसाला तीस ते सत्तर कप चहा पितात असे सांगितले जाते . भारतात खाजगी उद्योगात चहा उद्योगाला प्रथम पसंती आहे तर रेल्वेच्या खालोखाल चहा उद्योगातील कामगारांची संख्या आहे आणि तागा नंतर सर्वात अधिक परदेशी चलन मिळवून देणारा हा उद्योग आहे.

           आता मला सुपर गोल्डी चाय वाल्याचं म्हणणं पटल कि चहा हे संस्कृती दर्शक पेय आहे.कारण , चहा विकणा-याची संस्कृती वेगळी,चहा पिणा-याची वेगळी.राज्या राज्यांची वेगळी आणि राष्ट्रां राष्ट्रांची वेगळी .म्हणूनच चहा हे राष्ट्रीय पेय आहे ज्याने भारतीय संस्कृती जगभर नेली.    


- डॉ. नयना कासखेडीकर

Saturday, 19 April 2014

पाहिल्याने प्रदर्शन


पाहिल्याने प्रदर्शन ...
        


       बालपण ही देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. बालपणीचा काळ हा जीवनातला अत्यंत आनंदाचा, नवीन गोष्टी शिकण्याचा आणि संस्कार करण्याचा महत्वाचा काळ. 'बालपण' जगातल्या सर्व देशात, सर्व काळात आहे. म्हणूनच लहान मुलांच्या करमणूकीसाठी रंगीबेरंगी साधने व उपकरणे जगात सर्वत्र आढळतात. अगदी अश्मयुगापासून ती तयार होत असल्याचे अनेक पुरावे उत्खननात सापडले आहेत. ही साधने म्हणजेच खेळणी, त्या त्या युगाची संस्कृती सांगतात. या खेळण्यांतून लोकजीवन कळते.
     
        विटी-दांडू, सागरगोटे, गोट्यां, ठीक-या, लगोरी आणि भातुकली हे आपले पारंपारिक खेळ. लहान मुलींची बाहुली त्यात आलीच. 'बाहुली' हे जगभरातलं समान खेळणं. मोहेंजोदडो-हडप्पा संस्कृतीत, शृंगकाळात, कुशाणकाळात व गुप्त काळातल्याही बाहुल्या होत्या. भारतात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश या प्रांतात मुली भातुकली मांडून बाहुला-बाहुलीचं लग्न लावतात. शिवाय काही ठिकाणी तर मुलीच्या लग्नात  बाहुल्या, भातुकलीची भांडी अशा वस्तू आंदण म्हणून देण्याची प्रथा आहे. जेणे करून मुलामुलींनी प्रत्यक्ष संसाराला लागण्यापुर्वी ती भांडी हाताळावीत, अनुभवावीत.म्हणजे भविष्य काळात किचन कसे हाताळायचे याची ही रिहर्सल असायची. प्रत्येक राज्यातल्या बाहुलीचं नाव वेगळं. बंगालची असते कालीचंडिका, राजस्थानची गंगावती तर महाराष्ट्राची आपली ठकी. या बाहुल्या नुसताच एक खेळ नसून या बाहुल्यांवरून त्या त्या प्रांताची परंपरा, पोषाख, संस्कृती यांचा इतिहास कळतो.            
   

          दिल्ली येथे ४,नेहरू हाउस, बहादूरशहा जफरमार्ग,दिल्ली,११०००२. (वेळ-स.१०ते सायं ६) येथील शंकर्स इंटरन्याशनल डॉल्स म्युझिअम मध्ये जगातल्या सुमारे ८५ देशातल्या ६५०० बाहुल्या पाहायला मिळतात. भारतीय पोशाखातील १५० प्रकारच्या बाहुल्या, भारतीय नृत्यप्रकार कथ्थकलीच्या संपूर्ण कोस्च्युम्ससहित बाहुल्या. जपान मध्ये मुले आणि मुलींसाठी वापरणा-या बाहुल्या, इंग्लंडच्या राणीच्या संग्रहातील रेप्लीका डॉल, हंगेरीच्या मेपोल, जपानच्या सामुराई डॉल, थायलंडचा वूमेन ऑर्केस्ट्रा अशी जगाच्या कानाकोप-यातून आणलेल्या आणि भेट म्हणून मिळालेल्या बाहुल्यांची विविध रूपे आहेत.

       १९६५ मध्ये राजकीय व्यंगचित्रकार के.शंकर पिल्लई(१९०२-१९८९) यांच्या कलेक्शन मधून भारतातले हे खूप मोठे प्रदर्शन उभे राहिले आहे.यात हाताने बनवलेल्या विविध पेहरावातल्या असंख्य प्रकारच्या बाहुल्या लहान मुलांचे बालपण तर दाखवितातच परंतु विविध देशांमधील विविध काळातील संस्कृती, डिझाईनचे नमुने, दाग-दागिने, अशी अभ्यासपूर्ण कलाकुसर पाहायला मिळते. युरोपिअन देश, एशियन देश, मध्य पूर्व देश, अफ्रिका आणि भारत या प्रांतातल्या सुंदर बाहुल्या इथे पहायला मिळतात. अशा प्रकारची प्रदर्शने खूप माहिती देत असतात. असंच दुसरं महाराष्ट्रातील भातुकलीच फिरतं प्रदर्शन आपल्या मागील पिढ्यांचा वारसा सांगतं.


         भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य म्हणजे इथली कुटुंबपद्धती, परंपरा चालीरीती इत्यादी होत, त्यामुळे आपल्या संस्कृतीचा पाया भक्कम. 'भातुकली' या चिमुकल्या संसारात या सर्व संस्कृतीचं प्रतिबिंब  पाहायला मिळतं. भातुकलीचा खेळ बाजारात कुठेही मिळतो. पण, आज भातुकली खेळायला मित्रांची, भावंडांची कंपनीच नाही आणि मुलांना व पालकांना वेळही नाही.  काळाच्या ओघात चौसोपी वाडे जाऊन घरे झाली, घरे जाऊन आज इमारती उभ्या राहिल्या. त्यामुळे वन बीएचके, टू बीएचके मध्ये जागाही कमी झाली. प्लास्टिकचा जमाना. युज अॅंड थ्रो पद्धत, शिवाय गरजाही बदलल्या. त्यामुळे जुनी, पारंपारिक भांडी, वस्तू जपून ठेवायला जागाच नाही. मुलांच्या खेळण्यांना तर थाराच नाही. आमच्या वेळचा भातुकलीचा संसार आम्ही सांभाळून ठेवू शकलो नाही ही खंत आज वाटते. मला वाटतं ही सर्वांचीच खंत असणार. पण आपल्या आजच्या पिढीला, पुढच्या पिढीला ही संस्कृती, हा वारसा, परंपरा, इतिहास समजावा म्हणून काही छंद जोपासणारे ,संग्राहक अशा वस्तूंचा संग्रह करतात. पुण्याच्या विलास करंदीकर यांचा भातुकलीच्या संग्रहाचा खटाटोप आहे.

         ही संस्कृती, हे संस्कार जपले जावेत, तुमच्या आमच्या घरातल्या काळाच्या पडद्याआड गेलेल्या वस्तूंची माहीती व्हावी, परंपरेची ओळख व्हावी या उद्देशाने करंदीकर आपल्या भातुकलीचं प्रदर्शन भरवतात. 'भातुकली म्हणजे करंदीकरच' हे समीकरण पुणेकरांना ठाऊक आहे. कारण झाडून सर्व पुणेकर इतिहासप्रेमी, परंपरा व वारसा जतन करणारे. योगायोगाची गोष्ट म्हणजे करंदीकरांच्या पुढच्याच गल्लीत राजा केळकर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचं संग्रहालय आहे. जे कै. दिनकर केळकर यांच्या वैयक्तिक छंदातूनच निर्माण झालेलं आहे. विलास करंदीकरांचं 'भातुकली' प्रदर्शन हेदेखील वैयक्तिक छंदातूनच साकारलंय. परंतु मुख्य फरक आहे 'भातुकली' हे प्रदर्शन फिरतं, चालतं बोलतं आहे आणि या संग्रहातल्या पारंपारिक वस्तूंशी आपला थेट संबंध आहे. ते पाहताना अरे ही तर आपण खेळलेली भांडीकुंडी, चूल बोळकी आहेत. मग आपण मुलामुलींना, भाच्या पुतण्यांना, नातवंडांना "आमच्यावेळी हे असं होतं" हे सांगताना, त्या वस्तू प्रत्यक्ष दाखविताना, केवढा आनंद होतो. अशा या भातुकली प्रदर्शनातील भांड्यांच्या इतिहासाचे साक्षीदार आपण स्वतःच असतो.


        करंदीकर यांच्या या चिमुकल्या संसारात ३००० भांडी आहेत. ती पितळी, स्टील, तांबे, लाकूड, दगड, सिमेंट, कापड, माती आणि चांदीची सुद्धा आहेत. भांड्यांच्या छोट्या प्रतिकृती अगदी हुबेहूब. छोटी असूनही प्रत्यक्ष वापरता येणारी भांडी आहेत. यातला तांब्याचा छोटा बंब पेटवून पाणी गरम होतं, स्टोव्ह पेटवून चहा करता येतो, चकलीच्या सोऱ्यातून चकली करता येते. हापशीतून धो-धो पाणी पडते.या संग्रहात वसुदेव प्याला, संपूट, दिव्याच्या समया, गंगेचे भांडे,  तिर्थोटी, आड-रहात, दगडी डोणी, अग्नीहोत्र पाट, बंब, दूधदूभत्याचं  कपाट, चुली व शेगड्यांचे,  भांड्याचे  अनेक प्रकार, भाताच्या भत्त्या,  वेड्भांडे,  शकुंतला भांडे,  रुबवटा,  ठेचणी या घरातून  हद्दपार झालेल्या वस्तूंबरोबरच मोक्षपट,  गंजीफासारीपाट, सागरगोटे, गुंजा असे पारंपारिक  खेळही आहेत. तसेच  देवपूजेची भांडी, प्रवासाची साधने यांचाही इतिहास कळतो. या प्रदर्शनात भर पडली ती चांदीच्या भातुकलीची.  

     १९९० मध्ये जुन्या वाड्याच्या नूतनी करणा पासून हा संग्रह सुरु झाला.हळू हळू २६८ भांडी झाली.त्याचं पाहिलं प्रदर्शन पुण्याच्या बालगंधर्व कलादालनात मे १९९८ मध्ये भरलं.आता पर्यंत महाराष्ट्रात व बाहेर  १५० च्या वर प्रदर्शने झाली.प्रत्येक वेळी त्यांच्या संग्रहात नवी भर पडत आहे. प्रदर्शन बघायला ९१ वर्षांच्या आजी, त्यांची ६६ वर्षांची मुलगी, तिची ३५ वर्षांची सून व तिची ६ वर्षांची मुलगी अशा चार पिढ्या एकाच वेळी येतात तेव्हा त्या आजींना त्यांचं  बालपण आठवतं ,तर पणतीला पणजीच्या वेळच्या भांड्यांच कौतुक वाटतं.


        अशी ही भातुकली. म्हटलं तर लहान मुलांचाच खेळ. पण त्यांच्या जीवनातील हा महत्वाचा टप्पा. खेळ त्यांच्या मानसिक वाढीला पोषक असतात. खेळणी मुलांची नुसतीच करमणूक करत नाहीत. त्यांच्यात जिज्ञासा निर्माण करतात. त्यांची कलात्मक प्रवृत्ती वाढवितात. या खेळातून त्यांना एकमेकांबद्दल प्रेम, ओढ, मन जपण्याची, सहकार्याची, कर्तव्याची अशा मानवी नातेसंबंधातल्या भावभावनांची, जीवनातल्या मूल्यांची शिकवण मिळत असते. खेळ म्हणजे बिनभिंतींची शाळाच असते.  

      लुटूपूटूच्या संसारात ही मुले कधी आई-बाबा होतात, कधी डॉक्टर, तर क्षणात शाळाशाळा खेळतात. क्षणात भूक लागते. दुसऱ्याच क्षणाला विद्यार्थी झालेली ही मुलगी आई होऊन स्वयंपाक करते. सर्वांना समाधानाने जेवू घालते. असं हे बालविश्व.  या आपल्या आठवणींना हे प्रदर्शन उजाळा देतं. अशी संग्रहालये आणि प्रदर्शने मनोरंजना बरोबरच ज्ञान देतात. पालकांनी आणि शिक्षकांनी अशांची दखल घेतली पाहिजे. ती मुलांना आवर्जून दाखवली पाहिजेत. कित्येकदा आपल्याच शहरातलं एखादं संग्रहालय सुद्धा आपल्याला माहिती नसतं किंवा ते महत्वाचही वाटत नसतं. पालकांच्याच मानसिकतेवर मुलांची मानसिकता अवलंबून असते. तेव्हा ही दोन्ही प्रदर्शने मुलांना जमेल तशी, जमेल तेंव्हा अवश्य दाखवा. पर्यटन किंवा सहलीला गेलात तर तिथल्या म्युझियमला नक्की भेट द्या.     

डॉ.नयना कासखेडीकर

Tuesday, 8 April 2014

"गीत रामायण आणि सुधीर फडके "



"गीत रामायण आणि सुधीर फडके "


     श्री प्रभू रामचंद्रांचे चरित्र म्हणजे हिंदू संस्कृतीचा गौरवशाली इतिहास. सर्वश्रेष्ठ आदिकवी महर्षी वाल्मिकींनी चोवीस हजार श्लोकांचे रामायण लिहिले. भारतीयांच्या मनावर या रामायणाने हजारो वर्षे राज्य केलं आहे. संस्कृत मध्ये ९४ रामायणे आहेत. मराठी, हिंदी, तामिळ, कानडी, तेलुगु, गुजराती, डोगरी, बंगाली, ओडिसी, असामी, फारसी, प्राकृत, अशा प्रादेशिक भाषेतून सुद्धा रामायण सर्व भाषिकांपर्यंत पोहोचले आहे. कवी मोरोपंतानी तर १०८ रामायणे रचली. संत एकनाथ, श्री समर्थरामदास, अशा संत आणि अनेक साहित्यिकांनी रामायणाच्या माध्यमातून जनतेच्या मनाची जडण घडण केली आहे. जगाच्या इतर भाषांत सुद्धा इंग्लिश, जर्मन, इटालियन भाषेत रामायण आहे. इतके सगळे रामायणाचे अवतार. पण, गदिमांची रससिद्ध प्रज्ञा आणि बाबूजींची सांगीतिक प्रतिभा यांचा अजोड अविष्कार म्हणजे 'मराठी गीतरामायण'.
     
     महर्षी वाल्मिकींच्या रामायण या महाकाव्याला सरस्वतीपुत्र ग.दि.माडगुळकर यांनी केवळ छपन्न गीतात समूर्त साकार केलं. लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला हा एक मराठी विश्वातला चमत्कारच होता. पिढ्यान पिढ्या स्मरणात राहील अशी कलाकृती म्हणजे हे ' गीत रामायण 'या गीत रामायणाने मराठी ला अजरामर केलंय ,याचा आम्हा मराठीना अभिमान आहे.

    
      या गीत रामायणाने रसिक श्रोत्यांवर, अगदी सामान्यातल्या सामान्य माणसालाही वेड लावले. का नाही लावणार? एकतर ही रामायणातील गीते आपल्या बोली भाषेतली, नवरसांनी ओतप्रेत भरलेली, मधुर चालींची, कमालीची भावोत्कट. भारतीय जीवन मूल्यांची महती सांगणारी, मनुष्य जीवनातले आदर्श कसे असावेत याचा धडा देणारी, चांगले व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी प्रेरणा देणारी गीते. शिवाय बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांच्या स्वर्गीय संगीत, सुरेल चाली आणि दैवी आवाजामुळे ही रामायणातली गाणी साक्षात रामकथेतील प्रसंग, पात्रे आणि घटनाक्रम यांचे मूर्तिमंत चित्र डोळ्यासमोर उभे करतात. कवीच्या शब्दातील भावना जशाच्या तशा रसिकांपर्यंत पोहोचवण्याच काम त्यांनी केलं आहे. सिद्धहस्त गदिमांच्या कवितेतील शब्दांचा भाव, कवीची भूमिका अत्यंत तन्मयतेने गाण्यातून सादर केली आहे. तरीही गदिमा आणि बाबूजी दोघेही याचे श्रेय घेत नाहीत.ते श्रद्धेने म्हणतात की,"गीतरामायण आम्ही केलेले नाही ते आमच्या हातून झाले आहे. नाहीतर संगीत क्षेत्रात आज असंख्य मोठमोठे कार्यक्रम होत आहेत. पण जोपर्यंत त्याची माध्यमातून प्रसिद्धी होत आहे तोपर्यंतच ते लक्षात राहतात. गीत रामायणाचे हेच वैशिष्ठ आहे, म्हणूनंच ते निर्मिती नंतर ६० वर्षांनी सुद्धा कोटी कोटी लोकांच्या मनात घर करून आहे, गदिमा याबद्दल त्यांच्या कवितेत म्हणतात,

‘अजाणतेपणी केव्हा, माता घाली बाळगुटी,
बीज धर्माच्या द्रुमाचे, कणकण गेले पोटी !
छंद जाणतेपणीचा, तीर्थे काव्याची धुंडिली,
कोणा एका भाग्यवेळी, पूजा रामाची मांडिली !  

     गदिमांनी एका शुभ क्षणी रामाची पूजा मांडली आणि प्रासादिक रचना असलेल्या गीत रामायणाचा जन्म झाला. पण रामकथेचे बीज त्यांच्या मनावर लहानपणीच रुजले होते. तर बाबूजी थोर गायक व संगीतकार याबरोबरच कट्टर हिंदुत्ववादी आणि निष्ठावान देशभक्त होते. निश्चयी स्वभावचे, कडक शिस्तीचे, कष्टाळू, कलेची गुणग्राहकता असलेले, व्यावसाईक निष्ठा असणारे आणि स्वताच्या व्यक्तिमत्वात राम असलेले होते. गीत रामायण म्हटले की गदिमा आणि बाबूजी दोघेही आलेच. गदिमाबद्दल लिहायचे तर बाबूजी अनिवार्य आणि बाबुजीबद्दल लिहायचे तर गदिमा अनिवार्य आहेत. इतके ते कवी, संगीतकार आणि गायक म्हणून एकरूप झालेले.

     बाबूजींचा कोल्हापूरमधील बालमित्र माधव पातकर यांनी एच.म.व्ही. कंपनीसाठी गीते लिहिणाऱ्या ग.दि.माडगुळकर यांची साधारण १९३८|३९ च्या सुमारास कोल्हापूरला,’ हा माझा मित्र राम फडके, गातो आणि गाण्यांना चाली लावतो’ अशी बाबुजीशी ओळख करून दिली ती मैत्री शेवटपर्यंत होती. गदिमांच्या ‘दर्यावरी नाच करी, होडी चाले कशी भिरीभिरी’ या गीताला बाबुजींनी चाल लाऊन दिली, सर्वाना ती खूप आवडली. या गाण्याचे रेकॉर्डिंग व्हायच्या आधी कोल्हापूरला साहित्य संमेलन भरले होते, अध्यक्ष होते प्र.के.अत्रे. संमेलनातल्या कार्यक्रमात हे गाणं बाबुजींनी म्हणावं असा सगळ्यांनी आग्रह केला आणि काय आश्चर्य, 'वन्स मोअर' मिळाला. रसिकांनी प्रचंड दाद दिली होती. तेव्हा पासून गदिमा आणि सुधीर फडके ही दोन नावं कवी आणि गायक, संगीतकार म्हणून सा-या कोल्हापूरला माहिती झाली, पण लोकांच्या मनात आणि घराच्या देव्हा-यात जाऊन बसली ते गीत रामायणामुळे .                                         

          १९५४ साली गदिमांनी गीतरामायण लिहीले ते पुणे आकाशवाणी केंद्रासाठी. गीतरामायण प्रकल्पाचे प्रमुख होते सीताकांत लाड. सीताकांत लाड गदिमा आणि बाबूजींचे जिवलग मित्र. गदिमा पुण्यात तर बाबुजी मुंबईत. एव्हाना दोघेही त्यांच्या चित्रपट व संगीत क्षेत्रात अत्यंत व्यस्त होते, तरीही हे काम त्यांनी अत्यंत श्रद्धेने, आनंदाने आणि श्रीरामाच्या प्रेमापोटी भारावून जाऊन केले. अडचणी तर सुरुवातीपासून होत्याच.

     गीत रामायणातल्या पहिल्याच गीताचा प्रसंग, ललिताताई फडके आणि आनंद माडगुळकर यांनी त्यांच्या आठवणीत सांगितला आहे. गदिमांनी रामायणाचे पाहिलेच गीत लिहिले आणि ते त्यांचे मित्र नेमीनाथ यांच्या बरोबर बाबुजींकडे पाठवून दिले. आकाशवाणीत ऐन ध्वनिमुद्रणाच्या वेळी बाबूजींना ते मिळेना, धावपळ आणि शोधाशोध झाली, इकडे गदिमा गीत पाठवून दिल्यावर आपले काम झाले म्हणून निवांत झोपले होते. सीताकांत लाड यांनी गदिमांना निरोप पाठून बोलावून घेतले. ते आल्यानंतर गीत हरवल्याचे कळताच भडकले. वातावरण निवल्यानंतर सिताकांतानी गदिमांना सांगितले उद्या प्रसारण आहे, तेव्हा गीत तर तुम्हाला लिहावेच लागेल आणि त्यांनी गदिमांना गीत लिहिण्यासाठी एका खोलीत बसवून बाहेरून कडी घातली. तर १० ते १५ मिनिटातच गदिमांनी दार वाजविले. पहातात तर काय, नवं गीत लिहून सिताकांतांच्या हातात ठेवलं.हे नवं गीत पहिल्या हरवलेल्या गीतासारखच होतं. फक्त ‘ज्योतीने तेजाची आरती !’ या शब्दांची भर त्यात पडली होती. हे होतं गीतरामायणातलं पहिलं गीत                                            ‘स्वये श्री राम प्रभू ऐकती, कुश लव रामायण गाती’ !


     अशा प्रकारे गीतरामायणाचे दर आठवड्याला एक अशी ५६ गाणी पुणे आकाशवाणी केंद्रावरून वर्षभर प्रसारित झाली. अगदी ताजी ताजी ! रेकोर्डिंग रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत चालायचे. बाबूजी त्यासाठी दर आठवड्याला पुण्याला येत. गम्मत म्हणजे मुंबईच्या लोकांना गीतरामायण काय प्रकार आहे याची जराही कल्पना नव्हती. कारण पुणे आकाशवाणीचे कार्यक्रम मुंबईला ऐकू येत नसत.त्याची क्षमता कमी होती. ट्रांझिस्टर तर नव्हताच, रेडीओ ठराविक लोकांकडेच. त्यामुळे एकत्र रस्त्यावर जमून गीत रामायण ऐकले जायचे. ते सुरु होण्यापूर्वी लोक रेडिओला हार घालायचे, उदबत्ती ओवाळायचे, नमस्कार करायचे आणि भक्ती भावाने गीत रामायण ऐकायचे. ते संपल्यावर प्रसादही वाटायचे.इतकी प्रभू रामचंद्रांवर श्रद्धा. त्यानंतर मुंबई, नागपूर, इंदोर, भोपाळ, हैद्राबाद, दिल्ली आकाशवाणी केंद्रावरून अनेक वेळा गीतरामायणाचं प्रसारण झालं. अजूनही होतंय. चैत्रात गुढीपाडवा ते रामनवमी या काळात तर गीतरामायण हमखास लागलेच पाहिजे. एव्हढंच काय गीतरामायणाच्या सर्व प्रथम प्रकाशित झालेल्या कॅसेट्स विकत घेवून घराघरातून त्याचा आस्वाद घेतला जाई.आज रामनवमी ,सकाळपासूनच ही गीते रेडीओ, दूरदर्शनच्या विविध चॅनेल वरून प्रक्षेपित होतील.

     सुधीर फडके यांच्या सुस्वर कंठातून बाहेर पडलेले रामायण संपूर्ण महाराष्ट्राने सर्वेन्द्रियांचे कान करून ऐकले, अजूनही ऐकताहेत. यातील गीतांचे करूण रस, रौद्र रस, वीर रस, भयानक, अद्भुत अशा सगळ्या भावनांचे झपाटल्यासारखे सादरीकरण होत असे. आजही ही गाणी ऐकताना श्रोतागणही झपाटून जातो. बाबूजी या गीतातून आपल्यासमोर शोकविव्हल दशरथ, शंकाकुल सीता, चिडलेला लक्ष्मण, संतापी भरत ,प्रत्यक्ष उभे करतात.या गीत रामायणाचे बाबुजींनी १८०० प्रयोग केले.याची आठ भारतीय भाषेत भाषांतर झाली. पण विशेष म्हणजे हे भाषांतर जसेच्या तसे झाले आहे आणि ही गीतं बाबूजींच्या मूळ चालीवरच गायली जातात.

     बालगंधर्व आणि हिराबाई बडोदेकर हे बाबूजींचे गायनातले आदर्श होते. त्यांनी भावगीतं, भक्तीगीतं, लोकगीतं, लावणी, भारुड, चित्रपटसंगीत असे विविध प्रकार हाताळले. त्यांनी हिराबाई बडोदेकर, बालगंधर्व, पं.भीमसेन जोशी, लता मंगेशकर, आशा भोसले, माणिक वर्मा, मोहम्मद रफी, मन्ना डे  अशा दिग्गज गायकांच्या स्वरांना साज चढविला आहे. हा माझा मार्ग एकला, लाखाची गोष्ट, प्रपंच, जगाच्या पाठीवर, मुंबईचा जावई, चंद्र होता साक्षीला, झाला महार पंढरीनाथ, वंदे मातरम असे मिळून ११० चित्रपटाना त्यांनी संगीत दिलंय. त्याला लोकांनी प्रचंड दाद दिली आहे.’ज्योती कलश छलके’ आणि ‘खुश है जमाना आज पहली तारीख है’, या संगीत दिलेल्या आणि’ दिसलीस तू फुलले ऋतू’, ‘तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे’ अशी अनेक भावगीतं बाबूजींच्या सुमधुर आवाजा मुळे अजरामर झाली आहेत. पण एकूण त्यांच्या कारकीर्दीचा मुकुटमणी म्हणजे आनंद सोहळा असलेले गीतरामायणच.

     पुण्याच्या नगर वाचन मंदिरात एकदा मृत्युंजयदिना निमित्त स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हृद्य सत्कार समारंभात बाबुजींनी ‘सागरा प्राण तळमळला ‘हे गीत म्हटलं. कार्यक्रमानंतर सावरकर बाबूजींना म्हणाले, तू माझं हे गाणं दोन वेळा म्हटलंस, पण मला तुझं गीत रामायण ऐकायचं. मग लगेच रात्रीच्या सत्कार कार्यक्रमात बाबूजी गायले. ‘दैवजात दु:खे भरता, दोष ना कुणाचा , पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा’ हे बाबुजींच्या आवाजातलं यमन कल्याण रागातलं गीत ऐकून सावरकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यानंतर ते गहिवरून बाबूजींना म्हणाले, "कुणाचं अधिक कौतुक करू? तुझं कि माडगूळकराचं"?  

     वैयक्तिक आयुष्यात बाबूजींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांची मूल्ये जपली. स्वातंत्र्यवीर 
सावरकर बाबूजींचे प्रेरणास्थान होते. वीर सावरकर हा सावरकरांच्या जीवनावरील चित्रपट बाबुजींनी अत्यंत निष्ठेने आणि कष्टाने बनवला. या चित्रपटाचा प्रवासही अत्यंत खडतर होता. सोपी गोष्ट नव्हती .पण बाबुजींनी 'हा चित्रपट पूर्ण करेन मगच मरेन', ही त्यांची प्रतिज्ञा पूर्ण करून दाखवली. कलेबरोबरच त्यांच्यातील देशप्रेम आणि सामाजिक बांधिलकी त्यांच्या आयुष्यातल्या अनेक घटनांवरून दिसते. ते गोवा मुक्ती आंदोलनातले सशस्त्र क्रांतिकारक होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रचारक म्हणून जबाबदारीही त्यांनी पार पाडली होती. अमेरिकेत 'इंडिया हेरीटेज फौंडेशन' स्थापन झाले ते बाबूजींच्या प्रेरणेमुळेच.

     संगीत क्षेत्रात कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांची झालेली मानहानी, सोसलेले अपार कष्ट, हाल, वाईट अनुभव घेवून सुद्धा नंतरच्या काळात मिळालेली अफाट लोकप्रियता, श्रोत्यांच्या हृदयात मिळवलेलं अढळ स्थान यामुळे त्यांचं जीवन कृतार्थ झालं असं वाटतं.असा हा जगाच्या पाठीवरचा रामभक्त .


ले. डॉ. नयना कासखेडीकर
                                                      ------------------------------------