Tuesday, 31 August 2021

नंदनवनातील पक्षी – मोर भाग 3

 

                                             नंदनवनातील पक्षीमोर

                                मोराचे जीवन आणि कलात्मक मोर

                                                               भाग-  तीन 

      


    मोराचं स्थान जसं प्राचीन साहित्य पासून अढळ आहे, उदा. स्कंदपुराण, वेद. त्या प्रमाणेच भारतीय चित्रकला, शिल्पकला, धातू आणि हस्तिदंत यावर कोरीव कामात शतकानुशतके मोराच्या प्रतिमेचा वापर केलेला आढळतो. कार्तिकेय, बाणासूर, वृषसेन, तसेच मौर्य, कुशाण यांच्या ध्वजांवर सुवर्णतारांनी तयार केलेले मोराचे चित्र असायचे.

  भारतात प्राचीन काळापासूनच वस्त्रांवर मोरांच्या विविध आकृत्या विणण्याची पद्धत होती. म्हणूनच पैठणी या पारंपरिक वस्त्राची किंमत मोरांच्या नक्षीकामवार ठरते. पैठण्या इतर साड्या, काठ, पदर, गालिचे यावर मोर विराजमान असतो. आता तर बेडशीट्स, कार्पेट्स, चादरी, ड्रेस मटेरियलवर सुद्धा मोराचे डिझाईन असते. ते मग भरतकाम केलेले, विणलेले, पेंटिंग केलेले, मण्यांचे मोर, ताटभोवतीच्या महिरपी मधले मोर इत्यादि.  पुठ्ठा,प्लायवूड जे जे उपलब्ध असेल त्या त्या प्रकारात मोर नक्षी बसवून एकदाचे रुखवत करायचे, हा उपक्रम जवळचे कोणाचे लग्न ठरले की हौसेने जबाबदारी घ्यायची असा छंदच होता लहानपणी.


आता तर नव्या रूपात मोर आपल्याला भेटतो तो विविध डिझाईन्स मध्ये विविध माध्यमातून. म्युरल, पॉट, कानातले, गळ्यातले सेट्स, हेअर बॅंड किंवा क्लचर, छत्रीवर सजावट, वारली किंवा तंजावर अशा वेगवेगळ्या पेन्टीग शैलीत, रांगोळीत, फुलापानांच्या रांगोळीत, फुलांचे स्टेज डेकोरेशन ,भिंतीवरचे पेंटिंग फार मनमोहक असते मोराचे. मेंदीसाठी पण मोर डिझाईन वापरतात.

  

आता तंत्रज्ञानाने पण मोराला आपल्यात सामावून घेतले आहे. अँड्रोइड फोन मध्ये मोराचा इमोजी आहे आणि गूगल चं डुडल पण एकदा मोराचं होतं. मंगळसूत्र आणि इयरिंग्स, अंगठी, माळेचे पदक यात तर एकाहून एक सरस मोराचे डिझाईन असते.पण हं, मोराचं हे सौंदर्य वस्तूत निर्माण करताना खूप कौशल्याचं काम असतं म्हणून ते किमती पण असतं.




सजावटी साठी मोर आहेच पण इतर ठिकाणी सुद्धा मोराचा संबंध नकळतपणे जोडला गेला आहे. योगासने आपण नेहमी करतो, त्यात वेगवेगळ्या पोश्चर्सना वेगवेगळी नावे दिलेली असतात. त्यातलेच एक योगासन म्हणजे 'मयूरासन' मयूरासनात अंतिम स्थितीत पूर्ण शरीर दोन्ही हातावर तोलून धरलेल्या मोराप्रमाणे दिसतं. मानवाला योगक्रियेदवारे प्रयत्न करून सिद्धि प्राप्त करून घ्यावी लागते. म्हणूनच अनेक आसनांची नावे पशुपक्षांच्या नावावरून घेतलेली आहेत. कारण त्या त्या पशूपक्षांच्या स्वाभाविक गुणधर्मांचा त्यासाठी विचार केलेला आहे.



मोराची नावे -

 मोराला प्रादेशिक भाषांमध्ये वेगवेगळी नावे आहेत. मराठीत मोर/मयूर (नर) आणि मयूरी/लांडोर(मादी) म्हणतात. प्राचीन असल्याने संस्कृत भाषेत, मयु: म्हणजे किन्नर, सुरेल आवाजाचा यक्ष म्हटलं जातं. मोराला संस्कृत मध्ये पस्तीस नावं आहेत. उदाहरणार्थ- कलापी, चंद्रकी, नीलकंठ, भुजंगभुक, मेघनाद, लासक, शिखंडी,.... ईत्यादि अनेक .  इंग्रजी मध्ये मोर व लांडोर जोडीला, पीकॉक-पीहेन, राजस्थानी भाषेत मोरला- मोरली, तेलगूत मगनेमलि–अगनेमलि, तामिळमध्ये मयिल-पेडै , आसामी, बंगाली आणि उरिया मध्ये मयूर-मयूरी, पंजाबीत मोर-मोरनी तर याशिवाय, फारसी भाषेत ताऊस, फ्रेंच मध्ये पों, ग्रीक मध्ये पावो, सिंहली भाषेत मोनार अशी नावे आहेत. भारतात आढळणार्‍या मोराचे शास्त्रीय नाव पॅव्हो क्रिस्टेटस असे आहे. भारताबरोबरच श्रीलंका, बांगलादेश, ब्रह्मदेश, इथेही मोर आढळतो. मोराला नागांतक सुद्धा म्हणतात.   



मोर (पॅव्हो क्रिस्टेटस)- हा मोर भारतात सगळीकडे आढळतो, अगदी हिमालयात १६००मीटर उंचीवरसुद्धा. उष्ण कटिबंधात आणि समशीतोष्ण कटिबंधात मोर जास्त आढळतात. आशिया खंडात त्याच्या दोन जाती आहेत. पॅव्हो क्रिस्टेटस आणि दुसरी पॅव्हो म्युटिकस. हा रंगाने हिरवा असलेला मोर प्रामुख्याने ब्रम्हदेशात आढळतो. जगातल्या पांढरा, लाल, हिरवा आणि निळा या जातीं/प्रकारांमध्ये भारतीय निळा मोरच सर्वात आकर्षक आहे. विदर्भातील लोणार परिसर, चित्रकूट, मथुरा, वृंदावन, राजस्थान या भागात संख्या जास्त आहे. 


मोर राष्ट्रीय पक्षी का झाला ?

  मोराच्या लोभस सौंदर्यामुळे भारत सरकारने २६ जानेवारी  १९६३ ला मोर हा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले. इतके विविध पक्षी असताना मोरालाच राष्ट्रीय पक्षी म्हणून मान का मिळाला? होय नक्कीच काहीतरी कारण असणार ना? त्यामागे थोडा इतिहास आहे. जागतिक स्तरावर पक्षी संरक्षण विषयक विचार करण्यासाठी जपान मध्ये टोकियो येथे सर्व देशातले प्रतींनिधी जमले होते. या सभेत प्रत्येक देशाने आपल्या देशाचा एक विशिष्ट पक्षी निवडून त्याला पक्षांचा राजा असा मान द्यावा असे सांगण्यात आले. खर तर यामागे कारण होता की, आपल्या देशातील वन्य पशू पक्षी ही आपलीय राष्ट्रीय संपत्ती आहे आणि तिचे रक्षण करणे सर्व सामान्य जनतेचे सुद्धा कर्तव्य आहे. यासाठी एक समिति नेमून वन्य प्राण्यांचे रक्षण या मुद्द्यावर विचार झाला. वृत्तपत्रातून अभिप्राय मागविण्यात आले. प्रत्येक राज्याने आपले अभिप्राय दिले . या विषयावर १९६१ साली भारतीय वन्य प्राणी बोर्डाची बैठक उटकमंड (उटी) येथे भरली होती. जेंव्हा आपला राष्ट्रीय पक्षी ठरवायचा होता तेंव्हा, इतर अनेक पक्षांची नावे सुद्धा शर्यतीत होती. या बैठकीत सारस (बगळा), ब्राह्मणी घार, माळढोक, हंस आणि मोर या नावावर चर्चा झाली होती. अनेक पक्षांमधून एक पक्षी निवडताना काही निकष ठरवण्यात आले. त्यातला एक म्हणजे तो पक्षी भारतीय संस्कृती आणि परंपरेचा भाग असला पाहिजे. दुसरा- सामान्य माणसालाही तो ओळखता यावा. आणखी एक निकष म्हणजे या पक्ष्याचे अस्तित्व/ वावर देशाच्या सर्व भागात असावा. एव्हढंचं नाही तर, त्याची काव्याची कसोटी, लोकांची आवड, या बरोबरच, रंग, शरीर सौष्ठव, कलात्मकता, कंठस्वर या वैशिष्ट्यांचाही विचार करण्यात आला.या सगळ्या कसोट्यात पास झालेला म्हणजे, हे सगळे निकष पूर्ण करणारा पक्षी अर्थात सौंदर्यवान मोरच होता. भारताप्रमाणे श्रीलंकेचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे , तसेच म्यानमारचा (ब्रम्हदेश) राष्ट्रीय पक्षी पण मोरच आहे.


पण साहित्यात महाकवी कालिदास यांनी त्यांच्या काव्यात मोराला आणखीनच उच्च स्थान खूप आधीच दिलेले आहे. कालिदासाच्या ऋतुसंहार या खंड काव्यात सहा ऋतूंचे वर्णन आहे. प्रत्येक ऋतुत वृक्षलता आणि पशुपक्ष्यांवर होणारे परिणाम  आहेत, वर्षा ऋतूच्या भागात (श्लोक चौदा) भुंग्यांच्या स्थितीचे वर्णन आहे की, कमळे दिसली नाहीत तरीही भुंगे गुंजारव करत पिसारा फुलवून नाचणारा मोर बघून भ्रमित झाले आणि कमळे समजून मोरावरच भाळले आहेत.

विविध शैलीतील पेंटिंग्स 



मेघदूतात सुद्धा पत्नीविरहाने व्याकूळ झालेल्या यक्षाने  मेघाला अलकानगरीत जायला सांगितले असते. यावेळी अलकानगरी पर्यंतचा मार्ग सांगताना वाटेत काय काय लागेल ही भौगोलिक माहिती कालिदासाने सांगितली आहे. सुवर्ण केशरी रंगाचा आम्रकुट पर्वत, विंध्य पर्वताच्या अंगावर पसरलेली अवखळ नर्मदा, नर्मदेत डुंबणारे रानहत्ती, शुभ्र बगळ्यांच्या माळा, वाटेवरची केतकीची वने आणि आर्त केकारव करणारे मोर दिसतील. निसर्गातले त्या त्या ऋतुतले पशू पक्ष्यांचे वर्णन पण कालिदासाने केले आहे. निसर्गात इतके विविध प्रकारचे पक्षी असताना कालिदासाला फक्त मोरच सांगावासा वाटला याचं उत्तर मोराचं आकर्षित करणारं सौंदर्य आणि त्याचं संस्कृतिक महत्त्व.




कालिदासाच्या शाकुंतल नाटकात सुद्धा कण्वाश्रम सोडून शकुंतला सासरी जायला निघते तेंव्हा तेंव्हा आश्रमातील माणसे, पाळीव पशुपक्षी, झाडे, लता, फुले सुद्धा दु:खी होतात. लता-वेली अश्रु गाळू लागतात, हरणे कोवळ्या दर्भाचे घास घेणे सोडतात, वृक्षाची पाने गळून पडतात आणि मोर, नाचणे सोडतात असे वर्णन कवीने केले आहे. जेंव्हा तपोवनात आनंदी प्रसंग असतो तेंव्हा मोर आनंदाने नाचतो. दु:खी प्रसंगात त्यालाही दु:ख होते. असा हा निसर्ग, पशू पक्षी, मनुष्य जीवनाशी एकरूप झालेला पुराणातल्या कथांमध्ये दिसतो. यावरून पशू- पक्ष्यांविषयीचे प्रेम आणि भोवतालच्या निसर्गात समरस होणे हे आपल्या संस्कृतीचे प्राचीन वैशिष्ट्य पण दिसते.           

मोराचे प्रकार -

  निळा मोर आपल्याकडे भारतात आणि श्रीलंकेत आढळतो. तर, हिरवा मोर थायलंड, मलेशिया, जावा, दक्षिण चीन,चीनमध्ये मोराला आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानतात.  म्यानमार आणि भारतात मणीपुर, मिजोराम मध्ये आढळतो. पांढरा मोर भारत (आसाम), जपान आणि पूर्वेकडील देशात आढळतो. लाल मोर आफ्रिका, कांगो खोरे आणि झायरच्या जंगलात आढळतात. सोनेरी मोर बर्मा आणि ईशान्येकडच्या राज्यात आढळतात. मोराचं आयुष्य २५ ते ३० वर्ष असतं. मोर (नर) आणि लांडोर (मादी) यामध्ये सुंदर पिसारा फक्त मोरालाच असतो. त्याचा उपयोग मोर, लांडोरीला आकर्षित करण्यासाठी करत असतो. मोराच्या नाचण्याचा कालावधी  आणि पिसांची संख्या यावरून लांडोर मोराची साथीदार म्हणून निवड करते.

जपानचे पेंटिंग 

रागमाला पेंटिंग्स 


  प्राचीन संस्कृत कवींनी या पिसार्‍याला नयन मनोहर इंद्र्धनुष्य म्हटलेले आहे. तर संस्कृतमध्ये मोराला 'भुजंगभुक' म्हटले आहे. कारण नागासारखा विषारी सर्प, मोर सहज पचवू शकतो. पंखांची सळसळ, शरीराचं थरथरविणे, मोठयाने किंकाळी फोडणे आणि मोहक अदा सादर करणे हे केवळ आणि केवळ लांडोरीसमोर भाव खाण्यासाठीच असते. जोपर्यंत लांडोर त्याच्याकडे लक्षं देत नाही तोपर्यंत मोर नाचत राहतो. याचं जणू परीक्षण करूनच लांडोर त्या मोराला आपला जीवनसाथी निवडते. मला तर हे स्वयंवरच वाटते.

   पावसाळा हा मोराचा जननकाळ. मोराचे पिसारा फुलवत नाचणे हे लांडोरीसाठी असले तरी त्याला जेंव्हा जेंव्हा आनंद होतो तेंव्हा ही तो असाच नाचतो. मोराचा केकारव वर्षाऋतूचे आगमन सुचवितात. ग्रीष्म ऋतु संपता संपता शेतकर्‍यांना, येणार्‍या पावसाची पूर्वसूचना मोराकडूनच मिळते. त्यामुळे मोराचा आनंदोत्सव काळ असणारा हा वर्षाऋतु शेतकर्‍यान्चाही आनंदोत्सव असतो.  






     त्यांचा विणीचा काळ जानेवारी ते ऑक्टोबर असतो. एकांतात आणि सुरक्षित ठिकाणी जमिनीवर  काटेरी झाडाझुडुपात ते घरटे तयार करतात.मादी एका वेळी चार ते सहा अंडी घालते. अंडी पिवळ्या रंगाची असतात. २८दिवस अंडी उबविल्यानंतर आणखी महिनाभराने पिल्ले उडू लागतात. या विणीच्या हंगामानंतर मोराची पिसार्‍यातली सर्व सुंदर मोरपिसे गळून पडतात. पुन्हा विणीच्या काळाआधी पिसे उगवतात. ही पिसे साधारण दोनशे असतात. अशी ही गळून पडलेली पिसे गोळा करून त्याच्या आकर्षक वस्तु  तयार केल्या जातात. भारतातील खेड्यातील लोक ही पिसे पाश्चिमात्य देशांना विकतात. आता कायद्यानेच मोरांना संरक्षण देण्यात आल आहे. मोर पाळणे, त्याची शिकार करणे यावर भारतात बंदी आहे. तरीही जेंव्हा आपण मोरपिसांच्या वस्तूंकडे आकर्षिलो जातो तेंव्हा लक्षात येत की हा अवैध धंदा सुरू आहे, हे वाईट आहे.

    कीटक, धान्य, डाळी, पिकांचे कोवळे कोंब,पाली, लहान साप असे त्यांचे अन्न असते. मोर एकटा कधीच राहत नाही, समूहाने राहतो. स्वत:च्याच तोर्‍यात दिसणारा मोर अतिशय जागृत असतो. आदिवासी क्षेत्रातील मोराला तर 'जागल्या' म्हणतात. शत्रूची सूक्ष्म चाहूल पण त्याला कळते. वाघ, कोल्हा आणि रानमांजर हे मोराचे शत्रू असतात. ते दिसताच मोर इतरांना सावध करतो. चपळतेने झाडावर चढला तर ठीकच पण, जमिनीवरच बिबट्या आणि मोर समोरासमोर आले तर मात्र बिबट्या मोराला संमोहित करतो ,जागच्या जागी स्थिर उभा राहतो. पण शत्रूपासून सुटायला हवे हे कळत नाही आणि अतिशय चपळ असलेला मोर बळी पडतो. संध्याकाळ नंतर मोर विश्रांतीसाठी झाडावर बसतात आणि बिबट्या पासून रात्री संरक्षण मिळावं म्हणून पर्णहीन झाडावर बसतात. सकाळी खाली येतात. मोराची पिल्ले आठ महिन्याची झाल्यावर स्वतंत्र राहू लागतात. आठ महिन्यांनंतर नर पक्ष्याला पिसारा येऊ लागतो आणि तो मोठा होण्यासाठी चार वर्षे लागतात. चार वर्षानी पुन्हा विणीचा काळ येतो, मोर पिसारा फुलवून धुंद नाचू लागतो,त्याच ते नृत्य बघून आम्हीही बेधुंद होतो . हे नृत्य असंच टिकण महत्वाचं आहे. कारण मोरांची संख्या कमी कमी होत राहिली तर ?                             

 रांगोळीतला मोर  




    मोर आपला राष्ट्रीय पक्षी आहे, तो टिकवणं आमच कर्तव्य आहे. जेव्हढा आपला देश आपल्यासाठी महत्वाचा आहे, तेव्हढीच ही देशातली नैसर्गिक संपत्ती टिकविणे पण महत्वाचं आहे. त्यांना जगण्यासाठी अन्न,पाणी आणि निवारा उपलब्ध नसेल तर हे पशू पक्षी स्थलांतर करून दुसरीकडे जातील. म्हणूनही त्यांची संख्या कमी होईल. संख्या कमी होण्याचे दुसरे कारण शिकार आहे. या पशू पक्ष्यांच्या अधिवासाच्या ठिकाणी मानवाचे अतिक्रमण होणे हे पण एक मुख्य कारण, आणि त्यांच्या परिसरात हवा प्रदूषण, धूर यांचा वाढता त्रास.

     महाराष्ट्रात असे अभयारण्य आहे, मराठवाड्यात बीड शहारच्या डोंगराळ भागात पाटोदा तालुक्यात नायगाव मयूर अभयारण्य आहे. या वनात मोर खूप प्रमाणात आहेत. हे राखीव क्षेत्र १९९४ साली सुरू झालं. १९९४ ला इथे १०,००० मोर होते. हे अभयारण्य डॉ.सलीम अली पक्षी अभयारण्य म्हणून ओळखले जाते. यात २०१८-१९ मध्ये २२५२ मोर (नर) आणि ५९५१ मोर ,लांडोर(मादी) होते. पावसाळा सुरू होताच मोर व लांडोरच्या जोड्या रस्त्याच्या दुतर्फा मुक्त पणे फिरत असतात. मोराचे अभयारण्य म्हणजे मोरांसाठी असलेले खास संरक्षित क्षेत्र तयार केले असले तरी या सर्व गोष्टींचा विचार पर्यावरण म्हणून केला गेला पाहिजे.

                                                        कांगा चित्रशैली 

    पावसाचे कमी प्रमाण, वृक्षतोड, वनामध्ये विदेशी वनस्पतींची लागवड केल्याने मोरांचे अन्न-( टोळ, फुलपाखरे, सरडे, गांडूळ, साप यांचे प्रमाण कमी), एकाच प्रकारच्या वनस्पतींमुळे अन्नसाखळी बिघडल्याने मोरांची संख्या कमी होते. म्हणून वृक्षलागवड, फळे, फुले येणार्‍या वनस्पतींची लागवड, मोरांच्या शिकारीला आळा घालणे असे आवश्यक उपाय आहेत.असे केले तरच मोरांना नंदनवन उपलब्ध होईल आणि हे नंदनवनातले मोर, जी हजारो वर्षे आपली संपत्ती आहे ती टिकेल आणि पुढच्या अनेक वर्षांनंतरच्या पिढिंना मोर फक्त चित्रात न दाखवता प्रत्यक्ष दाखवता येतील. आमच्या पिढीने मुलांना प्रत्यक्ष जाऊन मोर दाखवले,

    पुण्याजवळ शिरूर तालुक्यात मोराची चिंचोली गाव आहे .तिथे मोरदर्शनाचा आनंद घेता येतो. तर असा आहे आपला राष्ट्रीय पक्षी मोर, हे मोर आणि पृथ्वी तलावरचे सर्व पक्षी, प्राणी,कीटक, वनस्पती ही आपली संपत्ती आपण जपूया, तिचे संवर्धन करूया, त्यांच्या अधिवासवर आपण माणसं अतिक्रमण करतो ते टाळूया, निसर्गाची साखळी पूर्वी सारखीच सुरू राहण्यास मदत करूया हीच सर्वांना विनंती !   

             बघूया मोराचे विविध प्रकार -   https://www.youtube.com/watch?v=eQj_4JO0ikQ

                              (या तिन्ही लेखांचे सर्व फोटो आणि विडिओ गुगल वरुन साभार)

 

© ले. डॉ.नयना कासखेडीकर.पुणे

                                                         ------ समाप्त -----   

 

Monday, 30 August 2021

नंदनवनातील पक्षी – मोर

 

नंदनवनातील पक्षीमोर

इतिहासातला आणि ललित कलांतला  

                                                               भाग-  दोन 

    

मोर हा पृथ्वीवरचा सर्वात सुंदर पक्षी. तो तर नंदनवनातला पक्षी. भारतात सर्वत्र आढळणारा, दोन हजार पक्ष्यांच्या जातीतला सर्वात सुंदर, ऐटबाज आणि नृत्यविशारद पक्षी. त्याच्या मोहक सौंदर्या मुळे जगातल्या सर्वांना तो आवडतो. भारतीयांनी तर मोराला १९६३ मध्ये राष्ट्रीय पक्ष्याचं मानाचं स्थान दिलं.

 

राजचिन्ह-    

    राज घराण्यातल्या ऐश्वर्य संपन्नतेत अनेक ठिकाणी मोराला स्थान दिलं असायचं. अशी अनेक उदाहरणे आहेत. मुघल बादशहा शहाजहान मोठा रसिक होता. तो मोराच्या सौंदर्याने इतका प्रभावित झाला होता की, त्याने स्वत:साठी मयूर सिंहासन तयार करवून घेतलं होतं.याच प्रमाणे वेगवेगळ्या काळात ते ते राज्यकर्ते नाणी पाडत असत. त्यावर अर्थातच काहीतरी विशेष प्रतिक असणारच. इ.स. पाचव्या शतकातल्या गुप्त घराण्याच्या राजांच्या सोन्या व चांदीच्या नाण्यांवर मोर कोरलेला असायचा. प्रथम कुमारगुप्त ने त्याच्या काळात जी नाणी काढली त्यात सुवर्ण नाणी, रजत नाणी, तांब्याची नाणी आणि शिशाची नाणी होती. रजत नाण्यावर गरुड, मोर, त्रिशूल यांचे छाप होते. हर्षवर्धन राजाच्या नाण्यांवर सुद्धा मोराची प्रतिमा कोरलेली होती.   

  

 मोर हे तुघलकांचे राजचिन्ह होते. बादशहांना वारा घालण्याचे पंखे सुद्धा मोरपंखापासून बनवलेले असत. मौर्य राजांचे कुलचिन्ह सुद्धा मोर होते. त्यांच्या महालात मोर पाळलेले असायचे. ओरिसा प्रांताच्या मयूरभंज राज्याचे मानचिन्ह पण मोर होते. तसेच अहीर आणि यादव राजांचेही कुल चिन्ह मोर होते. कलिंग च्या युद्धांनंतर अशोकाने त्याच्या राज्यात पशुहत्या आणि मोरांची हत्या करण्यावर बंदी घातली होती. या राजाज्ञा त्याने शिलालेखावर कोरून घेतल्या होत्या. 

                                          

            

                                  

प्राचीन काळी राजांच्या छत्रावर सोने आणि रत्नांनी मढवलेली नाचणार्‍या मोराची चित्रे असत. त्याला मायूरातपत्र म्हणायचे.या छत्रावर सर्व बाजूंनी मोराची चित्रे सोने आणि रत्नांनी मढवलेली असत.

दहाव्या शतकात पण अनेक ठिकाणी कास्य शिल्पांमध्ये मोर प्रतिकृती आढळतात. मोराच्या आपल्या संस्कृतीतल्या अस्तित्वाचे असे अनेक ऐतिहासिक पुरावे आपल्याकडे दिसतात. सांची येथील स्तुपाच्या प्रवेश दारावरील पाषाणाच्या स्तंभांवर मोराच्या आकृत्या दिसतात.


सांची स्तूप प्रवेशद्वार 
कातळशिल्पे 

     

   मयूर सिंहासन -सम्राट चंद्रगुप्त मौर्यच्या काळातील नाण्यावर एका बाजुला मोर चिन्ह असायचे. कोहिनूर आणि मयूर सिंहासन ही बादशहाच्या राजवटीतली दोन शाही राजचिन्हे होती. मुघल बादशहाचं सिंहासन तक्ख्त-ए-ताउस अनमोल रत्न जडित तयार करून घेतले होते. जगातलं सर्वात महाग असं हे मयूर सिंहासन, बादशाही वैभवाचे प्रदर्शन करण्यासाठी मुद्दाम १६३४ मध्ये बनवून घेतले होते. ही रत्ने देश विदेशातून आणली होती. यासाठी शाही जामदारखान्यातून तत्कालीन किमतिनुसार ८६लक्ष रुपये किमतीची निवडक रत्ने, हिरे, माणके,पाचू, मोती आणि एक लाख तोळे सोनं (ज्याची किमत १४ लक्ष रुपये होती) वापरलं होतं. हे सिंहासन १/४ यार्ड लांब,१/२ यार्ड रुंद आणि ५ यार्ड उंच होतं. सिंहासनावरचं छत, बैठक, छताचे खांब, त्याच्या पायर्‍या हे सर्वच रत्नाने मढवलेले होते. याच्या छताला १२ खांबांचा आधार दिला होता. या प्रत्येक खांबावर दोन रत्नजडीत मोर आणि दोन मोरांमद्धे रत्नजडित एक झाड होते. हे सिंहासन तयार करायला सात वर्षांचा काळ लागला. त्याच वजन ३१ मण २० शेर होतं. फक्त विशेष प्रसंगीच हे सिंहासन  शाही दरबारात आणलं जायचं. नादिर शाहने हिंदुस्थानवर स्वारी करून समृद्ध राज्यातली संपत्ती लुटून नेली, त्यात हे सिंहासन नादिरशाहने पर्शियात नेल्याचा उल्लेख आहे. आज ते अस्तित्वात नाही. जेंव्हा मुघल राजधानी आग्र्याहुन दिल्लीला हलवली गेली तेंव्हा हे सिंहासन दिल्लीच्या लाल किल्ल्यात आणलं गेलं होतं असं म्हणतात. इथे हा सगळा इतिहास सांगण्याचं कारण म्हणजे, मोराचं आपल्या संस्कृतीशी असलेलं नातं . हे नातं तसं सिंधु संस्कृतीपासून आहे. उत्खननात या संस्कृतीतिल लोकांच्या भांड्यांवर मोरांची कलात्मक चित्रे सापडली आहेत. 

रत्नजडित मयूर सिंहासन 

  
  
दक्षिण भारतात वेगवेगळ्या समया, दिवे यांच्यावर सुंदर मोर घडवलेले दिसतात. एखाद्या म्युझियम मध्ये असे दिव्यांचे प्रकार आपण नेहमी बघतो. शिवाय आपल्याकडची चांदीची उपकरणे अत्तरदाणी, गुलाबदाणी, करंडा, कोयरी, निरांजन, समई यावर मोराची नक्षी असतेच.  

                 


     राजप्रासाद-

प्राचीन काळी राजप्रासाद आणि वाड्यात मोर पाळलेले असत. त्यांना भवनशिखी किंवा क्रीडामयूर म्हणत. प्रासादाबाहेरील उद्यानात, मोरांसाठी छोट्या छोट्या टेकड्या तयार करवून छान सोय केलेली असे. त्यांना सांभाळण्यासाठी सेवक नेमलेले असायचे. इजिप्त मध्ये ही राजे आपल्या उद्यानात मोर पाळायचे. 


आपल्या कडे जसे कार्तिकेयचे आणि सरस्वतीचे वाहन मोर आहे, तसेच ग्रीक संस्कृतीत हेरा या देवतेच्या संदर्भात सुद्धा मोराचे अस्तित्व आहे. घराबाहेरच्या उद्यानात मोर बागडताहेत ही कल्पनाच किती मोहून टाकणारी आहे ना? मला इथे एक महत्वाचा संदर्भ द्यावासा वाटतो तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रासादाबाहेरील उद्यानातील मोर.  

 


प्राचीन काळात ग्रीक, रोम आणि भारताच्या उद्यानांमध्ये मोराचे वास्तव्य असायचे असे इतिहास सांगतो.  इ.स. पूर्व चौथ्या शतकात ग्रीस राजा सिकंदर ने भारतावर आक्रमण केले तेंव्हा त्याने पंजाबमध्ये मोरांचे अनेक थवे पहिले, त्यांचे लोभस नृत्य पाहिले. त्यांच्या प्रेमात पडून त्याने सैनिकांना सांगितले की मोरांना  मारू नये. आणि परत भारतातून जाताना दोनशे मोर आणि लांडोरी बरोबर घेऊन गेला. इथूनच मग अमेरिका, आफ्रिका, युरोप इथे भारतीय मोरांचा प्रसार झाला. प्राचीन कला पासूनच मोराने त्याच्या डौलदार सौंदर्याने आणि तोर्‍याने कवींचे योद्ध्यांचे आणि राजे रजवाड्यांचे लक्ष आकर्षित केले आहे.

 

ताऊस  (Taus) -

तर रोमन लोक, इंग्लंड मध्ये जाताना बरोबर मोर घेऊन गेले होते. कारण ते आक्रमण करायला गेले होते आणि मोर हे चिन्ह ख्रिस्ती लोक पुनरुत्थानाचे प्रतिक मनात असत. शुभ चिन्ह म्हणून त्याकडे ते पाहत. तर चीनमध्ये मोराला सौंदर्याचा, शोभेचा, उन्नतीचा आणि शांततेच दूतच मानतात.

मोर हे पारशी लोकांचे धार्मिक प्रतिक असते.मलक - ए - ताऊस या तांब्याच्या भांड्यातून अग्यारीत आलेल्या भक्तांना तिर्थ दिले जाते. प्राचीन काळात मोर भारतातून निर्यात केले जात असत. भारत आणि श्रीलंका हे मोराचे मूळ स्थान. तेंव्हापासून मोरांची निर्यात पाश्चिमात्य देशांमध्ये होत होती. ताऊस हा शब्द पर्शियन भाषेतला शब्द आहे. ताऊस म्हणजे मोर.


   





वाद्ये -

शास्त्रीय संगीतात वीणा व त्याचे इतर प्रकार स्वतंत्र वादनासाठी असतात. त्यातलच ताऊस हे एक तंतुवाद्य आहे. दक्षिणेत या वाद्याला मयूरी किंवा बालासरस्वती पण म्हणतात. हे तंतु वाद्य म्हणजे मोराच्या आकाराची चामड्याचे कंपित्र असलेली, गजाने उभी धरून वाजवण्याची सतारच. ताऊस चा रंगही मोरासारखाच. हे वाद्य स्वतंत्र वादनासाठी असते. बंगाल मध्ये मोरा ऐवजी माशाचा आकार असतो तेंव्हा त्याला मीन सारंगी म्हणतात.      

                       

मयूर नृत्य -






ललित कलांमध्ये सगळीकडे मोराचं अस्तित्व आहेच. मग नृत्यकला कशी बरं त्यातून सुटेल
? मयूर नृत्य एक प्रसिद्ध पारंपरिक नृत्य प्रकार आहे. भारतात अनेक प्रदेशात लोकनृत्यात ते असतं. भारताप्रमाणे परदेशात सुद्धा पिकॉक डान्स आहे. म्यानमार, कंबोडिया, इंडोनेशिया, श्रीलंका, बांगला देश या देशात मयूर नृत्य परंपरा आहे. तमिळनाडू मध्ये या नृत्याला मयिल अट्टम म्हणतात. भारताच्या अरुणाचल प्रदेशाच्या तिबेट आणि भूतान मध्ये जे मोनपा आदिवासी आहेत, ते तवांग आणि कामेंग जिल्ह्यात जास्त करून राहतात त्यांचे एक लोकनृत्य आहे, त्याला लायन आणि पिकॉक डान्स म्हटले जाते. या नृत्यातून प्राण्यांच्या कथा सादर केल्या जातात.


                                               

                              

     भगवान श्रीकृष्णाच्या अनेक लीला आहेत त्यातलीच एक मयूरनृत्य लीला आहे. असं म्हणतात, राधेच्या जन्मानंतर होणार्‍या द्वापारकालीन लिलांना बुढी लीला म्हणतात. या बुढी लीला दरम्यान मथुरेत मोर कुटी मध्ये मयूर लीला साजरी होते. एकदा कृष्णाची प्राणप्रिय राधा रुसून बसली होती, तिला अनेक प्रकारे कृष्णाने मनवलं पण राधा काही प्रसन्न होईना, शेवटी भगवान श्री कृष्णाने मोराचे रूप घेऊन राधेच्या समोर नृत्य केले, त्या नृत्याने राधा, मोरावर अर्थात कृष्णावर प्रसन्न झाली. हा बुढी लीला महोत्सव ब्रज प्रांतात अनेक वर्षे सुरू आहे. राधा रानीने बुलायौ, कान्हा मोर बन आयौ ... याचं महत्व म्हणून, ब्रज प्रांतात अनेक सण आणि उत्सवांमध्ये किंवा विशेष प्रसंगी अतिथींच्या स्वागतासाठी मयूर नृत्याचं आयोजन केलं जातं. मथुरेचं हे पारंपरिक नृत्य आहे. आपल्याकडे म्हणजे भारतात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आले होते, तेंव्हा त्यांचं स्वागत ब्रजच्या या पारंपरिक मयूर नृत्यानेच झालं होतं.

            

मोराचा नयनमनोहर नाच - लिंक -  https://www.youtube.com/watch?v=NKY1OOwnHEY

 

                                                         क्रमश:   

 

© ले. डॉ.नयना कासखेडीकर.पुणे

                                                 --------------