‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा,प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका
विचार–पुष्प, भाग-४५
प्रा.जॉन हेनरी राइट आणि स्वामीजी
महिला सुधार गृह |
वृत्तपत्रीय प्रसिद्धी |
शेरबोर्न च्या तुरुंगातील भेटीची बातमी वृत्तपत्रात आली पण
बोस्टन च्या एका महिला मंडळातील कार्यक्रमाची बातमी आली नाही. तो कार्यक्रम होता
पंडिता रमाबाई यांनी विधवांच्या शिक्षणाला सहाय्य मिळावे म्हणून, केलेल्या
प्रयत्नांना अमेरिकेत प्रतिसाद मिळत होता, त्यातलाच एक
कार्यक्रम. त्यासाठी तिथे ठिकठिकाणी महिला मंडळे स्थापन झाली. स्वामीजींचे भाषण ‘भारतातील बालविधवांची स्थिती’ यावर व्याख्यान झाले.
पण वृत्तपत्रात बातमी नाही.
अटलांटिक महासागराच्या किनार्यावर अनिस्क्वाम या टुमदार
खेड्यात ते सुटीला येत. प्रा.राइट, हार्वर्ड विद्यापीठात
भाषाशास्त्र, प्राचीन इतिहास संशोधन,
ग्रीसचा इतिहास या विषयाचे प्राध्यापक होते. अमेरिकेतील विद्वान मंडळीत त्यांचे
नाव घेतले जात होते. अशा लोकांमध्ये स्वामीजींचा वावर,
त्यांची ओळख, त्यांच्याशी झालेली चर्चा यामुळे त्यांची जणू
सर्वधर्मपरिषदेची रंगीत तालीमच होत होती की. त्यांच्याकडे विविध विषयांवर चर्चा
झडत असत आणि विवेकानंदांचे सखोल तात्विक चिंतन ऐकले तेंव्हा श्रीमती राइट इतक्या
भारावून गेल्या की विवेकानंद त्यांच्याकडून गेल्यावर,
त्यांनी आपल्या आईला पत्रात लिहिलंय, “त्यांचे वय
कालगणनेच्या दृष्टीने तीस वर्षाचे आहे, पण विद्वत्ता आणि
सुसंकृतपणा या दृष्टीने ते कितीएक युगांचे आहे”. अशी एकेकांची स्वामीजींबद्दलची
निरीक्षणे होती. स्वामीजी फक्त शनिवार रविवार हे दोनच दिवस त्यांच्या कडे राहिले
होते, त्यांच्या बरोबरच्या धर्म,
तत्वज्ञान आणि अध्यात्म या विषयांवर होणार्या गप्पांमधून,
चर्चेतून, विवेचनातून राइट पतीपत्नींनी स्वामीजींचं सूक्ष्म
अवलोकन केलेलं दिसतं.
प्रा.राइट यांच्याशी विवेकानंदांचे सर्व बोलणे अध्यात्म, धर्म आणि तत्वज्ञान या विषयावर चालत असे. विवेकानंदांच्या भेटीत राइट कुटुंबाला झालेला परिचय मिसेस राइट यांनी सविस्तरपणे लिहून ठेवला आहे. ते घरात सगळ्यांना कसे प्रिय होते हे सांगितलं, त्यांना तीन मुले होती. तेरा वर्षांची एलिझाबेथ, दहा वर्षांचा ऑस्टीन आणि दोन वर्षांचा जॉन. ऑस्टीन बद्दल त्यांना जास्त प्रेम असायचे. एक वर्षाने विवेकानंद पुन्हा राइट यांच्याकडे भेटायला गेले तेंव्हा त्यांनी मुलांसाठी मिठाई नेली होती. पण ऑस्टीनला त्यांनी ‘Light of Asia’ हे एडविन ऑर्नोल्ड यांचं पुस्तक भेट म्हणून दिलं. तो मोठा झाल्यावर कधीतरी वाचेलच असा स्वामीजींना विश्वास होता. म्हणजे अपेक्षा होती. ऑस्टीन मोठा झाल्यावर आईवडिलां इतकीच स्वामीजींची आठवण होती. ते सर्व स्वामीजींचा आमचे स्वामीजी असा उल्लेख करत असत. पुढे तर ऑस्टीन च्या मुलीलाही आपल्या वडिलांकडून स्वामीजींचा परिचय झाला होता. असे राइट यांच्या तीन पिढ्यात स्वामीजींना ओळखत होते हे विशेष आहे. इतकं देशासाठी झटलेल्या स्वामीजींच्या आपल्याच देशात आजही अनेक लोकांना स्वामी विवेकानंद यांची ओळख नाही. याचं उत्तर स्वामीजींच्याच विचारात मिळतं ते म्हणजे माणसं आपला इतिहास वाचतच नाहीत.
प्रा. राइट यांनी अनिस्काम च्या यूनिव्हर्सल चर्च मध्ये विवेकानंदांचे व्याख्यान घडवून आणले. त्यात त्यांनी ‘भारतीयांची जीवनपद्धती’ हा विषय मांडला. त्यात सांगितलं की, “आज भारताला खरी गरज धर्माची नसून त्यांना आधुनिक औद्योगिक युगाला उपयोगी पडेल असे शिक्षण मिळण्याची आहे”. या प्रभावी व्याख्यानचा असा परिणाम झाला की, श्रोत्यांनी भारावून जाऊन त्या क्षणीच, भारतात एखादी शाळा काढण्यासाठी वर्गणी गोळा केली. विवेकानंदांनी शाळा सुरू करण्याचा कोणताच विचार व्यक्त केला नव्हता. तरीही लोकांनी पैसे गोळा केले याचे विवेकानंदांना खूप हसू आले. म्हणजे ते भाषणच एव्हढं प्रभावी होतं. शाळा कोण काढणार, कोण चालवणार याचा जराही विचार न करता गरज आहे त्याला मदत एव्हढाच विचार त्यांनी केला होता. स्वामीजींचं अमेरिकेत झालेलं पहिलं सार्वजनिक व्याख्यान होतं हे. या आधीची व्याख्याने स्त्रियांसमोर संस्थेपुरती होती.
युनिवर्सल चर्च |
राइट यांच्या सारखे विद्वान प्राध्यापक सुद्धा विवेकानंदांच्या व्यासंग आणि विचारांनी प्रभावित झाले होते. सर्वधर्म परिषदेला उपस्थित राहण्याचा विचार आपण सोडून दिला आहे असे प्रा. राइट यांना स्वामीजींनी बोलताना सांगीतले. पण त्यांनी तसे करू नये यासाठी राइट यांनी स्वामीजींचे मन वळवले. ते म्हणाले, “सर्व अमेरिकेला तुमचा परिचय होण्याचा हा एकच मार्ग आहे”. पण आपल्याजवळ कोणतेही अधिकार पत्र नाही हे स्वाभाविकपणे तोंडून निघून गेले. त्यावर प्रा. राइट यांचं उत्स्फूर्त उत्तर होतं, “स्वामीजी, सर्वधर्म परिषदेला उपस्थित राहण्यासाठी तुमच्याकडे अधिकार पत्र मागणे म्हणजे, सूर्याने आपला प्रकाशण्याचा अधिकार सिद्ध करावा असे त्याला म्हणण्यासारखे आहे”. केव्हढा हा उत्स्फूर्तपणे झालेला गौरव! (सर्व फोटो इंटरनेट वरून साभार परत)
© डॉ.नयना कासखेडीकर
ही मालिका ऑडिओ बुक स्वरुपात पण उपलब्ध आहे ,ऐकण्यासाठी You Tube चॅनेल च्या
playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLEkZc0XQx78jmXuRkOtsWN-D1Z2FBgOGk
या लिंकवर जाऊन या भागाचा यू ट्यूब व्हिडिओ
बघावा
No comments:
Post a Comment