Monday, 14 September 2020

विचार–पुष्प, भाग –४९

                                 उत्तरार्ध

 स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका 

                विचार–पुष्प, भाग –४९                       

                               

            सर्वधर्म परिषदेनंतर शिकागोतील वास्तव्य 

 ११ सप्टेंबरला शिकागो येथे सर्व धर्म परिषद उद्घाटन जोरदार झालं.स्वामीजींचे स्वागतपर छोटेसे भाषण ही आपण पाहिले. परिषदेला आलेल्या पाहुण्यांची निवास व्यवस्था अनेक वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली होती. स्वामी विवेकानंद यांची सोय जे. बी. लायन यांच्याकडे केलली होती. लायन यांच्याकडे आधीच परप्रांतातून अनेक प्रतीनिधी राहायला होते. घर जरी प्रशस्त मोठं असलं तरी गर्दी झाली. त्यात विवेकानंद यांना लायन यांच्याकडे ११ सप्टेंबरला रात्री पाठवण्यात आले. लायन यांच्या पत्नी एमिली यांनी आपल्या मुलाला दुसरीकडे पाठवून ती खोली रिकामी करून ठेवली. कोण येणार हे माहिती नसल्याने त्यांच्या मनात शंका आली की आपल्याकडे दक्षिण अमेरिकेतील लोक उतरले आहेत त्यांच्या बरोबर हा कृष्णवर्णीय प्रतिनिधी कसा काय चालेल? कारण दक्षिण अमेरिकेत वर्णभेद खूप होता. मग त्यांनी मिस्टर लायन यांना सुचविले की यांची सोय हवं तर आपण शेजारच्या ऑडिटोरियम मध्ये करूया.  

श्री लायन 

मिस्टर लायन गप्पच. ते उठून खाली जाऊन वर्तमानपत्र वाचून आले. तिथे स्वामीजी भेटले आणि तसेच वरती येऊन एमिली यांना म्हणाले, “आपले इतर पाहुणे जरी इथून गेले तरी हरकत नाही, मला काही वाटणार नाही. पण हे भारतीय पाहुणे अतिशय बुद्धीमान असून इतकी मनोवेधक व्यक्ती यापूर्वी आपल्याकडे कधीच आली नव्हती. त्यामुळे त्यांना हवे तेव्हढे दिवस इथे ठेवले तरी चालेल. त्यांची इच्छा असेल तेव्हढे दिवस त्यांना इथे राहुदे”. विवेकानंद लायन यांच्याकडे राहिले आणि त्या घरचेच एक सभासद होऊन गेले, इतके त्यांच्यात मिसळले. यावरून लायन किती उदार विचारांचे होते हे लक्षात येते. वर्णभेदाचा विचार त्यांनाही करावा लागला होता. अमेरिकेत पोहोचल्यापासूनच विवेकानंदांना अशा अनेक चित्रविचित्र अनुभवांना सामोरे जावे लागले होते.

इथे, नुकत्याच अमेरिकेत घडलेल्या प्रसंगाची आठवण झाली. २०० वर्षांचा काळ लोटला तरी अमेरिकेत वर्णभेदाची चिंगारी मधूनच पेटते हे आता नुकतच सगळ्यांनी पाहिलं आहे. काळे गोरे या वादात मूळ कैरोलीनाचा असलेला आफ्रिकी अमेरिकन जॉर्ज फ्लॉयड याला मिनियापोलीस मध्ये नकली नोटेने बिल दिले अशा तक्रारीवरून पोलिसांची कारवाई होताना जीवाला मुकावे लागले. याचा परिणाम असा झाला की अमेरिकेत सगळीकडे त्या विरूद्ध आवाज उठवला गेला. मोर्चे निघाले, हिंसक वळण लागले. वॉशिंग्टन डी.सी,अटलांटा, फिनिक्स,डेनवर, लॉस एंजिल्स, लास वेगास सगळीकडे त्याचे पडसाद उमटले. एखादा चुकीचा विचार मनुष्याच्या मनात रूजला की तो बाहेर निघणे फार कठीण जाते. म्हणून चांगले विचार समाजात रुजविणे हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य असते. वर्तमानात सध्या चांगले कशाला म्हणायचे हेच लोकांना आधी शिकवावे लागेल. असो .              

शिकागो क्लबमध्ये विवेकानंद यांनी लायन यांच्या मित्रांसमोर मत व्यक्त करताना म्हटले होते, “आजपर्यंत मला भेटलेल्या व्यक्तींमध्ये लायन हे ख्रिस्तांशी सर्वात अधिक साम्य असलेले आहेत, अशी माझी धारणा आहे”.

लायन यांची नात कॉर्नेलिया कोंगर यावेळी सहा वर्षांची होती. तिची विवेकानंदांची चांगली मैत्री जमली. निरागस आणि अजाण अशा  कॉर्नेलियाला स्वामीजी मोर,पोपट, वानर यांच्या गोष्टी सांगत. झाडे, फुले यांची मनोरंजक माहिती सांगत. विवेकानंद संध्याकाळी बाहेरून आले की लगेच मांडीवर जाऊन बसत मला गोष्ट सांगा म्हणून ति मागे लागे. यावेळी विवेकानंद वास्तविक तीशीचे होते, पण त्यांचे लहान मुलांशी वागण्याचे कौशल्य मात्र आजी आजोबांच्या वयातले असे. कार्नेलियाचे वडील तरुण वयातच स्वर्गवासी झाले होते. त्यामुळे तिच्या आईवर मोठा आघात झाला होता. अजूनही तो ताजा होता. त्यातून ती बाहेर आली नव्हती. घरात तिच्याशी वागता बोलताना विवेकानंद काळजी घेत. त्यांच्या व्याख्यांनांना ती जात असे. त्यातले नीट कळायला हवे म्हणून तिने पौर्वात्य तत्वज्ञानाचा परिचय करून घेतला. आणि पुढे स्वामी विवेकानंद यांचे ग्रंथ अभ्यासले.

एमिली लायन 
एमिली लायन यांचा स्वभाव वागणं बोलणं यामुळे त्यांना, त्या आपल्या आई भुवनेश्वरी देवी सारख्या वाटत. म्हणून ते त्यांना मदर म्हणत असत.एमिली यांनीही विवेकानंद यांना पुत्रवत प्रेम दिलं, तिथले  उच्चवर्गीय सामाजिक शिष्टाचार शिकविले. त्यांना आपल्या एखाद्या अज्ञाना बद्दल संकोच नाही वाटायचा. घरी आल्यावर ते ती गोष्ट समजून घ्यायचे. ज्ञानात भर घालायचे.

त्यांना बाहेर व्याख्यान दिल्यावर जे मानधन मिळत असे, ते पैसे ते आपल्या रुमालात बांधून आणत असत आणी एमिली लायन यांच्यासमोर ठेवत असत. जवळ जवळ सत्तर ऐंशी डॉलर असत.संन्यासी, त्यात पैसे बाळगायची एकतर सवयच नव्हती. मग एमिली यांना न मोजताच ते पैसे देऊन सांगत, “हे तुम्ही सांभाळा”. एव्हढा विश्वास. विवेकानंद कशासाठी पैसे जमवत आहेत हे लायन यांनाही माहिती होते.त्यांनी मग पैसे कसे सांभाळायचे हे त्यांना शिकविले. नाणी ओळखायची शिकविले. पैसे ठेवण्यासाठी त्यांनी तर बँकेत खातेच उघडून दिले.

मिसेस लायन स्त्रियांसाठी असलेल्या रुग्णालयाच्या अध्यक्षा होत्या. एकदा त्या विवेकानंदांना तिथे घेऊन गेल्या. विवेकानंद यांनी तिथल्या सर्व गोष्टींची बारीक सारिक माहिती घेतली. तिथल्या अधिकारी डॉक्टर्स, नर्सेस सर्वांशी बोलून कामाची पद्धत जाणून घेतली.तिथलं बालमृत्यूचं प्रमाण जाणून घेतलं. भोजन गृहातले आचारी आणि कपडे धुणारे कर्मचारी यांच्याशी ही संवाद साधला. अशाच पद्धतीने त्यांनी उत्सुकतेने शिकागो मधली वस्तु संग्रहालये, दालने, विद्यापीठे पाहिली. छोट्या कोर्नेलियाच्या  बालवाडीत सुद्धा जाऊन आले. आपल्या देशात स्त्रियांसाठी रुग्णालये नाहीत आणि मुलींसाठी शाळा नाहीत याची त्यांना खंत वाटली.

शिक्षण क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या कर्नल वेलॅन्ड यांनी त्यांच्या शिकागोत उघडलेल्या शाळेत विवेकानंद यांना भेट द्यायला बोलावले. लहान मुलांवर संस्कार व्हावेत असा त्यांचा उद्देश होता. मुलांसमोर विवेकानंद यांनी केलेले भाषण मुलांना फार आवडले. ते झाल्यावर बाहेर पडत असताना शाळेतल्या एकमेव भारतीय विद्यार्थ्याने, खाली वाकून स्वामीजींच्या अंगावरील वस्त्राला आदराने स्पर्श केला. ते पाहून शेजारील मुलीने विचारले तू हे काय केलेस? कोण आहेत हे पाहुणे?तो भारतीय विद्यार्थी म्हणाला, “हे  स्वामी विवेकानंद आहेत, भारतातून आले आहेत. फार मोठे संत आहेत”. त्या मुलीला आश्चर्य वाटलं, आता तर संत कुठेच नाहीत?”मुलगा म्हणाला, इथं तुमच्या देशात नाहीत. पण आमच्या भारतात आजही आहेत”.

 असे अनुभव स्वामीजी घेत होते . एक दिवस ते एमिली लायन यांना म्हणाले, आज मला एका सुंदर गोष्टीचा शोध लागला आहे. लायन यांनी विनोदाने विचारले की, कोण आहे ती? विवेकानंद हसत सुटले आणि म्हणाले, अहो ती कोणी मुलगी नाही.ती गोष्ट म्हणजे संघटना. कोणतेही काम पद्धतशिरपणे व्हावयास हवे असेल तर, अमेरिकेत आहेत तशा वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या स्वतंत्र संस्था हव्यात त्यांचे नियम हवेत, कामात शिस्त हवी. असे केले तर खर्‍या अर्थाने कोणतेही काम होऊ शकते आणि सतत चालू राहू शकते”. हे सर्व सत्य त्यांच्या मनात आल होतं आता पर्यन्त केलेल्या निरीक्षणातून. इथून पुढे त्यांची या विचारांची पकड घट्ट झाली. आता त्यावर चिंतन पण सुरू झाले.त्यातूनच निर्माण झाली ती आपल्या सर्व गुरुबंधूंना एकत्र बांधून ठेवेल अशी संस्था उभी करण्याचे स्वप्न. याचा संबंध आपल्या देशातील धार्मिक आणि सामाजिक परिस्थितिशी घालून एक संस्था मूर्तरूपात आणावी अशी संकल्पना मनात रूजली. इथे लायन यांच्याकडे स्वामीजी जवळ जवळ दीड ते दोन महीने राहिले, या काळात त्यांनी तिथल्या सुंदर इमारती व वास्तुसौंदर्य, तिथलं संगीत, सुखसोयी,यांच्याकडे अभ्यासपूर्ण बघितले.त्यांनी 1898 मध्ये पत्रात मेरी यांना लिहिलं की,तुमचे घर आणि तुम्ही सर्व जणांनी मला एव्हढे प्रेम दिले आहे की, आपले पूर्वजन्मीचे काहीतरी नाते असले पाहिजे.  

श्री हेल 

                 

याच प्रमाणे परिषदेला आल्यानंतर सर्वप्रथम पत्ता शोधत शोधत कंटाळून स्वामीजी रस्त्यावर बसले असताना मिसेस बेली हेल यांनी त्यांना घरी नेले होते, तेही कुटुंब विवेकानंदांना घरच्यासारखेच मिळाले होते. विवेकानंद यांच्या आयुष्याच्या अखेरीस पर्यन्त त्यांचा हेल कुटुंबीयांशी संपर्क होता. पुढे पुढे कुठूनही ते प्रवास करून आले की सरळ हेल यांच्याकडेच येत. हेल यांच्या मेरी आणि हॅरिएट, जॉर्ज हेल यांच्या बहिणीच्या इजाबेल आणि मॅक किंडले यांन ते बहिणी मानत. तर मिसेस हेल यांना मदर म्हणत. सगळे जण स्वामीजींची चांगली व्यवस्था ठेवत आणि काळजी घेत असत. स्वामीजींना इथे मोकळेपणा वाटत असे. स्वास्थ्य लाभत असे.

हेंरीएटा ,मेरी हेल, इसाबेल, हॅररिएट

परिषद संपल्यानंतर विवेकानंद यांनी प्रा.राईट यांनाही पत्रे लिहिली आणि त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. राईट यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून आपल्याला पत्र लिहायला वेळ पुरेसा नव्हता आणि केवळ औपचारिक पत्र लिहू नये असे वाटल्याचे प्रांजळ पणे सांगितले. तसेच इथल्या परिषदेत केवळ राईट यांच्यामुळे आणि परमेश्वरमुळेच शक्य झाले. हे सर्व श्रेय स्वामीजींनी राईट यांना दिले आहे. हे लिहिताना स्वामीजींनी आता आपण पाश्चात्य जीवनाशी जुळवून घेण्याचे ठरविले आहे. असेही लिहिले आहे. कारण कपडे आणि अन्न पदार्थ यात त्यांना जुळवून घेणं क्रमप्राप्त होतं. आणि नंतर ते तिथे सन्यासी वेष सोडून पाश्चात्य वेषात दिसतात. हा बदल त्यांनी केला. बहिरंगाला अखेर काहीही महत्व नाही असे ते आधीही वारंवार सांगत असत.

अमेरिकेतली एकूण संस्कृती, आचार-विचार, तिथली परिस्थिति आणि आपला उद्देश याचा ताळमेळ स्वामीजींनी घातला. संन्याशाचा वेष जाऊन कोट पॅंट घातले तरी आपल्या मनात जे विचार आहेत जे उद्देश आहेत ते तसेच कायम असणं महत्वाचं आहे.

भारतात उद्योगधंदे उभे करण्यासाठी अमेरिकन उद्योगपतींचे मन वळवावे, म्हणजे भारतातल्या लोकांना तंत्र कळेल आणि गरीब जनतेला दोन वेळच अन्न मिळेल असं त्यांना वाटलं होतं, शिवाय देणग्या गोळा  कराव्यात असाही त्यांनी विचार केला होता पण त्यातली अव्यवहार्यता त्यांच्या लक्षात आल्यावर हे विचार त्यांनी मनातून काढून टाकले. नुसती देणगी मागितल्याने हळूहळू त्यात लाचारीचा भाव येतो आणि आपण भिक्षेकरी आहोत असे वाटू लागते असा विचार त्यांनी केला.पूर्वेकडून अनेक लोक जसे योजना घेऊन अमेरिकेत येतात आणि आवश्यकते पेक्षा जास्त निधि घेऊन जातात तसेच आपणही गणले जाऊ. यात स्वाभिमान राहणार नाही. मग यापेक्षा वेगळा विचार त्यांच्या मनात आला. त्यामुळे आपल्याला व्याख्यानाद्वारे जो पैसा मिळेल तेव्हढाच आपण घ्यायचा असे त्यांनी ठरवले. हाच मार्ग बरा आहे असे त्यांनी राईट आणि मिसेस वुड्स यांनाही पत्रातून कळवला. परिषद होऊन महिनाच होत होता तेंव्हाच हा निश्चय पक्का केला.

परिषद संपल्यावर विवेकानंद अनेक ठिकाणी राहिले. जिथे जिथे राहत आणि ज्यांना भेटत त्यांचा दृष्टीकोण आमुलाग्र बदलत असे. या काळातल्या आठवणी त्या त्या व्यक्तींनी लिहून ठेवल्या आहेत. काही आठवणी स्वामीजींनी स्वत: सांगितल्या आहेत. अमेरिका आणि युरोप खंडात अत्यंत लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली रंगभूमीवरची गायिका मॅडम एम्मा कॅल्व्हे हिची विवेकानंद यांची भेट तीच आयुष्य बदलून टाकणारी ठरली.उद्विग्न अवस्थेत ती विवेकानंद यांना भेटली आणि........क्रमश:

© डॉ.नयना कासखेडीकर   

No comments:

Post a Comment