Wednesday, 16 September 2020

विचार–पुष्प, भाग –५०

                                                          उत्तरार्ध

  स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना- घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका

                       विचार–पुष्प, भाग –५०


                            स्वामीजी आणि मॅडम कॅल्व्हे  

     अमेरिका आणि युरोप खंडात प्रचंड लोकप्रियता मिळवलेली रंगभूमीवरील गायिका मॅडम एम्मा कॅल्व्हे एका मेट्रोपोलियन ऑपेरा कंपनीबरोबर युरोपातून अमेरिकेत आलेली. तिची रंगभूमीवरची भूमिका, गायन सर्व काही तिनं गाजवलेले. त्यामुळे अमाप संपत्ति आणि प्रचंड लोकप्रियता, प्रसिद्धी मिळाली तरी सुद्धा ती मात्र मनातून पुरती दु:खी होती. खचलेली होती. पैसा आणि प्रसिद्धीमुळेच की काय, कला क्षेत्रात अशी परिस्थिति उद्भवते. पुरुषांच्या दृष्टीकोणातून स्त्री ही भोगवादीच वस्तु असते याचे तिने अनुभव घेतले. उत्कट आणि निरपेक्ष प्रेम तिला मिळत नव्हतं. दोन जणांशी ब्रेक अप झालं. त्यामुळे ती उध्वस्त झाली होती. ही दुसर्‍यांदा घडलेली घटना ताजी असतानाच ती आपल्या लहान मुलीला घेऊन अमेरिकेत आली होती. रंगभूमीची सेवा मात्र चालूच होती . तिच्या जवळच्या काहींना तिनं यातून बाहेर पडावं असा वाटत होतं. शिकागोमध्ये ज्या ऑडिटोरीयममध्ये तिचे कार्यक्रम होत होते, त्या ओपेरा हाऊसचे व्यवस्थापक मिलवर्ड अँडम्स यांच्याकडे त्यावेळी विवेकानंद राहत होते आणि वेदांताचे वर्ग घेत होते.अँडम्स यांनी कॅल्व्हेला, तू विवेकानंद यांना एकदा भेट” म्हणून सांगितलं.

अनेक वेळा सांगूनही तिच्या मनात नव्हते. मैत्रिणीने सुद्धा हेच सांगितले पण तिचेही ऐकले नाही. तिच्या मनात आत्महत्येचे विचार होते. ती या विचाराने बाहेर पडत असे .पण तिचे पाय आपोआप विवेकानंद राहत होते तिकडे  निवासस्थानाकडे वळत आणि आपण एका भयंकर स्वप्नातून जागे झाल्यासारखे वाटे. मग पुन्हा घरी येई. असे चार पाच वेळा झाले. शेवटी एका उद्विग्न क्षणी ती विवेकानंद यांना भेटायला गेली. नोकराने घराचे दार उघडले, कॅल्व्हे  बाहेर खुर्चीवर बसून राहिली. आपल्याच विचारात. थोड्या वेळाने आतून आवाज आला, “ये, मुली,ये ! कोणतीही भीती बाळगू नकोस”. कॅल्व्हे आत गेली आणि समोर विवेकानंद बसले होते त्यांच्याकडे बघत स्तब्ध झाली. कारण ध्यानअवस्थेत विवेकानंद बसले होते. त्यांची भगवी वस्त्रे, खाली नजर अशा अवस्थेतच ते तिच्याकडे न पाहता म्हणाले, “मुली किती विषण्ण आणि मन निराश करणारं, काळवंडून टाकणारं वातावरण तुझ्या भोवती आहे. मन शांत कर. ते फार आवश्यक आहे”. ती कोण? नाव काय? काहीही माहिती नसताना, तिच्याकडे न बघताच यांनी कशी आपल्या मनाची अवस्था ओळखली याचं तिला फार आश्चर्य वाटलं.

आपली परिस्थिति आणि समस्या केवळ आपल्यालाच माहिती आहेत तरीही हे एका अलिप्त आणि समाधान भावनेने आपल्याशी बोलत आहेत. यांना काय घडले ते कसं कळल असेल ? असं वाटून तिच्या लक्षात आलं की हे काहीतरी अद्भुत आहेत. ती विवेकानंद यांना म्हणाली, हे सारं तुम्हाला कसं माहिती? तुम्हाला कोणी बोललं आहे का ? स्वामीजी म्हणाले, “माझ्याजवळ कोणी काही बोलले नाही. तशी काही जरूर आहे असं मला वाटत नाही. एखादं उघडं पुस्तक वाचावं तसं तुझं मन मला स्पष्ट दिसतं आहे. तुला सारं काही विसरून गेलं पाहिजे. पुन्हा एकदा प्रसन्न आणि आनंदी वृत्ती धारण कर.तब्येत सुधार,दु:खाचा सतत विचार करत बसू नको. भावनांना कोणते तरी रूप देऊन व्यक्त हो. ही गोष्ट आध्यात्मिक दृष्टीने आवश्यक आहे. कलेला तर आवश्यक आहेच. 

                            

या शब्दांचा आणि स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाचा काल्व्हे वर सखोल परिणाम झाला. या प्रभावामुळे तर आपल्या डोक्याला ताप देणार्‍या सार्‍या कटकटीच्या  गोष्टी डोक्यातून काढून टाकून, त्याऐवजी स्वत:चे सुस्पष्ट व शांतिप्रद विचार मनात निर्माण केले होते असं काल्व्हे ला वाटलं.स्वामीजींच्या या समर्थशाली विचाराने तिचे मन पुन्हा उल्हसित झाले. आणि ती तिथून बाहेर पडली. हा काही संमोहन विद्येचा परिणाम नव्हता.विवेकानंदांच्या मनाची शुद्धता, त्यांचे सामर्थ्यशाली पवित्र आचरण यामुळे हा परिणाम झालेला होता. मन एकदम निश्चिंत झाले होते.

ही भेट होण्या आधी एक दु:खद प्रसंग घडला होता. तिचा कार्मेंनचा  प्रयोग चालू होता.तिचा अभिनय आणि गाणं ही उत्तम सादर होत होतं. पण मनातून ती वैफल्य ग्रस्त होती. आणि आता पुढच्या अंकात आपण काम करू शकणार नाहीत असं तिच्या मनाने घेतलं. अशाही अवस्थेत ती मनाचा निग्रह करून रंगभूमीवर गेली. तो अंक ही उत्तम झाला, पण दुसर्‍याच क्षणी आपण काम करू शकणार नाही मला बरे वाटत नाही असे सांगून टाकले.आणि पुढचा अंक होऊ शकत नाही असे दिलगिरी पूर्वक सांगा म्हणून सुचविले. परंतु प्रेक्षकांनी तर तिचे काम डोक्यावर घेतले होते.त्यामुळे व्यवस्थापकांनी तिला हर प्रकारे समजाऊन सांगत रंगभूमीवर जवळ जवळ ढकललंच. मग काय काल्व्हे कलेशी निष्ठावान होती तिने पाय ठेवतच सर्व बाजूला सारून आपली भूमिका सादर करू लागली.तिच्या आतल्या वैफल्याच्या भावनांमुळे तिच्या आवाजात आर्तता आणि उत्कटता होती.या वेळचे गाणे तर अत्यंत सुंदर झाले.श्रोत्यांनी प्रचंड दाद दिली होती.पण ती ते ऐकायला अजिबात उत्सुक नव्हती.तडक रंगमंचावरून आत गेली आणि कोचावर आडवी झाली आणि एक आश्चर्य वाटले की बाहेर एव्हढे लोक उभे आहेत मग या क्षणाला सारे निशब्द कसे?असा संशय येऊन ती दाराजवळ आली.तो समोर व्यवस्थापक आणि लोक गोळा होऊन बघताहेत.धीर करून व्यवस्थापकांनी सांगितलं,की “प्रयोग चालू असताना तुमच्या मुलीचा अपघाताने भाजून मृत्यू झाला आहे”. भयंकर धक्का होता तिला. या घटनेनंतर ती पार कोसळून गेली असणार . यातून बाहेर पडण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांमुळे तिची व  विवेकानंदांची भेट झाली होती त्यानंतर तीचं आयुष्य पुर्णपणे बदललं.

स्वामीजींच्या संपर्कात आल्यानंतर तिला अनेक विषय नव्याने कळले होते. त्यांच्याशी ती पटलेल्या न पटलेल्या गोष्टी व विषयांची चर्चा करू लागली होती. त्यांचे विचार ऐकून घेत होती. एकदा अमरत्व या विषयावर चर्चा सुरू होती.काल्व्हे या बद्दल म्हणाली, “मला ती कल्पनाच पटत नाही. मी माझ्या व्यक्तीत्वाला चिकटून राहणार.मग ते कितीही क्षुल्लक असेना. मला शाश्वत ऐक्यात मिसळून जाण्याची इच्छा नाही. तो नुसता विचारही मला भयंकर वाटतो. त्यावर स्वामीजींनी उत्तर दिले. “एके दिवशी अथांग महासागरात पाण्याचा एक थेंब पडला. स्वत:ची ही स्थिति पाहून जलबिंदू रडत तक्रार करू लागला.जशी तुम्ही आता करताहात , महासागर जळबिंदुला हसला. त्याने जलबिंदुला विचारले, की, का रडतोस बाबा?तुझ्या रडण्याचं कारण मला नाही समजत. तू जेंव्हा मला येऊन मिळालास तेंव्हा तू आपल्या सर्व बंधुभागिनींना येऊन मिळालास. त्या इतर जलबिंदूनीच मी बनलो आहे.त्यामुळे तू ही साक्षात महासागररूप झालास. मला सोडून जाण्याची जर तुझी इच्छा असेल तर, एखाद्या सूर्यकिरणावर स्वार हो आणि एखाद्या ढगात जाऊन राहा की झाले. तेथून तू पुन्हा पिपासार्त पृथ्वीला आशीर्वादासारखा व वरासारखा होऊन एखाद्या जलबिन्दूच्या रूपाने खाली येऊ शकतोस.” 

स्वामीजी रूपकांच्या भाषेत बोलत असत असं काल्व्हे म्हणते. ती पुढे स्वामीजिंबरोबर, त्यांच्या स्नेही आणि शिष्यांसोबत तुर्कस्तान, इजिप्त, ग्रीस मध्ये सहलीला गेली होती.त्यांच्या बरोबर फादर लॉयसन,त्त्यांची पत्नी तसेच मिसेस मॅक्लाउड सहलीला होते. ती म्हणते या सहलीत, विज्ञान, तत्वज्ञान आणि इतिहास कोणतीच गुपिते स्वामीजिंपासून लपून राहिली नव्हती. त्यामुळे त्यांची जी विद्वत्तापूर्ण आणि ज्ञानपूर्ण चर्चा चाले ती मी लक्ष देऊन ऐकत असे. वादविवादात मी कधी भाग घेत नसे. पण विद्वान नामांकित असलेले फादर लॉयसन यांच्या बरोबर स्वामीजींची सर्व प्रकारची चर्चा चाले. धर्मासंबधी  चाललेल्या चर्चेत फादर यांना एखाद्या चर्च कौन्सिल ची तारीख खात्रीशीरपणे सांगता येत नसे, पण स्वामीजींना सांगता येई. स्वामीजी एखाद्या धार्मिक ग्रंथातील अवतरण सुद्धा अगदी बिनचूक सांगायचे .   

ग्रीसमध्ये इल्युसिसला भेट दिली तेंव्हा स्वामीजींनी त्याची सर्व रहस्ये समजाऊन सांगितली. तिथल्या सर्व मंदिरातून हिंडवले, जुन्या प्रार्थनांचे मंत्र हुबेहूब प्राचीन पद्धतीने म्हणून दाखवले. इजिप्त मधेही असाच तल्लिंनतेने ऐकण्याचा अनुभव सर्वांनी घेतला. सर्वजण शांतपणे मंत्रमुग्ध होऊन ऐकत असत, एकदा तर, इतके की भान न राहिल्यामुळे तिथल्या स्टेशनवरील प्रतिक्षालयात स्वामीजींनी श्रोत्यांना आपल्या संभाषणाने खिळवून ठेवले होते. तेंव्हा गाडी निघून गेली तरी भान नव्हते. असे अनेक वेळा व्हायचे.

कॅल्व्हे या प्रवासातल्या आपल्या स्वामीजींच्या आठवणी सांगताना म्हणतात,  “कैरो मधला प्रसंग – कैरो मध्ये बोलता बोलता सर्वजण रस्ता चुकले आणि एका अत्यंत घाणेरड्या ओंगळ वाण्या रस्त्यावर येऊन पोहोचलो. आजूबाजूच्या घरांच्या खिडकीतून स्त्रिया स्वताचं अंग प्रदर्शन करीत होत्या. स्वामीजींचे याकडे लक्षच नव्हते. पण तेव्हाढ्यात बाहेर बसलेल्या, गलका करणार्‍या स्त्रिया स्वामीजींना खुणेने आपल्याकडे बोलावू लागल्या. इथून चटकन बाहेर पडावे म्हणून प्रयत्न केला पण  स्वामीजी अचानक त्या स्त्रियांपुढे जाऊन उभे राहिले.म्हणले, “ बिचार्‍या मुली, दुर्दैवी जीव, त्यांनी त्यांचे देवपण त्यांच्या सौंदर्यात निविष्ट केले आहे. पहा त्यांची आता काय दशा झाली आहे ती”. असे बोलून स्वामीजींच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले. त्या सर्व अत्रीय एकदम गप्प झाल्या आणि संकोचल्या. एकीने पुढे वाकून स्वामीजींच्या कफनीच्या टोकाचे चुंबन घेतले.आणि स्पॅनिश भाषेत देवमाणूस! देवमाणूस! असे म्हणू लागल्या, दुसरीने हात तोंडावर ठेऊन चेहरा लपविला”. अशा या स्वामीजींबरोबर च्या आठवणी कॅल्व्हेच्या  शेवटच्या आठवणी ठरल्या होत्या. कारण यानंतर स्वामीजी थोड्याच दिवसात भारतात निघून गेले. आणि वर्षभरातच त्यांनी महासमाधी घेतल्याचे कळले.कॅल्व्हे यांनी म्हटलंय, “ एकही पृष्ठ नष्ट न करता त्यांनी आपला जीवनग्रंथ लिहिला”. त्यानंतर काही वर्षानी काल्व्हे भारतात आली तेंव्हा, अखेरचा श्वास जिथे घेतला त्या स्वामीजींच्या बेलूर मठाला तिने भेट दिली. त्यांच्या आईला भुवनेश्वरी देवी यांना भेटली. या माऊलीनेच कॅल्व्हेला या मठात नेले होते .                        

काल्व्हे यांनी आपल्या आत्मचरित्रात हे सर्व लिहून ठेवले आहे. कॅल्व्हे जानेवारी १९४२ ला  वयाच्या ८३ व्या वर्षी निधन पावली. तिच्या उर्वरित आयुष्यात स्वामीजींमुळे खूप मोठा बदल झाला होता. योग्य आध्यात्मिक विचारांची समज आली होती. आत्महत्येपासून परावृत्त करून एक चांगले जीवन जगण्याचा मार्ग स्वामीजींनी तिला दाखवला होता. असे भारताबाहेर अनेक जण स्वामीजींच्या सहवासात आले त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला. काहींनी त्यांना रामकृष्ण संघाच्या कामात मदत केली, काही स्वामीजींचे शिष्य झाले.

भारताबाहेरील लोकांना एका भारतीय माणसानेच योग्य दिशा दाखवली होती, आज भारतातच रंगभूमी  आणि चित्रपट क्षेत्रात प्रसिद्धी आणि जीवघेणी स्पर्धा आणि कोटीच्या कोटी पैशांची उड्डाणे आणि त्यामुळे तरुण कलाकारांची, आयुष्याची झालेली वाताहत, कुटुंबाचं उध्वस्तपण हे बघितलं की वाटत यावर अंमल ठेवणारी व्यवस्थाच नाही ? जिथे विवेकानंद यांच्या रूपात पाश्चिमात्य देशात लोकांना मार्गदर्शन मिळत होतं. त्याच विवेकानंद यांच्या भारतात आज काय स्थिति आहे? राजकारण, प्रशासन किंवा कुठल्याही व्यवस्थेत भ्रष्टपणे काम करणारी माणसे/व्यक्ती लहानपणा पासून कशी घडली आहेत? कोणाच्या संगतीत घडली आहेत? आई वडिलांनी काय शिकविले आहे, काय संस्कार केले आहेत? हे अत्यंत महत्वाचे ठरते. कारण नरेंद्रला घडविणारे त्याचे पालक भुवनेश्वरी देवी, विश्वनाथ बाबू आणि गुरु रामकृष्ण परमहंस होते .          

    © डॉ.नयना कासखेडीकर  

----------------------------------------



1 comment: