(राष्ट्र समर्पित कलासाधना या विषयावरील सांस्कृतिक वार्तापत्राच्या २६ जानेवारी २०२५ च्या अंकात हा प्रमुख लेख म्हणून प्रसिद्ध झाला.)
कलांच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती
राष्ट्र,
राष्ट्रवाद आणि राष्ट्रीयत्व या संकल्पना एकमेकांशी संलग्न आहेत. ‘एखाद्या विशिष्ठ भूमीवर कायमस्वरूपी वस्ती करून राहणाऱ्या लोकांचा समुदाय
सार्वभौम सरकार स्थापन करतो, ते राज्य असते आणि अशा
राज्यातील लोकाना जेव्हा आपल्या या प्रदेशाविषयी प्रेम, आदर
आणि अभिमान वाटतो, तेंव्हा त्याला राष्ट्र म्हणतात’. कलांच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती कशी हे समजून घेताना आधी राष्ट्रभक्ती
म्हणजे काय ते समजून घ्यायला हवे. खरं तर राष्ट्रभक्तीची भावना अगदी पूर्वीपासून
आहे.मानवी उत्क्रांतीची अवस्था पाहिली की लक्षात येते की मानव जेंव्हा समूह करून
राहायला लागला तेव्हापासून तो राहात असलेल्या
परिसराबद्दल, बरोबरच्या लोकांबद्दल आपुलकी, प्रेम, सहवेदना या भावना निर्माण झाल्या. पुढे या
भावनांचा विस्तार झाला तेंव्हा याच भावना
वेगळ्या परिस्थितीत राष्ट्राशी निगडीत झाल्या.
सगळ्यांना या राष्ट्राविषयी प्रेम,अभिमान
आणि निष्ठा असणे यालाच राष्ट्रीयत्व असे म्हणतात. एकाच वंशात जन्मलेले लोक राष्ट्र
निर्माण करू शकतात असे म्हणतात. म्हणूनच आम्ही आपल्या राष्ट्राला हिंदू राष्ट्र
म्हणतो. याचे महत्वाचे घटक म्हणजे,भौगोलिक एकता, समान इतिहास, समान वंश, समान
भाषा, समान धर्म, समान संस्कृती,
समान राजकीय उद्दिष्टे ,समान आदर्श आणि
स्व-राज्य. या घटकांचा उद्देश मुख्यत: स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जागृती निर्माण
करणे, त्यासाठी लोकांना एकत्र आणून एकता आणि सहकार्याची
भावना, राष्ट्रप्रेम जागृत करणे व ती कायम राखणे तसेच विचार व भावनांचे आदान प्रदान करणे, संस्कृतीचे जतन करणे हा होता. जनतेला राष्ट्राप्रती संवर्धन, संरक्षण आणि समर्पण असा संदेश देण्याचे प्रभावी काम कलांच्या माध्यमातून
होते.
कला म्हणजे आपल्या मनातील विचार
आणि भावना यांची अभिव्यक्ति !. जगाच्या पाठीवरील प्रत्येक देशाची कला वेगवेगळी
आहे. इजिप्शियन कला, मेसोपोटेमियन कला,
सुमेरियन कला, ग्रीक कला, रोमन कला इत्यादि. या कला त्या त्या देशाची परंपरा आणि आदर्श यावर आधारित
आहेत . युरोपचा राष्ट्रवाद पाहिला तर त्यांच्या राष्ट्राच्या विकासात भाषा,
लोकसंगीत, लोककाव्य, लोकनृत्य
आणि संगीत या कलांचा मोठा वाटा आहे.
आपल्याकडील कला प्राचीन आहेत. आपल्या देशाच्या कलेमध्ये सुद्धा याचप्रमाणे आपले आदर्श,
आपल्या परंपरा आपली मूल्ये ,विचार यांचे
प्रतिबिंब दिसते. राष्ट्रीयत्वाचा/राष्ट्रभक्तीचा विचार सुद्धा आपल्याकडे प्रथम
साहित्यातून, तदनंतर विविध ललित कलांमधून दिसायला लागला.
कारण आपल्या संस्कृतीत जीवन जगण्यासाठीची मूल्ये, अगदी
मानवाच्या उत्क्रांती पासूनच आहेत. पण वैयक्तिक आयुष्यात असतात त्या प्रमाणेच या
मूल्यांचा उपयोग राष्ट्रासाठी केला गेला तर समाजात एकात्मतेची भावना लवकर रुजते.
राष्ट्राप्रति निष्ठा वाढते. तीच राष्ट्राच्या विकासासाठी ,प्रगतीसाठी
आवश्यक असते. राष्ट्राबद्दल जेव्हढी निष्ठा अधिक, तेव्हढी
राष्ट्राची प्रगती जास्त, तेव्हढा विकास चांगला .सामाजिक ऐक्य/समता, न्याय आणि एकता ही सामूहिक मूल्ये राष्ट्रभक्ती मध्ये महत्वाची असतात
.प्रत्येक संस्कृतीत वेगवेगळी मूल्ये आढळतात. म्हणूनच पाश्चिमात्य संस्कृतीपेक्षा
भारतीय संस्कृती वेगळी आहे. न्याय, निष्ठा, स्वातंत्र्य, समता, न्याय,
बंधुता, मैत्री, वक्तशीरपणा,
सहनशीलता आणि प्रामाणिकपणा ही मूल्ये म्हणजे मार्गदर्शक तत्वे
असतात. हेच सर्व विषय विविध कलांमधून मांडले जातात. .
समाजावर राष्ट्रीय संस्कार करण्याचे काम
ललितकलांच्या माध्यमातून चांगले होऊ शकते या अनुभवातून भारतीयांनी
मुळातच भारतीय कलांची आपापली वैशिष्ट्ये जपली आहेत.कलांचे ध्येय असते
लोकांना त्यांचे अर्थपूर्ण अस्तित्व दाखवणे, मनास
तोषविणे. कला लोकांना शिक्षित करते आणि त्यांचे प्रबोधन करते. आपल्या ६४ भारतीय कलांपैकी.नृत्य. नाटक, संगीत,चित्रकला, शिल्पकला,
वास्तुकला, चित्रण छायाचित्रण, कॅलिग्राफी, ग्राफिक्स, लोककला,
हस्तकला या सामाजिक व्यवहारातील कला आहेत. माध्यम वेगवेगळे आहे पण
या कालांमधून शब्द, रंग, रूप, आकार,आवाज भावना व्यक्त करण्याची शैली लोकांना
आकर्षित करते.त्यांच्या मनावर परिणाम करते. एक प्रकारे संवाद साधत असते . म्हणून
यातून प्रसारित झालेल्या भावना अधिक परिणामकारक उद्देश साधणाऱ्य ठरतात, मग जगाच्या पार्श्वभूमीवर आपला देश हा माझा देश असा अभिमान जागृत होतो.
एकदा समाज या विचाराने प्रेरित झाला की राष्ट्रप्रेमाची भावना याच दृष्टिकोनातून
विचार व कृती करायला लागतो. अनुकरण करायला लागतो. कारण कला हे प्रभावी माध्यम
आहे.त्यांचा आविष्कार सौंदर्यात्मक असतो .या सौंदर्याच्या अनुभवाबरोबर आपण कलेतून वास्तवाचा शोध पण घेत असतो.
पण राष्ट्रप्रेम किंवा राष्ट्रभक्ती प्रकर्षाने दिसली ती भारत पारतंत्र्यात
असताना. ब्रिटिशां विरुद्ध स्वातंत्र्याचा लढा देत असताना.जेंव्हा स्वबोध झाला
तेंव्हा. समाजातील सर्व स्तरातील लोकानी मिळून
बलाढ्य अशा वसाहतवादी ब्रिटिश साम्राज्याला शरणागती पत्करायला लावली. १७५७
मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने बंगाल
मध्ये प्लासीची लढाई जिंकली आणि स्वत:चे साम्राज्य उभे केले त्यांच्या
साम्राज्याच्या विरोधातले आंदोलन जवळ जवळ १८६ वर्षे चालले होते.
कंपनी सरकारचा कालखंड १७५७ ते १८५८ होता आणि
ब्रिटिश साम्राज्याचा पुढे कालखंड १८५८ ते १९४७ असा होता. १८५७ चा लढा हे पहिले
संघटित आंदोलन होते.
त्यानंतरच्या घटना होत्या १८८५ मध्ये
राष्ट्रीय कॉंग्रेस ची स्थापना, १९०५ मध्ये
बंगालचं विभाजन, वंगभंग
आंदोलन, लाल बाल पाल यांचा सहभाग, १९१५
मध्ये महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात आंदोलन, पुढे खिलाफत
चळवळ, असहकार आंदोलन, चौरीचौरा कांड, आझाद हिंद सेना
स्थापना, भारत छोडो आंदोलन,१९४२ ची
ऑगस्ट क्रांती आणि १९४७ला विभाजनाच्या दु:खात भारत स्वतंत्र झाला
मराठी मुलूखात इंग्रजी राजवट इ .स. १८१८ मध्ये सुरू झाली. ब्रिटिश राजवटीचा सर्वच क्षेत्रात समाजाला त्रास होऊ लागला. इंग्रजी शाळा आणि इंग्रजी शिक्षण यामुळे हिंदू संस्कृतीवरच घाला घालणारे वातावरण तयार होत होते. हिंदू लोकांचे ख्रिस्त धर्मात धर्मांतराचा समाजावर विपरीत परिणाम होऊ लागला होता. गुलामगिरी, पिळवणूक, व्यापारांचे खच्चीकरण, हस्तव्यवसायाचा नाश, अशा अनेक बाजुंनी हिंदू समाज भरडला जात होता. त्या वेळचे समाज सुधारक वृत्तपत्रातून या राजवटीवर कोरडे ओढत होते. क्लेश देणार्या घटनांचं प्रतिबिंब साहित्यातून पण उमटत होतं.
विद्वान, पंडित,
पुरोहित,, मौलवी, लेखक,
कलावंत, जमीनदार, शेतकरी,
कारागीर असे सर्वजण ब्रिटिश सरकारच्या विरोधात गेले. यात सामील होऊन
त्यांनी. घरादाराचा त्याग केला, कोणी फकीरी पत्करली. अनेक
स्वातंत्र्यवीरांनी परिणामांची तमा न बाळगता रणांगणात उडी घेतली. यात शाहीर आणि
अनामिक कवी अग्रेसर होते.या काळात शाहीरांच्या आणि कवींच्या काव्य रचनांनी मोठी
कामगिरी बजावली. त्यांच्या गीतांनी लोकांच्या मनातील स्फुल्लिंग चेतविले आणि स्वातंत्र्याच्या भावनेने भारावून जाऊन आपणही
काहीतरी केले पाहिजे असे प्रत्येकाला वाटू लागले. लोकांना सकाळपासूनच
स्वातंत्र्याची आठवण करून देऊन त्यांच्या मनात ही ज्योत पेटवण्याचे काम प्रभात
फेऱ्यांची गीते करू लागली होती. एखादे गीत असे – ‘साखरझोपा
कसल्या घेता राष्ट्र जळत असता?’ प्रभात फेरीतले पहाटेचे हे गीत ऐकून लोकांच्या खरंचच झोपा उडत असत.
यातून ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनमत तयार करण्यासाठी व जागृती करण्यासाठी क्रांतीकारकांप्रमाणेच भारतातील अनेक साहित्यिक, कवी यांनीही आपली लेखणी चालवली होती..हजारो देशभक्तिपर रचना निर्माण झाल्या ज्या सतत प्रेरणा देत होत्या. राष्ट्रभक्तीचे बीज रोवत होत्या. रविंद्रनाथ टागोर , बंकिम चंद्र चटटोपाध्याय, सुमित्रानन्दन पंत. हरिवंशराय बच्चन, मैथिली शरण गुप्त, माखनलाल चतुर्वेदी, महादेवी वर्मा, सूर्यकांत त्रिपाठी, रामधारी सिंह ‘दिनकर’ ते अटल बिहारी वाजपेयी अशा विचारवंत देशभक्तांच्या कविता साहित्य, कथा यातून समाजाला जागे करण्याचे काम झाले आहे.
महाराष्ट्रात सुद्धा अगदी वसंत बापट,
विंदा करंदीकर,,कुसुमाग्रज , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ,कवी अनिल , कवि अज्ञातवासी, कवि यशवंत, माधव
जूलियन, सेनापती बापट, स्वा. सावरकर,
शाहीर गोविंद, भा.रा. तांबे, बा. भ. बोरकर, दु .आ. तिवारी, गोविंदाग्रज,आणि मराठी मध्ये देशभक्तीचा प्रवाह पहिल्यांदा आणणारे कवी विनायक.इत्यादि. आपल्या पूर्वजांचे वैभव आणि
त्यांची वीर वृत्ती याचे लोकांना स्मरण करून देऊन त्यातून त्यांना स्फूर्ती देणे ,पारतंत्र्यविषयी लोकांच्या मनात चीड उत्पन्न करणे या ध्यासाने विनायक
कविता लिहित.दु आ तिवारी यांनी मराठ्यांची
संग्राम गीते लिहिली आहे. बा. भा. बोरकर यांची स्वातंत्र्यलक्ष्मीस कविता ,भा. रा. तांबे यांची ‘रे हिंदबांधवा थांब या स्थळी
अश्रु दोन ढाळी, ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली’अशी शौर्य दाखवणारी कविता .रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले? अशी स्वातंत्र्याची ललकारी देणारे, स्वातंत्र्य
शाहीर कवि गोविंद यांच्या काव्य रचनेतून व्यक्त झालेली देशभक्तीची तळमळ, त्यांनी केलेल्या काव्य गायनामुळे
ब्रिटिशांनी शिक्षा केली होती. राष्ट्राबद्दल अस्मिता जगावण्याची इतकी मोठी
शक्ति कवी गोविंद यांच्या कवितेत होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साहित्यातील
शब्द अन शब्द राष्ट्रप्रेमाने भारलेला
आहे. त्यांच्या कवितेत दिव्य आणि दाहक
स्वरूपात राष्ट्रीय जाणीव दिसते. ‘आर्य बंधू हो उठा उठा,
का मठासारखे नटा सदा’ हा स्वदेशीचा फटका
तरुणांना स्फूर्ती देत होता.
साहित्य, गीते, पोवाडे, पदये ,फटके, प्रार्थना,बोधवाक्ये, जात्यावरच्या ओव्या, मेळ्याची गाणी, आंदोलनातील घोषणा,नाटकातील पदे, चित्रपट गीते, कीर्तन, भारुड, तसेच चित्रकला, रांगोळी, पेन्टिंग, अशा विविध कला माध्यमातून याचे दर्शन झाले आहे. माणुसकीचे पाईक आम्ही, या भारतात बंधु भाव नित्य वसू दे, या मातीचे मोल आम्हाला, देश हीच माता , बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो, जाग जाग भारता , ए मेरे वतन के लोगो, मेरे देश की धरती.., भारत हमको जान से प्यारा है .., अशी अनेक देशभक्तीपर रचना लोकाना प्रेरणा देत होत्या. मनामनात देशभक्ती जागवत होत्या. त्यामुळे हा लढा द्यायला लोकाना प्रेरणा मिळत होती धीर मिळत होता. राष्ट्रभक्तीपर गीत, कविता एकत्र येऊन गायल्यामुळे यातून सर्व हेवेदावे विसरून राष्ट्रभक्तीची सामूहिक भावना जागृत होते.
याच पार्श्वभूमीवर काही नाटके
लिहिली गेली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘संन्यस्त
खड्ग’हे नाटक देशावर संकट आले असताना झोपी गेलेल्या लोकाना
जागे करण्यासाठी लिहिले होते. मॅझिनीचे चरित्र मराठीमध्ये लिहून लोकांना देशाच्या
स्वातंत्र्याचे महत्व कळावे म्हणून सावरकरांनी केव्हढे तरी कष्ट घेतले. वृत्तपत्रे,
साहित्य, काव्य या द्वारे जनजागृती चालूच
होती.
चित्रपट ही दृश्यकला अत्यंत परिणामकारक आहे.आजादी ,उपकार, हम हिंदुस्तानी, गंगा जमून, जागृती, बूट पॉलिश, रोजा, हकीकत, काबुलीवला, लिडर, पूरब और पश्चिम, जिस देश मे गंगा बहती है, नया दौर, हमराही, द लीजेंड ऑफ भगत सिंह (Bhagat Singh- 2002) स्वातंत्र्य सैनिकांवर बनवलेला हा चित्रपट, रंग दे बसंती (Rang De Basanti- 2006), ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवणारे चित्रपट लगान (Lagaan- 2001), भारत पाक युद्धावर आधारीत बॉर्डर (Border- 1997), केसरी (Kesari- 2019), कारगिल युद्धावर बेतलेला एलओसी कारगिल (LOC Kargil- 2003), गोल्ड (Gold- 2018), चक दे इंडिया (Chak De India- 2007), राज़ी (Raazi- 2018), उरी (Uri The Surgical Strike - 2019), स्वदेश, सरफरोश, क्रांति, गांधी, वीर सावरकर,. मंगल पांडे, शहीद. जुनून, मदर इंडिया या चित्रपटांनी मनोरंजनाबरोबर राष्ट्रीय विषयातून राष्ट्रभक्तीची भावना लोकांमध्ये जागृत केली.
आता इलेक्ट्रॉनिक माध्यमात चित्रपटा
इतक्याच प्रभावीपणे राष्ट्रभक्ती
विषयावरील मालिका ,कार्यक्रम,यांची निर्मिती होत असते. मिले सूर मेरा तुम्हारा.. या सर्व भाषिक गाण्याने तर इतिहास निर्माण
केला.
संगीत ही कला नाट्य, नृत्य आणि गीते यांना जोडून येते. शास्त्रीय संगीता पासून ,ए मेरे वतन के लोगो,हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा, अशा वर्णनाचे भक्तिगीते, भावगीते ,भजने अभंग हे सर्व गीतप्रकार लोकांच्या मनावर वर्षानुवर्षे राज्य केले आहे. संतांनी आपल्या काव्याने भक्ती आंदोलनात भारताला जोडण्याचे काम केले आहे. त्यांचं मुख्य उद्देश बंधुत्व भावना जागृत करणे आणि देशाची संस्कृती व साहित्य तसेच अखंडता कायम राखण्याचे काम केले आहे. मीरा बाई नामदेव कबीर. सूरदास, तुलसीदास ही काही उदाहरणे होत . राष्ट्रीय एकता टिकवण्यासाठी आकाशवाणी आणि चित्रपटाने आपली भूमिका बजावली आहे. ‘आवाज दो हम एक है….’ मोहम्मद रफी यांनी गायलेले या गीताने देशातील अनेक कोटी लोकाना एकता या सूत्रात बांधून ठेवल्याचे दिसते.सामूहिक राष्ट्रगान खूप प्रभावी ठरते. संगीता मध्ये संपूर्ण राष्ट्र एकेतेच्या सूत्रात बांधून ठेवण्याची शक्ति असते.रविंद्रनाथ टागोर यांचे राष्ट्रगीत -जण गण मन.. , बंकिम चंद्रांचे वंदेमातरम ..,प्रादेशिक भाषेत लिहिलेली देशभक्तीपर गीते,अब तुम्हारे हवाले वतन साथीओ.. ए मेरे वतन के लोगो.., मॉ तुझे सलाम .. अशी गीते श्रोत्यांच्या मनात राष्ट्र भावना जागृत करतात.
दशावतारी नाटके, लळित, तमाशा, बहुरूपी व खेळे (उत्स्फूर्त पणे विषय मांडणी), शाहीरी, नाटके, एकांकिका, प्रहसने, पथ नाटय, नृत्य नाट्य (कथा द्वारे विषय मांडणी) , महानाट्य, (बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणता राजा व इतर ऐतिहासिक महानाट्य ) लोककलेतील वासुदेव, जोगत्या, गोंधळी, गोसावी, शिमग्याची सोंगे, वारकरी भजने, वाघ्या या माध्यमातून सुद्धा राष्ट्रभक्तीचा विचार मांडला जातो. यात राष्ट्रभक्ती म्हणजे फक्त स्वातंत्र्याचा इतिहासच नव्हे तर राष्ट्राचा विकास, राष्ट्राची अखंडता, संस्कृतीचे संवर्धन. सामाजिक मूल्ये, नैतिक मूल्ये, कुटुंब व्यवस्था, न्याय ,एकता, सामाजिक समरसता, आपल्या संस्कृति व परंपरा यांचं इतिहास व महत्व आणि ते टिकवण्यासाठी प्रयत्न असे राष्ट्र भक्तीचे, राष्ट्रप्रेमाचे विषय, काळ व परिस्थिति बघून मांडले गेले आहेत, मांडले जातात. राष्ट्रीय ऐक्याची भावना निर्माण होऊन मानवतावाद रुजविण्यासाठी केवळ मनोरंजनच नाही तर, प्रबोधनातून लोक जागृतीची आवश्यकता आहे असे वाटून शाहीरी कवितेचा जन्म झाला ज्यातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जडण घडणीत क्रांतिकारक बदल घडवून आणण्याची शक्ति होती. असे शाहीरी पोवाडे गायले गेले. रचले गेले. याचा उपयोग निरक्षर समाजाला नवी जाणीव करून देण्यासाठी आणि नवी दृष्टी देण्यासाठी झाला.यातून पुढे लोकनाट्य, तमाशे, संगीत जलसे, मेळे या कलांचा वापर राष्ट्रीय प्रबोधन करण्यासाठी होऊ लागला.यातूनच राष्ट्रीय भावनेने कला पथके निर्माण झाली. अण्णा भाऊ साठे,अमर शेख यांचे प्रसिद्ध पोवाडे लोकांमध्ये जागृती करणारे ठरले.अशा लोककलांमधून राष्ट्रीय विषय तळागाळातील लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवता येतात.
नृत्यकला ही एक अत्यंत कौशल्य असलेली कला आहे .हावभाव आणि विविध हस्तमुद्रा याद्वारे कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. याला ताल, लय, वाद्य, पदन्यास याची जोड असल्याने प्रेक्षक ते दृश्य बघताना एकाग्र होतो. यातून श्रृंगार रस, हास्य रस, करुण रस, क्रोध रस, भय रस, वीर रस, जुगुत्सा रस, विस्मय रस, शान्त रस दाखवले जातात. वीर रस असलेला कुठलाही राष्ट्रीय विषय सादर होतो तो परिणामकारक असतो.भारतीय नृत्याच्या विविध शैली व प्रकार आहेत. भरतनाट्यम, कुचीपुडी, कथ्थक,कथकली, मोहिनीअट्टम, मणीपुरी, यक्षगान, ओडिसी या शैली आहेत. आदिम संस्कृतीपासून नृत्य ही लोक परंपरा होती ती पुढे विकसित झाली. विशेष म्हणजे या कलेचे वैशिष्ट असे की यात गुरु शिष्य परंपरा असते जी भारतीय संस्कृतीचे वैशिष्ठ आहे. नृत्याचा उपयोग चित्रपटात मोठ्या प्रमाणात दिसतो. प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथील संचलनात भारताच्या राष्ट्रीयता दाखवणारे असे अनेक चित्ररथ, नृत्य प्रकार ,संस्कृती, वैशिष्टपूर्ण असतात,
कला हे माध्यम राष्ट्रीयतेचा संस्कार करण्याचे प्रभावी माध्यम आहे. म्हणून त्याचे संवर्धन काटेकोरपणे झाले पाहिजे. जेंव्हा राष्ट्रावर एखादे संकट येते तेंव्हा संपूर्ण राष्ट्र तन मनाने एक होऊन एकत्र उभे राहते तेंव्हा राष्ट्रीय एकतेचे प्रत्यक्ष रूप आपल्यासमोर येते. हे संस्कार लोकांवर करण्याची जबाबदारी कलाकार आणि कला संस्था यांची आहे. तेंव्हाच संस्कृती बरोबर राष्ट्राविषयी सकारात्मक जनमत घडविण्याचे काम कला करू शकतात.
स्वामी विवेकानंद म्हणतात,
“राष्ट्रीयता का आधार धर्म व संस्कृती ही होता है, हिंदू धर्म का प्रबंध ही हिंदुत्व की राष्ट्रीय परिभाषा है, ईसे राष्ट्रीय परिप्रेक्ष्य में समझने पर हमे हमारे विशाल देश की बाहरी
विविधता में अंतर्निहित एकता के दर्शन होते है, सहस्त्राब्दीयोंसे यह भारत वर्ष आर्यावर्त एक संघ सांस्कृतिक
राष्ट्र रहा है”.
(यातील सर्व फोटो गुगल वरुन साभार परत . )
© ले. डॉ.नयना कासखेडीकर, पुणे .
-------------------------------------------------