‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना- घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका
विचार–पुष्प, भाग-४३
आशिया ते अमेरिका प्रवास
परिव्राजक म्हणून
स्वामी विवेकानंद या आधी भारतात हवे तसे फिरले होते. पण हा प्रवास तसा नव्हता, आजही ते परिव्राजक
होते, पण ही भ्रमंती ठरल्याप्रमाणेच,
ठरलेल्या दिशेने आणि एका शिस्तीनेच करायची होती. तेरा हजार किलोमीटर अंतरावर जायचे
होते.भारत भ्रमणात दरवेळी फिरताना त्यांच्याकडे सामान नसे. आता मात्र समान होते
आणि पैसेही होते गरज म्हणून. सोय म्हणून. विवेकानंदांना याची सवय नव्हती. जहाजाचा
प्रवास, सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि
रात्रीचे जेवण, वागण्या बोलण्यातले शिष्टाचार पाळणे याला ते
हळूहळू सरावले.
त्यांच्या या पी अँड ओ कपंनीच्या पेनिन्शूलर जहाजातून याच वेळी मुंबईचे शेठ छबिलदास जपानला आणि भारतातील औद्योगिक युगाचे प्रवर्तक मानले जाणारे सर जमशेटजी टाटा शिकागोसाठीच प्रवास करत होते. एक आठवड्याने पहिला पडाव झाला एक दिवसाचा सिलोन म्हणजे श्रीलंकेतील कोलंबो इथं.विवेकानंद शहरातून फिरून आले, एका बुद्धमंदिरात निर्वाण अवस्थेत शांतपणे पहुडलेली गौतम बुद्धाची प्रचंड मूर्ति त्यांनी पाहिली.
नंतर जहाज पेनांगला थोडा वेळ थांबून, हाँगकाँगला आले. सिंगापूर, मलाया, सुमात्रा यांचे दर्शन जहाजावरूनच झाले होते. हाँगकाँगला त्यांना खलाशी, कामगार, तिथले लोक यांचा व्यवहार पाहून तिथल्या दारीद्र्याची कल्पना आली. स्त्रियांची स्थिति समजली .अनेक गोष्टींची निरीक्षणे त्यांनी केली. चीनी मंदिरे आणि भारतीय मंदिरे पाहिली. कॅन्टनमध्ये चीनमधला पहिला बुद्धधर्मीय सम्राट आणि त्याचे पाचशे शिष्य यांच्या स्मरणार्थ उभे केलेले सर्वात मोठे बुद्धमंदिर पहिले. पण इथला बौद्ध मठ कसा असतो याची त्यांना उत्सुकता होती,इथे एक मजेदार घटना घडली. गाईडने बुद्ध मठाजवळ विवेकानंदांना नेलं, पण कुणाला आत प्रवेश नव्हता. विवेकानंदांनी कसेबसे त्याला मनवून आत प्रवेश केला तेव्हाढ्यात आतून दंडुके घेऊन काही लोक आले. बरोबरचे प्रवासी बाहेर पाळले, पण विवेकानंद यांनी त्या माणसाचा हात धरून ठेवला आणि त्याला म्हटले, चीनी भाषेत ‘भारतीय योगी’ याला काय शब्द आहे? त्याने शब्द सांगितला. विवेकानंद जागचे हलले नाहीत. ठामपणे उभे राहिले आणि धावत येणार्या लोकांना त्या शब्दात आपण भारतीय योगी आहोत हे मोठयाने सांगितले. तसे चमत्कार झाला, सर्वांनी दंडुके खाली घेतले आणि सर्वजण नम्रपणे उभे राहिले.त्या मठवासी लोकांनी विवेकानंदांना हात जोडून विनंती केले की,भुते खेते आणि पिशाच्च यांची बाधा होऊ नये म्हणून तुम्ही ताईत द्यावेत . विवेकानंदांचा यावर अजिबात विश्वास नव्हता. पण हा विचार करण्याची ही वेळ नव्हती. त्यांचे समाधान करणे भाग होते. विवेकानंदांनी जवळचा कागद काढला, दोन तुकडे केले, त्यावर आडव्या उभ्या रेघा मारल्या, मधोमध ओम अक्षर लिहिले. आणि त्यांना दिले. त्याबरोबर त्यांनी आदराने तो घेतला आणि कपाळाला लावला. हे त्यांचे अज्ञान बघून विवेकानंदांना खूप कीव आली. याच जोडीला त्यांचे दारिद्र्य, अस्वच्छता हेही दिसले. नंतर त्या लोकांनी मठाच्या आतील भागात नेले तिथे, जुन्या हस्तलिखित पोथ्या ठेवल्या होत्या.त्या संस्कृतमध्ये होत्या आणि लिपी बंगाली होती. याचं त्यांना फार आश्चर्य वाटलं. तिथे बुद्ध मंदिरात पाचशे अनुयायांपैकी काहींचे चेहरे विवेकानंदांना बंगाली वाटले होते. मग त्यांच्या लक्षात आले की, बुद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी भारतातून जे भिक्षू गेले होते त्यापैकी अनेक बंगाल मधून गेले असले पाहिजेत.
हाँगकाँग सोडल्यानंतर जहाज नागासकी बंदरात थांबले होते. जपान मध्ये शिरताच त्यांना चीन आणि जपान यातला प्रचंड फरक जाणवला होता. त्यांना जपान मध्ये दिसलं होतं, स्वच्छता, नीटनेटकेपणा, प्रत्येक बाबतीतली सौंदर्य दृष्टी, आधुनिक विज्ञानाचा केलेला स्वीकार, याचा त्यांच्या मनावर प्रभाव पडला होता.सरळ आणि रुंद रस्ते, शहराची नीटशी रचना, घराभोवती बगीचे, अशा शिकण्यासारख्या अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या. त्यांना मनोमन वाटलं की जास्तीत जास्त भारतीय तरुणांनी जपानला एकदा तरी भेट दिली पाहिजे, इथेही त्यांना जपानी मंदिरांमध्ये भिंतीवर जुन्या बंगाली लिपीत संस्कृत मंत्र लिहिलेले आढळले. चीन आणि जपान हे दोन्ही देश भारताशी नातं सांगणारे दिसले. भारताकडे आदराने पहाणारे दिसले. पण भारताची आजची स्थिति विवेकानंदांनी पाहिली होती. याची तुलना त्यांनी लगेच केली. त्यांनी इथूनच लगेच शिष्यांना एक पत्र लिहिलं आणि परखडपणे म्हटलं की, "जरा इकडे या, हे लोक पहा आणि शरमेने आपली तोंडे झाकून घ्या. पण परंपरेने गुलाम असलेले तुम्ही इकडे कसे येणार?तुम्ही जरा बाहेर पडलात की लगेच आपली जात गमावून बसाल. गेली कित्येक शतके आपण काय करीत आलो आहोत?. "आशियामधून
अजून जहाज बाहेर पडायचे होते, नव्या जगात पोहोचायला साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास अजून बाकी होता,
पॅसिफिक महासागर पार व्हायचा होता. तोवरच विवेकानंदांनी मनातली ही
व्यथा आपल्या शिष्यांना पत्रातून कळवली होती.
पंचवीस जुलै १८९३ला संध्याकाळी जहाज व्हंकुव्हरला पोहोचले. इथून रेल्वेने दुसर्या दिवशी शिकागोला जायचे होते. इथे पहिल्यांदा विवेकानंदांनी अमेरिकेच्या भूमीवर पहिले पाऊल ठेवले.
अमेरिकेचा भूप्रदेश, उंच उंच पर्वत, खोल दर्या, पांढर्या शुभ्र हिमनदया, घनदाट अरण्ये, अशी निसर्गाची अनेक रुपे बघून त्यांचे मन प्रसन्न झाले. शिकागोकडे जाणार्या, या गाडीत अनेक देशांचे प्रवासी बसले होते. त्यात केट सॅनबोर्न ही पन्नाशीची बुद्धिवंत लेखिका होती, तिच्याशी विवेकानंद यांचा संवाद झाला. त्यांचा पत्ता घेतला. ओळख झाली. त्यांनी घरी येण्याचं निमंत्रण पण दिलं. ते पुढच्या मुक्कामात कामी आले.
तीस जुलैला विवेकानंद शिकागोला उतरले.
इथल्या बारा दिवसांच्या सुरुवातीच्या वास्तव्यात एकामागून एक त्यांना धक्के बसले.
पहिलं म्हणजे प्रचंड महागाई, रोज पाच डॉलर खर्च, दुसर म्हणजे सर्वधर्म परिषद सुरू
होण्यास अजून पाच आठवडे बाकी आहेत, तिसरं म्हणजे या परिषदेला
प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहायचे असेल तर, कोणत्या तरी
संस्थेचे अधिकार पत्र आवश्यक आहे, चौथं म्हणजे प्रतिनिधी
म्हणून नाव नोंदविण्याची मुदतच संपली आहे. आता कोणालाही प्रतिनिधी म्हणून प्रवेश मिळणार
नाही. आता पुढे काय? हे मोठे प्रश्न चिन्ह उभे होते.(यातील सर्व फोटो इंटरनेट वरुन साभार परत.) केट सॅनबोर्न
© डॉ.नयना कासखेडीकर
ही मालिका ऑडिओ बुक स्वरुपात पण उपलब्ध आहे ,ज्यांना ऐकायची आहे त्यांनी You Tube च्या
playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLEkZc0XQx78jmXuRkOtsWN-D1Z2FBgOGk
या लिंकवर जाऊन हा यू ट्यूब व्हिडिओ बघावा