Wednesday, 30 September 2020

विचार–पुष्प, भाग –५५

 उत्तरार्ध

   स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना- घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका

विचार–पुष्प, भाग –५५
                               मार्था ब्राऊन फिंके

    शिकागो मध्ये मत्सराग्नि भडकलेला होता. मिशनरी तर विरोधात गेले होतेच पण बोस्टनला जेंव्हा स्वामीजी महाविद्यालयात व्याख्यान द्यायला गेले होते त्यावेळी च्या व्याख्यानाने विद्यार्थी भारावून गेले होते. इतके की,त्या दोन दिवसांच्या भेटीमुळे म्हणा किंवा स्वामींच्या दर्शनाने वा ऐकलेल्या विचाराने म्हणा, भविष्यात काहींचे जीवनच प्रभावित झाले होते. त्यातालीच एक विद्यार्थिनी होती, मार्था ब्राऊन फिंके. त्या दोन दिवसांच्या आठवणीवर मार्था तिचे आयुष्य बदलवू शकली. 

मार्था ब्राऊन फिंके 
मार्था ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती ते स्मिथ कॉलेज म्हणून ओळखलं जात होतं.स्त्रियांच्या उच्च शिक्षणासाठी १८७५ मध्ये सोफाया स्मिथ यांनी हे महाविद्यालय स्थापन केले होते. हे कॉलेज एक वैचारिक केंद्र म्हणून प्रसिद्ध होतं. न्यू यॉर्क आणि बॉस्टन च्या बरोबर मध्यावर नॉर्थअॅम्प्टन हे मॅसॅच्युसेटस राज्यातले टुमदार गाव होतं. त्या गावात हे कॉलेज होतं. मार्थाचं घर थोडं जुन्या वळणाचं होतं. जुन्या संस्काराच होतं. प्रोटेस्टंट ख्रिश्चन होते ते. त्यामुळे कॉलेजला बाहेर पाठवताना तिच्या आईवडिलांना तिची काळजी वाटत होती.बाहेर पडलेल्या मुली मुक्त विचारांच्या होतात असा सर्वांचा समज होता. कॉलेजला गेलेल्या मुली धर्म वगैरे मानत नाहीत असा अनुभव काहींचा होता.तिथे वसतिगृहात मुली राहत असत. वसतिगृहात जागा शिल्लक नसल्याने मार्था कॉलेज परिसरातच भाड्याने राहत होती.

स्मिथ कॉलेज

ज्यांच्या घरात राहत होती ती घरमालकिण स्वभावाने कडक होती. पण चांगली होती. त्या कॉलेजमध्ये अधून मधून विचारवंत भेटी देत असत. असेच एकदा स्वामी विवेकानंद यांची नोहेंबर मध्ये दोन व्याख्याने असल्याचे तिथल्या सूचना फलकावर लिहिले होते. ते एक हिंदू साधू आहेत एव्हढेच त्यांच्या बद्दल आम्हाला माहिती होते असे मार्थाने तिच्या आठवणीत म्हटले आहे.ते एव्हढे मोठे आहेत हे माहिती नव्हते. त्यांची सर्व धर्म परिषदेतील किर्ति यांच्या पर्यन्त पोहोचलेलीही नव्हती.पण कुठून तरी कानावर आल की हे हिंदू साधू, मार्था राहत असलेल्या घरमालकिणी कडेच उतरणार आहेत आणि त्यांच्या बरोबर या मुलींचे जेवण पण असणार आहे. त्यांच्या बरोबर आम्ही मुली चर्चा पण करू शकणार होतो याचे तिला फार अप्रूप वाटले होते.त्यामुळे सर्वजणी घरमालकिणीवर जाम खुश होत्या. त्यांनी आपल्या या मालकिणीला उदार मतवादी म्हटले आहे कारण आपल्याकडे एका काळ्या माणसाची राहण्याची सोय करायची म्हणजे त्याला काळी हिम्मतच असावी लागते असे त्यांना वाटत होते.बहुतेक गावातील हॉटेलांनी त्यांना प्रवेश नाकारला असेल असेही त्यांना वाटलं.

    मार्था म्हणते, आम्ही लहानपणापासूनच भारताचे नाव ऐकतं होतो कारण माझी आईसुद्धा हिंदुस्थानात जाणार्‍या मिशनर्‍याशी लग्न करणार होती.आमच्या चर्चमधून दरवर्षी भारतीय स्त्रियांसाठी मदतीची एक भली मोठी पेटी पाठवली जात असे. शिवाय त्यान काळात भारतबद्दल इतर माहिती अशी होती की, भारत हा एक उष्ण देश आहे. तिथे सगळीकडे साप फिरत असतात. तिथले लोक इतके अडाणी आहेत की, दगडा समोर किंवा लाकडासमोर डोके टेकवतात. बापरे!  मार्थाचे वाचन चांगले होते तरी सुद्धा तिला भारता बद्दल फारशी माहिती नव्हती. ख्रिश्चन धर्मियांच्या दृष्टीकोणातून लिहिलेली भारताबद्दलची माहिती फक्त तिला माहिती होती. एखादा भारतीय भेटून त्याच्याशी बोलायला कधी संधी नव्हती मिळाली.

                                    

त्यामुळे मार्था च्या घरमालकिण बाईंकडे विवेकानंद हे हिंदू साधू उतरणार तो दिवस आला. त्या दिवशी पाहिलेले स्वामी विवेकानंद कसे होते याचं तिने वर्णन केलय की, ते उतरणार ती खोली तयार करण्यात आली. भारदस्त व्यक्तिमत्व,एक कला प्रिन्स अल्बर्ट कोट,काळी पॅंट ,डोक्यावर डौलदार फेटा घातलेला, अलौकिक चेहर्‍याचा, डोळ्यात विलक्षण चमक असलेला,असा हिंदू साधू ! घरी आल्यावर सर्व जणी भारावून गेल्या. मार्था म्हणते, मला तर तोंडून काही शब्दच फुटत नव्हते. इतकी भक्तिभावाने ती हे व्यक्तिमत्व बघत होती. संध्याकाळी व्याख्यान झाले त्यानंतर प्रश्नोत्तरे.

 घरी त्यांना भेटायाला तत्वज्ञानाची  प्राध्यापक मंडळी, चर्चचे धर्माधिकारी, प्रसिद्ध लेखक, आले होते. चर्चा सुरू होती. सर्व मुली एका कोपर्‍यात बसून ऐकत होत्या. विषय होता, ख्रिश्चन धर्म - खरा धर्म. हा विषय स्वामीजींनी नव्हता निवडला, आलेल्या विचारवंत मंडळींनी निवडला होता. ते सर्व स्वामीजींना आव्हान देत होते. त्यांच्या त्यांच्या धर्माची माहिती असलेले मर्मज्ञ विषय मांडित. मार्थाला वाटले होते की स्वामीजी तर हिंदू त्यांना काय इकडचे कळणार व त्यावर कसे तोंड देणार? पण उलटेच झाले होते. स्वामी विवेकानंद आपली बाजू मांडताना, प्रती उत्तर देताना बायबल, इंग्रजी तत्वज्ञान, धर्मज्ञान, वर्डस्वर्थ, व थॉमस ग्रे यांचे  काव्य संदर्भ देऊन बोलत होते. ठामपणे बोलत होते. स्वामीजींनी त्यांच्या बोलण्यातून धर्माच्या कक्षा अशा रुंद केल्या की त्यात सर्व मानवजात सामील झाली आणि वातावरण बदलून गेले. मुक्त विचारांनी  दिवाणखान्यातील वातावरण भारावून गेले.या हिंदू साधुनेच बाजी मारली. त्यामुळे मी पण उल्हसित झाले असे मार्था ने लिहून ठेवले आहे. मार्था म्हणते आमच्या कॉलेज मधली मंडळी धर्माच्या बाबतीत फार संकुचित विचारांची होती. स्वतालाच ती शहाणी समजत. या बौद्धिक पातळीवरील चर्चेत स्वामीजींचा झालेला विजय मार्था च्या कायम लक्षात राहिला होता.

मार्थाने आणखी एक विशेष आठवण सांगितली आहे. तिथल्या वास्तव्यात दुसर्‍या दिवशी सकाळी, बाथरूममधून पाण्याचा आवाज व त्याबरोबर अनोळखी भाषेतले स्तोत्रपठण ऐकू येत होते. ते ऐकण्यासाठी सर्व मुली घोळक्याने दाराबाहेर उभ्या राहिल्या. एकत्र ब्रेकफास्ट च्या वेळी मुलींनी या स्तोत्राचा अर्थ स्वामीजींना विचारला.त्यांनी उत्तर दिलं, “प्रथम मी डोक्यावर पाणी ओततो . नंतर अंगाखांद्यावर. प्रत्येक वेळी सर्व प्राणिमात्रांचे कल्याण व्हावे म्हणून मी ते स्तोत्र म्हणतो”. हे ऐकून मार्था आणि मुली भारावून गेल्या. मार्था म्हणते, “मीही प्रार्थना करत असे पण ती स्वतसाठी आणि नंतर कुटुंबासाठी. समस्त मानवजातीसाठी व प्राणिमात्रासाठी आपलेच कुटुंब आहे असे समजून प्रार्थना करावी असे कधीच मनात आले नव्हते आमच्या”. 

ब्रेक फास्ट नंतर स्वामीजी म्हणाले चला बाहेर फिरून येऊन थोडं, म्हणून आम्ही चार मुली त्यांच्या बरोबर गेलो . गप्पा मारत चाललो होतो, मला एव्हढेच आठवते की, 'ख्रिस्ताचे रक्त' हा शब्दप्रयोग वारंवार केला जातो. हे शब्द मला कसेचेच वाटतात असे ते म्हणाले होते.यावर मीही विचार करू लागले. मलाही हे उल्लेख आवडत नव्हते. पण चर्चच्या तत्वांच्या विरुद्ध उघडपणे बोलायचे धैर्य हवे. पण इथेच माझ्यातील स्वच्छंद आत्म्याने, मुक्त चिंतांनाचा स्त्रोत त्या क्षणी खुला केला आणि मी कायमची मुक्तचिंतक झाले. विषय बदलून मी त्यांना वेदांबद्दल विचारले कारण त्यांनी आपल्या भाषणात वेदांचा उल्लेख केला होता. मी वेद मुळातून वाचावेत असे त्यांनी मला सांगितले. मी त्याच क्षणी संस्कृत शिकण्याचे ठरविले .पण ते शक्य झाले नाही पुढे.

यावरून एक गोष्ट गमतीची आठवली. उन्हाळ्यात आमच्याकडे नवीन गुर्नसी पारडू पाळीव प्राण्यांमध्ये समाविष्ट झाले. माझ्या वडिलांनी तो माझ्याकडे सोपविला. त्याचे नाव मी वेद ठेवले. दुर्दैवाने ते वासरू लवकरच मेले. माझे वडील गमतीने म्हणाले की तू त्याचे नाव वेद ठेवले म्हणूनच ते गेले.

नंतर स्वामीजी परत एकदा अमेरिकेत येऊन गेले, ते कळले नाही. मग काहीच संबंध नाही आला. पण त्या दोन दिवसात स्वामीजींच्या विचाराने मार्था चे जीवनच उजळून गेले असे ती म्हणते. तिने वडिलांना पत्र लिहून हा वृत्तान्त कळवला तर ते घाबरून गेले. आपल्या घराण्याचा धर्म सोडून ही स्वामीजींबरोबर त्यांची शिष्या होऊन निघून जाते की काय अशी त्यांना भीती वाटली .

बेलुर मठ

   मार्था ने तिचे हे स्वतंत्र विचार तिच्यापुरतेच मर्यादित ठेवले. तिच्या मते, 'मी लगेच हे अमलात आणले असते तर, जीवनात मला लगेच त्याचा उपयोग झाला असता. खूप वेळ वाया गेला'. पण ती निराश नाही झाली. आतापर्यंत जरी चाचपडली असली तरी विचार पेरले गेले आहेत ते उगवणारच असा तिला विश्वास होता.  स्वामीजींनी सांगितलेला वैश्विक धर्म तिच्या अंतकरणात जाऊन बसला होता. ती १९३५ मध्ये जवळ जवळ ४२ वर्षानी, भारतात पहिल्यांदा कलकत्त्यात आली तेंव्हा, प्रथम ती एक प्रवासी म्हणून तिचा प्रवास सुरू झाला तर भारतात पोहोचल्यावर गंगेच्या काठावरील बेलुर मठात स्वामी विवेकानंदांच्या पवित्र स्मृतीचे, समाधीचे दर्शन घेतल्यावर आपण एक विश्वधर्माचे यात्रेकरू आहोत याची मनोमन खात्री झाली. तिथेच आत्मिक आणि मानसिक उन्नतीची ओढ असणार्‍या मार्था ने या आठवणी सगळ्यांच्या आग्रहाखातर सांगितल्या आहेत.मार्था जर दोन दिवसांच्या विचाराने एव्हढी प्रभावित झाली असेल तर आपल्याकडे हे तत्वज्ञान बारा महीने चोवीस तास उपलब्ध आहे विचार करण्याची गोष्ट आहे .  

  © डॉ.नयना कासखेडीकर    

----------------------------------------

Friday, 25 September 2020

विचार–पुष्प, भाग –५४

                                                                 उत्तरार्ध

  स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना- घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका

विचार–पुष्प, भाग –५४

                                 मत्सराचा अग्नी

   हुश्श! स्वामी विवेकानंद यांचा स्लेटन लायसियम लेक्चर ब्यूरोशी केलेला व्याख्यानांचा करार आता संपला होता. तरीही त्यांची व्याख्याने सतत होत होती आणि अनेकजण त्यांच्या विचारांकडे आकृष्ट होत होते. ही संख्या वाढतच होती. त्यामुळे यातून आपले खरे अंतरंगशिष्य त्यांना शोधायचे होते. तिथल्या सामाजिक कामाची पाहणी केल्यावर त्यांना आपल्या कामासाठी संघटना किंवा संस्था उभी करावी हे मनोमन पटले होतेच. असे त्यांनी एकदा मिसेस लायन यांना बोलूनही दाखवले होते. म्हणजेच त्यांच्या मनात अशी संघटना कोणाची करायची? त्याचे उद्दिष्ट्य काय असेल? कार्यपद्धती कशी असेल याचे विचारमंथन सुरू होते. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात, शब्दात आणि मनात देशभक्तीच होती. त्यांचे ध्येय फार मोठे होते. त्यांना भारताचे पुनरुत्थान घडवायचे होते. हे घडवून आणण्यासाठी आत्म्याला जाग आणणे महत्वाचे होतेती जाग आणण्यासाठीचे अध्यात्म ज्ञान आवश्यक आणि त्यांच्या दृष्टीने हे अध्यात्म ज्ञान फक्त भारतच सार्‍या जगाला देऊ शकत होता. म्हणून ही जाग सर्वांमध्ये निर्माण करणे हेच स्वामीजींचे ध्येय होते.

  तिथे अमेरिकेत त्यांच्या व्याख्यानांशिवाय असे काही प्रसंगही घडत होते, घटना घडत होत्या .एकदा घडलेली घटना आहे. अमेरिकेत श्वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीय यांच्या तुलनेत स्वामीजी कृष्णवर्णीय वाटत असत. एका गावात ते स्थानकावर उतरले आणि त्यावेळी काही समिति सदस्य त्यांना घ्यायला आले होते. हे तिथल्या एका निग्रोने पाहिले. त्याच्या दृष्टीने हा माणूस आपल्यापैकी एक कृष्णवर्णीयच होता.मग आपल्या पैकी एका बांधवाचा गौरवर्णीय लोक एव्हढा आदर करताहेत हे पाहून तो मोहरून गेला. तो खर तर एक हमाल होता. तो स्वामीजींजवळ येऊन म्हणाला, “मला तुमच्याशी हस्तांदोलन करण्याची ईच्छा आहे. मी भारतीय आहे असे काहीही न सांगता स्वामीजींनी त्याचा हात प्रेमभराने हातात घेतला आणि त्याला म्हणाले, “ धन्यवाद माझे बंधो, धन्यवाद! तो निग्रो खूप भारावून गेला होता.  स्वत:चे देशबांधव प्रेम आणि अखिल मानवजातीचे वाटणारे प्रेम एकाच ठिकाणी ? तर या उलट काही ठिकाणी स्वामीजींना निग्रो समजून केशकर्तनालयात बाहेर काढून अपमान केल्याचाही प्रसंग घडला.

                                   
  अमेरिकेत आता स्वामीजींना न्यूयॉर्क मध्ये जाण्याचे आमंत्रण मिळाले होते. तत्वज्ञानाच्या अभ्यासात गोडी असणार्‍या काही जणांचा हा गट होता, त्यांनी बोलवले होते.त्यात डॉ.एगबर्ट ग्युएर्न्सि,मिसेस स्मिथ,मिस हेलन गौल्ड हे लोक  होते, ग्युएर्न्सि यांच्या कडे स्वामीजी राहायला होते. हेल आणि बॅगले यांच्या प्रमाणेच ग्युएर्न्सि पतिपत्नी यांचे स्वामीजींशी घरगुती संबंध तयार झाले.ग्युएर्न्सि व्यवसायाने डॉक्टर होते. लेखक, नियतकालिकाचे संपादक होते. ब्रुकलीन डेली टाईम्स आणि न्यू यॉर्क मेडिकल न्यूज टाईम्स याचे संस्थापक पण होते. वय एक्काहत्तर ,विवेकानंदां च्याच वयाचा त्यांचा तरुण मुलगा नुकताच स्वर्गवासी झालेला. त्या धक्क्यातून ते अद्याप सावरले नव्हतेच,मिस गौल्ड सुद्धा अफाट श्रीमंत होत्या त्यांच्याकडेही स्वामीजी राहण्यास गेले. अशा या न्यूयॉर्कच्या मुक्कामात त्यांचा अनेक मोठमोठ्या लोकांशी सबंध येत होता. बोलवले की जात, व्याख्याने देत, भेटत, चर्चा करत. शिवाय तिथल्या महत्वाच्या ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या. सहा-सात दिवस भुररर्कन निघून गेले, 

बोस्टन कॉलेज 
  आता ते बोस्टनला आले होते. तिथे अठवडाभरात महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या समोर विचार व्यक्त केले, त्यावेळी मार्था ब्राऊन फिंके महाविद्यालयात शिकत होती. तिथे पहिल्यांदा विवेकानंद यांना तिने पाहिले. विचार समजण्याचे वय नव्हते पण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मोठा प्रभाव आपल्यावर पडला असे तिने आठवणीत लिहून ठेवले आहे. एव्हढे श्रेष्ठ असूनही ते आम्हा विद्यार्थ्यात मिळून मिसळून वागले हे तिला विशेष वाटले होते. पुन्हा न्यूयॉर्क, परत बोस्टन व जवळपास फिरणे चालू होते.

मार्था ब्राऊन फिंके 
प्रा राइट यांच्या निमंत्रणावरून स्वामीजी बोस्टनला पुन्हा आले होते. हार्वर्ड आणि बोस्टन इथे त्यांची व्याख्याने झाली होती. इथे बोस्टनला मिसेस ओली बुल यांची पहिली भेट झाली होती. ज्या पुढील कार्यात सहभागी झाल्या आहेत.तसेच इथे त्यांना कर्नल थॉमस वेंटवर्थ हिगिनसन्स जे सर्वधर्म परिषदेत पण भेटले होते ते भेटले. विमेन्स क्लब मध्ये मिसेस ज्युलिया वॉर्ड होवे यांनी स्वामीजींचे व्याख्यान ठेवले होते. त्याही भेटल्या. असे दौरे चालू होते॰ स्वामीजी फार थकून गेले. नंतर हेल यांच्या कडे ते विश्रांतीसाठी थांबले.

सारा बुल
कर्नल हिगिनसन्स 

 इझाबेला मॅककिंडले हिने स्वामीजींना भारतातून आलेला सर्व पत्रव्यवहार पाठवला. यात होती भारतात झालेली वृत्तपत्रीय प्रसिद्धीची कात्रणे .काहींमध्ये अमेरिकेतला गौरव होता. ते ठीक होते , पण भारतात आपल्याबद्दल जो विरोधी प्रचार चालला होता त्याचीही कात्रणे त्यात होती.ती वाचून स्वामी विवेकानंद यांना फार फार वाईट वाटले. त्यांनी इझाबेलाला कळवले की, “माझ्याविषयी माझ्याच देशातील लोक काय म्हणतील याची मी फार फिकीर करीत नाही. पण एक गोष्ट मात्र आहे की, माझी आई वृद्ध आहे, सार्‍या आयुष्यभर तिने कष्ट उपसले आहेत.असे सारे असूनही जिच्या सार्‍या अशा ज्याच्यावर केन्द्रित झाल्या होत्या असा आपला मुलगा ईश्वराच्या आणि मानवाच्या सेवेसाठी देऊन टाकण्याचा भार तिने सहन केला. पण मजूमदार कलकत्त्यात सर्वत्र सांगत आहेत, त्याप्रमाणे दूर परदेशात कोठेतरी गेलेला हा आपला मुलगा तेथे पशुसारखे जीवन घालवत आहे ,अनीतिमान झाला आहे, हे जर का तिच्या कानावर गेलं,तर त्या धक्क्याने ती प्राण सोडेल, पण परमेश्वर दयाघन आहे. त्याच्या मुलांना कोणीही अपाय करू शकत नाही”. हे प्रतापचंद्र मजूमदार यांचे कलकत्त्यातले प्रताप वाचून स्वामीजी, आईच्या आठवणीने बेचैन झाले. खरे तर ते स्वत: शांतपणे या सर्वांना अजूनही तोंड देत होते.

 प्रतापचंद्र मजुमदार कलकत्त्यात आपल्याबद्दल एव्हढे भयानक सांगत आहेत. या वृत्तपत्राचे संपादक मजुमदारांचा चुलत भाऊ आहे. ज्याने याआधी आपले एव्हढे कौतुक केले ते आता?

याचा पहिला धक्का स्वामीजींना परिषदेच्या वेळी बसला होताच. ज्या प्रतापचंद्र मजुमदारांनी ब्राहमो समाजात उपासना संगीत गाणारा नरेंद्र पाहिला होता ,एव्हढ्या लांबच्या देशात त्यांना नरेंद्र पुन्हा भेटल्यानंतर आपल्याला जणू घरातले वडीलधारी भेटल्याचा आनंद नरेंद्रला झाला होता. पण घडलं होतं उलटच . पहिल्यांदा पाहिल्यानंतर ते नरेंद्रशी अगत्याने बोलले होते. पण जेंव्हा सर्व माणसे प्रचंड संख्येने नरेंद्र भोवती गोळा होऊ लागली, तसतसे मजुमदार यांना मत्सर वाटू लागलापरिषदेतल्या मिशनर्‍यांजवळ त्यांनी स्वामीजींची निंदा करणं सुरू केलं. नरेंद्र हा तसा कोणीच नाही तो एक लुच्चा आणि ठक आहे, येथे येऊन संन्यासी असल्याचे ढोंग करीत आहे. असे सांगून त्यांची मने कलुषित केली. त्यात ते यशस्वी झाले. या सगळ्यावर मात करून स्वामीजी पुढे निघून गेले होते.

 विवेकानंद यांचे विचार, त्यांचे वक्तृत्व आणि व्यक्तिमत्व यामुळे तिथले सगळेजण भारले गेले होते, तसे , मत्सराची दुसरी वाईट बाजुही त्याला होती. विरुद्ध प्रचार. आता मात्र विवेकानंद यांनी या वृत्तपत्रांकडे लक्षच द्यायचे नाही असे ठरवले होते.काहीही छापून आल तर ते मनावर घेत नसत. त्यातून आता भारतात सुद्धा हा अपप्रचार चालू आहे आणि हे सर्व प्रतापचंद्र करीत आहेत हे कळल्यापासून तर त्यांना खरे विश्वासच बसत नव्हता. प्रतापचंद्र या पातळीला जातील हे स्वप्नातही वाटले नाही. खेतडी चे राजेसाहेब आपल्या पाठीशी उभे आहेत म्हणून आपण निश्चिंत पणे इथे आलो. पण आता? आपण दूर्वर्तनी आहोत, शिलभ्रष्ट आहोत असे प्रतापचंद्र सर्वत्र सांगत आहेत. हे ऐकून आपल्या आईला काय वाटेल? ही वेदना त्यांना सतावत होती.

मत्सर भावनेतून चक्क चारित्र्य हनन सुरू होते. सुरूवातीला फक्त विरोध! मग विरोधाचे तीव्र स्वरूप, मग प्रचार! आणि स्वामीजींची किर्ति जशीजशी वाढली तशी विरोधासाठी पद्धतशीर मोहिमच सुरू झाली होती. मग सुरू झाला छुपा खोटा प्रचार. विवेकानंद यांचे चारित्र्य शुद्ध नाही. ते तरुण सुंदर मुलींना फूस लावून आपल्या जाळ्यात ओढतात वगैरे सांगू लागले. यात मिशनरी, ब्राह्मसमाजी आणि थिओसोफिस्ट आघाडीवर होते. हे अमेरिकेत सुरू होते पण प्रतापचंद्र भारतात काही दिवसांनी परत आल्यावर भारतात सुद्धा ही मोहीम त्यांनी सुरू ठेवली होती. ब्राह्म समाजाच्या मुखपत्रात विवेकानंद यांच्या विरोधात लेख येत असत. इतर नियतकालिकात सुद्धा असे लेख येत होते आणि हे सर्व लेख अमेरिकेत पाठवले जात, तिथेही ते प्रसिद्ध करत. अशा प्रकारे मत्सराचा अग्नि पेटला होता.याचा विवेकानंद यांना किती त्रास होत असेल याची नुसती कल्पना केली तरी आपल्याला सहन होत नाही या क्षणाला सारं विचित्रच !  

  © डॉ.नयना कासखेडीकर    

----------------------------------------

Tuesday, 22 September 2020

विचार–पुष्प, भाग –५३

                                                             उत्तरार्ध

  स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना- घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका

विचार–पुष्प, भाग –५३


                                          सायक्लोनिक हिंदू ?
  वृत्तपत्रातील विवेकानंद यांच्या बद्दल आलेल्या, मजकुरामुळे अस्वस्थ झालेल्या बॅगले यांनी अॅनिस्क्व्याम हून पत्रात लिहिलं, “विवेकानंद यांच्या बद्दल आदरभाव व्यक्त करण्याची संधी मला मिळत आहे.याचा माला फार आनंद वाटतो. जे कोणी त्यांच्या विरूद्ध  लिहीत आहेत,त्यांच्या मनात विवेकानंदांची श्रेष्ठता आणि आध्यात्मिक धारणा यांबद्दलचा  मत्सर आहे. धर्माचा उपदेष्टा आणि सर्वांनी ज्याचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवावे अशी त्यांच्या तुलनेची दुसरी योग्य व्यक्ती मला दिसत नाही.ते संतापी आहेत हे साफ खोटे आहे. माझ्या घरी त्यांचे तीन आठवड्याहून जास्त काळ वास्तव्य होते. माझ्या कुटुंबातील सर्वांशी त्यांचे वागणे अतिशय सौजन्याशील होते. आनंद देणारा एक मित्र आणि हवाहवासा वाटणारा पाहुणा असे त्यांचे वागणे बोलणे असे”.

   “ शिकागोचे हेल कुटुंब अशीच साक्ष देणारे आहेत. ते प्रेस्बिटेरियन आहेत,पण विवेकानंदन यांना आपल्यापासून दुसरीकडे कोठे जाऊ देण्यास ते तयार नसत. विवेकानंद हे असे एक सामर्थ्यसंपन्न आणि अतिशय थोर व्यक्तिमत्व आहे की जे ईश्वराचा हात धरून चालत राहणारे आहे. त्यांची भाषणे ऐकून अनेकजण उद्गार काढतात की, असे बोलणारा दुसरा वक्ता आपण या आधी कधी ऐकला नाही.ते श्रोत्यांना एका उदात्त विश्वात घेऊन जातात आणि ऐकणारे सारेजण त्यांच्या धर्माविषयक श्रद्धेशी तद्रूप पावतात. माणसाने निर्माण केलेले पंथ आणि संप्रदाय या सर्वांच्या अतीत असणारे असे काहीतरी श्रोत्यांना जाणवते . विवेकानंदांना समजून घेतले आणि त्यांच्या सहवासात एका घरात राहता आले तर , प्रत्येक व्यक्ती उन्नत होऊन जाईल.प्रत्येक अमेरिकन माणसाने विवेकानंद जाणून घ्यावेत. आणि भारताजवळ असतील तर असेच आणखी विवेकानंद त्याने आमच्याकडे पाठवावेत. हे मला हवे आहे”.

मिसेस बॅगले 

    प्रा.राईट यांनी विवेकानंद यांच्या असामान्य योग्यतेबद्दल सर्व धर्म परिषदेसाठी पत्र लिहिलं होतं, त्याच अॅनिस्क्व्याम मधून बॅगले यांनी हे पत्र लिहिलं होतं.मिसेस स्मिथ यांनी विवेकानंद यांच्या बद्दल छुपा प्रचार चालुच आहे हे ऐकून पुन्हा बॅगले यांना न राहवून विचारले होते. बॅगले यांनी पुन्हा उत्तर दिले ,त्यात आधीच्या पत्रातील मजकूर होताच पण त्यात चिडून म्हटले होते, “ माझे अनेक नोकर आहेत. मोलकरणी आहेत. सारे जण माझ्याकडे अनेक वर्षे काम करीत आहेत”.म्हणजे बदनामी करण्याची किती हीन पातळी गाठली होती. त्यांनी काही तक्रार नाही केली आणि हे सांगणारी ही कोण? त्याच्या नंतर बॅगले यांच्या मुलीनं स्मिथ यांना कडक पत्र लिहून कानउघडणी केली.

चारित्रहननाची ही मोहिम सव्वा वर्ष सुरू होती पण विवेकानंद यांनी काहीही व्यक्त केले नव्हते, शांतपणे ते सहन करत होते.

आपणही असे अनुभव घेत असतो. मत्सरी लोक आपल्या आसपासच असतात. त्यामुळे इतर लोकांचे आपल्याबद्दल कान फुंकायचे ,विरोधी मत तयार करायचे अशा चुकीच्या गोष्टी लोक करत असतात. पण बॅगले यांच्या सारख्या सत्यासाठी परखड शब्दात कान उघडणी करणारे असले की किमान दुसरी बाजू लोकांसमोर येते आणि न्याय अन्याय ,खरे खोटे, काय? कोणाचे? हे स्पष्ट होते, हेही तितकेच खरे आहे. ऐकावे जनाचे पण करावे मनाचे!     

    डेट्रॉईटला विवेकानंद यांची आणखी व्याख्याने होत होती. इतक वादळ उठलं होतं पण स्वामीजी धर्म, परंपरा, स्त्रिया, निर्बंध ,त्यातून तयार झालेल्या रूढी यावर भारत व अमेरिका यांच्यावर तुलनात्मक बोलत होते.त्यांनी वाचलेला आणि पाहिलेला अमेरिका आणि आपल्या देशाची  मूल्ये आणि शिकवणूक त्या लोकांना, श्रोत्यांना समजून सांगत होते.त्यांच्यात आणि श्रोत्यांमध्ये मनमोकळा संवाद होत होता. गप्पा होत होत्या. भारतातील धार्मिक आणि सामाजिक अस्वस्थेवर प्रश्न विचारून लोक स्वामीजींकडून समाधान करून घेत. विवेकानंद सर्व प्रश्नांची उत्तरे प्रांजळपणे देत असत. काही दोष तर सरल मान्य करत आणि काही प्रश्न सुटणे अवघड आहे हेही सांगत. राजकीय आक्रमणामुळे सामाजिक निर्बंध स्वीकारावे कसे लागतात ते समजावून देत. हेच निर्बंध मग पुढे जाऊन कशा रूढीत बदलतात हे सविस्तर सांगत .

भारतातील स्त्रियांच्या प्रश्नांबद्दल लोक जाणून घ्यायला उत्सुक असत.

इथे एका व्याख्यानात विवेकानंद सांगत होते, “ भारतातील स्त्रिया काही शतकांपूर्वी मोकळेपणाने फिरत असत. सिकंदराने केलेल्या स्वारीच्या वेळी तर राजकन्याही इकडे तिकडे संचार करीत होत्या. पण पुढे मुसलमानांच्या उगारलेल्या तलवारीमुळे आणि इंग्रजांच्या रोखलेल्या बंदुकांमुळे आन्तरगृहाचे दरवाजे बंद करावे लागले होते. पुढे विनोदाने म्हणाले दाराशी वाघ आला तेंव्हा दार लावून घेतले. असे निर्बंध पुढे रूढी झाल्या.

भारतातील स्त्रिया या विषयवार विवेकानंद यांनी व्याख्यान दिले. ते खूप गाजले. अमेरिकेतील बुद्धीमान आणि कर्तृत्व संपन्न स्त्रियांबद्दल त्यांनी कौतुक केले. पण ते करताना हेही बजावले की, वैवाहिक जीवनात चारित्र्याचा आणि पतिपत्नीच्या नात्यातील निष्ठेचा अभाव हा पाश्चात्य संस्कृतीचा एक महान दोष आहे. वृत्तपत्रीय वादळात ही डेट्रॉईट मध्ये विवेकानंद यांच्या विचारांनी लख्ख प्रकाश पडला होता. तीन आठवड्याचा हा काळ भरगच्च कार्यक्रमांचा झाला.

मिसेस बॅगले यांच्याकडे विवेकानंद राहत होते पण थॉमस विदरेल पामर यांच्या आग्रहाखातर काही दिवस स्वामीजी त्यांच्याकडे राहायला गेले होते. पामर मोठे उद्योगपती आणि अमेरिकेचे सिनेट सदस्य होते.तिथल्या स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून त्यांनी ४० वर्षे प्रयत्न केले होते.कोलंबियन एक्सपोझिशन चे चीफ कमिशनर म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्यांनी तर डेट्रॉईट मधल्या अनेक लोकांना सतत आमंत्रित करून भोजन समारंभ केले. सर्व क्षेत्रातल्या नामवंतांसहित कोणीही स्वामीजींना जवळून बघितले नाही असा कोणी बाकी राहिला नाही. स्वामीजींच्या एव्हढ्या प्रेमात ते पडले होते.

विवेकानंद यांची व्याख्याने १८९३ च्या नोहेंबर पासून स्लेटन लायसियम लेक्चर ब्यूरो यांच्या झालेल्या कारारा नुसार झाली होती.पण दोन महीने होत नाहीत तो विवेकानंद यांना शंका येऊ लागली. आपली फसवणूक होते आहे हे लक्षात आलं. एका कार्यक्रमाचे उत्पन्न दोन हजार डॉलर्स झाले असताना विवेकानंदांना फक्त दोनशे डॉलर्स देण्यात आले होते. त्यांनी हेल यांचा सल्ला घेतला. पामर यांनाही सांगितले . या करारा बाबत वकिलांचा सल्ला ही घेतला. आणि सरळ स्लेटन यांना रीतसर सांगून ते या करारातून मुक्त झाले. यात पामर यांनी स्वता शिकागोला जाऊन मदत केली. तीन वर्षांचा झालेला करार तीन महिन्यातच संपला होता. अतिशय वाईट अनुभावातून एकच चांगली गोष्ट घडली होती की, तिथल्या थोरा मोठ्यांचा परिचय व भेटी झाल्या होत्या. प्रसिद्धीही भरपूर मिळाली होती.

तिथल्या जाहिरात बाजी आणि धावपळीला ते कंटाळलेच होते. सायक्लॉनिक हिंदू म्हणून त्यांची जाहिरात केली होती. जी स्वामीजींच्या शांत आणि गंभीर व्यक्तिमत्वाला शोभेशी नव्हतीच.ते हेल भगिनींना याविषयी पत्रात म्हणतात , “ मी तुफानी वगैरे काही नाही त्याहीपेक्षा वेगळा आहे. मला जे हवे आहे ते या करारा नुसार कराव्या लागणार्‍या कामात नाही. हे तुफानी वातावरण मी आता फार काळ सहन करू शकत नाही. स्वता पूर्णत्व प्राप्त करून घेणे आणि काही मोजक्या स्त्री पुरूषांना पूर्णत्वाकडे नेणे हा माझा मार्ग आहे. असीम कर्तृत्वाची माणसे तयार करावीत अशी माझी कल्पना आहे. आलतूफालतू माणसांमध्ये आपली विचार रत्ने विखरून टाकावीत आणि वेळ, शक्ति आणि आयुष्य व्यर्थ घालवणे हा माझा मार्ग नाही”

व्याख्यानच्या द्वारे पैसे मिळवायचे नाहीत असा निर्णय विवेकानंद यांनी घेतला.भारतात जाऊन एखादी  शिक्षण संस्था उभी करायची ही योजना पण बाजूला  ठेवली. आपण योजना प्रत्यक्षात आणणार नसलो तर मिळालेल्या देणग्या ठेऊन घ्यायचा काय अधिकार ? म्हणून ज्यांनी पैसे दिले होते त्यांना ते परत करू लागले तर त्या लोकांनी ते नाकारले. त्यांना बाकीच्या तपशीलाशी काही देणे घेणे नव्हते. स्वामीजींवरील प्रेम आणि आदरापोटी ते पैसे दिले होते. भारतात आता परत जावे इथला मुक्काम हलवावा असे मनात आले होते पण विवेकानंद यांना आता न्यूयॉर्क चे आमंत्रण आले होते...क्रमश:

 

  © डॉ.नयना कासखेडीकर    

----------------------------------------

                     

Monday, 21 September 2020

विचार–पुष्प, भाग –५२

                                                     उत्तरार्ध

  स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना- घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका 

 विचार–पुष्प, भाग –५२ 


                                डेट्रॉईट आणि वृत्तपत्रातील वादळ

 मेंफिसहून स्वामीजी शिकागोला परतले. २५ जानेवारीला,तिथेही एक कार्यक्रम झाला. तीन आठवडे राहून ते आता डेट्रॉईट ला आले होते. सांस्कृतिक शहर होतं डेट्रॉईट. तिथे सतत काही न काही घडत तरी असे, किंवा काही तरी उपक्रम चालत असे. असे नवचैतन्य असलेले शहर, इथे नवीन उपक्रमाचे नेहमी स्वागत होत असे,स्वामींचा तिथे तीन वेळा मुक्काम झाला. त्या काळात त्यांची ८ सार्वजनिक व्याख्याने झाली.डेट्रॉईट मध्ये स्वामीजी मिसेस जे.बॅगले यांच्या राजेशाही प्रासादात मुक्कामाला होते.

मिसेस बॅगले 

   बॅगले साठीच्या होत्या. स्वतंत्र विचारांच्या, तडफदार आणि मनाने उदार होत्या. त्यांचे पती मिशिगन चे निवृत्त गव्हर्नर होते ,पण दुर्दैवाने त्यांचे खूप लवकर निधन झाले. व्यापक दृष्टी असलेल्या बॅगले अनेक सार्वजनिक कामात विविध ठिकाणी पदांवर होत्या. जबाबदारी सांभाळत होत्या. शिकागो चे जे प्रदर्शन भरले होते त्याच्या महिला विभागाच्या व्यवस्थापक मंडळावर त्या होत्या. सर्व धर्म परिषदेत त्यांनी विवेकानंदांची भाषणे ऐकली होती. तेंव्हाच त्यांच्यावर स्वामीजींचा प्रभाव पडला होता. त्यामुळे तर काय त्यांनी स्वामीजींना अगदी आनंदाने डेट्रॉईटला आपल्याकडे ठेऊन घेतले होते.

बॅगले यांची कॉलनी 
स्वामीजींच्या स्वागताप्रीत्यर्थ अल्पोपाहाराचा खास कार्यक्रम आयोजित केला होता.त्याला सर्व चर्च चे बिश्यप, धर्मोपदेशक, महापौर,पत्रकार, प्राध्यापक, विचारवंत अशा सर्वांना निमंत्रित केलं होतं. याआधी सुद्धा बॅगले यांनी नामवंतांसाठी असे कार्यक्रम आयोजित केले होते पण त्याहीपेक्षा हा कार्यक्रम चांगला झाला असे वृत्तपत्रातल्या प्रसिद्धीत म्हटले होते.

 पण या सुंदर नियोजित कार्यक्रमाला गालबोट लागले ते तिथे आलेल्या एका स्त्रीने स्वामीजींना उद्देशून अपमानकारक काही शब्द वापरले होते म्हणून. ते बॅगले यांना अजिबात आवडले नाही. ही तर स्वामीजींना विरोधाची नांदी च ठरली होती जणू. वाचकांच्या पत्रात वृत्तपत्रात हे छापून आले होते. दुसर्‍या दिवशी फ्री प्रेस च्या पत्रकारांनी घेतलेली त्यांची मुलाखत छापताना सुरुवातीलाच काही उपहासात्मक चार ओळी सुद्धा लिहिल्या होत्या मुलाखतित मेंफिस ला प्रश्न विचारले होते तसेच विचारले होते. ही मुलाखत डेट्रॉईट इव्हिंनिंग न्यूज मध्ये सविस्तर छापली होती.डेट्रॉईटच्या युनिटेरियन चर्च मध्ये स्वामीजींचे पहिले व्याख्यान झाले. मिसेस मेरी फंकी या वेळी उपस्थित होत्या.  

  स्वामी विवेकानंद, भारतातील अध्यात्मिकता गुलामगिरीत सुद्धा टिकून राहिली होती,ती प्राचीन संस्कृती, खोलवर पोहोचलेली नीतीमूल्य यावर स्वामीजी बोलले. अशा आमच्या देशात ख्रिस्ती उपदेशकांची काहीही आवश्यकता नाही ,त्यांनी हवं तर भारतात यावं आणि तिथल्या संस्कृतीकडून धडे घ्यावेत”.झालं! ही टीका सहन न होऊन स्वामीजींच्या याच मुद्दयाचा आधार घेऊन आता विवेकानंदांविरूद्ध टीका सुरू झाली.विवेकानंद यांच्या आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक करायला सुद्धा आता लोक नाही म्हणू लागले. आणि आता विवेकानंद आपले पाहुणे नाहीत सर्वधर्म परिषद आता संपली आहे. आपण त्यांच्या बोलण्यावर जोरदार प्रहार केला पाहिजे. मिशनर्‍यांनी उठवलेले हे वादळ ट्रिब्युन जर्नल, इव्हिंनिंग न्यूज, फ्री प्रेस या तिथल्या प्रमुख वृत्तपत्रातून आल्याने आता स्वामीजी एका बाजूला तर मिशनरी एका बाजूला अशी स्थिति निर्माण झाली.

 डेट्रॉईट मध्ये तर वृत्तपत्रात वाचकांची पत्रे आणि संपादकीय याचा वर्षाव झाला जणू. स्वामीजींचे दुसरे व्याख्यान हिंदूंचा तत्वज्ञानविचार या विषयावर झाले.काहीजण योग्य विचार करून स्वामीजींबद्दल लिहिणारे होते तेही छापून येत होते.

 विवेकानंद यांना सभेनंतर प्रश्न विचारत किंवा प्रश्नोत्तरचा कार्यक्रम होई त्यात विचारत. त्यातील मते अशी असत. “भारत एक अतिशय मागासलेला देश आहे. आदिम समाज असावा तसा किंवा त्या अवस्थेतून नुकताच बाहेर पडत असलेला देश. दगड धोंड्यांची तसेच, वड किंवा तुळस अशा झाडांची, नाग, वानर अशा प्राण्यांची, पुजा तेथे चालते.पतीच्या मृत्यूनंतर स्त्रीला सरळ त्याच्या बरोबर चितेवर चढवतात . तेथील लोक आपली मुले विशेषत मुली गंगेत सुसरीपुढे टाकतात किंवा जगन्नाथाच्या रथयात्रेवेळी चाकाखाली आपले शरीर झोकून देऊन अनेक जण प्राणत्याग करतात. अशा तिथे भारताबद्दल समजुती होत्या. हेच प्रश्न लोक तिथे विचारात असत. विवेकानंद यांनी या सर्व प्रश्नांना वेगवेगळ्या कार्यक्रमात ,मुलाखतीत,सभेच्या शेवटी योग्य ती सत्य उत्तरे दिली. नेमके त्या मागचे विचार आणि वस्तुस्थिती स्पष्टपणे समजावून सांगितली.काहीही लपविले नाही.

त्या लोकांची दुसरी समजूत अशी होती, भारतात चमत्कार करणारे काही फकीर आणि बैरागी आहेत, ते आकाशात दोर ताठ फेकून त्यावर चढून नाहीसे होतात. पुन्हा खाली येतात. आपले शरीर जमिनीपासून वर अधांतरी उचलतात,पाण्यावरून चालत जातात, हिमालयात तर अनेक योगी व महात्मे असे आहेत की, अनेक दिवस अन्न पाण्याशिवाय राहू शकतात. भूत भविष्य सांगतात. निसर्गाचा कोणताही नियम त्यांना अडवू शकत नाही. शंभर शंभर वर्षे जगतात अशा या समजुतीचे विवेकानंद यांनी स्पष्ट नकारार्थी उत्तर दिले. काही वेळा क्वचित चमत्कार घडतात पण त्यामागे काही नियम असला पाहिजे तो आपल्याला माहिती नसतो एव्हढच. आपण हिमालयात फिरलेलो आहोत. असा कुठलाही महात्मा आपल्याला भेटलेला नाही असे ठणकाऊन सांगितले. पुढे जाऊन असेही स्पष्ट केले की, हिंदू धर्मातील तत्वज्ञानामध्ये चमत्कारांना कोणतेही महत्व दिलेले नाही. सामान्य माणूस त्यांना भुलतो. पण ते त्याचे अज्ञान असते. आध्यात्मिक धारणा महत्वाची आहे. आणि तिचा संबंध माणसाच्या आत्मिक विकासाशी आणि विशुद्ध आचरणाशी आहे. ही भारतीय तत्वज्ञानाची शिकवणूक आहे. हे स्वामी विवेकानंद यांचे बुद्धिनिष्ठ विचार थिओसॉफीच्या विचारसरणीचा पाया च डळमळीत करणारे ठरले आणि पुन्हा एकदा त्यांना शत्रुत्व पत्करावे लागले.एव्हढी समाधानकारक उत्तरे त्यांनी दिली होती, तरी सुद्धा यानंतरच्या अंकात विवेकानंद यांचे स्वागत करताना आम्हाला काही चमत्कार दाखवा असा अग्रलेख प्रसिद्ध झाला. त्याच्या दुसर्‍या दिवशी पुन्हा एक अग्रलेख .त्यात लिहिलं होतं, चमत्कार करता येत नाहीत तेंव्हा विवेकानंद यांच्या विषयीचा भ्रमाचा भोपळा फुटला.

पण आता मात्र ओ.पी. डेलडॉक जे स्वामीजींच्या विचारांचे पुरस्कर्ते होते त्यांनी वृत्तपत्राची मागणी आणि विसंगती दाखवणारं सविस्तर पत्रच पाठवलं, जे प्रसिद्ध झालं. धार्मिक विषयात विवेकानंद यांची उघडपणे बाजू घेणारे लोकही तिथे होते.

                              

                                                                        युनिटेरियन चर्च  

युनिटेरियन चर्च मध्ये १८ फेब्रुवारी ला धर्म प्रवचनासाठी रेव्हरंड रीड स्टुअर्ट यांनी पूर्व दिशेचा उघडत असलेला दरवाजा  असा विषय मांडला.विवेकानंद यांच्या विचारधारेशी समन्वय साधणारे भाषण त्यांनी केले, पश्चिमेकडे विज्ञान आहे ,तर पूर्वेकडे अध्यात्म आहे. पश्चिमेकडे पंथ आहे तर पूर्वेकडे अनेक पंथांना सामावून घेणारा धर्म आहे.असे सांगितले.

बेथ एल टेंपल 
तर बेथ एल या मंदिरात रॅब्बी ग्रोसमन यांनी, विवेकानंदांनी आपल्याला काय दिले?’ हाच विषय प्रवचनाला निवडला.अगदी ऐकण्यासारख आहे हे . रॅब्बी म्हणतात, “ विवेकानंदांचे विचार ऐकताना मन  अगदी उल्हसित होऊन जाते. धर्म आणि ईश्वर संकल्पना या बाबतीत आपण पाश्चात्य फार मागे आहोत. धर्म म्हणजे नुसता विचार नव्हे, तर साक्षात दैनंदिन जीवन. आपल्याजवळ फार मोठ्या सुरेख आणि आकर्षक कल्पना आहेत. पण त्या हवेत तरंगत असतात. आपणा पाश्च्यात्यांचा देव आकाशात आहे. आणि रविवार सकाळपुरतेच काही कार्य आपण त्याच्यावर सोपविलेले आहे.विवेकानंदांचा ईश्वर पृथ्वीवर आहे. तो परमेश्वर नित्य क्षणाक्षणाला आपल्याजवळ आहे.बागेतील प्रत्येक फुलात, वार्‍याच्या झुळुकीत,आपल्या शरीरातील रक्ताच्या क्षणाक्षणातील स्पंदनात परमेश्वर भरून राहिला आहे. हा विचार आपण हिंदूंकडून उचलला पाहिजे. आपल्या पंथांना भिंती आहेत. पूर्वेकडील धर्म चहू दिशांनी खुला आणि स्वीकारशील आहे.

एखाद्या अगदी गरीब माणसाच्या दरात अकस्मात कोणीतरी येतो तेंव्हा घरातील लहान मूल ओरडून सांगते अतिथि अतिथि. त्या अतिथि साठी घरातले सर्वजण त्याच्यासमोर उभे राहतात. कारण त्याच्या रूपाने दरात परमेश्वर आला आहे अशी शिकवणूक त्या माणसांना मिळालेली असते. ही केव्हढी सुंदर कल्पना आहे. पाश्च्यात्यांच्या घरी बाहेरच्या खोलीत येणार्‍याला किती उपचार(formality) सांभाळावे लागतात.हे आपल्याला माहिती आहे. आपले चर्च पवित्र आहे तेही फक्त रविवारी”.अशा पद्धतीने ग्रोसमन यांनी त्यांना समजलेले विवेकानंद यांचे विचार मांडले. म्हणजेच विवेकानंद यांनी आपल्या धर्माचे काय महत्व आहे ,आपला धर्म काय शिकवण देतो, ते तिथे अशा प्रकारे मोठ्या अभिमानानेच सांगितले असणार.ग्रोसमन चे हे प्रवचन इव्हनिंग न्यूजला मानवले नाही. त्याने ग्रोसमन यांच्यावर टीका केली.

 पुढे पुढे तर विवेकानंदा यांच्या विधानांचा विपर्यास करून तशा बातम्या,लेख प्रसिद्ध होऊ लागले. कोणी स्वामीजींची बाजू मांडू लागले आणि आश्वस्त करू लागले की, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. सगळेच लोक हलक्या मनाचे व संकुचित वृत्तीचे नाहीत, आम्ही ख्रिस्ता ची शिकवणूक मानणारे तुमचं स्वागत करतो. आणि ज्या शिवराळ भाषेत विवेकानंद यांच्या बद्दल लिहिले जात आहे ते ख्रिस्ताच्या शिकवणुकीला न शोभणारे आहे असे खडसावले होते. एव्हढी टिका चालू होती पण विवेकानंद यांच्या व्यख्यांनाना प्रचंड गर्दी होत होतीच.अनेक जण त्यांना भेटायला येत. स्वामीजींना भोजन आणि अल्पोपहार याची सतत निमंत्रणे येत.

 एक तरुण उद्योजक, मिशिगन-पेनिनशूलर कार कंपनीचे भागीदार चार्ल्स एल. फ्रिअर एक धनवंत होते.  त्यानेही स्वामीजींसाठी भोजन समारंभ आयोजित केला होता. तो खूप थाटामाटाचा होता.शिवाय विवेकानंद यांना त्यांच्या कामासाठी तेंव्हा २०० डॉलर्सची देणगी ही दिली होती.          

मिसेस बॅगले म्हणतात, आमच्या घरातील विवेकानंद यांच्या वास्तव्याचा प्रत्येक दिवस आनंद पूर्ण झाला.बॅगले ज्या भागात राहत होत्या तिथे सर्व धनवान मंडळी राहत होती.त्यांनी आपल्या निवासस्थानी स्वामीजींचे एक व्याख्यान ठेवले. सर्वांना जाहीर निमंत्रण असल्याने खूप गर्दी झाली.स्वामीजी दोन तास बोलले. चर्चा, वाद उत्तर प्रतिउत्तर सुरूच राहिले. सडेतोड व्याख्यान झाले.केवळ आठ दहा दिवसात मिशनरी हादरून गेले होते.

 पण डेट्रॉईट च्या बाहेरून विरोध ऐकू यायला लागला होता.रेव्हरंड आर. ए. हयूम यांनी विवेकानंद यांना त्यांच्या भाषणावर आक्षेप घेणारे पत्र लिहिले,विवेकानंद यांनी त्याला लगेच उत्तर दिले. हयूम भारतात जन्मलेले,वाढलेले आणि मिशनरी म्हणून भारतात काम केलेले गृहस्थ. आता त्यांनी पुन्हा पत्र पाठवले. मात्र स्वामीजींनी त्याला उत्तर दिले नाही, कारण सार्वजनिक वादात आपल्याला ओढण्याचा प्रयत्न त्यांच्या लक्षात आला. हयूम यांनी मद्रास मध्ये हिंदू या वृत्तपत्रात आलेला अग्रलेख याचा आधार घेऊन हे पत्र लिहिले होते. हा अग्रलेख संपादक जी. सुब्रम्हण्यम अय्यर यांनी लिहिला होता. जे भारतात सर्व धर्म परिषदेसाठी समिति नेमली होती त्यात ते एक सदस्य होते.

 हयूम यांनी मार्च मध्ये पाठवलेली पत्रे एप्रिल मध्ये डेट्रॉईट फ्री प्रेस मध्ये प्रसिद्ध झाली. विवेकानंद या वादात नसतानाही त्यांना त्यात ओढण्याचा घाट घातला होता. त्याला वृत्तपत्रातून त्या ओपत्राच्या बाजूने आणि विरुद्ध बाजूने ही उत्तरे देण्यात आली. धरमोपदेशकणी तर स्वामीजींच्या वागण्या बोलण्यावर आणि चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यास सुरुवात केली.  ही सर्व वार्ता विवेकानंद आलसिंगा पेरूमल यांना पत्राने कळवत होते.

 आता ही सर्व बातमी मिसेस बॅगले यांच्या कानावर आली. त्यांच्या ओळखीच्या मिसेस स्मिथ यांनी कळवले की विवेकानंद यांच्यावर नाना तर्‍हेच्या गोष्टी बोलल्या जात आहेत. ते संतापी आहेत, त्यांचे वर्तन शुद्ध नाही, असे आरोप ही केले जात आहेत. हे ऐकून आपण अस्वस्थ झालो आहोत. बॅगले यांनी आपले मत सांगावे असे विचारले होते. स्वामीजी तर तेंव्हा बॅगले यांच्याकडेच राहत होते.पण बॅगले आता नेमक्या अॅनिस्क्व्यामला गेल्या होत्या.तिथून त्यांनी पत्र लिहिले आणि म्हटले ......क्रमश:               

  © डॉ.नयना कासखेडीकर    

----------------------------------------

Thursday, 17 September 2020

विचार–पुष्प, भाग –५१

 

                                                       उत्तरार्ध

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना- घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका

                                 विचार–पुष्प, भाग –५१

                          
                           दानशूर जॉन डी रॉकफेलर

मॅडम कॅल्व्हे  स्वामी विवेकानंद यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांचे पुढचे आयुष्य बदलून गेलेले दिसते .कुठल्याही अडीअडचणीच्या वेळी, संकटाच्या वेळी, दु:खाच्या वेळी माणसाला योग्य मार्गदर्शन मिळाल्याने आधार वाटतो आणि त्यातून तो सावरायला मदत होते, बाहेर पडायला मदत होते. एव्हढच काय, सर्व काही चांगलं असताना सुद्धा योग्य दिशा तर हवीच ना? तशी योग्य मार्गदर्शन करणारी, योग्य माणसंही आपल्याला माहिती हवीत. आजच्या काळात ती असायलाही हवीत.   

स्वामीजी शिकागो मध्ये इतर ठिकाणी ही फिरत होते. त्यांच्या संपर्कात वेगवेगळी माणसे येत होती. एव्हाना परिषदेपासून त्यांची चांगलीच प्रसिद्धी झाली होती.स्वामीजींच्या भेटीतून आपल्याला चांगले तत्वज्ञान समजू शकते, त्यांच्या चांगल्या विचारांनी योग्य दिशा मिळू शकते असा विश्वास तिथल्या लोकांमध्ये निर्माण झाला होता.जे जे त्यांना भेटत, त्यांच्या विचारात बदल होत असे.

अशीच एका धनवंताची भेट स्वामीजिंबरोबर झाली. ते होते जॉन डी. रॉकफेलर.( जन्म-८ जुलै १८३९ मृत्यू २३ मे १९३७) मोठे व्यावसायिक होते. तेलसम्राट म्हणून ओळखले जात होते.  


जॉन डी रॉकफेलर
रॉकफेलर घराणे हे  प्रसिद्ध अमेरिकन उद्योगपतींचे दानशूर घराणे. आधुनिक खनिज तेल उद्योगाचा विकास करण्याचा, त्याचप्रमाणे अतिशय मोठ्या प्रमाणावर परोपकारी व जनहितकारक कृत्ये करण्याचे श्रेय या उद्योगसमूहाला जाते. विशेषत: अमेरिकन वैद्यकशास्त्राला आधुनिकीकरणाचा साज देण्याचे कर्तृत्व या घराण्याचे आहे. जॉन हे या घराण्यातील पहिले उद्योगपती, Standard Oil उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेलउद्योगाचा संस्थापक. शिक्षण पूर्ण केल्यावर १८५९ मध्ये क्लार्क यांच्या भागीदारीत दलालीचा धंदा सुरू केला. १८५९ मध्ये अमेरिकेतल्या पेनसिल्वेनिया च्या टायटसव्हील मध्ये जगातली पहिली तेल विहीर खोदली गेली. १८६३ मध्ये जॉन यांनी अँड्रूज, क्लार्क अँड कंपनीस्थापन करून तेलशुद्धीकरण उद्योग सुरू केला. दोन वर्षांनी रॉकफेलर अँड अँड्रूज कंपनीस्थापन केली. १८८२ मध्ये ‘Standard Oil Trust’ या मोठ्या उत्पादनसंस्थेची स्थापना करण्यात आली. या ट्रस्टच्या नियंत्रणाखाली अमेरिकेतील ९५% तेलउद्योग, लोहधातुकाच्या खाणी, लाकूड कारखाने, वाहतूक उद्योग यांसारखे अनेक उद्योग होते.

जॉन यांनी १८९५ च्या सुमारास Standard Oil Company चे दैनंदिन व्यवस्थापन आपल्या सहकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यास प्रारंभ केला होता. तेलउद्योगातून मिळणाऱ्या प्रचंड नफ्यापैकी बराचसा भाग बाजूला काढून तो लोहधातुकाच्या खाणी व न्यूयॉर्कमधील व्यापारी बँकिंग व्यवसाय या दोन अतिशय विकासक्षम उद्योगांकडे त्यांनी वळविले. मोठ्या प्रमाणावरील लोकोपकारविषयक कार्ये, हे जॉन यांच्या जीवनातील दुसरे मोठे वैशिष्ट्य होते. त्यामुळे ते तेलउद्योगापेक्षा या कार्याबद्दल अधिक ख्यातकीर्त झाले होते. हे किती विशेष म्हटले पाहिजे. आपल्याजवळील अफाट संपत्तीचा काही भाग जनकल्याणार्थ खर्च करणे आवश्यक आहे; नव्हे, ते आपले कर्तव्यच आहे, अशी त्यांची भावना होती. केवळ आपल्या वारसदारांना सर्व संपत्ती मिळणे इष्ट नसल्याचे त्यांचे ठाम मत होते. म्हणून त्यांनी अमेरिकेतील वैद्यकशास्त्र, शिक्षण तसेच संशोधन यांचा विकास व उन्नती यांकरिता लक्षावधी डॉलर खर्च केले. अनेक धर्मादाय संस्था उभारून त्यांचे संचालन सुयोग्य विश्वस्तांच्या हाती ठेवले व त्यांच्या दैनंदिन कार्यवाहीसाठी लोककल्याणाची तळमळ व आस्था असणारे कर्तव्यदक्ष अधिकारी नेमले. अशा संस्थांद्वारा जॉन यांनी सुमारे साठ कोटी डॉलर रकमेचा विनियोग केला. अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यांमधील अतिशय हलाखीची शैक्षणिक अवस्था सुधारण्यासाठी जनरल एज्युकेशन बोर्डहे मंडळ व शिकागो विद्यापीठया दोन्ही संस्था त्यांच्या प्रचंड देणग्यांमधून स्थापन झाल्या.पुढेही शिकागो विद्यापीठास त्यांनी आपल्या मृत्यूपर्यंत सुमारे आठ कोटी डॉलर देणगीरूपाने दिले.

जॉन यांनी १९०२ मध्ये स्थापन केलेल्या ‘General Education Board’ या शैक्षणिक मंडळाचा अमेरिकेतील शिक्षणाचा वंश, धर्म, जात, लिंग यांचा विचार न करता विकास करणे हे उद्दिष्ट होते. १९५२ अखेर या मंडळाने आर्थिक अडचणीमुळे आपले कार्य थांबविले. पन्नास वर्षांच्या कालखंडात महाविद्यालये व विद्यापीठे, वैद्यकीय शाळा, शैक्षणिक संशोधन प्रकल्प व शिष्यवृत्त्या अशा विविध शैक्षणिक कार्यक्रमांसाठी मंडळाने पैसे खर्च केले. १९०१ मध्ये रॉकफेलर वैद्यकीय संशोधन संस्था न्यूयॉर्कमध्ये स्थापण्यात आली. आरोग्यशास्त्र, शस्त्रक्रिया, वैद्यक व तदनुषंगिक शास्त्रे यांच्या संशोधन कार्यात मदत, रोगांचे स्वरूप, कारणे व निवारण या कार्यात मदत व संशोधन आणि यांविषयी झालेल्या व होणाऱ्या संशोधनाचा व ज्ञानाचा सार्वजनिक कल्याणार्थ प्रसार करणे अशी या संस्थेची उद्दिष्टे होती. पुढे याच संस्थेचे रॉकफेलर विद्यापीठामध्ये रूपांतर करण्यात आले. जगातील मानवजातीच्या कल्याणाचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून रॉकफेलर प्रतिष्ठान या लोकोपकारी संघटनेची १४ मे १९१३ रोजी स्थापना करण्यात आली.

जॉन यांचे सुरूवातीचे दिवस --

खरं तर जॉन अमेरिकेतल्या न्यूयॉर्क जवळील रिचफोर्ड या खेड्यात राहणारा सर्व सामान्य कुटुंबातला मुलगा होता. वडीलही पोटापाण्यासाठी साधं काहीतरी काम करायचे, जॉन मोठा झाल्यावर गावच्या बाजारात भाजी, अंडी असे विकू लागला.मग पुस्तकाच्या दुकानात काम करू लागला. थोडे पैसे साठवून पेनसिल्वेनिया मध्ये जाऊन नगरपालिकेच्या रस्त्यावरील दिव्यांसाठी रॉकेल पुरविण्याच काम करू लागला. इथे थोड स्थैर्य मिळालं. इतर गावातही रस्त्यावरील दिव्यांसाठी रॉकेल पुरवण्याचे काम प्रयत्न करून मिळवलं. यातून तेलाचं महत्व ओळखून जॉन बरेच काही शिकला होता आणि भविष्यात ज्याच्याकडे तेल त्याचेच हे जग हे त्याने ओळखले. मग ऑइल रिफायनरीत पैसे गुंतवले. तेल विहीरींचे पीक आले. आणि बुडीत तेलविहीर कंपनी रॉक फेलर ने लिलावात विकत घेतली. ती म्हणजेच स्टँडर्ड ऑइल. आता जॉन च्या हातात सगळ आलं. तेलाच्या ऑर्डर मिळत होत्या. त्याला रिफायनारीची जोड दिली. तेल साठवण्यासाठी पत्र्याचे डबे लागत त्याचाही कारखाना स्वत:च घातला. एका राज्यातून हे डबे वाहतूक करायला स्वत:चे  टँकर्स बनवले. पुढे रेल्वे वॅगन ची गरज होती तेही तयार केले आणि त्या वॅगन, ने आण करण्यासाठी स्वत:चा रेल्वे मार्गही टाकला . इतकी मेहनत करून आपल साम्राज्य त्याने उभ केलं होत. सदैव सैनिका पुढेच जायचे या चालीवर .....  हा जॉन पुढे पुढे जातच होता, प्रगती करत होता.   

 एव्हढं माहिती करून देण्याचं कारण म्हणजे इतका हा प्रगती केलेला, श्रीमंत झालेला माणूस एका हिंदू तत्वज्ञानाच्या संपर्कात आल्यावर त्याचे मन कसे परिवर्तन होऊ शकते त्याचं हे उदाहरण आहे. तेही परदेशात हे विशेष.

   रॉकफेलर यांचे एक व्यावसायिक सहकारी मित्र होते, त्यांच्याकडे स्वामीजी राहत असताना ते जॉन यांना आग्रह करीत की, एकदा स्वामी विवेकानंदांना तुम्ही भेटा. पण जॉन स्वाभिमानी होते, त्यांना कुणी सुचवलेले मान्य होत नसे. पण एकदा अचानक त्यांच्या मनात आले विवेकानंदांना भेटायचे आणि म्हणून, ते स्वामीजींना भेटायला त्या सहकार्‍याकडे पोहोचले. कुठलाही शिष्टाचार न पाळता जॉन सरळ विवेकानंद यांच्या खोलीत गेले. स्वामीजी त्यांच्या खोलीत योग अवस्थेत बसले होते. त्यांनी मान सुद्धा वर केली नाही. पाहिले नाही. जॉन बघतच राहिले. थोडा वेळ गेल्यानंतर, स्वामीजी म्हणाले, “तुम्हाला जी संपत्ती मिळाली आहे, ती तुमची नाही. तुम्ही केवळ एक माध्यम आहात. तुम्ही लोकांचं भलं करावं. इतरांना सहाय्य करण्याची, त्यांचं कल्याण करण्याची संधी तुम्हाला मिळावी, म्हणून ईश्वराने ही संपत्ती तुम्हाला दिली आहे”. हे ऐकून मनातून दुखावलेले रॉकफेलर तडक घरी आले ते हा विषय डोक्यात घेऊनच. एक आठवड्याने पुन्हा ते स्वामी विवेकानंद यांना भेटायला गेले. तेंव्हाही स्वामीजी योग अवस्थेतच बसलेले होते. रॉकफेलर यांनी एक कागद स्वामीजींपुढे टाकला. त्यावर, आपण एका सार्वजनिक संस्थेला भरघोस देणगी देण्याचे ठरविले आहे असे लिहिले होते.आणि म्हणाले,आता यामुळे तुमचे समाधान होईल आणि त्यासाठी तुम्ही माझे आभार मानायला हवेत. विवेकानंद यांनी कागदावरून शांतपणे नजर फिरवली पण वर पाहिले नाही आणि म्हणाले, “ठीक, यासाठी तुम्ही मला धन्यवाद द्यायला हवेत”. मनस्वी असलेले रॉकफेलर यांची ही पहिली मोठी देणगी होती. विशेष म्हणजे, १८९५ पासून त्यांच्या गाजलेल्या कल्याणकारी निधींचा प्रारंभ झाला. म्हणजे एका क्षणी स्वामीजींच्या भेटीत लोकांसाठी आर्थिक सहाय्य करावं या सूचनेचा राग आलेले रॉकफेलर यांनी आता कल्याणकारी निधिला सुरुवात केली हा मोठा बदलच होता. पुढे त्यांच्या मानव सेवा कार्याबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, “मानवी जीवनात केवळ पैशाचा संग्रह करत बसण्यापेक्षा मोलाचं असं काहीतरी आहे, संपत्ती हा माणसाच्या हातात असलेला केवळ एक विश्वस्त निधि आहे त्याचा त्याचा अयोग्य पद्धतीने वापर करणे हे पाप आहे. जीवनात अखेरच्या क्षणाला उत्तम प्रकारे सामोरं जाण्याची तयारी करणं म्हणजेच सतत दुसर्‍यासाठी जगत राहणं होय आणि ते मी करतो आहे”. हाच होता स्वामीजींच्या संपर्काचा प्रभाव.

    रॉकफेलर घराण्याने वैद्यक, शिक्षण, कला, सांस्कृतिक घडामोडी इत्यादी क्षेत्रांना प्रचंड प्रमाणावर आर्थिक साह्य देऊन मानवजातीचे कल्याण व विकास अव्याहत होत राहील यासाठी प्रतिष्ठाने व विविध निधी उभारून दानशूरतेचे कार्य अखंडपणे चालू ठेवले आहे.

असे अनेक लोक स्वामीजींना भेटत होते. परिषद संपल्यानंतर पावणेदोन महीने आसपासच्या गावांमध्ये त्यांची व्याख्याने पण झाली. त्यांनी व्याख्यानांसाठी एक करार केला होता. स्लेटन लायसियम ब्यूरो या संस्थेशी तीन वर्षांचं करार केला की त्यांनी व्याख्याने द्यायची त्या बदल्यात स्वामीजींना पैसे दिले जातील. असे केल्यास पैसा जमवून तो भारतातल्या कामासाठी उपयोगी पडेल असे स्वामीजींना पटवण्यात आले होते. दौर्‍यातील पहिले व्याख्यान झाल्यावर स्वामीजींना 100 डॉलर्स देण्यात आले. त्यामुळे असा कार्यक्रम सुरू झाल्याने स्वामीजींची धावपळ, सतत प्रवास, मुक्काम सुरू झाले. दमछाक झाली. करार झाल्यामुळे तो एक व्यापार झाला होता ते अनुषंगुन  काम करणे भाग होते आणि हे आपल्याला शक्य नाही असे अनुभव घेतल्यानंतर स्वामीजींच्या लक्षात आले.

मेंफिस निवासगृह 
दौरा ठरविणारी ब्यूरो व्यवसाय म्हणून त्याकडे बघत असते. जाहिरात, वृत्तपत्रे प्रसिद्धी, व्याख्यानांचे भित्तिपत्रके असा दिनक्रम स्वामीजींना नकोसा झाला. यावेळी मेंफिस इथं आठवडयाभरचा मुक्काम झाला आणि स्वामीजी सुखावले.१३ ते २२ जानेवारी १८९४ मध्ये ते मेंफिसला थांबले.हयू एल ब्रिंकले यांचे पाहुणे म्हणून ते मिस व्हर्जिनिया मून यांच्या निवासगृहात उतरले होते. त्या नुसते निवासगृह चालवीत नव्हत्या तर गोरगरिबांना सढळ हाताने मदत करणे हे ही काम करत. त्यांच्या दानशूर वृत्तीमुळे त्या मेंफिस मध्ये प्रसिद्ध होत्या. इथे त्यांची दोन व्याख्याने झाली. मेंफिसला जरा त्यांना शांतता लाभली. इथे पत्रकारांनी वृत्तपत्रासाठी  मुलाखती घेतल्या, वेगवेगळ्या लोकांच्या घरी भेटी,परिचय, चर्चा झाल्या.  स्वामीजींच्या विचारांनी पत्रकार सुद्धा भारावून गेले होते. 

व्हर्जिनिया मून
वुमेन्स कौन्सिल मध्ये १६ जानेवारीला मानवाची नियती या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. यात ते म्हणाले, “ परमेश्वराची भीती वाटणे हा धर्माचा प्रारंभ आहे. तर त्याच्याविषयी प्रेम वाटणे ही धर्माची परिणती आहे. मानवाचं मूलभूत पाप या सिद्धांतात वाहून जाऊ नका. जेंव्हा अॅडमचा अध:पात झाला, तेंव्हा तो पवित्रतेपासून झाला. त्याच्या पावित्र्याला ढळ पोहोचला,हे पतनाचे कारण. तेंव्हा मूळ आहे ते पावित्र्य. पतन नंतरचं आहे. हे त्यांचे उद्गार श्रोत्यांची मने हेलावून गेले.मेंफिस च्या आठ दिवसाच्या मुक्कामात कळत नकळत स्वामीजींनी लोकांच्या मनात अध्यात्मिकतेच्या विचारांचे बीज पेरले होते. सर्वांचा प्रेमळ निरोप घेऊन मेंफिसहून स्वामीजी शिकागोला परत आले . तीन आठवडे राहिल्यानंतर, तिथून ते  डेट्रॉईटला आले.  

    © डॉ.नयना कासखेडीकर  

----------------------------------------