Tuesday, 29 October 2024

कर्तृत्वशालिनी अहिल्यादेवी भाग 3 – ‘लोकहितदक्ष अहिल्याबाई’

 




कर्तृत्वशालिनी अहिल्यादेवी

भाग 3 – ‘लोकहितदक्ष अहिल्याबाई’

(जन्म-३१ मे १७२५-चौंडी,अहमदनगर, मृत्यू- 13 ऑगस्ट १७९५,इंदोर.)


                                                           

            अहिल्याबाईंचा दिनक्रम अगदी आखीव रेखीव होता. पहाटे उठून स्नान आटोपून शंकराची पूजा. स्तोत्र पठण. थोडे दूध पिऊन मग दिवसभराच्या कामाची आखणी व आढावा घेणे, आलेल्या तक्रारींचे कागद वाचून ठेवणे. गुप्त पत्रे लिहिणे. कोतवालीत जाऊन कामे बघणे. तोपर्यंत भोजनाची वेळ होई मग भोजन आटोपून, न्यायदानाची कामे, हिशोब असे दिवसभर चाले. कधी कधी रात्री उशिरापर्यंत काम चाले. कधी हिशोबांचा गुंता झाला असेल तर त्या रात्रभर जागून स्वत: मार्गी लावत असत. १७६७ ला अहिल्याबाईंचा कारभार सुरू झाला . पाच वर्षे झाली तरी आर्थिक गणित नीट बसत नव्हते. घरात एका पाठोपाठ एक मृत्यू झालेले, पती खंडेराव, सासरे मल्हारराव, मुलगा मालेराव, आणि या तिघांच्या सती गेलेल्या बायका. स्वत:च्याच घरात तेरा जणी सती गेल्या होत्या. या सगळ्याची सल मनात ठेऊन त्या कारभार करत होत्या. आता फक्त मुलगी मुक्ताचाच त्यांना आधार होता. अशा मानसिक अवस्थेत सुद्धा अहिल्याबाई राज्याचा कारभार अत्यंत कर्तव्य निष्ठेने करत होत्या. प्रजेचा अपमान किंवा अनादर केलेला त्यांना आवडत नसे. त्यांच्या बरोबर असत्य किंवा अनुचित व्यवहार केलेलाही चालत नसे, त्यांच्या मते प्रजेसाठी आपण आहोत. गावात एखादा अनुचित प्रकार कानावर आला तर लगेच त्याला समज देत. हिशोबत गोंधळ असेल तर त्यांना तो लगेचच लक्षात येई. प्रजेच्या पाठीशी उभे राहून अधिकार्‍यांना जबाबदार धरत. वेळप्रसंगी त्याला अधिकार पदावरून काढून टाकत.

          एकदा गावात श्रीमंत व्यापारी मरण पावला. त्याच्या मागे फक्त पत्नी होती. मुलबाळ नव्हते. वारस नसल्याने सर्व संपत्ती सरकारजमा होईल, त्या ऐवजी त्यांच्या विधवा पत्नीने अहिल्यादेवीकडे ती दान करायची असे ठरविले. मात्र न्यायप्रिय अहिल्यादेविंनी विधवा पत्नीला बोलवून संगितले की, “हा पैसा तुमच्या पतीचा आहे, आता तुम्हीच त्याच्या मालक आहात. तुम्ही स्वेच्छेने हा पैसा एखाद्या अन्नछत्राला द्या, अनाथ मुलांचा शिक्षणाचा खर्च करा, पाणपोया उघडा, धर्मशाळा बांधून द्या. घाट बांधायला पैसे द्या, विहिरी खोदा, दानाचे सुख घ्या”. असा एक मोठा सामाजिक संदेश त्या काळात अहिल्यादेवी देत होत्या. पक्षपात, भेदभाव असे त्यांच्या ठायी नव्हतेच. सर्वांना न्यायपूर्ण वागणूक देत.
 
                        

त्या मृदु होत्या, मायाळू होत्या. तरीही वेळ आली तर तितक्याच कठोर पण होत्या. मल्हार राव हो;ल्करांचे बाजीराव पेशव्यांशी संबंध चांगले होते. ते तसेच त्यांच्या नंतर सुद्धा अहिल्याबाईंनी चांगले सांभाळले होते. त्या हुशार, व्यवहारी, मुत्सद्दी, धीट आणि फटकळ सुद्धा होत्या. त्यामुळे व्यवहार अगदी चोख असत. कोणाला त्यात काही गडबड करू देत नसत. केलीच तर चांगले फैलावर घेत. कोणाच्या स्वार्थी मनात कशाचे इमले आहेत हे त्या लगेच ओळखत.


                        

         एकदा, पुणे दरबारातून अहिल्याबाईंनी आपल्याला पाठिंबा द्यावा म्हणून, भेटायला हरिपन्त आले होते. त्यांनी हरिपंतांना स्पष्ट संगितले की, “सुभेदार मल्हाररावांपासून आमची निष्ठा बाजीराव पेशव्यां बरोबर आहे. हा एकनिष्ठेचा बेलभंडार आम्ही कधीच उचलला आहे तो काही उगीच नाही”. हरीपंताना लगेच सगळे ध्यानात आले. शिवाय महेश्वर मधल्या, बाजारपेठा, संशोधन केंद्रे, युद्धभंडार, चिलखते, भाला- बरच्या, तोफा हे सर्व पाहून ते थक्क झाले. त्यांच्या मनात आता अहिल्याबाई न्यायदान कसे करतात त्याचा अनुभव घ्यावा असे आल्याने ते शेतकर्‍याचा वेष घेऊन दरबारात आले. त्यावेळी एक कवी दरबारात आला आणि

देवी अहिल्ये, शुद्धमति तू, सर्वांची माता ,

ईश्वर आला तुझ्या स्वरूपे होऊनिया त्राता |

तव पायाशी तीर्थे सगळी, देवदेवळे ती,

स्वर्गामद्धे नारद तुंबर तव लीला गाती |

असे कवन गाऊ लागला. हे ऐकताच अहिल्यादेवी म्हणाल्या, “कविराज, तुमची माझ्याविषयी जी श्रद्धा आहे याचा मी आदर करते पण, माझे हे अतिशयोक्तीचे वर्णन मला पटत नाही. एकतर ईश्वराने माझ्या रूपात अवतार घेणे अशक्य आहे. नारद तुंबर स्वर्गात माझी लीला गाणं हे ही अशक्य आहे. देवांना आणी देवळांना तुम्ही माझ्या अभागिनीच्या पायाशी आणून ठेवलत. हा अपराध आहे तुमचा. कशासाठी गाता असे? चांगले काव्यगुण दैवाने मिळाले आहेत ते चार पैशांसाठी सत्ताधार्‍यांची कौतुके गाण्यात का दवडता ? त्या ऐवजी समाजाची दु:खे काव्यातून मांडा. ईश्वराची लीला रचा. शौर्याचे पोवाडे गा. मग सोन्याचे कडेही देईन. पण आज ती चोपडी इकडे द्या, नर्मदेत बुडविते. या तुम्ही.” हरिपन्त हा प्रसंग पाहून आश्चर्यचकीत झाले. देवलाही आपली स्तुति आवडते आणि अहिल्याबाई ? त्यांच्या विषयी केलेली स्तुति नर्मदेत फेकली ?


                                        
  
          असे अनेक प्रसंग घडले, इतिहासात त्याची नोंद आहे. काशी येथे अहिल्यादेविंनी ब्रम्हपूर स्थापन केले. कारण एकदा काशीचे ब्राह्मण अहिल्यादेवींकडे आले. मुसलमानांचा उच्छाद सुरू होता, वेदाभ्यास करायला जागा नव्हती. मुसलमान हल्ला करत तेंव्हा शिष्यगण सैरावैरा पळून जात, आश्रमास कोणी जागा देत नसे. अहिल्यादेवींनी एकाला त्या ब्राम्हणांबरोबर देऊन काशीला पाठवून ,आता हे आश्रमासाठी जागा शोधून देतील असे संगितले. ब्राम्हण आनंदले. पण त्या म्हणाल्या, “एक गोष्ट ध्यानात ठेवा, जी वास्तू बनेल त्याचे नाव ब्रम्हपुरी असेल. दर तीन महिन्यांनी आमचे गुप्तहेर कुठल्याही वेशात तिथे येतील, तिथली पाहणी करतील. ज्ञानदान नीट चालले असेल तर प्रश्नच नाही . तसे नसेल तर शिक्षा च”. अशा प्रकारे त्या प्रेम आणि शक्तीने जनतेचे हित, प्रजेची सोय नेहमी बघायच्या.वास्तविक वाराणशी महेश्वर पासून वेगळा प्रांत होता तरीही तिकडील लोक सुद्धा अहिल्याबाईंकडे असा न्याय मागायला यायचे. नुसत्या धर्मशाळा उघडल्या तरी त्यात सोयी करत. तिथे पहारेकरी असे, आतमध्ये तुळस आणि शिवलिंग मंदिर तसेच पाण्याची सोय म्हणून विहीर आणि अन्नछत्र एव्हढी सोय त्या लोकांसाठी त्या करत असत. अशा कामांमुळे व निर्णयांमुळे त्या लोकांच्या विश्वासाला पात्र ठरल्या होत्या.



- डॉ. नयना कासखेडीकर. पुणे



--------------------------------------

कर्तृत्वशालिनी - अहिल्याबाई होळकर - भाग २

  

कर्तृत्वशालिनी - अहिल्याबाई होळकर

भाग २


छत्रपती शिवरायांच्या नंतर जो हिंदवी स्वराज्याचा विस्तार झाला त्यात अनेक सरदार व अनेक घराणी यांचे महत्वाचे योगदान आहे.त्यापैकीच एक इंदूरचे होळकर घराणे. होळकर घराण्याचे मूळ पुरुष, ज्यांनी होळकरशाहीचा पाया रोवला ते मल्हारराव होळकर. यशस्वी बावन्न लढाया लढणारे मल्हारराव, मराठेशाहीचे आधारस्तंभच. मल्हाररावांच्या नंतर लोककल्याणकारी राज्य चालवले ते अहिल्याबाईनी .

     राज्य कारभार हातात येण्याआधी अहिल्याबाईंची मनोपृष्ठभूमी अनेक अनुभवातून तयार झाली होतीच. पती खंडेराव यांच्या (१७५४मध्ये )मृत्यूमुळे वैधव्याचं दु:ख पदरी आलं होतं. मात्र केवळ आणि केवळ सासरे मल्हारराव होळकर यांच्या दूरदृष्टीमुळे अहिल्येचे सती जाणे वाचले होते. दहा वर्षांनी १७६६मध्ये मल्हारराव यांचे निधन झाले. मल्हारराव यांच्या दोन्ही पत्नी बनाबाई आणि द्वारकाबाई सती गेल्या.  आपल्या डोक्यावरचे छत्र हारपले याची जाणीव अहिल्याबाईंना झाली. नाही म्हटले तरी सासरा - सुनेचे हे नाते, स्वामी आणि सेवकाशिवाय, गुरु शिष्याचे नाते पण होतेच.आपल्या मुलाच्या खंडेरावाच्या मृत्यूनंतर पैशांचे हिशोब, वेगवेगळे राजकीय संबंध या बद्दल दोघात सल्ला मसलत, चर्चा होत असत. मल्हार राव आणि अहिल्याबाई यांना एकमेकांबद्दल आदर होता विश्वास होता. त्यांच्या मार्गदर्शना खाली अहिल्याबाई थोडा फार कारभार बघत होत्या. अनुभवाने शिकत होत्या. काही चुकीचे निर्णय घेतले गेले तर तिथल्या तिथे मल्हार राव स्पष्ट पणे दुरूस्ती करून काय योग्य काय अयोग्य हे सांगत. या दहा वर्षांच्या काळात अनेक घटना घडल्या, त्याच्या साक्षीदार अहिल्याबाई होत्या. आता राज्याचा वारस म्हणून अहिल्याबाई आणि खंडेराव यांचा एकुलता एक मुलगा मालेराव याच्या हाती येणे साहजिक होते.

खंडेराव होळकर 
मल्हारराव गेल्यानंतर, मालेराव यांस लिहीलेल्या पत्रात अहिल्यादेवी त्यांना धीर देतात, कसं वागायला हवं ते सांगतात. त्या म्हणतात, “आता शोक करत बसायची वेळ नाही. आपलं प्रथम कर्तव्य सरदारकी आहे. ती कशी चालली पाहिजे याचा विचार केला पाहिजे. दौलत चालली पाहिजे. हे समजून घेऊन यात आता विचारपूर्वक लक्ष घालावे. तुमच्या तीर्थस्वरूप वडिलांनी ज्याप्रमाणे कामाचा पाया घालून लौकिक निर्माण केला त्या प्रमाणे तुम्हीही कार्य करा. वडिलांची किर्ति लक्षात घ्या . त्याही पेक्षा तुम्ही अधिक लौकिक संपादन करा”.

    जरी मालेराव याच्या हाती कारभार आला होता तरी अहिल्याबाईंचे जातीने लक्ष होते. अननुभवी तरुण मालेराव कारभार कसा चालविल याची आई म्हणून त्यांना काळजी होतीच. दुर्दैवाने वर्षभरातच मालेराव चे निधन झाले. मालेराव च्या दोन्ही पत्नी सती गेल्या. या सर्व घटनेनंतर एक आई म्हणून अहिल्याबाई यांची काय अवस्था झाली असेल याची आपल्याला कल्पना येते. अं:तकरण हेलावून गेलेल्या अहिल्याबाईना राज्य कारभारा पुढे फार शोक करत बसणे परवडणार नव्हते. होळकर राज्याचे तीन वारस गेले. आता इंदोरला होळकर वाड्यात राहणे त्यांच्या उद्विग्न मनाला नकोसे वाटू लागले. अहिल्याबाईनी महेश्वर राहण्यासाठी निवडले. मल्हारराव होळकरांनी मोगलांकडून जिंकून महेश्वर ताब्यात घेतले होते आणि महेश्वर वसविले होते. आता पुढे काय? राज्य चालवायचे कोणी? कसे? या जनतेच्या मनातील प्रश्नांचे उत्तर अहिल्यादेवीच देणार होत्या.  

मालेराव होळकर 
मालेराव च्या मृत्यूनंतर अहिल्याबाई महेश्वरला येऊन राहिल्या. नर्मदा घाट, किल्ल्यातून च होणारे नर्मदेचे  दर्शन व दिसणारे विहंगम दृश्य, भोवतालची मंदिरे आणि सात्विक व मंगल वातावरणामुळे दु:खी अहिल्याबाईना इथे जरा शांत वाटत होते. असे होते तरी बाहेर राज्यकारभाराबाबत काय काय शिजतय, काय होऊ शकते याची कल्पना त्यांना आली होती. म्हणून त्या सावध सुद्धा होत्या. एका पाठोपाठ होळकर  घराण्यात तिघांचे निधन झाल्याने, होळकर घराणे पारंपरिक राजकीय दृष्ट्या निर्वंश झाले होते. एक तर अधिकृतरित्या आता होळकर राज्याला वारस असा कोणीच नाही, एकटी बाई माणूस काय करेल ? असा समज नेहमी स्त्रियांच्या बाबतीत असतो तो होताच. तशी वेळ आली तेंव्हा अहिल्याबाईंनी ठणकाऊन सांगितले की, “होळकर घराण्याच्या  कैलासवासी सुभेदारांच्या वारसातल्या एकाची मी पत्नी तर, दुसर्‍याची माता आहे. त्यामुळे दत्तक वारस जरी निवडायचा झाला तरी तो अधिकार माझाच आहे”. याला दुजोरा, थोरले माधवराव पेशवे यांनी दिला होता. त्यांनी सांगितले की, “खंडेराव यांच्या विधवा पत्नीला कारभार पाहण्याचा अधिकार आहे”.झाले.

आणि अधिकृतपणे अहिल्याबाई होळकर आता महेश्वरहून राज्यकारभार पाहू लागल्या.

तत्पूर्वी त्यांनी प्रतिज्ञा केली की, “माझे कार्य प्रजेला सुखी करणे आहे. माझ्या प्रत्येक कृतीला मी स्वत: जबाबदार आहे. सत्तेच्या अधिकारामुळे मी येथे जे जे काही करत आहे, त्या प्रत्येक कृत्याचा जाब मला परमेश्वरा पुढे देणे आहे. परमेश्वराने ज्या जबाबदर्‍या माझ्यावर सोपवल्या आहेत त्या मला पार पाडावयाच्या आहेत”. 

 

लेखन- डॉ. नयना कासखेडीकर, पुणे

संपर्क- ०७७६७०८१०५७      

-----------------------------------------------

Sunday, 6 October 2024

प्रजाहितदक्ष अहिल्याबाई होळकर

 

प्रजाहितदक्ष अहिल्याबाई होळकर

 



सती धन्य धन्य कलियुगी अहिल्याबाई । गेली कीर्ति करूनिया भूमंडळाचे ठायी ॥ ध्रुवपद ॥

महाराज अहिल्याबाई पुण्य प्राणी । सम्पूर्ण स्त्रियांमधी श्रेष्ठ रत्‍नखाणी ।

दर्शने मोठ्या पापाची होईल हानी । झडतात रोग पापांचे पिता पाणी ।

वर्णिती कीर्ति गातात संत ते गाणी । झाली दैवदशे ती होळकरांची राणी ॥

- अनंत फंदी

         जगाच्या इतिहासात  उत्कृष्ट प्रशासिका म्हणून नोंद घेतली गेलेल्या अहिल्याबाई होळकर . नगर जिल्ह्यात, जमखेड तालुक्यातील चौंडी गावच्या माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाई शिंदे यांचे कन्यारत्न.

अठराव्या शतकातील, २८ वर्षे यशस्वीपणे राज्य सांभाळणार्‍या मुत्सद्दी, धैर्यवान, शूर, चतुर, धर्मनिष्ठ, दूरदर्शी अशा बहुपेडी स्त्री राज्यकर्ती म्हणजे अहिल्यादेवी . अहिल्यादेवी यांचा राज्याचा काळ ( १७६७ - गादीवर बसून ते १७९५- निधन होईपर्यंत )म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातले सोनेरी पान. सर्वसामान्य कुटुंबातली अहिल्या  एका वैभवशाली होळकर राज्याच्या स्वामींनी झाल्या. आपल्या मुलाच्या खंडेरावाच्या मृत्यूनंतर त्याची जागा सुनेला, अहिल्येला देणारे मल्हारराव होळकर ( इंदूरच्या होळकर घराण्याचे संस्थापक ) घराण्याचा वंशाचा दिवा मुलगाच हे मानण्याच्या काळात एक स्त्री असूनही,आपला पुत्र खंडेराव याचे निधन झाल्यानंतर, अहिल्या जेंव्हा सती जाण्यास निघाली, तेंव्हा मल्हार राव म्हणाले,  “खंडूच्या अपमृत्यूमुळे मी निर्जीव झालो आहे.आता तूही मला सोडून जाणार? आता माझा पुत्र होण्याचे सोडून कुठे निघलीस? माला अनाथ करून जाऊ नकोस पोरी. तूच माझा खंडू आहेस. हे राज्य तुझेच आहे. जीव द्यायचाच तर या प्रजेसाठी दे. या प्रजेची आई हो”.आणि अहिल्येने  त्याच क्षणी आपले अलंकार, वस्त्र रंग, उपभोग हे सर्व चितेत टाकले आणि आणि यापुढे फक्त शुभ्र वस्त्रे नेसेन आणि पुढचे आयुष्य प्रजेसाठी आणि राज्यासाठी देईन,” अशी शपथ घेतली. एक अनमोल रत्न चितेत जाण्यापासून आपण वाचवले याचे मल्हाररावांना त्या दु:खी प्रसंगातही समाधान झाले . विधवा झालेल्या सुनेला मुलाच्या जागी राजपदाची सूत्रे बहाल केली. तेंव्हा पासून मल्हार रावांनी पण अहिल्येला एकेरी हाक मारणे बंद केले.

        सुरुवातीपासूनच मल्हाररावांनी अहिल्ये मधील जात्याच विशेष गुण ओळखून तिला शिक्षण देण्यास गुरु नेमले. गणित, इतिहास, भूगोल अशा सर्व विषयांचे ज्ञान तिला मिळत होते. लवकरच ती हिशोब करू लागली. घोडेस्वारी शिकली. रामायण, महाभारत व महत्वाचे ग्रंथ वाचून संपवले. राज्यकरभारातील हिशोब करावेत, पत्रे पाठवावित, फौजा तयार कराव्यात, वसूली जमा करावी, खातेनिहाय पैसे वाटप करावेत, गोलाबारूद, ढाल तलवारी सारखे साहित्य सज्जा करावे, अशा प्रकारे अहिल्या मल्हारराव सांगतील तसे धडे गिरवीत होती. अनुभव घेत होती आणि तिची कुशलता वाढत होती.राज्य कारभाराचे सर्व पदर मल्हार रावांनी अहिल्येला शिकविले होते. त्यातल्या खाचा खोचा शिकवल्या. आपल्या मुलाच्या खंडेरावाच्या मृत्यूनंतर पैशांचे हिशोब, वेगवेगळे राजकीय संबंध या बद्दल दोघात सल्ला मसलत, चर्चा होत असत. मल्हार राव आणि अहिल्याबाई यांना एकमेकांबद्दल आदर होता विश्वास होता. त्यांच्या मार्गदर्शना खाली अहिल्याबाई थोडा फार कारभार बघत होत्या. अनुभवाने शिकत होत्या. काही चुकीचे निर्णय घेतले गेले तर तिथल्या तिथे मल्हार राव स्पष्ट पणे दुरूस्ती करून काय योग्य काय अयोग्य हे सांगत. मल्हार राव आणि गौतमाबाई अहिल्येच्या पाठीशी सर्वार्थाने खंबीरपणे उभे राहिले.  

     मल्हारराव मोहिमेवर गेले की सर्व कारभार अहिल्या बघत असे. मल्हाररावांच्या सूचनेनुसार सर्व व्यवस्था करीत असत. हिंदुस्थानात अब्दालीच्या करामतींच्या बातम्या कानवर येत होत्या. त्याने मथुरा वृंदावनात मुंडक्यांच्या राशी घातल्या, हे कळल्यावर त्यांनी ठरविले की, हिंदूंना आता चिरेबंद आश्रयस्थाने हवीत . त्यांनी ठिकठिकाणी धर्मशाळा बांधून घेतल्या.    

     राजकारण करता करता एकाच वेळी ब्रिटिश चोहोबाजूंनी वाढत असता, आपल्या समाजाचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्या प्रयत्न करत होत्या. संस्कृती टिकवण्याचे प्रयत्न करत होत्या. राज्यात पाणी पुरवठा सुधारणा घडवल्या. त्यांनी अन्नछत्रे उघडली, धर्मशाळा बांधल्या, चिरेबंदी विहिरी खोदल्या, राज्यातून उन्हाळ्यात प्रवास करणार्‍या लोकांसाठी पाणपोया बांधल्या, पांथशाळा, आश्रयशाळा बांधल्या, मंदिरे बांधली, नद्यांवर घाट बांधले, स्त्रियांसाठी कपडे बदलण्यासाठी व सुरक्षित स्नानासाठी बंदिस्त ओवर्‍या बांधल्या, वेळोवेळी आक्रमणात उध्वस्त झालेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला.

     पुलांचे बांधकाम, रस्ते निर्मिती, रस्ते दुरूस्ती, डाक व्यवस्था,रायते साथी शिक्षणाची व्यवस्था ग्रंथ संग्रह व ग्रंथ निर्मिती, आरोग्यासाठी दवाखाने , औषधी बागा, शेतीसाठी सिंचना सोयी, जमीनिसाठी ९\ ११चा  कायदा ,माळरानावर वृक्षलागवड  आरक्षित गयरान , करप्रणाली ,विद्वान आणि कलाकार यांना राजाश्रय  अशा अनेक गोष्टी केल्या .

     त्यांचे कार्य इंदूर उज्जैन पर्यन्त्च मर्यादित नव्हते. केदारनाथ, रामेश्वर, जगन्नाथ पुरी,ते द्वारका असे चारही दिशांना होते. विशेष म्हणजे सर्व प्रांतातील माणसे जोडण्याची कला त्यांच्याकडे होती. त्यांनी गंगेचे पाणी महाशिवरात्रीला प्रांताप्रांतात कावडीने नेण्याची पद्धत सुरू केली. त्यामुळे प्रांतीय भारत जोडला गेला. ते कुठलीही सक्ती न करता, सात्विकता या त्यांच्या गुणामुळेच.माणसांबरोबरच पशू, पक्षी, प्राणी यांचाही विचार त्या करत. त्यांच्यासाठी डोण्या, वैद्यकीय उपचाराची सोय केली होती. सर्पदंशावर उपचार करण्यासाठी हकीम व वैद्य नेमले, एव्हढेच काय मुंग्या व जलचर प्राण्यांसाठी सुद्धा साखर, कणकेच्या गोळ्या असे  अन्नदान करीत. गोरगरिबांना सणासुदीला अन्नदान, कपडे ,थंडीपासून संरक्षण म्हणून घोंगड्या वाटप करीत. 

त्यांच्याकडे दुर्मिळ हस्तलिखित ग्रंथसंग्रह होता. विद्वान आणि कलावंत यांची त्या कदर करीत, योग्य तो मानसन्मान देत.तीर्थ क्षेत्रांच्या ठिकाणी इतर प्रांतातील शास्त्री, पंडित , वैद्य व वैदिक यांना आणून,राहण्याची सोय करून त्यांनी एक प्रकारे ज्ञान संवर्धन व संरक्षण केले. उदा. काशी येथील ब्रह्मपुरी,

     लोकांसाठी रोजगार निर्माण व्हावेत म्हणून योग्य ते धोरण त्यांनी आखले होते. राज्यकारभार चालवताना त्यांनी जनतेच्या अन्न ,वस्त्र, निवारा या मूलभूत गोष्टीबरोबरच, समता शांतता, बंधुता, न्याय, विचार स्वातंत्र्य आणि आत्मसन्मान या मुल्यांची जपणूक त्यांच्या काळात झालेली दिसते.

    अहिल्याबाईंच्या बुद्धीचातुर्य, मुत्सदीपणा ,प्रजाहित दक्ष आणि धर्मपरायणतेमुळे धर्म टिकला, संस्कृती संवर्धन झाले. कलेला प्रोत्साहन मिळाले. चरीतार्थाची साधने उपलब्ध झाली. त्यांनी आपल्या सासर्‍यांचे ,होळकर घराण्याचे नाव स्व -कर्तृत्वाने इतिहासात अजरामर केले.(हा लेख विश्व संवाद केंद्राने 5 ऑक्टोबर 24 रोजी प्रसिद्ध केला.)

---- डॉ. नयना कासखेडीकर ,पुणे .

 

------------------------------------

Friday, 16 August 2024

कर्तृत्वशालिनी अहिल्यादेवी

 

कर्तृत्वशालिनी अहिल्यादेवी

(जन्म-३१ मे १७२५-चौंडी,अहमदनगर, मृत्यू- १३ ऑगस्ट १७९५,इंदोर.)


भारताच्या इतिहासातले , महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे व्यक्तिमत्व अहिल्याबाई होळकर यांचे हे जन्म त्रिशताब्दीवर्ष आहे. या निमित्त या कर्तृत्वशालिनीची ओळख करण्याचा जागर अखिल भारतात मांडला जातोय. नव्हे तो मांडलाच पाहिजे, त्याशिवाय या अठराव्या शतकातील, 28 वर्षे यशस्वीपणे राज्य सांभाळणार्‍या मुत्सद्दी, धैर्यवान, शूर, चतुर, धर्मनिष्ठ, दूरदर्शी अशा बहुपेडी स्त्री राज्यकर्तीची ओळख कशी होणार? रूढी परांपरांनी जखडलेल्या भारतात सामाजिक सुधारणा करण्याचे प्रयत्न 19 व्या शतकात सुरू झाले होते. पण त्या आधीचा काळ ? स्त्रियांना प्रतिकूलच होता.

अहिल्यादेवी यांचा राज्याचा काळ ( १७६७ - गादीवर बसून ते १७९५- निधन होईपर्यंत )म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातले सोनेरी पान. सर्वसामान्य कुटुंबातली अहिल्या एका वैभवशाली होळकर राज्याच्या स्वामींनी झाल्या. आपल्या मुलाच्या खंडेरावाच्या मृत्यूनंतर त्याची जागा सुनेला, अहिल्येला देणारे मल्हारराव होळकर ( इंदूरच्या होळकर घराण्याचे संस्थापक ) खरंच ग्रेट च होते. त्यांचे ही कौतुक वाटते. त्यांचा हा पाठिंबा म्हणजे आज स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोण कसा असावा हे सांगणारा आहे. घराण्याचा वंशाचा दिवा मुलगाच हे मानण्याच्या काळात एक स्त्री असूनही,आपला पुत्र खंडेराव याचे निधन झाल्यानंतर, विधवा झालेल्या सुनेला त्याच्या जागी राजपदाची सूत्रे बहाल केली. तिचे अंगीभूत गुणवैशिष्ट्य हेरून तिला घडविणारे मल्हारराव म्हणूनच वेगळे आहेत. अशी घडलेली एक स्त्री काय करू शकते ,कसा पराक्रम गाजवू शकते हा इतिहास समजून घ्यायला हवा.


राजकारण करता करता एकाच वेळी ब्रिटिश चोहोबाजूंनी वाढत असता ,आपल्या समाजाचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्या प्रयत्न करत होत्या. संस्कृती टिकवण्याचे प्रयत्न करत होत्या.त्यांनी अन्नछत्रे उघडली, धर्मशाळा बांधल्या, चिरेबंदी विहिरी खोदल्या, राज्यातून उन्हाळ्यात प्रवास करणार्‍या लोकांसाठी पाणपोया बांधल्या, पांथशाळा, आश्रयशाळा बांधल्या, मंदिरे बांधली, नद्यांवर घाट बांधले, स्त्रियांसाठी कपडे बदलण्यासाठी व सुरक्षित स्नानासाठी बंदिस्त ओवर्‍या बांधल्या, वेळोवेळी आक्रमणात उध्वस्त झालेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला.

त्यांचे कार्य इंदूर उज्जैन पर्यन्त्च मर्यादित नव्हते. केदारनाथ, रामेश्वर, जगन्नाथ पुरी,ते द्वारका असे चारही दिशांना होते. विशेष म्हणजे सर्व प्रांतातील माणसे जोडण्याची कला त्यांच्याकडे होती. त्यांनी गंगेचे पाणी महाशिवरात्रीला प्रांताप्रांतात कावडीने नेण्याची पद्धत सुरू केली. त्यामुळे प्रांतीय भारत जोडला गेला. ते कुठलीही सक्ती न करता, सात्विकता या त्यांच्या गुणामुळेच.माणसांबरोबरच पशू, पक्षी, प्राणी यांचाही विचार त्या करत. त्यांच्यासाठी डोण्या, वैद्यकीय उपचाराची सोय केली होती. सर्पदंशावर उपचार करण्यासाठी हकीम व वैद्य नेमले, एव्हढेच काय मुंग्या व जलचर प्राण्यांसाठी सुद्धा साखर, कणकेच्या गोळ्या असे अन्नदान करीत. गोरगरिबांना सणासुदीला अन्नदान, कपडे ,थंडीपासून संरक्षण म्हणून घोंगड्या वाटप करीत.

त्यांच्याकडे दुर्मिळ हस्तलिखित ग्रंथसंग्रह होता. विद्वान आणि कलावंत यांची त्या कदर करीत, योग्य तो मानसन्मान देत.तीर्थ क्षेत्रांच्या ठिकाणी इतर प्रांतातील शास्त्री, पंडित , वैद्य व वैदिक यांना आणून,राहण्याची सोय करून त्यांनी एक प्रकारे ज्ञान संवर्धन व संरक्षण केले. उदा. काशी येथील ब्रह्मपुरी,

लोकांसाठी रोजगार निर्माण व्हावेत म्हणून योग्य ते धोरण त्यांनी आखले होते. राज्यकारभार चालवताना त्यांनी जनतेच्या अन्न ,वस्त्र, निवारा या मूलभूत गोष्टीबरोबरच, समता शांतता, बंधुता, न्याय, विचार स्वातंत्र्य आणि आत्मसन्मान या मुल्यांची जपणूक त्यांच्या काळात झालेली दिसते.

अहिल्याबाईंच्या बुद्धीचातुर्य, मुत्सदीपणा ,प्रजाहित दक्ष आणि धर्मपरायणतेमुळे धर्म टिकला, संस्कृती संवर्धन झाले. कलेला प्रोत्साहन मिळाले. चरीतार्थाची साधने उपलब्ध झाली. त्यांनी आपल्या सासर्‍यांचे ,होळकर घराण्याचे नाव स्व -कर्तृत्वाने इतिहासात अजरामर केले. या अहिल्यादेवींच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण आणि त्यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग, घटना, त्यांचे कार्य यांचा आढावा घेणारी ही मालिका, त्यांच्या जन्म त्रिशताब्दी निमित्ताने क्रमश:

कर्तृत्वशालिनी अहिल्यादेवी ही मालिका अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी निमित्त दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्रातर्फे त्यांच्या महिला विश्व च्या ऑगस्ट च्या अंकात सुरू झाली. ही मालिका ,दर महिन्याला एक अशी वर्षभर प्रसिद्ध होणार आहे.

© --ले. डॉ. नयना कासखेडीकर               

                                                        ---------------------------

Thursday, 15 August 2024

मणिपूर- एक सांस्कृतिक ओळख

 

                                              मणिपूर- एक सांस्कृतिक ओळख

                 
         निसर्ग सौंदर्याने नटलेले, ईशान्येकडचे राज्य मणिपूर रत्नभूमी ( The Land of Jewels )म्हणून ओळखले जाते. भारताच्या पूर्व सीमेवर आजूबाजूच्या नऊ डोंगरांनी वेढलेला मैदानी खोर्‍याचा प्रदेश मणिपूर. या राज्याच्या उत्तरेकडे नागालँड, पूर्व व आग्नेयला ब्रह्मदेश, दक्षिणेला मिझोराम आणि पश्चिमेला आसाम . मणीपुर हा भौगोलिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अतिशय संपन्न असलेला प्रदेश . दुर्गम भाग असल्याने इथे वन्य आणि भटक्या जमाती जास्त आहेत. 33 अनुसूचीत जनजाति आहेत. एमोल, अनल, चिरु, चोथे, गांगटे, इनपुई, हमार, खारम, खोइबू, कोइरांव, कोम, लामकांग, लियांगमाई, माओ, मरम, मरिंग, माटे, मोनसांग, मोयोन, पैते, पौमाई, पुरुम, राल्ते, रोंगमेई, सिम्टे, सुहते, तांगखुल, टाराओ, थाडौ, थंगल, वैफेई, जिमी और जो. तर अनुसूचीत जाती 7 आहेत प्रकारच्या आहेत. इथे अनेक संस्कृतीचा संगम आणि लोकजीवन अनुभवायला मिळते. जवळ जवळ 59 % लोक या खोर्‍यामध्ये राहतात तर 41 % लोक आदिवासी पहाडी दुर्गम भागात राहतात. यांचे मुख्य दोन प्रकार आहेत मैतेयी आणि कुकी. मैतेयी आणि नागा मणीपुरचे मूल निवासी मानले जातात. प्रत्येक जाती आणि जनजाति लोकांची भाषा वेगळी आहे. संस्कृती थोडी वेगळी आहे. पण सर्वांचा मुख्य संवाद मणीपुरी भाषेतच होतो.

मणीपुर ची मूळ भाषा ‘मितई’ किंवा ‘मणीपुरी’ आहे. याची लिपि रोमन आहे. ‘लियांगमेई’ ही आणखी एक बोलली जाणारी भाषा आहे. एव्हढ्या प्रकारच्या लोकांवरून इथली संस्कृती कशी असेल याची कल्पना आपल्याला येते. सर्वांचे रीतिरिवाज, पोशाख, परंपरा वेगवेगळ्या आहेत. सतराव्या शतकापासून चैतन्य वैष्णव संप्रदायाची उपासना पद्धत इथे आहे. ती अजूनही टिकून आहे.

भाषा-
मणीपुर राज्यात बोलली जाणारी मुख्य भाषा मणीपुरी आहे. या भाषेला तीन ते चार शतकांचा इतिहास आहे.तिला मेईथेई म्हणतात. ब्रह्मी आणि तिबेटी भाषेशी साम्य असलेल्या याची लिपि मेईथेई होती, पुढे आठराव्या शतकात बंगाली लिपीचा वापर सुरू झाला. मणीपुर चे प्राचीन साहित्य इन्फाळ च्या बोली भाषेत आढळते. मणीपुर मध्ये 29 प्रकारचे आदिवासी राहतात त्यांची प्रत्येकांची स्वतंत्र भाषा आहे. सर्वांचे रीतिरिवाज, पोशाख, परंपरा वेगवेगळ्या आहेत. वैशिष्ट्य पूर्ण आहेत.

ऐमोल लोक कुकी आहेत. ते असम आणि मणीपुर दोन्ही ठिकाणी आढळतात. त्यांची भाषा ऐमोल. शेती करतात. सर्वात जुनी जनजाति म्हणजे च अनल जाती, तर चिरू लोक मणीपुर आणि असम मध्ये विशेषता आढळतात. ते कुकी, चीन, नागा पैकी चिरु ही त्यांची भाषा आहे. यांचे आचार विचार रीतिरिवाज कुकी सारखे, तर शरीरयष्ठी ,सवयी केशभूषा नागा लोकांसारखी आहे. नागांच्या विविध जमातींच्या भाषा वेगळ्या आहेत. इनपूई ची इनपूई,लियांगमाई ची लियांगमाई,मरम यांची मरम,कूकींमध्ये मते जंजातींची भाषा माटे पाओ,मोनसांग लोकांची मोनसंग ही चीनी तिबेटी भाषा.

साहित्य – मणीपुरी साहित्य प्राचीन काळापासून असल्याचे उल्लेख इतिहासात आहेत. जुन्या कोरीव लेखातून एक प्रार्थना इ.वि.सन पूर्व आठव्या शतकात लिहिली आहे. सोळाव्या आणि सतराव्या शतकात मणीपुरी भाषेत लिखित साहित्य रचना चांगली झाली असे म्हणाले जाते. 1890 मध्ये ‘मणिपुरेर इतिहास’ हा प्रकाशित झालेला पहिला ग्रंथ . कवी निलकांत सिंह ,.एन बिरेन, कवी इबोपिशक,कवी राजकुमार मधुवीर,ठा. इबोहल, के.पद्मयकुमार,यांच्या कविता म्हणजे पारंपारिक रचनांबरोबरच सामाजिक चित्रण, सामाजिक परिस्थिति,जाणिवा, जीवनातील पोकळी, मनाची अस्वस्थता, स्वच्छंदपणा, देशभक्ती, वासुदेव व गोपी यांची वर्णने अशा रचना केल्या आहेत.

मणीपुरी भाषेत कवितांशिवाय कथा, कादंबरी, नाटके-(मणीपुर प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडविणारी नाटके ) निबंध, समीक्षा, अनुवाद-(संस्कृतमधील रामायण महाभारत,कालिदास,बाणभट्ट यांच्या रचना, प्रेमचंद, बंकिम चंद्र चटर्जी, टागौर यांचे साहित्य) अशा साहित्य प्रकारांचे लिखाण आहे.

लोकजीवन व परंपरा - मणीपुर चे सर्वोच्च हिल स्टेशन असलेल्या उखरुल जिल्ह्यात जिथे सर्वात जास्ती तांगखुल नागांची वस्ती आहे ही प्राचीन जमातींपाइकी एक समजली जाते. ही जमात निसर्ग पूजक आहे.तांगखुल या मैतेयी बोलीतील शब्दाचा अर्थ- बडे भाई का गांव असा आहे. या भागातील कांगखुई इथे चुन्याच्यी लेणी आहेत, येथे पाषाणयुगीन मानवी वस्त्यांचे पुरावे सापडले आहेत. म्हणजे प्राचीनतेचा धागा दोरा पाषाण युगीन काळात आपल्याला घेऊन जातो.

भारत- म्यानमार सीमा क्षेत्रात येणार्‍या उखरुल च्या तांगखुल नागांचा धर्म ख्रिश्चन आहे, मणीपुरच्या लोकांचा धर्म बदलण्यास मिशनर्‍यांनी पहिला प्रयत्न तांगखुल येथेच केला.1895 पासून ख्रिश्चन मिशनर्‍यांच्या प्रयत्नांमुळे त्यांचे जीवन बदलले. त्यांचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने निसर्ग चक्राप्रमाणेच त्यांचे सण आणि उत्सव असतात.त्याला धार्मिकतेची जोड असते. पेरणीचा उत्सव लुईरा फणित ,मंगखप फणित आणि युवा उत्सव हे मोठे सण असतात. लुईरा फणित हा वृक्षारोपण हंगामाच्या सुरूवातीला साजरा होणारा सर्वात मोठा उत्सव असतो. संगीतप्रेमी असलेले हे लोक लोकगीते आणि लोककथा याद्वारे सादरीकरण करतात. व्हायोलिन, तुरही, ड्रम, माजो(महिलांचे मौखिक संगीत), बासरी, पैरेन (बांबुचा पाईप,) ही त्यांची पारंपरिक वाद्ये आहेत. मौखिक परंपरा, लोकगीते, नृत्य, संवाद ,याद्वारे त्यांनी इतिहास जीवंत ठेवलेला दिसतो.

                             

या जमाती मध्ये वस्त्र प्रवारणे आणि आभूषणे घालण्याचे काही नियम पारंपरिक आहेत, लिंग, वय, सामाजिक स्थिति, वैवाहिक स्थिति याप्रमाणे सूत, रंग, आकार,कपड्याचे प्रकार समाजातील ज्येष्ठ व्यक्तींनी प्रथेप्रमाणे ठरवून दिलेले असतात.विणकाम हे मणीपुर मधील प्रमुख कला व कापड उद्योग आहे. प्रत्येक घरात हातमाग /लूम आहेत. घराघरातील प्रत्येक स्त्री यात सहभागी असते, हे कौशल्य लहान वयापासूनच मुलगी आत्मसात करते. सामाजिक जाणीवेतून सुरू झालेले हे काम पुढे त्यांचा हातमागाचा उद्योग, अर्थाजनासाठी उपयोगी पडतो. तिथे प्रत्येक घरात मैतेयी, काबूईस, थांगकुल आणि कुकी स्त्रिया विशेषता हे काम करतात. विणकाम कलेमुळे येथील खेडी स्वयंपूर्ण बनली आहेत. आत्मनिर्भर झाली आहेत. भरतकामाचे निरनिराळे प्रकार आहेत. पुरुष जेंव्हा युद्धकाळात बाहेर असत तेंव्हा घरातील स्त्रिया त्यांच्या साठी कपडे /गणवेश पुरवीत, तसेच आपला उदरनिर्वाह चालवीत . तेंव्हापासून योद्ध्यांसाठी व राजा साठी वेगळे भरतकाम असलेले कापड तयार करण्याची प्रथा आहे. त्याला वॉर कापड म्हणजे युद्धासाठी तयार केलेली विशेष शाल -लॅम्फी म्हणतात. राजदरबारातील विश्वासू लोकांसाठी लांब कोट सैजूनबा, योद्ध्यांच्या पगडीवर लावण्यासाठी लहान ध्वज चिन्ह -प्लम फिरनानबा , धोतर- खमेनचटपा, फिरंजी- लाल रंगाचे ब्लंकेट. अशा अनेक डिझाईन्स चे प्रकार पण आहेत. नृत्यासाठी, सण समारंभासाठी, लग्नासाठी, वीरता म्हणून सन्मानासाठी, कपड्यांवर नक्षीकाम वेगवेगळे असते. आदिवासींच्या रचना व नक्षीकाम वेगवेगळ्या असतात. कबुई नागा, हमर्स, कूकी, पेइतीस, थंगथुल नागा या आदिवासींची कपड्यांची वैशिष्ट्य पूर्ण डिझाईन असतात.

                                                      
                                                    

‘थांगौ पुओन’ हे पैतें चे कापड, जो पर्यन्त युद्धात शत्रूंना मारत नाहीत तो पर्यन्त हे कापड त्या पैतेइ लोकांना वापरता येत नाही अशीही प्रथा आहे.तसेच गावात जो सर्वात जास्त पीक कापणी करतो त्यालाच हे कापड वापरता येते, ‘पुओन दम’ हे राष्ट्रीय कापड शोकसभा, अधिकृत सभा, राष्ट्रीय दिन या वेळेसच वापरता येते. जौल पुअन कापड नव विवाहितेने सासरी जातांना पतीसाठी भेट म्हणून नेणे अनिवार्य असते.

                                     

मैतेयी हिंदू नववधू पोशाख म्हणजे ‘पोटलोई किंवा पोलोई’ म्हणजे जड कापड आणि बांबूचा दंडगोलाकार सुशोभीत स्कर्ट. हाच रास लीला नृत्याला पण वापरतात. याला पण इतिहास आहे. हे पोटलोई डिझाईन महाराजा भाग्यचंद्र (1749 -1798 ) यांनी रस लीला या नृत्यासाठी पोशाख म्हणून तयार केला होता. त्याच्या सुंदरतेमुळे पुढे तो हिंदू मैतेइ लोक समारंभसाठी वापयाला लागले. मग तोच वधू पोशाख म्हणून प्रसिद्ध झाला.

     हस्तकला - भरतकाम विणकाम आणि हातमाग कापडा बरोबरच हस्तशिल्प आणि हस्तकला यातही मणीपुर प्रसिद्ध आहे. बांबू च्या कलाकुसरीचे सर्वात मोठे उत्पादक म्हणून हे राज्य ओळखले जाते.याला मोठी आंतरर्राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध आहे. कुंभारकामाची वेगळीच शैली येथे पहायला मिळते. यात कुंभार कामात चाकाचा उपयोग न करता अन्द्रो,थोंगजाओ आणि नुंगबी या जमाती अशी भांडी हाताने आकार देत तयार करतात. हे त्यांचे पारंपरिक कौशल्य आहे. तर, ऊस आणि बांबू हस्तकला, कौना हस्तकला, मातीची भांडी , कापड विणकाम (हाताने विणलेले आणि भरतकाम केलेले कापड),लाकूडकाम, अशा विविध कलात्मक वस्तु म्हणजेच कापड, खेळणी, सजावटीच्या वस्तु, दगडी आणि लाकूड कोरीव काम, बाहुल्या प्रसिद्ध आहेत.


                           


                               

मणीपुरी नृत्य – हे पारंपरिक शास्त्रीय नृत्य आहे.रास लीला शास्त्रीय शैलीत तर लाई हारोबा लोक शैलीत असते. संकीर्तन चोलम, पुंग चोलम, रास लीला - रास लीला चे वसंत रास, कुंजा रास, महारास, नित्य रास, दीबा रास हे प्रकार आहेत.या शास्त्रीय नृत्य प्रकारात राधा आणि कृष्ण यांचे अलौकिक प्रेम आणि भक्तिचे दर्शन असते. या नृत्य नाटिका प्रकारातून श्रीकृष्णाच्या लीला, वृंदावनच्या गोपिकांबरोबरच्या कहाण्या आणि उदात्त प्रेम दाखवले जाते. वसंत रास होळी पौर्णिमेला तर राखी पौर्णिमेला कुंजा रास सादर करतात. यात विशेषता श्रीकृष्णाच्या प्रेमलिलेवर आधारित गीत गोविंद किंवा पद्म पुराणातील विषय गीत नृत्य आणि अभिनयाने मांडले जातात. हे नृत्य नाट्य मंदिरात केले जाते.

                       

                       

                        

 आश्विन पौर्णिमेला साजर्‍या होणारी कुंजा रास गोविंद लीलामृत वर आधारित असते. यात पूजा, भक्ति, प्रार्थना, पुष्पांजलि, आरती सादर होते. भागवत पुराणावर आधारित ,कार्तिक पौर्णिमेला ही रास होते. यात श्रीकृष्णाची निष्काम भक्ति आणि शुद्ध प्रेम यावर, श्लोक आणि गीतांच्या माध्यमातून कथा सादर केली जाते.
थांगटा नृत्य- मार्शल आर्ट्स आणि तलवारी व भाला यांचा कौशल्यपूर्ण वापरकरून नृत्य सादर होते.
पुंग चोलम- हे नृत्य पुरुष सादर करतात. याला मृदंग कीर्तन म्हणतात.

                          
सण उत्सव - मणीपुर मध्ये आनंद व उल्हास देणारे उत्सव वर्षभर सुरु असतात. यात लाई हारोबा, याओशांग (होली), रास लीला, चैराओबा, निंगोल चकौबा, रथयात्रा, दुर्गा पुजा, दिवाळी, ख्रिसमस, मेरा हौचौगंबा, असे विविध महत्व पूर्ण सण साजरे केले जातात.
  
                              
   लाई हारोबा – हा नृत्य नाट्य महोत्सव असतो. . सृष्टीची उत्पत्ती करणार्‍या देवतेचा हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. पारंपरिक देवता आणि पूर्वजांचा सन्मान करणे आणि त्यांच्या प्रती श्रद्धा व्यक्त करणे हा उद्देश असतो. सनामाही, पखंगबा, नोंगपोक निमगथो, लेईमरेल,उमंग लाई या जंगलातील देवी देवतांची पण पुजा करतात. निसर्ग, प्राणी आणि मनुष्य यांच्या जीवनासाठी देवाची प्रार्थना असते. पुजा, पौराणिक कथांवर आधारित पारंपरिक गीते व लोकनृत्य, नाटक लोककथा यातून विषयाची मांडणी होते.


                                
निंगोल चकौबा हा सण म्हणजे मैतेयी /वैष्णव लोकांचा प्रमुख सण आहे. ‘निंगोल म्हणजे महिला’ आणि ‘चकौबा म्हणजे भोजनाचे आमंत्रण’. याची परंपरा म्हणजे आपल्या विवाहित मुलीं व बहिणींना माहेरी भोजनासाठी बोलावून आदरातिथ्य करायचे. ऑक्टोबर- नोहेम्बर मध्ये येणारा हा सण श्रीमंत गरीब अशा सर्वांच्या घरी साजरा केला जातो. आपल्या आई वडिलांच्या, भावाच्या घरी,अर्थात माहेरी, बहिणी व मुली मुलाबाळांसह आवर्जून येतात, सर्व जण तिचा आनंदाने सत्कार व स्वागत करून एक कौटुंबिक पुनर्मिलन करून ही नाती अधिक दृढ करतात. मणीपुर मध्ये या सणाला सार्वजनिक सुट्टी असते.


                              
याओशांग उत्सव म्हणजे होळी- हा मणीपुरचा सर्वात महत्वाचा उत्सव फाल्गुन मध्ये पाच दिवस चालू असतो. याचे मुख्य आकर्षण असते लोकगीतांवर आधारित थबल चोंगबा पारंपरिक नृत्य. नृत्य हे ईश्वर उपासनेचे च एक रूप मानले जाते. मैतेयी लोकांच्या या सणाला तीनशे वर्षांची परंपरा आहे. हा आदिवासींचा एक कृषि उत्सव होता.आपल्याकडील गणेशोत्सवा सारखेच लोकांकडून देणग्या गोळा करून सण साजरा करतात. या दिवशी कुस्ती, घोडेस्वारी असे खेळही आयोजित केले जातात.

                              
काबुई नागां चा गंग-न्गाई आणि लुई-न्गाई-नी- हे सण नागा जन जातीचे प्रमुख सण आहेत, वसंत ऋतुत बीज पेरणी करून शेतीचे काम उत्साहात सुरू करताना एकत्र येऊन गीत, नृत्य, भोजन यांचा आस्वाद घेऊन ,बियाणे पेरणीचा हंगाम नागा लोक पाच दिवस साजरा करतात.

                             
कुट महोत्सव – ज्याप्रमाणे बीज पेरणी उत्सव हा कृषीवर आधारित साजरा करतात, त्या प्रमाणेच वर्षभर कठीण परिश्रम करून घेतलेले पीक , शरद ऋतुत कापणी करून हातात भरपूर पीक आलेले असते, त्याचा आनंदोत्सव व देवाचे आभार मानण्यासाठी हा उत्सव साजरा करतात, कुट म्हणजे कापणी .हा कुकी-चीन-मिजो आदिवासी शेतकर्‍यांचा उत्सव असतो.

असाच उत्सव तांगखुल नागा लोक चुम्फा उत्सव म्हणून साजरा करतात.सात दिवस चालणार्‍या या उत्सवात विशेष गोष्टींना स्थान आहे. मुख्याता पेय जल शुद्धता आणि स्वच्छता यासाठी सणाच्या आधल्या दिवशी गावातील पिण्याच्या पाण्याचे सर्व स्त्रोत साफ करतात. या दिवशी नव्या सुनेला सासूकडून घराचा सर्व व्यवहार सांभाळायला दिला जातो. साहजिकच घराची मालकीण होण्याचा मान याच दिवशी नव्या सुनेला मिळतो.

याच प्रमाणे अंग्गी फेव उत्सव - नागा लोक भविष्यातील सर्वांच्या समृद्धीसाठी देवाकडे मागणे मागतात.यावेळी कुदळ ,फावडे, कुर्‍हाड अशी शेतीची अवजारे स्वच्छ करतात. तसेच थंगल लोक लिन्हू उत्सव साजरा करतात, हा उत्सव झाल्याशिवाय बी पेरणी केली जात नाही , गावचा मुखीया तीन दिवस उपवास करून देवाची पुजा करतो व देवाकडे चांगले पीक येऊ दे अशी इच्छा व्यक्त करतो. हा उत्सव होईपर्यंत गावातील कोणीही गावाबाहेर जाऊ शकत नाही आणि बाहेरचे कोणीही गावात येऊ शकत नाहीत.अशी प्रथा आहे.
चेइराओबा – मणीपुरी नव वर्षाभिनंदन –मैतेयी हिंदू सण.हा सण त्यांच्या चंद्र कॅलेंडर शाजिबू नुसार वर्षाचा पहिला दिवस असतो. चेई म्हणजे वर्ष आणि राओबा म्हणजे सांगणे- ‘नव्या वर्षाची घोषणा’. त्यांच्या मतनुयार पहिल्या दिवशी जे बरोबर असतं किंवा जे घडते ते वर्षभर बरोबर असते त्यामुळे सर्व चांगल्या उद्देशाने , महत्व देऊन वर्षाची सुरुवात चांगली झाली पाहिजे असे बघतात, म्हणून कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार सर्वांनी आनंदाने एकत्र येतात, हिंदूंची कुलदेवता ‘सनामाही’ देवतेला स्मरून, पूजून, आशीर्वाद घेतात. समता आणि बंधुत्व वाढवणे व टिकविणे याचा प्रयत्न करतात.यापूर्वी ते आधी घराची साफसफाई, घर व आसापाचा परिसर यांची स्वच्छता ,घराची रंगरंगोटी, घरे व देवलयांची सजावट करतात. सर्वांना एकत्र बोलावून भोजन समारंभ होतात. नवी खरेदी होते, नवीन वर्ष सुरुवातीपासूनच वर्षभर चांगले जावे अशी मनोकामना करतात. गोडधोडचे जेवण करतात. या दिवसा पासून नवीन कृषि चक्र पण सुरू होणार असते.

                                      

कांग चिंगबा- रथयात्रा – पुरी येथील जगन्नाथचा रथ असतो तसेच मणीपुर मध्ये जुलै मध्ये भगवान जगन्नाथची रथयात्रा हा उत्सव असतो. कांग या रथगाडीतून, मंदिरातून जगन्नाथ, सुभद्रा आणि बलभद्र यांच्या मूर्ती नेल्या जातात, हा रथ भक्त ओढतात, ही मोठी शोभायात्रा असते. याची सुरुवात प्रथम 1832 मध्ये राजा गंभीर सिंह याने केली. मैतेयी लोकांचा हा मोठा उत्सव असतो.

                              
खरं तर, अशा सांस्कृतिक वेगळेपणामुळे समाजात एकोपा, समता आणि बंधुत्व टिकून राहायला मदत होते. मणीपुरच्या सौंदर्य आणि निसर्गसंपत्ति बरोबरच ही संस्कृती टिकून राहावी, अबाधित राहावी अशी प्रार्थना !

(सर्व फोटो गुगल वरून साभार . हा लेख एकता या मासिकाच्या ऑगस्ट च्या विशेष मणीपुर अंकात प्रसिद्ध झाला. ,आज 15 ऑगस्ट 24  रोजी अंकाचे प्रकाशन झाले.  ) 

 
© ले. डॉ. नयना कासखेडीकर, पुणे . .
-------------------------------------

Friday, 21 June 2024

डॉ हेडगेवार- लेखक - ना.ह. पालकर

 



डॉ हेडगेवार-

लेखक - ना.ह. पालकर

वाचायलाच हवा हा चरित्रग्रंथ


थोर आणि कर्तबगार व्यक्तींची चरित्रे पुढच्या पिढीला नेहमीच प्रेरणा देतात,मार्ग दाखवतात.आतापर्यंतअनेकऐतिहासिक व्यक्तींची चरित्रे, संतांची चरित्रे, स्वातंत्र्यपूर्व काळातील व स्वातंत्र्यानंतरच्या काळातीलव्यक्तींचीचरित्रेवाचकांना उपलब्ध झाली आहेत. अशी चरित्रे त्यातील संस्मरणीय आणि उद्बोधक घटना मधून वाचकांना प्रेरकठरतात. त्यातील व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू समजतात. कर्तृत्व कळते, असेच एक उल्लेखनीय चरित्र म्हणजे ना.ह.पालकर यांनी लिहिलेले डॉक्टर हेडगेवार यांचे चरित्र.याला वाङमयीन मूल्य तर आहेच पण ऐतिहासिक मूल्य सुद्धाआहे.

कारण जगातल्या एकमेव मोठ्या हिंदू संघटनेचे संस्थापक असलेल्या डॉक्टर केशवराव हेडगेवार यांचे जीवनविषयी विचार, त्या वेळी असलेली सभोवतालची परिस्थिति, स्थित्यंतरे, त्याचे परिणाम, आचार, विहार, व्यवहार, कौटुंबिक घटना, स्वभाव वैशिष्ठ्ये आणि घडत गेलेले व्यक्तिमत्व आजच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीच्या दिशेने होणार्‍या वाटचालीच्या पार्श्वभूमीवर समजून घेणं महत्वाचं वाटतं.


एखाद्या व्यक्तिच्या जीवनात घडलेल्या सामाजिक घटनांचा त्याच्या व्यक्तिमत्वावर झालेला परिणाम समजून घेत घेत चरित्र वाचताना आपल्याला एखादे व्यक्तिमत्व समजत जाते, उलगडत जाते. तसेच, त्या वेळच्या स्थळ, काळ आणि परिस्थितिचे आपल्याला आकलन होत जाते.त्या प्रमाणे डॉक्टरांचा हा चरित्रग्रंथ वाचताना हे सर्व समजतेच पण, देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात डॉक्टरांनी क्रांतिकारक म्हणून केलेले काम, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या आज जगभर बलाढ्य समजल्या जाणार्‍या विशाल संघटनेच्या स्थापनेची गरज का पडली, त्यावेळची सामाजिक व राजकीय परिस्थिति कशी होती आणि या सगळ्यात डॉक्टरांचे योगदान सुरुवातीपासून काय आणि कसे होते हे यातून वाचताना मन आश्चर्याने स्तिमित होते आणि ऊर अभिमानाने भरून येतो. हा ग्रंथ वाचताना एकीकडे राष्ट्राला संघटनेचा मंत्र देणार्‍या आणि त्यासाठी अतोनात कष्ट घेणार्‍या डॉक्टरांचे उत्तुंग व्यक्तिमत्व कसे घडत गेले ते समजते तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळपास शतकभराचा असंख्य खाचखळग्यांनी भरलेला इतिहास म्हणजे एका दीर्घ वाटचालीचा पटच आपल्यासमोर उलगडतो आणि राहून राहून आश्चर्य वाटतं की एका अलौकिक कर्तृत्ववान व्यक्तीने सुरू केलेली एक संघटना तब्बल १०० वर्षभर कार्यरत आहे, नव्हे फोफावलेल्या एका विस्तीर्ण वटवृक्षासारखी भारतातच काय, भारताबाहेरसुद्धा आपली मुळे खोलवर रुजविते ! याचे कारण त्यांनी बालवयापासूनच अनुभवलेला पारतंत्र्यातील भारत. वैद्यकीय क्षेत्रातील पदवी घेऊन वैद्यकीय व्यवसाय सुरू करून आपले जीवन आर्थिकदृष्ट्या स्थिर, सुखी व्हावे अशी चारचौघांसारखी रूढ वाट चालावी असे कदापिहि न वाटता, आपल्या राष्ट्रासाठी काहीतरी करण्याची तीव्र उर्मी त्यांच्या मनात होती. परकीय सत्तेखाली भरडून निघत असलेला भारत रोज दिसत होता आणि त्यामुळे इंग्रजांबद्दल मनात कमालीची चीड होती.त्यांच्या जीवनातल्या अनेक घटनां वरून दिसते. एक प्रसंग उल्लेख करण्याजोगा आहे, इंग्लंड ची रानी विक्टोरिया हिच्या राज्यारोहणाला २२ जून १८९७ ला साठ वर्षे पूर्ण झाली म्हणून सगळीकडे समारंभ, भाषणे होऊन, त्यानंतर मुलांना मेवामिठाई वाटण्यात आली. काही अजाण मुलांनी ती आनंदाने उड्या मारत खाल्ली. पण परदास्याची जाणीव असलेला लहानगा केशव, त्याने मिळालेला पुडा घरी आल्यावर कचर्‍याच्या डब्यात फेकून दिला. भावाने विचारलं केशव तू एव्हढा गंभीर का? तुला नाही वाटतं मिठाई मिळाली?केशवने उत्तर दिले मिळाली तर! पण आपल्या भोसल्यांचे राज्य जिंकणार्‍या राजांच्या समारंभाचा आनंद कसला? कारण लहानपणी त्यांच्या मनावर स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचा विलक्षण प्रभाव होता. सीतबर्डीच्या किल्ल्यावर युनियन जॅक फडकताना दिसला की, त्या बाल मनाला वाटे तो काढून टाकून तिथे भगवा झेंडा लावला की किल्ला सर झाला. एव्हढेच काय वर्गात इतिहासाच्या तासाला शिकविले जाणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र केशव अत्यंत तन्मयतेने ऐकत असे. त्यातल्या रोमांचकारी अद्भुत घटना ऐकल्यावर त्याला वाटे आपणही असा पराक्रम करावा. असे अनेक संदर्भ डॉक्टरांच्या देशभक्तीचे दाखले म्हणून या ग्रंथात ठिकठिकाणी आले आहेत.

म्हणून पुढे हिंदूंचे असे संघटन उभे करून हिंदू राष्ट्र स्वबळाने आणि वैभवाने पुन्हा एकदा जगाच्या अग्रभागी दिसावे अशा उद्देशाने डॉक्टरांनी, अखेरच्या श्वासापर्यंत सर्व शक्तींनीशी प्रयत्न केले. त्यांनी भले संन्याशाची वस्त्रे चढवली नाहीत पण ब्रह्मचारी राहून संन्यस्त जीवन जगले, ते केवळ आणि केवळ राष्ट्रासाठी. आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडेल की काय विचार होता या मागे?

केशवराव कलकत्त्याहून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून पदवी घेऊन परतल्यानंतर साहजिकच लग्नासाठी मुलींची स्थळे येऊ लागली. तसे यासाठी प्रयत्न करणार्‍या आपल्या काकांना त्यांनी पत्राने कळविले की, “अविवाहित राहून, जन्मभर राष्ट्रकार्य करण्याचा मी निश्चय केला आहे. देशकार्य करताना केंव्हाही जिवावरचे संकट ओढवू शकेल, हे माहीत असताना उगीच एका मुलीच्या जीवनाचा नाश करण्यात काय अर्थ आहे?” आणि देशकार्यासाठी ब्रह्मचारी राहून आपले ध्येय साधत राहिले. केव्हढे हे समर्पण होते?

हम करे राष्ट्र आराधन,

तन से, मन से, धन से,

तन मन धन जीवन से,

हम करे राष्ट्र आराधन !

हा चरित्र ग्रंथ वाचताना या गीताची प्रचिती आपल्याला पदोपदी येते आणि मन आदराने भरून येते.
त्यांच्या अशा निर्णयामुळे, त्यागी आणि सच्छील देशभक्त तरुण म्हणून त्यांच्याकडे सगळे पाहात आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन देश कार्यासाठी पुढे येत. या वयातला हा त्यांचा निर्णय होईपर्यंतच्या काळात त्यांचे लहानपणापासूनचे आयुष्य कसे होते, त्यांना देशासाठी, राष्ट्रासाठी अवघ आयुष्य समर्पित करावं अशी प्रेरणा देणार्‍या कुठल्या घटना होत्या, हे सगळं या चरित्र ग्रंथातून समजतं.डॉक्टरांनी म्हटले होते,

सामर्थ्य आहे हिंदुत्वाचे |

प्रत्येक हिंदु राष्ट्रियाचे |

परंतु तेथे संघटनेचे |

अधिष्ठान पाहिजे ||

त्याप्रमाणे, संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन करणे हाच त्यांचा उद्देश होता. त्यांनी हे संघटन बांधताना एका कार्यपद्धतीने त्याला आकार दिला. एक शिस्त लावली, दृष्टी दिली, संघटन कौशल्य शिकविले. वेगवेगळ्या प्रसंगातून व घटनातून आणि व्यवहारातून बरोबरच्या कार्यकर्त्यांवर संस्कार केले. त्यामुळेच त्यांनी १९२५ च्या विजयादशमीला सुरू केलेले हे कार्य, आज काळ बदलला तरी त्या नंतरची सतत ९८ वर्षे वाढतच आहे. संघ स्थापन करून राष्ट्रासाठी हिमालयाएवढे काम करणारे डॉक्टर हेडगेवार म्हणजेच संघ आणि संघ म्हणजेच डॉक्टर हेडगेवार.

पूजनीय डॉक्टरांचे हे चरित्र, भारतीय विचार साधनाने प्रकाशित केले आहे. ज्येष्ठ स्वयंसेवक (दिवंगत) ना.ह. उपाख्य नाना पालकर यांनी हे लिहिले आहे. या ग्रंथाला प.पू. श्रीगुरुजींची सविस्तर अशी प्रस्तावना आहे. ग्रंथाची ही प्रस्तावना वाचल्यास हे चरित्र लिहिण्यातल्या अडचणी किती होत्या आणि तरीही ते लिहिणे आपल्यासाठी किती महत्वाचे होते हे आज कळते. अन्यथा हा इतिहास आपल्या हाती लागलाच नसता आणि याचे दस्तैवजीकरण ही झाले नसते. डॉक्टरांच्या निधनानंतर २० वर्षांचा काळ लोटल्यावर हे चरित्र लिहिले गेले, हे काम अर्थातच सोपे नाही. शिवाय पूर्वायुष्यात डॉक्टर क्रांतिकारक म्हणून काम करताना इंग्रज शासनाच्या हाती काही लागू नये ही काळजी घेत असल्याने अनेक संदर्भ प्रसिद्ध झाले नाहीत, जपून ठेवले गेले नाहीत. इंग्रज सरकारचेही डॉक्टरांवर बारीक लक्ष असे. लेखक कै.नाना पालकरांनी मनोगतात आणखी एक खंत व्यक्त केली आहे की, गांधी हत्येनंतर १९४८ मध्ये झालेल्या जाळपोळीत डॉक्टरांच्या संबोधनांची प्रतिवृत्ते व पत्रे यात नष्ट झाली. जे कागदपत्र चरित्र लिहिण्याच्या दृष्टीने महत्वाचे होते. ते हाती आले असते तर, डॉक्टरांचे संघटक म्हणून व्यक्त झालेले वेळोवेळचे विचार व चिंतन आपल्यापर्यन्त पोहोचले असते. शिवाय कित्येक कागदपत्रे सरकारकडून जप्त झाली, काही वाळवी लागून हातची गेली. डॉक्टरांना पाहिलेल्या वा त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती हयात नसल्यामुळे ज्यांच्याकडून प्रत्यक्ष माहिती उपलब्ध झाली असती, ते ही शक्य झाले नाही. म्हणूनच हे ग्रंथ लेखन परिश्रमाचे व कौशल्याचे काम होते. यात ‘महाराष्ट्र’सारख्या जुन्या वृत्तपत्रातील माहिती, संबंधित व्यक्ती व कार्यकर्त्यांशी बोलून, जुनी कागदपत्रे, संदर्भ, काही भाषणे, पत्रव्यवहार ,लोकांनी सांगितलेल्या आठवणी आणि संदर्भ घेत लिहिलेल्या या चरित्रामुळे डॉक्टरांचे अगदी बालपण, शालेय जीवन, युवावस्था, वैद्यकीय शिक्षण ते संघस्थापने पर्यन्त घडलेले त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग, घटना, घडामोडी आणि त्यानंतरच्या काळात केलेले काम, कॉंग्रेस पक्षातील दायित्व, क्रांतिकारक हालचाली, भोगलेला तुरुंगवास, गांधीजींच्या दांडी सत्याग्रहातला वैयक्तिक सहभाग व त्यामुळे घडलेला नऊ महीने तुरुंगवास, जंगल सत्याग्रह, असहकार आंदोलन, होमरूल चळवळीत दिलेली भाषणे अशा अनेक गोष्टींपासून ते थेट संघाचा कार्यविस्तार इथपर्यंतचा डॉक्टरांचा जीवन प्रवास या चरित्रग्रंथात वाचायला मिळतो.

१९२५ साली विजयादशमीला सुरू झालेल्या एका शाखेपासून प्रारंभ झालेलं संघाचं काम डॉक्टरांच्या दूरदृष्टीमुळे आणि कामाच्या विस्मयकारक झपाट्यामुळे त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यन्त म्हणजे १९४० पर्यन्त ७०० शाखा आणि ८० हजार सदस्य, इतके वाढले होते. आज तर देशभरात हजारो शाखा आणि लाखो स्वयंसेवक कार्यरत आहेत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एखादे संघटन किंवा राष्ट्रासाठीचे काम उभे करून ते वाढवायचे असेल तर काय काय गोष्टी ध्यानात घ्यायला हव्यात? काय व कसे निर्णय घ्यायला हवेत? कसे आचरण असायला हवे? कार्यकर्ता कसा घडवायचा? वैयक्तिक भेटीचे महत्व, सहकार्य, विश्वास आणि प्रेम, लोकसंग्रह, डॉक्टर मुंजे, लोकमान्य टिळक, क्रांतिकारक सावरकर तिन्ही बंधु, सुभाषचन्द्र बोस, शामा प्रसाद मुखर्जी, लोकनायक अणे, महात्मा गांधी, भगतसिंग, राजगुरू यांच्याशी संपर्क आणि अशा अनेक बारीक सारिक गोष्टी, डॉक्टरांची स्वभाव वैशिष्ठ्ये या चरित्रातून आपल्याला समजतात. प्रभावी संस्कार केल्यावचून देशभक्ती चे टिकाऊ स्वरूप निर्माण होणे अशक्य आहे असे त्यांना निरीक्षणातून पटले होते. त्यासाठी विशेषत: आजच्या तरुणांनी हा चरित्र ग्रंथ आवर्जून वाचलाच पाहिजे असा आहे. त्याशिवाय ज्यांना आतापर्यंत संघ समजला नाही त्यांनी जरूर वाचला पाहिजे. झालेले गैरसमज क्षणात गळून पडतील.म्हणून म्हणावेसे वाटते हिंदुनो हा चरित्र ग्रंथ वाचाल तरच वाचाल !

- लेखन – डॉ. नयना कासखेडीकर,पुणे.

(हा लेख साप्ताहिक विवेक हिंदुस्तान प्रकाशन यांनी संघ शताब्दी वर्षा निमित्त प्रकाशित केला त्यात समाविष्ट आहे. ६७४ पानी असलेला हा ग्रंथ अत्यंत महत्वाचा दस्तऐवज आहे व वाचनीय आहे. त्याचा एक छोटासा भाग आपण आहोत याचा अभिमानच आहे.) 

                                                                    ---------------------- 

Saturday, 25 May 2024

चहा - जपानी समारंभ ‘चाडो’

 

 चहा - जपानी समारंभ चाडो


   चहाची तल्लफ ? होय ना ? मग ऑफिस मध्ये. मीटिंग मध्ये ,कुणाच्याही भेटी दरम्यान ,प्रवासात आणि वातावरणाचा परिणाम म्हणून सुद्धा या चहाची तल्लफ आपल्याला येतेच. काही वेळा तर चहा ची वेळ हे सासूबाई किंवा आज्जेसासूबाई यांचे घड्याळ असते. पण ही तल्लफ मोठी वाईट. ठरलेल्या वेळेला चहा नाही मिळाला तर काहींचे डोके चढते ...म्हणजे दुखायला लागते. चिडचिड होते. काही कामाच्या ठिकाणी दिवसभरचा कामाचा ताण बाजूला ठेऊन जरा निवांत वेळ मिळण्यासाठी चहासाठी ब्रेक घेतात. टी-टाईम. (कुठल्याही ऑफिस मधले लोक १० मिनिटांच्या चहाला तास भराचा फेर फटका मारतात ही गोष्ट वेगळी.)

     चहा सुद्धा ठराविक ब्रॅंड चा प्यायचा अशी सवय जडली असते. कोणाला भेटायला बोलवायचे तेंव्हा आपण म्हणतोच “चहाला या” यात लपलेला अर्थ म्हणजे गप्पा मारायला या.(चित्रपट गीतात शायद मेरे शादी का खयाल दिल मे आया है, इसिलीये मम्मीने मेरी तुम्हे चाय पे बुलाया है” हेच ते बोलणे या वेळी करायचे असते.)ते असो. पूर्वी आपल्याकडे चहा सुद्धा पित नसत. आमच्या लहानपणी आम्ही चहा मागितला की चहाची सवय लागू नये म्हणून ,आज्ज्या, मावश्या, काकू आम्हाला भीती दाखवायच्या. की, लहान मुलांनी चहा प्यायचा नसतो ,कोणी म्हणायचे चहा प्यायला की काळे होतो. आज चहाचे आवडते ब्रॅंड आहेत. आता मात्र याला मोठेच सांस्कृतिक महत्व आलेले दिसते. सुर्रर्र....के पियो ... अशा चहाच्या उत्पादनाच्या अनेक जाहिरातीतून चहा आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता पावलेला आहे हे कळते. म्हणून तर चहा प्रेमींसाठी २१ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने अधिकृतपणे जाहीर केला आहे.

                         

चहा म्हणजे चा या चीनी भाषेतून रूढ झालेला शब्द. तोच मग चीनी भाषेतून भारत, जपान, इराण, रशिया या देशातून सुद्धा थोड्या फार प्रकाराने रूढ झाला. डच लोकांनी हा शब्द जावा मार्गे युरोपात नेला असे म्हणतात.चहा चे शास्त्रीय नाव कॅमेलिया सायनेन्सिस. चहा ची ही वनस्पति झुडुपे या प्रकारात मोडते. याच्या पानांवर प्रक्रिया करून उत्तेजक पेय तयार होते तोच चहा.चीनी दंतकथेत चहा हे उत्तेजक पेय म्हणून उल्लेखलेले असले तरी Erhya या चीनी शब्दकोशानुसार चहा ही औषधी वनस्पति म्हणून लोकांना परिचित होती.  केवळ चहाच्या पानांच्या उत्पादनांसाठी याची लागवड केली जाते. हाच चहा आता जगातील निम्मे लोक पितात आणि हे पेय लोकप्रिय आहे. म्हणूनच चाय पे चर्चेला आणि दैनंदिन आहारामध्ये व आदरातिथ्यात चहाला महत्व आहे. सातव्या आणि आठव्या शतकात म्हणे चीन मध्ये चहा इतका लोकप्रिय झाला होता की चहावर चीनी सरकराने कर बसवला होता . चीन मध्ये चहा वर ग्रंथ सुद्धा आहे. त्याचे नाव आहे चा चिंग’,आठव्या शतकातील हा ग्रंथ, चहाचा इतिहास व चीन मधील ही मूळ वनस्पति याची माहिती देतो. असे म्हणतात की बौद्ध भिक्कुंमार्फत चहा पिण्याची ही सवय चीन मधून युरोपात पोहोचली. मग पुढे याचा प्रसार झाला. सहाव्या ते आठव्या शतका दरम्यान जपान मध्ये प्रथम चहा गेला. आता तर चहापान विधी तिथे घराघरात महत्वाचा समजाला जातो. सर्व आशियाई देशात पण हा प्रसार झाला.

                                          जपान मध्ये चहा समारंभ -


  जपानी चहा समारंभ ‘चाडो’. द वे ऑफ टी, म्हणून ओळखला जाणारा हा समारंभ एक सांस्कृतिक परंपरा समजली जाते. १५०० च्या काळात सेन नो रिक्यु यांनी जपानी चहा संस्कृतीत क्रांति घडवून आणली आणि त्याला एक कला प्रकार म्हणून मान्यता प्राप्त करून दिली. चीनी चहाचे पूर्णपणे जपानीकरण केले. तेंव्हा पासून चहाचे घर, चहाची बाग, चहाची भांडी, चहा समारंभाचे नियम असे लागू करून सौंदर्य पूर्ण चहा समारंभ होऊ लागले. सेन नो रिक्यु ने या समारंभाचे योगी नियोजन होण्यासाठी सात नियम घालून दिलेले आहेत. चहा समारंभासाठी म्हणजे चानोयू साठी हे जपानी परंपरेतले एक घर / वास्तू ‘चशीत्सू’ हे चहाघर म्हणून वापरले जाते. आपल्याकडे जशी अमृततुल्य चहा ची दुकाने अथवा चहा टपर्‍या ठिकठिकाणी आढळतात तशीच.यात चहा शिकविणारे असतात चाय मास्टर म्हणजे तज्ञ त्यांना ‘तेशू’ म्हणतात.
   
                        

                                                         चहा घर - चशीत्सु

    सेन नो रिक्यु यांच्या पतवंडांनी म्हणजे पुढच्या पिढिंनीही या संकल्पनेचा विकास करत आणला. या पद्धती शाळेच्या पाठ्यक्रमात लावल्या गेल्या आहेत. त्यांनी तर ओमोटेसेन्के , उरासेन्के आणि मुशाकोजिसेन्के या चहा शाळांची स्थापना केली.या तीन प्रमुख शैली आहेत. यातील शाळा आजही सुरू आहेत. पुढे चहा संमेलनाचे औपचारिक आणि अनौपचारिक वर्ग पडून वर्गीकरण झाले.  तिथे शाळा  महाविद्यालये आणि विद्यापीठात चहाचे क्लब आहेत.

            उरासेंके शाळेचे पंधरावे ग्रँड मास्टर सेन गेंशीत्सू यांनी केलेल चहा समारंभ 

    जसे आपल्याकडे पाककृतींचे वर्ग घेतले जातात तसे तिथे वेगवेगळ्या लोकांसाठी चहाच्या सशुल्क शाळा चालतात. हे विद्यार्थी महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक असे असतात.म्हणजे थोडक्यात क्लासेस.त्यात काय शिकायचे  असा प्रश्न आपल्याला पडेल पण खरच हा एक समारंभ असा असतो की त्या शाळेत प्रवेश करण्यापासून चे नियम , शिस्त, प्रथा, मॅनर्स अगदी दार कसे उघडायचे,आत आल्यावर तातामी मॅट वर कसे चालायचे , इथपासून भांडी कोणती वापरायची, कशी वापरायची, कशी धुवायची, कशी मांडायची, आलेल्यांचे स्वागत कसे करायचे , कोणाला आधी नमन करायचे, यजमानाने चहा समारंभासाठी आलेल्या पाहुण्यांशी कसे वागायचे आणि पाहुण्यांनी पण वागताना कोणते नियम पाळायचे असे एव्हढे संस्कार/पद्धती या शाळेत शिकविले जातात. पाहुण्यांनी चहा समारंभाला आल्यानंतर आत जाण्याआधी चपला बूट बाहेर काढून, हात पाय तोंड स्वच्छ धुवून मगच जायचे असते.तेही यजमानांनी आदरपूर्वक बोलवल्यानंतरच . तो पर्यन्त वेटिंग रूम मधेच थांबायचे असते. एक राऊंड झाल्यानंतर मध्यंतर असते, त्यात चहा च्या खोलीची स्वच्छता होते पुन्हा पाहुण्यांना आदराने आत बोलावले जाते. एका वेळी पाहुण्यांची संख्या साधारण ५ असते. असा हा समारंभ किमान अर्धा तास ते जास्तीत जास्त चार तास चालू असतो. हा, वेळ पाहुण्यांची संख्या ,चहा सादरीकरणाची पद्धती, जेवण व चहाचे प्रकार यावर अवलंबून असतो. अशी ही मोठी प्रक्रियाच असते.

  

चहाच्या या औपचारिक कार्यक्रमावेळी ताजे जेवण दिले जाते त्याला कैसेकी किंवा चा- कैसेकी म्हणतात. या समारंभासाठी यजमान विशेष कपडे किमोनो घालतात. किमोनो हा जपानचा राष्ट्रीय पोशाख आहे. शाळा, प्रसंग, त्या वेळचा ऋतु, उपकरणे अशा अनेक घटकांवर ही चाडो म्हणजे (the way of tea)पद्धत आधारित असते. म्हणजे चहा समारंभ केवळ चहा पुरताच मर्यादित नसतो तर या वेळी छोटेसे भोजन पण असते. याचे महत्व म्हणजे आस्वाद घेणे आणि आनंद देणे असते.  

    अशा शाळांतून चहा शिकल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देखील मिळते. हे ऐकलं की आपल्याकडे सुद्धा संगीत, शिवण, कला याबरोबर पाककौशल्य किंवा चहा, कॉफी, सरबते शिकवण्यासाठी एखादा तास असायला हरकत नाही ,नाही का ? पण एक मात्र आहे , आपल्या मुलामुलींना चहा नक्कीच करता येतो.नव्हे यायलाच हवा त्यासाठी कशाला शाळा हव्यात ? हं चहा करून झाल्यावर तो सर्व्ह करतांना ,किंवा कपात चहा ओतताना हातावर कंट्रोल हवा ,तो ट्रे मध्ये, खाली जमिनीवर  सांडू नये , कपातला चहा बशीत सुद्धा सांडू नये देताना, असे शिक्षण द्यायला हवे पालकांनी. हेच ते मॅनर्स, शिस्त जपानी चहा समारंभात शिकवले जातात. 

 पाहिलंत, हा जपानी चहा समारंभ म्हणजे नुसता एक सोहळा च नसतो तर तो सद्भाव, सन्मान, पवित्रता आणि शांतीचे प्रतीक असलेली, एक आध्यात्मिक अभ्यासाची पद्धत मानली जाते. त्यात इतिहास आहे, संस्कृती आहे, सौंदर्य शास्त्र आहे , सामाजिक एकोपा वाढवण्याचे साधन आहे. शिवाय त्यात कला आहे, स्वच्छता आहे , नीटनेटकेपणा आहे, आतिथ्य आहे. नम्रता आहे, शिष्टाचार आहे. विविध शैली आहेत.

मग काय कधीही जपान टूरवर जाल तेंव्हा नक्की या समारंभाला जाणीवपूर्वक हजर रहा. तिथला अमृततुल्य पिऊन या. आपल्या इथल्या आसाम - दार्जिलिंग सारखे चहाचे मळे पण बघून या. संस्कृतीतला फरक बघाल तेंव्हाच महत्व अनुभवाल, तर अशी ही जपानी चहा संस्कृती ! वाचली म्हणून सांगितली.

© ले – डॉ. नयना कासखेडीकर , पुणे

( सूचना - यातील कुठलीही माहिती/ content लेखिकेच्या परवानगी शिवाय वापरता येणार नाही. )

                                    ---------------------