वसुंधरा दिवस
आज जागतिक ‘Earth Day’ म्हणजेच ‘वसुंधरा दिवस’
समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले ।
विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पाद: स्पर्शं क्षमस्वमे ॥
इंडोनेशिया ची पृथ्वी देवता |
धरतीमाता आपली पोषणकर्ती आहे असे
मानले जाते आणि ते खरंच आहे. पृथ्वी मानवाचे निवासस्थान आहे. मनुष्याच्या विविध
गरजा भागवण्यासाठी लागणार्या सर्व वस्तु त्याला पृथ्वी मधूनच मिळतात. साधं अन्न, वस्त्र, निवारा या मूळ गरजासुद्धा पृथ्वीपासून मिळणार्या द्रव्य/ वस्तूंपासूनच
मिळत असतात. ही द्रव्य जमिनीतून महासागरातून
आणि वातावरणातून मनुष्याला मिळत असतात. गोडे पाणी, शेतजमिनी, खनिजपदार्थांचे साठे, प्राणिसृष्टी, जंगले आणि कुरणे यापासून औषधे ते पोलादापर्यंतच्या सर्व वस्तु बनवता
येतात. जमिनीवरील या साधनसंपत्तीप्रमाणे सागरी संपत्तीचा उपयोग आणि वातावरणातून
मिळणा-या प्राणवायू (ऑक्सीजन), नत्रवायू (नायट्रोजन) यांचाही
उपयोग होत असतो. मानवाला निसर्गाकडून मिळणारी ही साधनसंपत्ती आहे. सर्व जीवनोपयोगी
वस्तु पृथ्वीपासूनच मिळत असल्याने कृतज्ञतेपोटीच प्राचीन काळापासून पृथ्वीची
प्रार्थना केली जाते. म्हणूनच शांखायन अरण्यकात पृथ्वीला ‘वसुमती’ म्हटलेलं आहे. म्हणजे संपत्तीने
परिपूर्ण अशी. या संपत्तीचा उपयोग आदिमानव करत होता. तो त्यावर अवलंबून होता आणि
आजपण मानव तितकाच या नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून आहे,
जरी सुखसोयीसाठी असंख्य साधने त्याने निर्माण केली असली तरीही.
नुसती पृथ्वीवरची भुस्वरूपे
बघितली तरी, पर्वत, दर्या, खचदर्या, समुद्र, उपसागर, आखात, भूशिरे, ज्वालामुखी बेटे, किनारे,
सरोवरे, नद्या, हिमनद्या, त्रिभुज प्रदेश, वाळवंटे इतकी आहेत. या सगळ्यांवर भरती, ओहोटी, लाटा, पाऊस, प्रवाह, जमीन वर उचलली जाणे/खचणे, हवामान बदल, ज्वालामुखी,
भूकंप यांचा परिणाम महासागर आणि जमिनीवर नैसर्गिकपणे होत असतोच. त्यात मानवाने
भौतिक विकास करून यावर परिणाम करणार्या घटकांची आणखी भर घातली आहे. ग्लोबल
वॉर्मिंग सर्वजण जाणतो. त्याचप्रमाणे प्रदूषण ही एक अक्राळविक्राळ जागतिक समस्या
झाली आहे. याचे मूळ कारण म्हणजे निसर्गाचा बिघडलेला समतोल. नैसर्गिक साधन संपत्तीचा
अतिवापर आणि गैरवापरसुद्धा हा समतोल ढळायला कारणीभूत आहे.
भौतिक सुखाचे जग हा विकास वाटत असेल तर आधी जमिनीवर या म्हणजे पृथ्वीवर या, ती आहे म्हणून आपण आहोत. आधी तिला वाचवा. पृथ्वी म्हणजे पाणी, वन्यप्राणी, वनश्री, प्रदूषण आणि याच्याशी संबधित सर्व काही आले. प्लॅस्टिक, कागद, इलेक्ट्रोनिक कचरा यांचा अमर्याद वापर वाढला आहे. हवा, पाणी आणि आवाज प्रदूषण वाढलं आहे. आज कोरोंना साथी मध्ये आपण रोज बघतोय की जगण्यासाठी श्वास घेणं किती महत्वाच आहे. शुद्ध हवा अर्थात ऑक्सीजन किती आवश्यक आहे, सतत काही ना काही नैसर्गिक संकटामुळे जागतिक पातळीवर पृथ्वीला वाचवण्याची चर्चा होते, विचार होतो. काही काळाने ते हवेत विरून जाते, पुन्हा रहाटगाडगं चालू आणि मग वर्षातून एक दिवस ‘डे’ आला की पुन्हा त्याचा एक दिवस विचार. असा पृथ्वी वाचवण्याचा ‘डे’ साजरा होतो दरवर्षी.
आपल्या आजूबाजूचा
परिसर स्वच्छ राहण्यासाठी रस्त्यावर काहीही फेकण्याची सवय सोडली पाहिजे. असे
प्रत्येकाने स्वत:पासून सुरू केले तर आपली पृथ्वी /वसुंधरा मोकळा श्वास घेईल, नुसती तिची
/लक्ष्मीची पुजा करून हे साध्य होणार नाही.
संतवाणीत संतश्रेष्ठ
तुकारामांनी केलेलं पृथ्वीचं वर्णन बघा,
वृक्षवल्ली आम्हा
सोयरीं वनचरी |
पक्षी ही सुस्वरे आळविती ||
येणे सुखे रुचे एकांताचा वास |
नाही गुण दोष अंगा येत ||
आकाश मंडप पृथुवी |
रमे तेथे मन क्रीडा करी ||
कंथा कुमंडलू देह उपचारा |
जाणवितो वारा अवसरू ||
हरिकथा भोजन परवडी विस्तार |
करोनी प्रकार सेवूं रुची ||
तुका म्हणे होय मनासी संवाद |
आपुलाची वाद आपणांसी || - संत तुकाराम
त्या काळातले निसर्गाच्या सान्निध्याचे वर्णन संत तुकाराम करतात. मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतात. तसंच श्रीसमर्थ रामदासांनी दासबोधामध्ये पण वर्णन केलं आहे की, “पृथ्वी रत्नांची खाण आहे, इथली जीवसृष्टि विविध आहे, झाडे झुडपे, वृक्ष वेली, जीवजंतु याने पृथ्वी नटून गेली आहे. या वृक्षवेलींमध्ये अनेक गुणकारी औषधे आहेत”.
जग १९७०
ला या बाबतीत जागं झालय, पण वसुंधरेचा विचार आपल्या
संस्कृतीत प्राचीन काळापासून आहेच. संतांचं हे चारशे वर्षापूर्वीचे हे वर्णन आहे .
आज इतक्या वर्षानी आपण कुठे पोहोचलो आहोत याचा विचार आपण अंतर्मुख होऊन करायला हवा
आणि म्हणूनच, सुखाच्या मागे लागलेल्या मानवाला जागृत
करण्यासाठीच हा वसुंधरा दिवस साजरा केला जातो. तेंव्हा सुख कशाला मानायचं याची
व्याख्या प्रत्येकाने करावी, ते ओरबाडून घेऊ नये, समाधानी राहावं. आपल्याला जगविणार्या या पृथ्वी देवते/वसुंधरे समोर
नतमस्तक व्हावं. तिचा बर्थ डे फक्त २२ एप्रिलला करू नये तो रोज साजरा करावा. तिचं
संवर्धन करण्यात आपला वाटा उचलावा, आपलं कर्तव्य करावं एव्हढीच
कळकळीची विनंती ! ( हा लेख आजच्या सोलापूर तरुण भारत वृत्तपत्रात पान 2 वर प्रसिद्ध झाला आणि विश्व संवाद केंद्रा तर्फेही प्रसिद्ध झाला.तसेच news24pune या वेब पोर्टल वर पण प्रसिद्ध झाला.)सर्व फोटो इंटरनेट वरून साभार .
-----------------------------