Friday, 31 July 2020

विचार – पुष्प २७.


 स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका  
                       विचार – पुष्प २७.  


           परिव्राजक – ५ . मातृभाषा
बैद्यनाथ चे मंदिर 
     स्वामीजी आणि अखंडांनंद आता वैद्यनाथला पोहोचले होते. कारण ते एक धार्मिक क्षेत्र होत आणि ते अखंडानंदांनी पाहिलं नव्हतं. रस्त्यात लागणारी धार्मिक स्थळांना ते आवर्जून भेट देत असत. तिथे एक ब्राम्ह्समाजी नेते राजनारायण बोस यांची भेट घेतली. स्वामीजी त्यांना ओळखत होते. त्यांचं वय बरच म्हणजे चौसष्ट होतं. पाश्चात्य संस्कृतीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. महर्षि देवेन्द्रनाथ टागोर यांना ते गुरु मानत. मिशनर्‍यांच्या धर्मप्रसाराला पायबंदची चळवळ, विधवाविवाह सारखी सामाजिक सुधारणा चळवळ यात त्यांचा सहभाग होता. बंगाल मध्ये देशभक्तीची जाणीव उत्पन्न होण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते. युवकांमध्ये राष्ट्रीयत्वाची आणि देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी एक संस्था पण काढली होती. इंग्रज आपल्या देशावर राज्य करतात ते आपल्या कल्याणसाठी नव्हे तर त्यांच्या देशाचे ऐश्वर्य वाढावे म्हणून, म्हणून त्यांना हुसकावून लावण्यासाठी बळाचा वापर करायला काय हरकत आहे असं त्यांचं मत होतं.
  
   
ऋषितुल्य राजणारायण बोस व त्यांचे घर 
     त्यांच्या कुटुंबातच राष्ट्रावादाची परंपरा होती. जगप्रसिद्ध, महायोगी श्री अरविंद घोष यांची आई म्हणजे राजनारायण यांची कन्या होती. क्रांतिकारक  कन्हैयालाल दत्त यांच्या बरोबर ऐन तारुण्यात हसत हसत फाशी गेलेला सत्येन्द्रनाथ बोस हा त्यांचा पुतण्या होता. देशभक्तीच्या या परंपरेमुळे त्यांची काही मते ठाम  होती. जसे की, आपण आपला पोशाख करावा. आपल्या भाषेतच बोलावे. आपले शिष्टाचार आपण सांभाळावेत. आपण आपले भारतीय खेळच खेळावेत. यावर त्यांचा बारीक कटाक्ष असे. त्यांच्या संस्थेत कोणी एखादा इंग्रजी शब्द वापरला तर त्याला एक पैसा दंड भरावा लागे. त्यांचा हा स्वाभिमान स्वामी विवेकानंदांना माहिती होता म्हणून, इथे त्यांची भेट घेताना स्वामीजींनी अखंडानंदांना आधीच सांगून ठेवले होते की, आपल्याला इंग्रजी येतं हे त्यांना अजिबात कळू द्यायचं नाही.

  
त्या काळात बंगालमधल्या सुशिक्षितांमध्ये इंग्रजी शब्द वापरण्याची खूप मोठी खोड लागली होती. इतकी की आपल्या मातृभाषेत त्यांना कोणत्याही विषयावर धड विचार प्रकट करता याचे नाहीत आणि धड इंग्रजीत सुद्धा नाहीत. भाषेची दैन्यावस्थाच होती.
   
  त्यामुळे राजनारायण यांच्याबरोबर झालेल्या गप्पांमध्ये स्वामीजींनी एकही इंग्रजी शब्द येऊ दिला नाही. राजनारायण यांना वाटले की ही संन्यासी मुलं, इंग्रजी कुठल येणार त्यांना? अशाच समजुतीत ते होते. या प्रसंगात अखंडानंद आणि स्वामीजींची मस्त करमणूक झाली होती. ही समजूत करून देण्यात आपण यशस्वी झालो असे दोघांनाही वाटले. पुढे स्वामीजींची किर्ति ऐकून राजनारायण यांना स्वामीजींची भेट आठवली आणि आश्चर्य वाटले की, “केव्हढा चमत्कार आहे हा, इतका वेळ ते माझ्याशी बोलले, पण त्यांना इंग्रजी येतं अशी शंका क्षणभर सुद्धा मला आली नाही. खरोखरच हा विलक्षण चतुर माणूस असला पाहिजे.” खरच  स्वामीजींचं केव्हढं प्रसंगावधान होतं.निश्चय होता. 
  
    धार्मिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ज्यांनी आयुष्यभर तपश्चर्या केली त्या राजनारायण यांना स्वामीजींना वैद्यनाथला भेटावसं वाटलं कारण, ब्राह्म समाजात देशभक्तीचे विशेष महत्व नसताना सुद्धा  ,राज नारायण ब्राह्म समझी असूनसुद्धा त्यांनी तरुणांमध्ये स्वाभिमान आणि देशभक्तीची भावना निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न केला होता. हेच वेगळेपण स्वामीजींना भावलं होतं. आपल्या प्रवासात अशा व्यक्तींचीही आवर्जून भेट घेणं हा त्यांचा उद्देश असायचाच. प्रवासात अशी अनेक प्रकारची माणसे त्यांना भेटत. नव्हे स्वामीजीच त्यांना आवर्जून भेटत.
  
                     
     समोरच्या व्यक्तीबद्दल आदरभाव असणं किंवा त्यांना किमत देणं हा स्वामीजींचा गुण कसं वागायचं ते शिकवणारा आहे. राजनारायण यांची स्वदेशी बद्दलची आणि मातृभाषेबद्दलची भावना हे राष्ट्र प्रेमाचं उदाहरण आहे. देशाभिमानाचं उदाहरण आहे त्यामुळे स्वामीजींना ते मनापासून आवडलं होतं असं वाटतं.

    मातृभाषेची दैन्यावस्था हा विषय तर आताही आहे. आपण रोजचं पाहतोय, ऐकतोय. पु.ल देशपांडे यांनी उपहासाने म्हटलं होतं, आपल्या मदरटंग मध्ये आपल्या फिलिंग चांगल्या एक्स्प्रेस करू शकतो. हा गमतीचा भाग सोडला, तर आज रोज अनेक वार्तापत्र झडताहेत वाहिन्यांवर. इतकी मोठी आपत्ती आणि इतकी घाई आहे की आंतर्राष्ट्रीय स्तरावर जाहीर झालेले शब्दच जसेच्या तसे वापरतोय. मराठी भाषा इंग्रजी शब्दांनी समृद्ध झाली आहे असेच म्हणावे लागेल. त्यात लॉक डाउन, हॉटस्पॉट, व्हायरस, सोशल डिस्टन्स या शब्दांनी तर सामान्य लोकांना काहीच कळत नाहीये असं वाटतं काही काही वेळा. लॉकडाउन या शब्दाचा नेमका अर्थ समाजाला स्वत:च्या मातृभाषेत उमगत नाहीये. म्हणूनच याही परिस्थितीत ते कळत नसल्याने बाहेर नेहमीप्रमाणेच फिरत आहेत. जागतिक पातळीवरच्या अशा संसर्गजन्य साथीच्या सूचना, माहिती, आपल्या मातृभाषेत सोप्या शब्दात सांगितली, समजून सांगितली, तर निदान कळेल तरी. तरच ते गंभीरपणे या सगळ्याकडे बघतील. मातृभाषा हृदयाची भाषा.                                     
    © डॉ.नयना कासखेडीकर                                                                                    

ही मालिका ऑडिओ बुक स्वरुपात पण उपलब्ध आहे ,ज्यांना ऐकायची आहे त्यांनी You Tube च्या


या लिंकवर जाऊन हा यू ट्यूब व्हिडिओ बघावा

Wednesday, 29 July 2020

विचार–पुष्प ,भाग - २६

 स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा,प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका  
                      विचार–पुष्प ,भाग - २६. 

 
परिव्राजक –४. हिमालयाच्या वाटेवर  
    
      आज आपले ओळखपत्र/आय डी प्रुफ, सगळीकडे दाखवावे लागते. ती एक सिक्युरिटी चेक सिस्टिम आहे.यावरून तुम्ही कोण आहात? कुठले आहात? कुठून कुठे चालला आहात? असे कुठे विचारले तर राग यायचे काहीच कारण नाही. आपल्याच देशात आपल्याच सुरक्षिततेसाठी हे आहे. प्रवास करतांना किंवा पर्यटनाला जातांना आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड,ड्रायविंग लायसन्स नाहीतर अगदीच इलेक्ट्रिक बिल्ल इत्यादी आपल्याला दाखवावे लागते. पण अशी पद्धत आजची नवी नाही. स्वामी विवेकानंदांना अमेरिकेत शिकागोला गेले तेंव्हा ही परिचय पत्र न्यावे लागले होते बरोबर आणि ते भारतात सुद्धा फिरले तेंव्हाही व्यवस्थे साठी ज्यांच्या कडे जायचे त्यांना कोणाचे तरी ओळखपत्र घेऊन जावे लागत होते.
  
                            

   हिमालयात भ्रमणासाठी जातांना ते आधी हिमालय ते तिबेट असा प्रवास करणार होते. त्यामुळे नेपाळ मध्ये असलेल्या आपल्या मित्राचे रीतसर परिचय पत्र घेऊन जायचे म्हणजे तिबेट मध्ये प्रवेश मिळण्यात अडचण येणार नाही.कारण अखंडानंदांना तशी एकदा अडचण आली होती. पण काही कारणामुळे हा मार्ग  बदलून त्यांनी अल्मोरा मार्गाने जायचे ठरवले. पहिला मुक्काम भागलपूर मध्ये झाला.   
       
                          
    भागलपुर मध्ये पोहोचल्यावर थकले भागलेले स्वामीजी व अखंडांनंद गंगेच्या काठी उभे होते. शेजारीच राजा शिवचन्द्र यांचे निवास होते. तेजस्वी संन्याशांकडे तिथले एक प्रतिष्ठित कुमार नित्यानंद सिंग यांचे लक्ष गेले. त्यांनी ती रात्र दोघांना घरी ठेऊन घेतले आणि दुसऱ्या दिवशी त्यांना बाबू मन्मथनाथ यांच्याकडे घेऊन गेले. त्यांना वाटले असतील कोणी साधूबैरागी त्यामुळे फार लक्ष दिलं नाही. आणि जेवणं झाल्यावर बौद्ध धर्मावरील इंग्रजीतल पुस्तक वाचत बसले. स्वामीजींनी विचारले की, कोणतं पुस्तक वाचताहात? मन्मथबाबूंनी नाव सांगून विचारलं तुम्हाला इंग्रजी येतं का? स्वामीजी म्हणाले थोडंफार येतं. यानंतर जो संवाद झाला त्यात स्वामीजींनी बौद्ध धर्मावर चर्चा करतांना अनेक इंग्रजी ग्रंथांचे संदर्भ दिले. मन्मथबाबू  चकित झाले. त्यांच्या लक्षात आलं हा तरुण संन्यासी आपल्यापेक्षा हजार पटींनी हुशार आहे.

                             

   आणखी एक दिवस, योगसाधनेवर चर्चा झाली. यावर स्वामीजींनी व्यक्त केलेले विचार मन्मथबाबूंनी यापूर्वी आर्य समाजाच्या स्वामी दयानन्द सरस्वतीं कडून ऐकलेल्या विचारांशी मिळतेजुळते होते. पण यावेळी अजूनही नवीन ऐकायला मिळाले त्यांना. त्यानंतर त्यांनी उपनिषदांचा विषय काढला. स्वत:जवळची उपनिषदावरची पुस्तके समोर ठेवली आणि त्यातील एकेक वचने काढून अर्थ विचारू लागले. स्वामीजींनी दिलेल्या उत्तरामुळे मन्मथबाबू चकितच झाले. स्वामीजींची तर याबाबत मोठी तपस्या आणि साधना होती हे त्यांना माहिती नव्हते.
  
   एकदा स्वामीजी असेच गुणगुणत होते. बाबूंनी लगेच विचारलं तुम्हाला गाणं येतं का? स्वामीजी उत्तरले," अगदी थोडंफार येतं." बाबूंनी आग्रह केल्यामुळे स्वामीजींनी काही गीतं म्हटली. बाबू आश्चर्याने स्तिमित झाले. अरे या संन्याशाला जितकं गहन शास्त्राचं ज्ञान आहे तितकाच संगीतासारख्या कलेवर सुद्धा त्यांचं प्रभुत्व आहे . झालं दुसऱ्याच दिवशी मन्मथबाबूंनी भागलपुर मधल्या संगीतप्रेमींना घरी बोलवलं. त्यात काही संगीत उस्ताद पण होते. रात्री नऊ पर्यन्त कार्यक्रम संपेल असे त्यांना वाटले. पण संगीत श्रवणाच्या आनंदात कोणाला जेवणाखाण्याचे व वेळेचे भान नव्हते उरले. रात्री दोन वाजता कार्यक्रम संपला. सर्वजण तिथेच थांबले आणि दुसऱ्या दिवशी गेले. केवळ आठ दिवसाच्या वास्तव्यात स्वामीजींचे निरासक्त, निसंग, वैराग्यशीलता ,विनम्रता हे विशेष गुण आणि त्यांचे,चर्चांमधून, प्रतिक्रियातून आणि काही प्रसंगातून विविधरंगी आणि समृद्ध व्यक्तिमत्व आपल्याला दिसतं.
   
    एव्हढ्याशा काळातल्या अनुभवावरून मन्मथबाबूंच्या मनावर स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाचा खोलवर ठसा उमटला. खरं म्हणजे ते कट्टर ब्राह्मसमाजी होते. पण या काळात ते आतून बाहेरून पूर्ण बदलले आणि पुन्हा हिंदू धर्माचे चाहते झाले. एव्हढे की पुढे आयुष्यभर दोघांचाही खर्च स्वत: करून स्वामीजींच्या सहवासात वृंदावनला कायमचे राहण्यास तयार झाले. पण स्वामीजींनी त्याला नम्रतेने नकार दिला. इथल्या नाथनगरमध्ये असलेल्या जैन मंदिराला स्वामीजींनी भेट दिली. तिथल्या जैन आचार्यांशी जैन तत्वज्ञानवर चर्चा केली. मन्मथबाबूंकडे राहणारे मथुरानाथ सिन्हा म्हणतात की, " धर्म आणि तत्वज्ञान यावर झालेल्या चर्चेतून ज्ञान आणि अध्यात्मिकता  हे जणू स्वामीजींचे श्वासोच्छवास आहेत आणि त्यांच्या सर्व विवेचनात उत्कट आणि नि:स्वार्थी देशप्रेमाची भावना आहे.
मन्मथबाबू आपल्याला सोडत नाहीत असे पाहून स्वामीजींनी ते घरात नसताना जाण्याचे ठरवले तेंव्हा, बाबू घरी आल्यावर ते पाहून अस्वस्थ झाले आणि लगेच त्यांच्या मागोमाग त्यांना गाठायला निघाले. पण स्वामीजी हिमालयात अल्मोऱ्या पर्यन्त गेले होते. हे ऐकून ते अल्मोऱ्या पर्यन्त गेले तरीही स्वामीजींना ते गाठू शकले नाहीत. शेवटी निराश होऊन मन्मथबाबू भागलपुरला परत आले. स्वामींजीच्या आठवड्याच्या सहवासातून मन्मथबाबूंसारख्या थोडी आध्यात्मिक संवेदनशीलता असलेल्या सुशिक्षित व्यक्तीवर केव्हढा प्रभाव पडला होता याच हे बोलकं उदाहरण आहे. जे स्वामीजींना भेटत ते त्यांचेच होऊन जात.(सर्व फोटो इंटरनेट वरुन साभार) 

© डॉ.नयना कासखेडीकर                                                                                       

ही मालिका ऑडिओ बुक स्वरुपात पण उपलब्ध आहे ,ज्यांना ऐकायची आहे त्यांनी You Tube च्या


या लिंकवर जाऊन हा यू ट्यूब व्हिडिओ बघावा

विचार–पुष्प,भाग २५

 स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका  
                      विचार–पुष्प,भाग २५ 

 
परिव्राजक –३. गाजीपूर  
     
    गाजीपूरच्या लोकांबरोबर स्वामीजींच्या खूप छान वैचारिक चर्चा होत होत्या. आपल्या समाजात दूरवर शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे. आपल्या संस्कृतीतील सत्वांश जाणून घेऊन समाजाला प्रेमाने विश्वासात घेऊन सुधारकांनी सुधारणा घडवून आणली पाहिजे. ती सहज प्रक्रियेतून व्हायला हवी. लादली जाऊ नये. शिक्षणाचा पाया आणि त्यातील तत्वे हिंदू विचारधारेवर आधारित असली पाहिजेत. जे चांगलं आहे ते गौरवपूर्वक मांडलं गेलं पाहिजे. हिंदू धर्मात मानले गेलेले आदर्श नीट समजून घेऊन समाजासमोर ठेवले पाहिजेत. असं समाजसुधारकांना बजावून सांगताना स्वामीजी म्हणतात, “ध्यानात ठेवा हिंदू धर्म हे काही केवळ चुकीच्या गोष्टींचे एक गाठोडे नाही. खोलवर बुडी मारा, तुमच्या हाताला अनमोल रत्ने लागतील. परक्या लोकांची संस्कृती आणि चालीरीती, यांच्या डामडौलावर भुलून जाऊ नका. आपली ही मातृभूमी कशी आहे ते समजून घ्या. आपल्या भारतीय समाजाचा जीवनहेतु काय आहे आणि त्याच्या अस्तित्वाची प्रेरणा कशात आहे, याचा तुम्ही शोध घ्या. आपल्या संस्कृतीतील आध्यात्मिक आदर्श आपण विसरून गेलो आहोत, हे आपले खरे दारिद्र्यपण आहे. आपल्या ठायी स्वत:च्या अस्मितेचे भान उत्पन्न होईल तेंव्हाच आपले सारे प्रश्न सुटतील”.
                                

    इथेच गाजीपूरमध्ये स्वामीजींच्या विचारांना एक आकार येत चालला होता. सतत आध्यात्मिक विचार तर होतेच डोक्यात, पण देशाच्या वर्तमानस्थितीबद्दल त्यांना चिंता सतावत होती आणि त्यातून बाहेर येण्याचा मार्ग शोधताना भविष्यातला दृष्टीकोण आकार घेत होता असे दिसते.
       
    गाजीपूरला काही इंग्रज अधिकारीही होते. त्यातील दोघांशी स्वामीजींचा संवाद होत होता. अफू विभागात रॉस म्हणून एक अधिकारी होते, त्यांना हिंदू धर्म व त्यातले देवदेवता, उत्सव, सामाजिक चालीरीती, याचे खूप कुतूहल होते. काही रूढी आणि आचार उघड उघड सदोष होते, अशा आचारांना हिंदूच्या धर्मग्रंथात काही आधार आहे का याचं त्यांना कोडं पडलं होतं. मग स्वामीजींनी प्रतिसाद देत, धार्मिक कल्पनांचा विकास, आणि सामाजिक आचारांच्या मागे उभी असणारी आध्यात्मिक बैठक त्यांनी सांगितली. हे ऐकून हिंदू धर्मातला व्यापक दृष्टीकोण रॉस यांच्या लक्षात आला.
       
    एकदा, रॉस यांनी तिथले जिल्हा न्यायाधीश पेंनिंग्टन यांची स्वामीजींशी भेट घडवून आणली. स्वामीजींनी त्यांच्या बरोबर हिंदू धर्माचे पुनरुत्थान, आजच्या विज्ञानामुळे होऊ घातलेले परिवर्तन, योगाच्या मागचा शास्त्रीय विचार, सन्याशांचा संयम आणि मनोनिग्रह यावर आधारित जीवननिष्ठा यावर संवाद साधला. स्वामीजींचा, मुलभूत मानवी शक्ति, प्रेरणा आणि साधना याबद्दलचा वेगळा दृष्टीकोण  पेंनिंग्टन यांना खूप आवडला. त्यांना वाटलं याचं तर आधुनिक मानसशास्त्राच्या आधारे विश्लेषण होऊ शकतं की. ते एव्हढे प्रभावित झाले की, ते म्हणाले, “हिंदूंचा धर्म आणि त्यांचा सामाजिक आचार याविषयीचे आपले विचार तुम्ही इंग्लंडला जाऊन तेथील विचारवंतांपुढे ठेवले पाहिजेत.”
   
     “वादे वादे जायते तत्वबोध:” सतत तत्वचिंतन सुरू असल्याने स्वामीजींचे हे विचार  आतापर्यंत फक्त गुरुबंधु, आपल्या समाजाचे लोक यांच्यापुरताच मर्यादित होते. आज मात्र ते निराळ्या संस्कृतीत वाढलेल्या विचारवंतांपुढे मांडल्यामुळे त्याचे परिमाणच बदलले होते.

 स्वामीजींच्या या समाधानकारक चर्चा तर चालू होत्याच, पण गाजीपूरला येण्याचा त्यांचा मूळ उद्देश होता, श्रेष्ठ आध्यात्मिक विभूति पवहारी बाबा यांची भेट घेणं. न्याय, वेदान्त, व्याकरण अशा सर्व शास्त्रांचा अभ्यास, भारतभर केलेला प्रवास, संस्कृत बरोबर इतर भाषांचे ज्ञान, सद्गुरूंकडून योगमार्गाची मिळालेली दीक्षा, त्याप्रमाणे वर्षानुवर्षे केलेली साधना आणि शेवटी शेवटी चालू असलेला निराहार अवस्थेतला एकांतवास व मौनाचा स्वीकार अशा तपश्चर्येचं तेज असणारे पवहारी बाबा. स्वामीजींची यांची भेट घेण्याची तीव्र इच्छा होती. त्यानंतर ते वाराणशी करून वराहनगर मठात आले. कारणही तसच होतं, बलराम बाबू यांचं निधन झालं होतं, त्या पाठोपाठ सुरेन्द्र नाथांचे पण निधन झाले, त्यांच्या आध्यात्मिक परिवारात खूप मोठी पोकळी निर्माण झाली.
    
बलराम बसू 
  



    वराहनगर मठाची  व्यवस्था लावून, नंतर त्यांना हिमालयात जाऊन गढवाल च्या शांत परिसरात साधना करण्याची इच्छा होती. यावेळी त्यांचा भ्रमणाचा काळ जवळ जवळ सलग पावणेतीन वर्ष होता. आणि प्रदेश थेट हिमालयापासून ते कन्याकुमारी पर्यंतचा, विविध प्रांत, भाषा, प्रदेश, अनेक प्रकारच्या व्यक्ती असा विविधतेने नटलेल्या भारताच्या भागात त्यांनी संचार केला. त्यांनी गाजीपूरला समाजसुधारकांना म्हटलं होतं की, आपली मातृभूमी समजून घ्या त्याप्रमाणे ते ही याच उद्देशाने स्वदेश संचाराला निघाले होते.

 © डॉ.नयना कासखेडीकर                                                                                       

ही मालिका ऑडिओ बुक स्वरुपात पण उपलब्ध आहे ,ज्यांना ऐकायची आहे त्यांनी You Tube च्या


 या लिंकवर जाऊन हा यू ट्यूब व्हिडिओ बघावा. 
    

     

Tuesday, 28 July 2020

विचार–पुष्प, भाग २४.

 स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका  
                      विचार–पुष्प, भाग २४.  

     
                        परिव्राजक – २. उत्तर भारत
       
    हाथरस इथं स्वामीजी एकटे आले होते. मात्र आता तिथून निघताना बरोबर शरदचंद्र होते. हृषीकेशला जाताना सहारनपूरला उतरून साडेतीनशे किलोमीटर पायी अंतर कापायचे होते. स्वामीजींना सवय होती पण शरदचंद्र यांना हे सर्व परिवर्तन नवीन होते. सवय नव्हती. अंगावर सामान घेऊन पायी चालणे, जागा मिळेल की नाही विश्रांतीसाठी, याची खात्री नाही, मुक्काम कुठे असेल माहिती नाही, अशा अनिश्चित परिस्थितीत मध्ये प्रवास सुरू होता. तो त्यांना झेपत नव्हता. ओझं घेऊन चालू शकत नव्हते, स्वामीजींच्या हे लक्षात आलं आणि ते सामान त्यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतलं. शरदचंद्रांच्या लक्षात आलं की, हिमालयातील भ्रमणासाठी आपण घेतलेले बूट त्या सामानात आहेत. खूप शरमल्यासारखं झालं त्यांना. आपण ज्यांना गुरु मानतो त्यांच्याच खांद्यावर आपले बूट? पण स्वामीजींना त्याचं काहीही वाटलं नव्हतं.

   नदी ओलांडताना तर बरं नसलेल्या शरदचंद्रांना घोड्यावर बसवून स्वत: घोड्याबरोबर पायी चालत गेले. काही वेळा पायी चालताना स्वामीजींनी शरदचंद्रांना खांद्यावर घेऊन प्रवास केला. अशी स्वामीजींनी आपली सेवा केली यामुळे त्यांचा स्वामीजींबद्दलचा आदरभाव आणखीन वाढला. त्या विचाराने मन भरून आलं. माणुसकीच्या दृष्टीकोणातून आपल्या शिष्याची जबाबदारी आणि काळजी घेणं हे स्वामीजींनी आपलं कर्तव्य मानलेलं दिसतं. एकूणच स्वामी सदांनंदांचे मठातले आगमन म्हणजे रामकृष्ण संघाच्या पुढच्या विस्ताराची नांदी ठरली होती.   
                               

   स्वामी विवेकानंदांना हे कार्य उभं करतांना सुरुवातीपासूनच अनेक खाचखळग्यातून व प्रसंगातून जावं लागलं. मठांमध्ये वेद वाड:ग्मयाचा अभ्यास झाला पाहिजे असं स्वामीजींचं मत होतं. वेदांच्या अभ्यासाकडे बंगाल मध्ये फार दुर्लक्ष झालं होतं. असं त्यांच्या लक्षात आल होतं. वेदांच्या अभ्यासासाठी एक उत्तम सोय असलेली संस्था उभी करावी असं त्यांना वाटत होतं. ते स्वत: भारतभ्रमण करतांना कोणी संस्कृत व्याकरणाचा पंडित भेटला की त्यांच्याकडून पाणीनीच्या व्याकरणाचे धडे घेत असत. भारतीय संस्कृतीचा वारसा स्पष्ट करत असताना त्यांच्या डोळ्यासमोर नेहमीच वेदातील ज्ञानकांडाचा भाग आणि उपनिषदे असत. कर्मकांडांचा अतिरेक झाल्यामुळेच समाजरचनेत दोष निर्माण झाला आणि त्यामुळेच संस्कृतीचा र्‍हास झाला असे त्यांचे निरीक्षण होते.
   
   स्वामी विवेकानंद असेच बिहार आणि उत्तरेतील भागात खेड्यापाड्यातून पायी फिरले. खूप तीर्थाटन झाल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आचार-विचार, रिती-नीती, यांचा जवळून परिचय झाला. त्यांना दिसलं की जनतेत धर्माबद्दल आस्था आहे पण सामाजिक जीवनात गतीशीलता नाही. दोष धर्माचा नाही पण धर्माचा धंदा झाल्यामुळे समाजजीवन पंगु झालं आहे. अशा अनेक गोष्टी त्यांच्या लक्षात येत होत्या. त्यामुळे पुढे काय योजना करायची याचा विचार सतत त्यांच्या मनात चालू असे. मध्ये मध्ये वराहनगरला मठात पण फेरी व्हायची. सर्व गुरु बंधु एकमेकांना भेटल्यामुळे सर्वजणच आनंदी व्हायचे. पुन्हा आपापल्या ठरलेल्या भ्रमणास निघायचे.

           
   कलकत्याहून ते पुढे गाझीपूरला जाताना मधेच अलाहाबादला महिनाभर थांबले. इथेही बंगाली समाज स्वामीजींचे विचार आणि त्यांचे व्यक्तिमत्व यामुळे भारावून गेला होता. समाजव्यवस्थेतील दोष आणि विषमता यावर स्वामीजींनी इथेही टीका केली होती.

   स्वामीजी गाझीपूरला गेले आणि त्यांचा कलकत्त्यातलाच मित्र बाबू सतीशचंद्र मुखर्जी यांच्याकडे राहिले. इथेही अलाहाबादसारखाच बंगाली समाज गोळा झाला. इथे त्यांना वेगळाच अनुभव आला. इथल्या बंगाली समाजावर पाश्चिमात्य सुखवादी संस्कृतीचा मोठाच पगडा आहे असे त्यांनी पहिले. भारतीय संस्कृतीतला त्याग, सेवा, संयम अशा उदात्त असलेल्या जीवन मूल्यांचा पाश्चात्य संस्कृतीच्या झगमगाटामुळे आपल्या देशबांधवांना साफ विसर पडला आहे. याचे स्वामीजींना दु:ख झाले.
       
   हे सगळे पाहता आजही पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा आपल्या समाजावर दिसतोच आहे. मुख्य म्हणजे संस्कृती वर प्रभाव पडून काही बदल होत आहेत. आज परिस्थिति तर खूप वेगळी आहे. त्याकाळात इंग्रजांचे राज्य होते त्यामुळे हा प्रभाव होता. आता तर सारं जगच एक खेडं झालं आहे. अंतर खूप असलं तरी तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलं आहे. पण आज कोरोंना सारख्या साथी नं सर्व जगालाच एका पातळीवर आणून ठेवलं आहे. पण त्याग, सेवा व संयम ही आपली भारतीय मूल्येच आज यातून बाहेर पडायला आपल्याला मदत करताहेत असं दिसतंय.

© डॉ.नयना कासखेडीकर                                                                                       

ही मालिका ऑडिओ बुक स्वरुपात पण उपलब्ध आहे ,ज्यांना ऐकायची आहे त्यांनी You Tube च्या


 या लिंकवर जाऊन हा यू ट्यूब व्हिडिओ बघावा. 
         

Monday, 27 July 2020

विचार – पुष्प,भाग -२३.


स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका  
                       विचार – पुष्प,भाग -२३. 



परिव्राजक –१.  केल्याने देशाटण ..

   तीर्थंभ्रमणाला निघायच्या आधी पण नरेंद्रनाथ आंटपूर, वैद्यनाथ, शिमूलतला इथे कित्येकदा आले होते. उजाडल्यानंतर सूर्य किरणे सर्व दिशांना पसरतात हे सांगायची गरज नसते. तसे स्वामीजी जिथे जिथे जातील तिथे तिथे प्रभाव पाडत असत. असाच अनुभव ते फिरलेल्या प्रत्येक प्रांतात दिसतो. बिहार प्रांत फिरत फिरत ते हिंदू भारतभूमीचं हृदय समजल्या जाणार्‍या काशीला आले. इथे ते संस्कृत भाषेचे पंडित आणि साहित्य व वेदांत पारंगत असलेले सद्गृहस्थ श्री प्रमदादास मित्र यांच्याकडे राहिले. स्वामीजींना त्यांच्या विद्वत्तेबद्दल आदरभाव वाटू लागला. पुढे पुढे तर ते वैदिक धर्म आणि तत्वज्ञान याबद्दल काही शंका असली की ते प्रमदादास यांना पत्र लिहून विचारात असत. आपले आजोबा दुर्गाप्रसाद हे संन्यास घेतल्यावर काशीत आले होते. श्रीरामकृष्ण पण इथे येऊन गेले होते. तिथे मद्रासी, पंजाबी, बंगाली, गुजराथी, मराठी हिंदुस्तानी अशी प्रभृती सर्वजण, आचारांची भिन्नता असूनही एकाच उद्देशाने विश्वेश्वराच्या मंदिरात एकत्र येत असत. यात नरेंद्रनाथांना या विविध लोकांमधला ऐक्याचा विशेष गुण भावला. म्हणूनच त्यांना सगळीकडे फिरून भारत जाणून घ्यावसा वाटला होता.
काशी 
    शिवाय इंग्रजांची सत्ता, गुलामी असताना वर्तमान अवस्थेत, देशातील आध्यात्मिक संस्कृती कशी आहे, सामान्य लोक कसे जगताहेत? शिक्षणाची काय परिस्थिति आहे? सनातन धर्म सगळीकडे कसा आहे? याची सगळीकडे हिंडून माहिती करून घ्यावीशी वाटली. त्यासाठी ते इथून निघून कन्याकुमारी पर्यन्त शहरे, खेडी, विविध लोक, शेतकरी, गरीब, दीन दुबळे, राजे रजवाडे, संस्थानिक आणि जे जे आवश्यक त्यांच्या भेटी घेत अवलोकन करता करता भ्रमण करत होते.
                                  
     उत्तरेत फिरून झाल्यावर ते शरयू तीरावरच्या अयोध्येला येऊन पोहोचले. काशी आणि अयोध्या ही  धर्मक्षेत्र,त्यामुळे स्वामीजींचे आध्यात्मिक मन तिथे रमले. अयोध्या जिच्या मातीशी सूर्यवंशी राजांच्या गौरवाची स्मृती जोडलेली आहे. शरयू नदीच्या तीरावरून आणि घाटावरील विविध मंदिरातून फिरतांना त्यांच्या डोळ्यासमोर प्रभू श्रीरामचंद्रांचे चरित्रच उभे राहिले. आदर्श राजा, आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श भाऊ, अशा प्रभू श्रीरामचंद्राच्या अयोध्येत आल्याबरोबरच त्यांना लहानपणची रामसीतेची भक्ती, रामायण प्रेम, वीरभक्त श्री हनुमानवरची गाढ श्रद्धा आणि आईच्या तोंडून ऐकलेल्या रामाच्या कथा सारे सारे आठवले असणारच. काही दिवस इथे त्यांनी रामायत संन्याशांच्या समवेत श्रीरामनामसंकीर्तनात घालवून पुढे ते ऑगस्ट१८८८ मध्ये लखनौ- आगरा मार्गाने पायी पायी चालत वृंदावनच्या दिशेने निघाले.     
        
लखनौला त्यांनी बागा, मशिदी, नबाबाचे प्रासाद बघितले. आग्र्याला आल्यावर तिथल्या शिल्प सौंदर्याचा जगप्रसिद्ध नमुना ताजमहाल मोगलकालीन इमारती, किल्ले पहिले.  मोगल साम्राज्याचा इतिहास त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला. लखनौ आणि आग्रा या ऐतिहासिक स्थळं सुद्धा  त्यांच्या मनात भरली. कारण ती भारताच्या इतिहासाच्या पर्वाची महत्वाची खूण होती आणि स्वामीजी त्याबद्दल पण जागरूक होते. म्हणून एक वैभवशाली साम्राज्याची स्मृती म्हणून ते पाहत होते.  


शिवाची काशी पाहिली, श्रीरामची अयोध्या पाहिली आता भगवान श्री कृष्णाच्या वृंदावनला स्वामीजी  पोहोचले. राधा कृष्णाची लीलाभूमी असलेल्या वृंदावनात, मर्यादित परिसरात असलेले विविध प्रकारचे, भिन्न काळात बांधले गेलेले वास्तूकलेचे, अनेक मंदिरांचे नमुने त्यांना पाहायला मिळाले. वृंदावनला ते बलराम बसुंच्या पूर्वजांनी बांधलेल्या कुंजामध्ये राहिले. तिथे यमुनेच्या वळवंटात असो की भोवताळच्या परीसरात असो सगळीकडेच, श्रीकृष्णाच्या बासरीचा मधुर ध्वनी येतोय असे वाटावे अशा काव्यात्मक आणि भक्तिपूर्ण वातावरण त्यांनी अनुभवले. गोवर्धन पर्वताला त्यांनी प्रदक्षिणा घातली. तेंव्हाच त्यांनी मनाशी संकल्प केला की, कोणाकडेही भिक्षा मागायची नाही. कोणी आपणहून आणून दिले तरच त्या अन्नाचा स्वीकार करायचा. हे बिकट व्रत त्यांनी घेतले. एकदा तर त्यांना पाच दिवस उपाशी राहावे लागले होते. पण इथे त्यांनी दोन वेळा परमेश्वर भक्तीचा ईश्वरी अनुभव घेतला आणि श्रीकृष्णाची भक्ती आणखीनच दृढ झाली. 

   पुढे ते हरिद्वारला गेले. वाटेत जाता जाता ते हाथरस च्या स्थानकावर बसले असताना, त्यांना थकलेल्या अवस्थेत स्थानकाचे उपप्रमुख असलेले शरदचंद्र गुप्त यांनी पाहिले. आणि, “स्वामीजी आपल्याला भूक लागलेली दिसते आपण माझ्या घरी चलावे” अशी विनंती केली. स्वामीजींनी लगेच हो म्हटले आणि त्यांच्या घरी गेले. स्वामीजींचे व्यक्तिमत्व बघून शरदचंद्र गुप्त आकर्षित झाले होते , त्यांनी स्वामीजींना काही दिवस इथे राहावे असा आग्रह केल्याने ते खरच तिथे राहिले. सर्व बंगाली लोक संध्याकाळी एकत्र जमत. आपला धर्म आणि समाज यावरील सद्यस्थितीबद्दल  स्वामीजी बोलत. आपल्या मधुर आवाजात गीतं म्हणत. येणारे सर्व बंगाली मोहित होऊन जात. त्यांच्यातील भांडणे जाऊन एकोपा निर्माण झाला. 

शरद चंद्र गुप्त ,स्वामीजींचे पहिले शिष्य 
एकदा चिंतेत असताना शरदचंद्रांनी स्वामीजींना पाहिलं आणि विचारलं, “आपण एव्हढे कसल्या विचारात आहात?” स्वामीजी म्हणाले, “मला खूप काम करायचं आहे. पण माझी शक्ती कमी. काम मोठं आहे. मातृभूमीचं पुनरुत्थान घडवून आणायच आहे. तीचं आध्यात्मिक सामर्थ्य क्षीण झालं आहे. सगळा समाज भुकेकंगाल आहे. भारत चैतन्यशाली झाला पाहिजे. अध्यात्मिकतेच्या बळावर त्यानं सारं जग जिंकलं पाहिजे. अशा प्रकारचे संवाद होत होते. चर्चा होत होत्या. काही दिवसांनी  स्वामीजी तिथून निघतो म्हटल्यावर, शरदचंद्र जाऊ नका म्हणून विनवणी करू लागले आणि मला आपला शिष्य करून घ्या असेही म्हणू लागले. तुम्ही जिथं जाल तिथं मी तुमच्या मागोमाग येईन हा त्यांचा दृढ निश्चय ऐकून, “शेवटी तुम्ही माझ्याबरोबर येण्याचा आग्रहच धरता आहात तर घ्या हे भिक्षा पात्र आणि स्थानकातले जे हमाल आहेत त्यांच्या दरात जाऊन भिक्षा मागून आणा” असे स्वामीजी म्हटल्याबरोबर, शरदचंद्र तडक उठले आणि भिक्षा पात्र घेऊन सर्वांकडून भिक्षा मागून आणली. स्वामीजी अत्यंत खुश झाले. त्यांनी शरदचंद्रांचा शिष्य म्हणून स्वीकार केला. असे शरदचंद्र गुप्त हे स्वामीजींचे पहिले शिष्य झाले, आणि मातापित्यांचा आशीर्वाद घेऊन, नोकरीचा राजीनामा देऊन, स्वामीजीं बरोबर ते हाथरस सोडून हृषीकेशला आले. त्यांचे नाव स्वामी सदानंद असे ठेवण्यात आले. असा सुरू होता स्वामीजींचा प्रवास .

  © डॉ.नयना कासखेडीकर                                                                                      

ही मालिका ऑडिओ बुक स्वरुपात पण उपलब्ध आहे ,ज्यांना ऐकायची आहे त्यांनी You Tube च्या


या लिंकवर जाऊन हा यू ट्यूब व्हिडिओ बघावा.