Saturday, 21 June 2025

भाग ८ - अहिल्याबाईंचे माहेर

 

कर्तृत्वशालिनी अहिल्यादेवी

भाग ८  - अहिल्याबाईंचे माहेर

 (जन्म-३१ मे १७२५-चौंडी,अहमदनगर, मृत्यू- १३ ऑगस्ट १७९५,इंदोर.)



चौंडी हे गाव २०२४-२५ या वर्षात शेकडो वर्षानंतर इतिहास जगविणारे तीर्थस्थळ म्हणून प्रसिद्ध झाले. वर्षभर या गावात आदराने नाव घेणारे, अहिल्याबाईंची कामाची दखल घेणारे, त्यांना मानवंदना देणारे, या जन्मस्थळाला भेट देऊन त्यांच्या स्मृति जागवणारे, राजकीय दृष्ट्या स्मृतिस्थळ आणि विकास यांचा लेखाजोखा मांडून या चौंडीचा विचार करणारे अशा हजारो नागरिकांनी भेट दिली. नाहीतर या आधी महेश्वर, इंदोर या माळव्यातील गावांशी अहिल्यादेवींचे नाव जोडले होते. गेली अनेक वर्षेच काय वर्तमानातही लोकाना चौंडी माहिती नव्हते. आज अनेक महिला अभिवादन कार्यक्रमानिमित्त मात्र चौंडीला आल्या होत्या.प्रत्येकीच्या मनात कुतूहल होतं. काहीजणी तर अहिल्याबाई हे नाव आजच ऐकत होत्या. काहीना अहिल्याबाईनी एव्हढे काम केले आहे. ते कशा काळात, कशा परिस्थितीत ? याची आपल्याला आजच माहिती मिळते याचे आश्चर्य वाटत होते. खंत वाटत होती.

भारतभर हे वर्ष अहिल्यादेवींचे त्रिजन्मशताब्दी साजरे होत असताना मलाही याच दिवशी चौंडीला भेट देण्याचा योग आला. अहिल्यादेवी यांचे माहेर अर्थात जन्मगाव चौंडी. निजाम राजवटीमध्ये औरंगाबाद सुभ्यातल्या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात चौंडी गाव होते. अहमद निजामाच्या ताब्यात हे नगर होते त्यामुळे अहमदनगर असे त्याच्या नावानेच ओळखले जात होते.प्रदीर्घ काळ येथे दख्खनी मुस्लिम राजवट होती. मात्र स्वातंत्र्यानंतर ते निजामाचे राज्य जाऊन जामखेड तालुका अहमदनगर जिल्ह्यात आले. आणि आता या अहमदनगरला अहिल्याबाईंच्या माहेराला चौंडी च्या कन्येचा मान व आदर म्हणून अहिल्यानगर अशी ओळख मिळाली आहे आणि ही रास्तच आहे. अहिल्यादेवींचे चरित्र वाचल्यावर चौंडीला भेट दिल्यावर जाज्वल्य इतिहासाची साक्ष पटून अहिल्यादेवींचे कर्तृत्व आणि तो काळ आपल्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहतो.

चौंडी हे शहर आजच्या अहिल्यानगर पासून ८५ किलोमीटरवर तर, जामखेड पासून ३५ किलोमीटर वर वसलेले गाव. चौंडी च्य दक्षिणेला दक्षिण वाहिनी सीना नदी वाहते. अहिल्या बाईंचे वडील माणकोजी शिंदे (गावचे पाटील) यांचे हे गाव. याचे सुरुवातीच्या काळातले नाव मल्हारपीठ होते असेही सांगतात. सुशीलाबाई आणि माणकोजी शिंदे यांच्या पोटी जन्मलेले कन्यारत्न म्हणजे अहिल्या, जीने हिंदुस्तानात तब्बल २८ वर्षे तत्वाने, ज्ञानाने आणि न्यायाने आदर्श असे राज्य करून लोककल्याणकारी माता, पुण्यश्लोक राजमाता म्हणून जगभरात कीर्ती मिळवली.

माणकोजी शिंदे यांची गढी आज त्याच डौलात उभी आहे. जशी च्या तशी . अहिल्यादेवी यांच्या जन्म स्थळी चौंडी या गावी त्यांच्या कारकीर्दीचा इतिहास सांगणारी शिल्पसृष्टी उभी केली आहे. अहिल्येसह त्यांचे दोन भाऊ शहाजी आणि महादजी,तसेच आई सुशीलाबाई व वडील माणकोजी शिंदे यांची शिल्पे आपल्याशी बोलून जणू इतिहास सांगताहेत असेच वाटते. अहिल्येच्या जन्माने पावन झालेली खोली, व त्या बाहेर मल्हारराव होळकर, हरिहर बुक्क चंद्रगुप्त मौर्य यांची शिल्पे आहेत. लाकडी माळवदाचा चिरेबंदी पण ऐश्वर्यसंपन्न वाडा, माची, बुरूज, संरक्षक कठडे या सहित उभा आहे.इथे लक्षात येते की मल्हारराव होळकर अहिल्येचे सासरे असले तरी या तिच्या माहेरी सुद्धा त्यांच्या कर्तृत्वाचे तेव्हढेच महत्व होते.

अहिल्याबाईंनी विकासाच्या यादीत आपल्या या जन्मगावालाही स्थान दिले आहे. त्यांनी २५० वर्षांपूर्वी इथल्या छोट्याशा सीना नदीवर रेखीव घाट बांधला होता तो अजूनही आपली ओळख कायम ठेऊन आहे. घाटावरच शिंदे आणि पाटलांच्या समाधी आहेत. शिलालेख आहेत. येथे चौंडेश्वरी ग्रामदेवता आणि महादेवाचे मंदिर आहे. याच मंदिरात ३०० वर्षापूर्वी छोटी अहिल्या वडील माणकोजी शिंदे यांच्या बरोबर महादेवाच्या पूजेला आली असताना पेशवे व मल्हारराव यांनी तिला पाहून होळकर घराण्याची सून म्हणून निश्चिती केली होती.

अहिल्याबाईंनी देशभरात मंदिरे घाट आणि बारव बांधल्या, त्यातलीच एक चौंडी पासून ८ किलोमिटर अंतरावर जवळा शिवारात शके १७०८ (उत्तरायण ,वैशाख शुद्ध शके १७०८ )मध्ये बारव बांधली होती. येथे असलेल्या शिलालेखात या पुरातन ऐतिहासिक बारव निर्माणचा उल्लेख आहे.५० बाय ५० फूट आकाराची चौकोनी बारव आतून अष्टकोनी आहे. यात मोटेने पाणी काढण्यासाठी सोय, खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत.आत नंदकेश्वर शिवलिंग आहे. पाऊस पडला नाही तर याच बारवेत नंदकेश्वराची पूजा करून प्रार्थना केली जाते, ही परंपरा अजूनही सुरू आहे. बारवेच्या पश्चिमेला भैरवनाथाचे हेमाडपंथी मंदिर आहे, येथे दरवर्षी चैत्र अष्टमीला उत्सव साजरा केला जातो.

अलीकडे सीना नदीचे जलसंधारण कामात रुंदीकरण करण्यात आले. अहिल्यादेवींनी इथल्या मंदिरांचा पण जिर्णोद्धार केला होता. शेतकरी, कारागीर यांना अहिल्यादेवींनी माळवा प्रांतात जसे बळ दिले होते, त्या प्रमाणे इथल्या आताच्या परिस्थितीत इथला सांस्कृतिक विकास ,महेश्वर प्रमाणे कापड उद्योगास चालना जुने उत्सव व परंपरा यांनाही चालना मिळावी अशी रास्त अपेक्षा जनतेची आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी काळात ऐतिहासिक गावातील शाळांचा विकास करण्याकरता,महाराष्ट्र शासनाने निधी मंजूर केला त्यात चौंडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा समावेश आहे.

अशा या लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथे आता तीन एकर जागेत स्मृती स्तंभ बांधले आहे,मंदिराचा जिर्णोधार् करून त्यांच्या महेश्वर दरबाराची आठवण जागविणारी प्रतिकृति उभी केली आहे. अहिल्येच्या जन्मवेळच्या प्रसववेणा अनुभवलेला हा वाडा स्तब्ध तरी अभिमानाने आपल्याला साद घालतो. अशी ही अहिल्येच्या माहेरची वाट एकदा तरी जाऊन अनुभवावी .

© ले. डॉ. नयना कासखेडीकर, पुणे

------------------------------

No comments:

Post a Comment