Monday 21 September 2020

विचार–पुष्प, भाग –५२

                                                     उत्तरार्ध

  स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना- घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका 

 विचार–पुष्प, भाग –५२ 


                                डेट्रॉईट आणि वृत्तपत्रातील वादळ

 मेंफिसहून स्वामीजी शिकागोला परतले. २५ जानेवारीला,तिथेही एक कार्यक्रम झाला. तीन आठवडे राहून ते आता डेट्रॉईट ला आले होते. सांस्कृतिक शहर होतं डेट्रॉईट. तिथे सतत काही न काही घडत तरी असे, किंवा काही तरी उपक्रम चालत असे. असे नवचैतन्य असलेले शहर, इथे नवीन उपक्रमाचे नेहमी स्वागत होत असे,स्वामींचा तिथे तीन वेळा मुक्काम झाला. त्या काळात त्यांची ८ सार्वजनिक व्याख्याने झाली.डेट्रॉईट मध्ये स्वामीजी मिसेस जे.बॅगले यांच्या राजेशाही प्रासादात मुक्कामाला होते.

मिसेस बॅगले 

   बॅगले साठीच्या होत्या. स्वतंत्र विचारांच्या, तडफदार आणि मनाने उदार होत्या. त्यांचे पती मिशिगन चे निवृत्त गव्हर्नर होते ,पण दुर्दैवाने त्यांचे खूप लवकर निधन झाले. व्यापक दृष्टी असलेल्या बॅगले अनेक सार्वजनिक कामात विविध ठिकाणी पदांवर होत्या. जबाबदारी सांभाळत होत्या. शिकागो चे जे प्रदर्शन भरले होते त्याच्या महिला विभागाच्या व्यवस्थापक मंडळावर त्या होत्या. सर्व धर्म परिषदेत त्यांनी विवेकानंदांची भाषणे ऐकली होती. तेंव्हाच त्यांच्यावर स्वामीजींचा प्रभाव पडला होता. त्यामुळे तर काय त्यांनी स्वामीजींना अगदी आनंदाने डेट्रॉईटला आपल्याकडे ठेऊन घेतले होते.

बॅगले यांची कॉलनी 
स्वामीजींच्या स्वागताप्रीत्यर्थ अल्पोपाहाराचा खास कार्यक्रम आयोजित केला होता.त्याला सर्व चर्च चे बिश्यप, धर्मोपदेशक, महापौर,पत्रकार, प्राध्यापक, विचारवंत अशा सर्वांना निमंत्रित केलं होतं. याआधी सुद्धा बॅगले यांनी नामवंतांसाठी असे कार्यक्रम आयोजित केले होते पण त्याहीपेक्षा हा कार्यक्रम चांगला झाला असे वृत्तपत्रातल्या प्रसिद्धीत म्हटले होते.

 पण या सुंदर नियोजित कार्यक्रमाला गालबोट लागले ते तिथे आलेल्या एका स्त्रीने स्वामीजींना उद्देशून अपमानकारक काही शब्द वापरले होते म्हणून. ते बॅगले यांना अजिबात आवडले नाही. ही तर स्वामीजींना विरोधाची नांदी च ठरली होती जणू. वाचकांच्या पत्रात वृत्तपत्रात हे छापून आले होते. दुसर्‍या दिवशी फ्री प्रेस च्या पत्रकारांनी घेतलेली त्यांची मुलाखत छापताना सुरुवातीलाच काही उपहासात्मक चार ओळी सुद्धा लिहिल्या होत्या मुलाखतित मेंफिस ला प्रश्न विचारले होते तसेच विचारले होते. ही मुलाखत डेट्रॉईट इव्हिंनिंग न्यूज मध्ये सविस्तर छापली होती.डेट्रॉईटच्या युनिटेरियन चर्च मध्ये स्वामीजींचे पहिले व्याख्यान झाले. मिसेस मेरी फंकी या वेळी उपस्थित होत्या.  

  स्वामी विवेकानंद, भारतातील अध्यात्मिकता गुलामगिरीत सुद्धा टिकून राहिली होती,ती प्राचीन संस्कृती, खोलवर पोहोचलेली नीतीमूल्य यावर स्वामीजी बोलले. अशा आमच्या देशात ख्रिस्ती उपदेशकांची काहीही आवश्यकता नाही ,त्यांनी हवं तर भारतात यावं आणि तिथल्या संस्कृतीकडून धडे घ्यावेत”.झालं! ही टीका सहन न होऊन स्वामीजींच्या याच मुद्दयाचा आधार घेऊन आता विवेकानंदांविरूद्ध टीका सुरू झाली.विवेकानंद यांच्या आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक करायला सुद्धा आता लोक नाही म्हणू लागले. आणि आता विवेकानंद आपले पाहुणे नाहीत सर्वधर्म परिषद आता संपली आहे. आपण त्यांच्या बोलण्यावर जोरदार प्रहार केला पाहिजे. मिशनर्‍यांनी उठवलेले हे वादळ ट्रिब्युन जर्नल, इव्हिंनिंग न्यूज, फ्री प्रेस या तिथल्या प्रमुख वृत्तपत्रातून आल्याने आता स्वामीजी एका बाजूला तर मिशनरी एका बाजूला अशी स्थिति निर्माण झाली.

 डेट्रॉईट मध्ये तर वृत्तपत्रात वाचकांची पत्रे आणि संपादकीय याचा वर्षाव झाला जणू. स्वामीजींचे दुसरे व्याख्यान हिंदूंचा तत्वज्ञानविचार या विषयावर झाले.काहीजण योग्य विचार करून स्वामीजींबद्दल लिहिणारे होते तेही छापून येत होते.

 विवेकानंद यांना सभेनंतर प्रश्न विचारत किंवा प्रश्नोत्तरचा कार्यक्रम होई त्यात विचारत. त्यातील मते अशी असत. “भारत एक अतिशय मागासलेला देश आहे. आदिम समाज असावा तसा किंवा त्या अवस्थेतून नुकताच बाहेर पडत असलेला देश. दगड धोंड्यांची तसेच, वड किंवा तुळस अशा झाडांची, नाग, वानर अशा प्राण्यांची, पुजा तेथे चालते.पतीच्या मृत्यूनंतर स्त्रीला सरळ त्याच्या बरोबर चितेवर चढवतात . तेथील लोक आपली मुले विशेषत मुली गंगेत सुसरीपुढे टाकतात किंवा जगन्नाथाच्या रथयात्रेवेळी चाकाखाली आपले शरीर झोकून देऊन अनेक जण प्राणत्याग करतात. अशा तिथे भारताबद्दल समजुती होत्या. हेच प्रश्न लोक तिथे विचारात असत. विवेकानंद यांनी या सर्व प्रश्नांना वेगवेगळ्या कार्यक्रमात ,मुलाखतीत,सभेच्या शेवटी योग्य ती सत्य उत्तरे दिली. नेमके त्या मागचे विचार आणि वस्तुस्थिती स्पष्टपणे समजावून सांगितली.काहीही लपविले नाही.

त्या लोकांची दुसरी समजूत अशी होती, भारतात चमत्कार करणारे काही फकीर आणि बैरागी आहेत, ते आकाशात दोर ताठ फेकून त्यावर चढून नाहीसे होतात. पुन्हा खाली येतात. आपले शरीर जमिनीपासून वर अधांतरी उचलतात,पाण्यावरून चालत जातात, हिमालयात तर अनेक योगी व महात्मे असे आहेत की, अनेक दिवस अन्न पाण्याशिवाय राहू शकतात. भूत भविष्य सांगतात. निसर्गाचा कोणताही नियम त्यांना अडवू शकत नाही. शंभर शंभर वर्षे जगतात अशा या समजुतीचे विवेकानंद यांनी स्पष्ट नकारार्थी उत्तर दिले. काही वेळा क्वचित चमत्कार घडतात पण त्यामागे काही नियम असला पाहिजे तो आपल्याला माहिती नसतो एव्हढच. आपण हिमालयात फिरलेलो आहोत. असा कुठलाही महात्मा आपल्याला भेटलेला नाही असे ठणकाऊन सांगितले. पुढे जाऊन असेही स्पष्ट केले की, हिंदू धर्मातील तत्वज्ञानामध्ये चमत्कारांना कोणतेही महत्व दिलेले नाही. सामान्य माणूस त्यांना भुलतो. पण ते त्याचे अज्ञान असते. आध्यात्मिक धारणा महत्वाची आहे. आणि तिचा संबंध माणसाच्या आत्मिक विकासाशी आणि विशुद्ध आचरणाशी आहे. ही भारतीय तत्वज्ञानाची शिकवणूक आहे. हे स्वामी विवेकानंद यांचे बुद्धिनिष्ठ विचार थिओसॉफीच्या विचारसरणीचा पाया च डळमळीत करणारे ठरले आणि पुन्हा एकदा त्यांना शत्रुत्व पत्करावे लागले.एव्हढी समाधानकारक उत्तरे त्यांनी दिली होती, तरी सुद्धा यानंतरच्या अंकात विवेकानंद यांचे स्वागत करताना आम्हाला काही चमत्कार दाखवा असा अग्रलेख प्रसिद्ध झाला. त्याच्या दुसर्‍या दिवशी पुन्हा एक अग्रलेख .त्यात लिहिलं होतं, चमत्कार करता येत नाहीत तेंव्हा विवेकानंद यांच्या विषयीचा भ्रमाचा भोपळा फुटला.

पण आता मात्र ओ.पी. डेलडॉक जे स्वामीजींच्या विचारांचे पुरस्कर्ते होते त्यांनी वृत्तपत्राची मागणी आणि विसंगती दाखवणारं सविस्तर पत्रच पाठवलं, जे प्रसिद्ध झालं. धार्मिक विषयात विवेकानंद यांची उघडपणे बाजू घेणारे लोकही तिथे होते.

                              

                                                                        युनिटेरियन चर्च  

युनिटेरियन चर्च मध्ये १८ फेब्रुवारी ला धर्म प्रवचनासाठी रेव्हरंड रीड स्टुअर्ट यांनी पूर्व दिशेचा उघडत असलेला दरवाजा  असा विषय मांडला.विवेकानंद यांच्या विचारधारेशी समन्वय साधणारे भाषण त्यांनी केले, पश्चिमेकडे विज्ञान आहे ,तर पूर्वेकडे अध्यात्म आहे. पश्चिमेकडे पंथ आहे तर पूर्वेकडे अनेक पंथांना सामावून घेणारा धर्म आहे.असे सांगितले.

बेथ एल टेंपल 
तर बेथ एल या मंदिरात रॅब्बी ग्रोसमन यांनी, विवेकानंदांनी आपल्याला काय दिले?’ हाच विषय प्रवचनाला निवडला.अगदी ऐकण्यासारख आहे हे . रॅब्बी म्हणतात, “ विवेकानंदांचे विचार ऐकताना मन  अगदी उल्हसित होऊन जाते. धर्म आणि ईश्वर संकल्पना या बाबतीत आपण पाश्चात्य फार मागे आहोत. धर्म म्हणजे नुसता विचार नव्हे, तर साक्षात दैनंदिन जीवन. आपल्याजवळ फार मोठ्या सुरेख आणि आकर्षक कल्पना आहेत. पण त्या हवेत तरंगत असतात. आपणा पाश्च्यात्यांचा देव आकाशात आहे. आणि रविवार सकाळपुरतेच काही कार्य आपण त्याच्यावर सोपविलेले आहे.विवेकानंदांचा ईश्वर पृथ्वीवर आहे. तो परमेश्वर नित्य क्षणाक्षणाला आपल्याजवळ आहे.बागेतील प्रत्येक फुलात, वार्‍याच्या झुळुकीत,आपल्या शरीरातील रक्ताच्या क्षणाक्षणातील स्पंदनात परमेश्वर भरून राहिला आहे. हा विचार आपण हिंदूंकडून उचलला पाहिजे. आपल्या पंथांना भिंती आहेत. पूर्वेकडील धर्म चहू दिशांनी खुला आणि स्वीकारशील आहे.

एखाद्या अगदी गरीब माणसाच्या दरात अकस्मात कोणीतरी येतो तेंव्हा घरातील लहान मूल ओरडून सांगते अतिथि अतिथि. त्या अतिथि साठी घरातले सर्वजण त्याच्यासमोर उभे राहतात. कारण त्याच्या रूपाने दरात परमेश्वर आला आहे अशी शिकवणूक त्या माणसांना मिळालेली असते. ही केव्हढी सुंदर कल्पना आहे. पाश्च्यात्यांच्या घरी बाहेरच्या खोलीत येणार्‍याला किती उपचार(formality) सांभाळावे लागतात.हे आपल्याला माहिती आहे. आपले चर्च पवित्र आहे तेही फक्त रविवारी”.अशा पद्धतीने ग्रोसमन यांनी त्यांना समजलेले विवेकानंद यांचे विचार मांडले. म्हणजेच विवेकानंद यांनी आपल्या धर्माचे काय महत्व आहे ,आपला धर्म काय शिकवण देतो, ते तिथे अशा प्रकारे मोठ्या अभिमानानेच सांगितले असणार.ग्रोसमन चे हे प्रवचन इव्हनिंग न्यूजला मानवले नाही. त्याने ग्रोसमन यांच्यावर टीका केली.

 पुढे पुढे तर विवेकानंदा यांच्या विधानांचा विपर्यास करून तशा बातम्या,लेख प्रसिद्ध होऊ लागले. कोणी स्वामीजींची बाजू मांडू लागले आणि आश्वस्त करू लागले की, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. सगळेच लोक हलक्या मनाचे व संकुचित वृत्तीचे नाहीत, आम्ही ख्रिस्ता ची शिकवणूक मानणारे तुमचं स्वागत करतो. आणि ज्या शिवराळ भाषेत विवेकानंद यांच्या बद्दल लिहिले जात आहे ते ख्रिस्ताच्या शिकवणुकीला न शोभणारे आहे असे खडसावले होते. एव्हढी टिका चालू होती पण विवेकानंद यांच्या व्यख्यांनाना प्रचंड गर्दी होत होतीच.अनेक जण त्यांना भेटायला येत. स्वामीजींना भोजन आणि अल्पोपहार याची सतत निमंत्रणे येत.

 एक तरुण उद्योजक, मिशिगन-पेनिनशूलर कार कंपनीचे भागीदार चार्ल्स एल. फ्रिअर एक धनवंत होते.  त्यानेही स्वामीजींसाठी भोजन समारंभ आयोजित केला होता. तो खूप थाटामाटाचा होता.शिवाय विवेकानंद यांना त्यांच्या कामासाठी तेंव्हा २०० डॉलर्सची देणगी ही दिली होती.          

मिसेस बॅगले म्हणतात, आमच्या घरातील विवेकानंद यांच्या वास्तव्याचा प्रत्येक दिवस आनंद पूर्ण झाला.बॅगले ज्या भागात राहत होत्या तिथे सर्व धनवान मंडळी राहत होती.त्यांनी आपल्या निवासस्थानी स्वामीजींचे एक व्याख्यान ठेवले. सर्वांना जाहीर निमंत्रण असल्याने खूप गर्दी झाली.स्वामीजी दोन तास बोलले. चर्चा, वाद उत्तर प्रतिउत्तर सुरूच राहिले. सडेतोड व्याख्यान झाले.केवळ आठ दहा दिवसात मिशनरी हादरून गेले होते.

 पण डेट्रॉईट च्या बाहेरून विरोध ऐकू यायला लागला होता.रेव्हरंड आर. ए. हयूम यांनी विवेकानंद यांना त्यांच्या भाषणावर आक्षेप घेणारे पत्र लिहिले,विवेकानंद यांनी त्याला लगेच उत्तर दिले. हयूम भारतात जन्मलेले,वाढलेले आणि मिशनरी म्हणून भारतात काम केलेले गृहस्थ. आता त्यांनी पुन्हा पत्र पाठवले. मात्र स्वामीजींनी त्याला उत्तर दिले नाही, कारण सार्वजनिक वादात आपल्याला ओढण्याचा प्रयत्न त्यांच्या लक्षात आला. हयूम यांनी मद्रास मध्ये हिंदू या वृत्तपत्रात आलेला अग्रलेख याचा आधार घेऊन हे पत्र लिहिले होते. हा अग्रलेख संपादक जी. सुब्रम्हण्यम अय्यर यांनी लिहिला होता. जे भारतात सर्व धर्म परिषदेसाठी समिति नेमली होती त्यात ते एक सदस्य होते.

 हयूम यांनी मार्च मध्ये पाठवलेली पत्रे एप्रिल मध्ये डेट्रॉईट फ्री प्रेस मध्ये प्रसिद्ध झाली. विवेकानंद या वादात नसतानाही त्यांना त्यात ओढण्याचा घाट घातला होता. त्याला वृत्तपत्रातून त्या ओपत्राच्या बाजूने आणि विरुद्ध बाजूने ही उत्तरे देण्यात आली. धरमोपदेशकणी तर स्वामीजींच्या वागण्या बोलण्यावर आणि चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यास सुरुवात केली.  ही सर्व वार्ता विवेकानंद आलसिंगा पेरूमल यांना पत्राने कळवत होते.

 आता ही सर्व बातमी मिसेस बॅगले यांच्या कानावर आली. त्यांच्या ओळखीच्या मिसेस स्मिथ यांनी कळवले की विवेकानंद यांच्यावर नाना तर्‍हेच्या गोष्टी बोलल्या जात आहेत. ते संतापी आहेत, त्यांचे वर्तन शुद्ध नाही, असे आरोप ही केले जात आहेत. हे ऐकून आपण अस्वस्थ झालो आहोत. बॅगले यांनी आपले मत सांगावे असे विचारले होते. स्वामीजी तर तेंव्हा बॅगले यांच्याकडेच राहत होते.पण बॅगले आता नेमक्या अॅनिस्क्व्यामला गेल्या होत्या.तिथून त्यांनी पत्र लिहिले आणि म्हटले ......क्रमश:               

  © डॉ.नयना कासखेडीकर    

----------------------------------------

1 comment: