Tuesday, 8 September 2020

विचार–पुष्प,भाग-४६

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा,प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका 

विचार–पुष्प,भाग-४६ 


                                    सर्व धर्म परिषदेच्या पूर्व संध्येला

    प्रा. जॉन हेनरी राइट स्वामीजींना एका निर्णायक क्षणी साक्षात परमेश्वर म्हणून भेटले. सर्व धर्म परिषदेच्या ज्या ज्या अडचणी होत्या त्या सर्व सोडवण्यासाठी ते पुढे सरसावले. या परिषदेच्या व्यवस्थापनेतील बरेच प्रमुख कार्यकर्ते राइट यांच्या ओळखीचे होते. प्रा.राइट यांनी प्रतिनिधी निवड समितीचे अध्यक्ष, निवास व्यवस्था पहाणारे प्रमुख यांना पत्रे पाठवली. त्यात त्यांनी लिहिलं, “मला असे आढळून आले आहे की, अमेरिकेतील आपल्या सर्वांचे ज्ञान एकत्रित केले, तरी त्याहून त्या तरुण संन्याशाची विद्वत्ता अधिक भरेल”. असे प्रशस्तिपत्रच जणू त्यांनी पुढे पाठवले होते. त्या बरोबरच स्वामीजींच्या शिकागो पर्यन्त ची प्रवास व्यवस्था केली. कारण त्यांना स्वामीजींची आर्थिक अडचण माहिती होती. शिवाय बरोबर काही पैसे पण दिले आणि संबंधित पदाधिकार्‍यांना परिचय पत्र पण दिली. अशा बहुतेक सर्व अडचणी त्यांनी दूर केल्या होत्या. पैसे मदत म्हणून घेताना स्वामीजींना फार संकोच वाटत होता. हे पाहून, मिसेस राइट यांनी आईच्या पत्रात वर्णन केले ते असे, आपल्याकडचे मिशनरी जसे व्रतस्थ जीवन घालवतात तसेच जवळ जवळ भारतातील सन्याशांचे पण असते. पण एक फरक आहे तो महत्वाचा आहे . की भारतातले संन्यासी केवळ निर्धन असतात. दारिद्र्य हा शब्द फक्त वापरण्यापुरता नाही तर अक्षरश: तसे जगतात, आपल्यासमोर जे येईल त्यावर ते गुजराण करतात.

                   
  आता विवेकानंद निघाले सालेम इथं. तारीख २८ ऑगस्ट १८९३ . विवेकानंदांना मिसेस सॅनबोर्न यांच्या घरी भेटलेल्या मिसेस तन्नत वुड्स यांच्या घरी. त्याही प्राध्यापक होत्या. त्यांनी पुस्तके लिहिली होती. त्यांचा काही संस्थांशी संबंध होता. विमेन्स नॅशनल प्रेस असोसिएशन च्या उपाध्यक्षा होत्या. स्त्रीयांचे प्रश्न आणि अधिकार यावर त्या काम करत. त्यांची दी थॉट अँड वर्क्स क्लब ही संस्था होती. या संस्थेत त्यांनी विवेकानंदांची दोन व्याख्याने आयोजित केली. विषय होता भारतीयांचा धर्म आणि भारताची आजची परिस्थिती

       या व्याख्यानला खूप लोक उपस्थित होते. विषय धर्माचा असल्याने अनेक धर्मोपदेशक होतेच. मिशनरी होते. त्यामुळे अनेक खटके उडाले, वादविवाद झाले, प्र्श्नोत्तरे झडली. मिशनर्यांनी आपल्या भारतातल्या कामाचा डांगोरा अमेरिकेत पिटला होताच. त्यामुळे तिथे भडकपणे रंगवलेला हिंदू धर्माचा भाग आणि विपरीत देश असं चित्र उमटल होतं. भारत हा अतिशय मागासलेला आणि रानटी देश आहे आणि तिथे मिशनर्‍यांच्या कामामुळे थोडी फार सुधारणा होत आहे असा तिथल्या लोकांचा समज झाला होता. पण आता विवेकानंदांच्या या व्याख्यानामुळे त्यांच्यातले भारताबद्दलचे गैरसमज दूर झाले. नाहीतरी एखाद्या गोष्टीची दुसरी बाजू समजत नाही तो पर्यन्त गैरसमज मनात ठाण मांडून असतात. त्याप्रमाणेच आपले मत तयार होत असते.    

      मिशनर्‍यांच्या कामाला महत्व न दिल्यामुळे त्यांनी स्वामीजींना चिडून विरोध केला होता, भारतातील स्त्रियांची स्थिति, स्त्रियांची बुरखा पद्धती, तर जगन्नाथाच्या रथाखाली आपले शरीर झोकून देण्याची अघोरी प्रथा यावर खूप प्रश्न विचारले गेले. विवेकानंदांनी योग्य ती उत्तरे दिली.आज सुद्धा काही परंपरा भारतात सुरू आहेत. अशा ज्या गोष्टी आपल्या देशात होतात त्या माहिती आहेत आणि त्याला स्वामीजींचा विरोध पण आहे. अशा गोष्टींचं समर्थन स्वामीजी करूच शकणार नव्हते म्हणून त्यांनी या परंपरा कशा निर्माण झाल्या त्या कशा हिंदू धर्मात महत्वाचा भाग नाहीत असे विचार मांडले. उत्तरे दिली. तर, आपला देश रानटी आणि असंस्कृत देश नाही हे सांगण्यावर भर दिला. यावरून परदेशात एकाकी पणे अशा सर्वांना तोंड देणे किती अवघड होते तरी ते स्वामीजींनी समर्थपणे पेललेले दिसते.

तन्नत वुड्स

    वुड्स यांनी या दोन व्याख्यानांनंतर छोट्या मुलांसाठी आपल्या घरासमोरच्या बागेतच एक व्याख्यान ठेवलं. यावेळी विवेकानंदांनी भारतातील मुले, त्यांचे खेळ, तेथील शाळा, शिकवण्याची पद्धत यांची माहिती मुलांना दिली. याला खूप छान प्रतिसाद मिळाला. त्याची वृत्तपत्रात प्रसिद्धी पण झाली. वुड्स यांच्या घरी स्वामीजी एक आठवडा राहिले. त्यांच्या अगत्यशील वागण्याने स्वामीजींना आनंद झाला होता. जेंव्हा सुरूवातीला आपण निराधार होतो, त्या काळात ज्यांनी आपल्याला प्रेमाची वागणूक दिली,त्या देशात त्यांनी मला घरच्या सारखे वागवले त्यांना मी विसरुच शकत नाही असे म्हणून वर्षभराने ते पुन्हा भेटायला गेले तेंव्हा, निघताना त्यांनी आपली आठवण म्हणून वुड्स यांना आपल्या वस्तु, दंड, धाबळी, ट्रंक भेट म्हणून दिल्या. वुड्स कुटुंबियांनी त्या जपून ठेवल्या होत्या. १९०० साली ब्रिटिश म्युझियमने चांगली किंमत देऊ केली आणि त्या वस्तु मागितल्या असता, वुड्स यांचा मुलगा प्रिन्स याने त्याला नकार दिला. कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचं हे गुण अमेरिकेतून घेण्यासारखे आहेत.

  सर्वधर्म परिषदेला उपस्थित राहण्यासाठी दरवाजा उघडून देणारे आणि मार्गदर्शन करणारे प्रा.राइट यांना तर स्वामीजी विसरुच शकत नाहीत. प्रा. राइट यांना शतश: वंदन!

चार सप्टेंबर, स्वामीजी सालेमहून सॅराटोगा स्प्रिंग्स इथे गेले. फ्रॅंकलिन सॅनबोर्न यांनी निमंत्रण दिले होते. इथे अमेरिकन सोशल सायन्स असोसिएशन ची परिषद होणार होती, त्यात विवेकानंदांना बोलायचे होते, ही संस्था वेगवेगळ्या विषयातील संशोधक आणि प्राध्यापक यांची होती. पण स्वामीजींचा सन्मान म्हणून बोलवले होते. यानंतर डॉक्टर हॅमिल्टन यांच्या घरी दोन व्याख्याने झाली. सॅराटोगाला एकूण पाच व्याख्याने झाली .पाचसहा दिवसात पाच व्याख्याने. स्वामीजींची सकारात्मक घोडदौड चालू होती.

या काळात स्वामीजीच्या अनेकांशी भेटी झाल्या, परिचय झाले, अनेकांकडे त्यांना राहता आले. जनजीवन त्यांना पाहता आले. धर्मोपदेशकांचा विरोध कळला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इथल्या लोकांना कोणते विषय आवडतात, कोणत्या विचारांचा श्रोत्यांवर चांगला व प्रतिकूल परिणाम होतो, आपल्या बोलण्याची पद्धत कशी ठेवायला पाहिजे, काय टाळले पाहिजे, याची जाणीव या अनुभावातून त्यांना झाली. याचा उपयोग त्यांना परिषदेत बोलण्यासाठी होणार होता.

     अनेक अडचणींवर मात करून, आता ९ सप्टेंबरला विवेकानंद सॅराटोगाहून मोठ्या आत्मविश्वासाने, निश्चिंत आणि प्रसन्न मनाने शिकागोला निघाले. शिकागो चे स्थानक ओळखीचे झाले होते. स्टेशनवर उतरल्यावर सर्वधर्म परिषदेच्या कार्यालयाचा पत्ता ज्या कागदावर लिहून घेतला होता तो कागदच सापडेना. इकडे तिकडे चौकशी केली, उपयोग नाही झाला.काही मार्ग दिसेना. रात्र झाली. शेवटी समोरच उभ्या असलेल्या मालगाडीत एका डब्यात आश्रय घेतला. सकाळी उठून शिणलेले  स्वामीजी कार्यालयाचा पत्ता विचारत घरोघर फिरले,कोणी  लक्ष दिलं नाही, गेट बाहेर काढलं, दारं उघडली नाहीत. स्त्रियांनी घाबरून दरवाजे बंद करून घेतले, जवळ जवळ चार किलोमीटर ते फिरले पण काही मार्ग निघाला नाही.वर्णभेदाचा असाही अनुभव त्यांनी घेतला. शेवटी थकून रस्त्याच्या कडेला हताश होऊन स्वस्थ बसले. त्याच वेळी समोर रस्त्यापलीकडे असलेला एका घरचा दरवाजा उघडला आणि त्यातून एक प्रौढ स्त्री बाहेर आली. रस्ता ओलांडून ती स्वामीजींजवळ आली आणि विचारलं, “आपण सर्वधर्म परिषदेसाठी प्रतींनिधी म्हणून आला आहात का?” अहो आश्चर्यम !स्वामीजीन कडून होकार मिळाला आणि त्या स्वामीजींना घेऊन समोर घरात गेल्या. एका खोलीत त्यांची व्यवस्था करून दिली. स्टेशनवरचं सामान मागवून घेतलं.चहा नाश्ता झाल्यावर त्या स्वामीजींना परिषदेच्या कार्यालयात घेऊन गेल्या.

   
ही प्रौढ स्त्री म्हणजे मिसेस जॉर्ज डब्ल्यू हेल. त्यांना घराच्या खिडकीतून समोर स्वामीजी बसलेले दिसले होते. हे परिषदेसाठी आले असावेत असे त्यांना वाटले. सकाळपासून अनेक दारं स्त्रियांनीच बंद केली होती पण स्वामीजींना आपण होऊन दार एका वात्सल्यपूर्ण स्त्रीनेच उघडलं होतं. अमेरिकेत अशा अनेक स्त्रिया त्यांना भेटल्या. पण ज्या क्षणी मिसेस हेल यांनी माझ्या घरी चला असे म्हटले होते त्या क्षणापासून स्वामीजींन कोणतीच व्यक्तीगत आणि व्यावहारिक अडचण आली नाही. अमेरिकेतल्या हेल कुटुंबाशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबध निर्माण झाले ते कायमचेच.

शेवटी स्वामीजी सर्व धर्म परिषदेच्या कार्यालयात पोहोचले.त्यांची इतर पौर्वात्य प्रतिनिधींच्या बरोबर तात्पुरती व्यवस्था केली होती. त्यानंतर , २६२,मिशिगन अव्हेन्यू इथे राहणार्‍या श्री जॉन डब्ल्यू. लायन यांच्याकडे निवासाची सोय केली होती, स्वामी विवेकानंद, सर्व धर्म परिषदेचे एक कार्यवाह, डॉ.जॉन एच.बॅरोज यांच्या खोलीत बसले होते ही  ११ सप्टेंबरच्या वृत्तपत्रात बातमी झाली, ती परिषदेचा अधिकृत प्रतीनिधी म्हणून .

हिंदू धर्माचा प्रतिनिधी. सौम्य मुद्रा, तेजस्वी चेहरा, बुद्धिमत्तेचा निदर्शक, भगव्या रंगाचा झगा, डोक्याला केशरी फेटा, असा वेष परिधान केलेल्या स्वामी विवेकानंदांना जगाच्या ऐतिहासिक धार्मिक परिषदेला सहभागी होण्याची सुवर्ण संधी मिळाली होती. उद्या एक सुंदर अपूर्व दिवस उगवणार होता.  

  © डॉ.नयना कासखेडीकर   

ही मालिका ऑडिओ बुक स्वरुपात पण उपलब्ध आहे ,ऐकण्यासाठी You Tube चॅनेल च्या

playlist link

https://www.youtube.com/playlist?list=PLEkZc0XQx78jmXuRkOtsWN-D1Z2FBgOGk                

या लिंकवर जाऊन या भागाचा यू ट्यूब व्हिडिओ बघावा

 

No comments:

Post a Comment