Tuesday, 20 July 2021

संत एकनाथ

 

                                               || निर्गुण वारी अभंगमाला ||

                                        संत एकनाथ (संत भानुदास यांचे पणतू)

(जन्म- १५३३ पैठण, मृत्यू- १५९९-पैठण,फाल्गुन वद्य षष्ठी)

आई- रुक्मिणी , वडील- सूर्यनारायण.

 

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा…. 

समाधि न ये ध्यानाहरली भवचिंता ।।

`दत्त दत्तऐसें लागलें ध्यान। हारपले मन झाले उन्मन
 `मी-तूपणाची झाली बोळवण। एका जनार्दनीं श्रीदत्तध्यान
।।

    देवपूजा करताना किंवा गणेश उत्सवात आपण नेहमीच आरती संग्रहातील पाच पैकी एक आरती दत्ताची म्हणतोच. उत्पत्ती, स्थिति आणि लय ही तीनही तत्व एकाच ठिकाणी असलेल्या दत्तदर्शनाचं हे वर्णन केलं आहे नाथ महाराजांनी म्हणजे संत एकनाथांनी. असं म्हणतात श्री दत्तात्रेयांनी एकनाथांना आपल्या मूळ रूपात दर्शन दिले होते. समाधी अवस्थेपर्यंत पोहोचलेल्या एकनाथांना हा अद्वैताचा अनुभव आला होता. या दत्तारतीमध्ये ते सर्व भाव प्रकट झाले आहेतच, पण आता आपल्या सर्वांना माहिती असलेल्या त्यांच्या रचना म्हणजे ओंकार स्वरूपा.. , वारियाने कुंडल हाले..., काया ही पांढरी..., गुरु परमात्मा परेशु..., नको वाजवू श्रीहरी मुरली रे ...., माझे माहेर पंढरी...., रामनाम ज्याचे मुखी...., रुपे सुंदर सावळा गे माये..., आणि खूप प्रसिद्ध असलेले विंचू चावला... भारुड आणि सत्वर पाव ग मला..., दादला नको ग बाई ..., हे लोकगीत. या सर्वच रचना आपल्याला खूप आवडतात कारण त्या पटतात. त्यातले भाव मनाला भिडतात. सगळ्या रचना गेय आहेत.श्रीकृष्णा च्या पदांमध्ये सुंदर, भावपुर्ण  शब्दचित्र रंगवले आहे. अशा अत्यंत विविध विषयांवर वाङ्गमय निर्मिती करून संत साहित्य परंपरा पुढे नेलेले संत एकनाथ महाराष्ट्रातले एक श्रेष्ठ संत कवी. त्यांचा जन्म पैठणचा. एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, ज्ञानेश्वरी शुद्धीकर, रुक्मिणी स्वयंवर या वाङ्गमयाचे निर्माता.  

राम नाम ज्याचें मुखी ।
तो नर धन्य तिनी लोकीं ॥१॥

राम नाम वदता वाचें ।
ब्रह्म सुख तेथें नाचे ॥२॥

राम नामें वाजे टाळी ।
महादोषां होय होळी ॥३॥

एकनाथ लहान असतानाच त्यांचे आई,वडील निवर्तले. पुढे त्यांचा सांभाळ आजोबा चक्रपाणी यांनी केला. चक्रपाणी यांचे वडील म्हणजे सूर्योपासक संत भानुदास. ते कसे विठ्ठल भक्त होते, त्यांनी कर्नाटकात श्रीकृष्णदेवरायांनी नेलेली पंढरपूरची श्री विठुरायाची मूर्ती पंढरीत परत आणली. हा इतिहास याच अभंगमालेतील संत भानुदास या लेखात पाहिला. त्याच घरातले संत एकनाथ, एकनाथ तल्लख बुद्धीचे होते. आजोबांनी  त्यांची मौंज करून दिली आणि नंतर त्याला शिक्षण देण्यासाठी विद्वान पंडितांची नेमणूक केली. अध्ययन सुरू होते. ईश्वरभक्तीचे वेड बालवयापासूनच त्यांना होते. समाजाला मार्गदर्शन करायचं तर त्या मार्गदर्शकला ईश्वराची प्रचिती यायला हवी, नाहीतर नुसती पोपटपंची होईल असा दृढ समज एकनाथांचा होता. पण त्यासाठी ईश्वरकृपा आवश्यक आहे आणि ती गुरूंशिवाय मिळणार नाही. म्हणून अशा समर्थ गुरूंच्या शोधात एकनाथ होते. एकदा मंदिरात गेले असताना याच विचारात ते चिंतन करत होते तेंव्हा, एका वृद्ध गृहस्थाने त्यांना सांगितले की, “तुला आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर, देवगिरीचे किल्लेदार जनार्दन स्वामी यांच्याकडे जा”. मग पैठणहून एकनाथ तहान-भूक विसरून पायी देवगिरीला पोहोचले.      

वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांनी देवगिरी येथील जनार्दन स्वामींकडे जाऊन शिष्यत्व घेतले. हा दिवस फाल्गुन वद्य षष्ठी होता. जनार्दन स्वामी दत्तोपासक होते.सुरूवातीला हा मुलगा रुसून घरातून पळून आला आहे असे त्यांना वाटले पण चौकशी केल्यानंतर एकनाथांनी संगितले की, “आपल्या चित्ताला अनुताप झाल्यामुळे आपण आलो आहोत”. त्यांच्याकडे सहा वर्षे राहून संस्कृत शास्त्रे, पुराणे, अमृतानुभव, ज्ञानेश्वरी सारखे आध्यात्मिक ग्रंथ अध्ययन आणि योगाभ्यास केला. पुढे सात वर्षे तीर्थयात्रा केली. यावेळी काही दिवस गुरु जनार्दन स्वामीही त्यांच्या बरोबर यात्रेस होते.  

  तीर्थ यात्रेनंतर गुरूंच्या आदेशाप्रमाणे ते पैठणला येऊन गृहस्थाश्रमात राहिले. याच काळात आजी आजोबांनी त्यांचा विवाह गिरीजा यांच्याशी लावून दिला. संसार सुरू झाला. त्यांचा परमार्थिक दिनक्रम शिस्तबद्ध होता. संसारी जीवनातही मन ईश्वरमग्नच असे. सकाळी लवकर उठून चिंतन, गोदावरी स्नान, गीतेचे पारायण, जेवणानंतर ज्ञानेश्वरीवर प्रवचन, रात्री देवळात लोकांसमोर कीर्तन असा दिन क्रम असायचा. त्यांना गोदावरी आणि गंगा या दोन मुली आणि हरिपंडित हा मुलगा होता. हरिपंडितने नंतर नाथांचे शिष्यत्व पत्करले. याच हरीपंडितांनी नाथांच्या पादुका दरवर्षी आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे नेण्याची सुरुवात केली.

   तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांनी जी भक्तिमार्गाची प्रतिष्ठापना केली होती ती पुढच्या काळात यवनांच्या सत्तेत क्षीण झाली होती, त्याचे पुनरुज्जीवन संत एकनाथांनी केले. मध्ये अडीचशे वर्षांचा काळ गेला. भक्तीपंथाची त्यांनी शास्त्रोक्त प्रतिष्ठापना केली असे म्हणतात. संत ज्ञानेश्वरांची समाधी अडीचशे वर्षांनंतर लोकांच्या विस्मरणात गेली होती ती एकनाथांनी शोधून काढली, १५८३ मध्ये समाधीचा चौथरा आणि गाभारा एकनाथांनी बांधून जीर्णोद्धार केला. आळंदीची वारी पुन्हा सुरू केली. १५८४ मध्ये ज्ञानेश्वरीची संहिता शुद्ध केली आणि ती शुद्ध प्रत लोकांना दिली. म्हणूनच त्यांना मराठी भाषेतले पहिले संपादक म्हटले जाते. लोकोद्धारासाठी त्यांनी लेखणी हाती घेतली आणि लोकभाषेतून, बोली भाषेतून भारुड, अभंग, स्फुटे लिहिली. दोनशे पेक्षा जास्त हिन्दी भाषेत त्यांनी रचना लिहिल्या. अंधश्रद्धा आणि जातीयतेच्या विरोधात त्यांनी लिहिले आणि प्रत्यक्ष जीवनही जगले. स्वधर्म, स्वराज्य आणि स्वराष्ट्र याविषयी समाज अज्ञानी होता. समाज सुधारण्यासाठी एकनाथांनी जगदंबेला सद घातली बये दार उघड..  म्हणत, रूढी आणि परंपरांवर भारुडातून प्रहार केले. सामान्य लोकांना ज्ञानाच्या मार्गापेक्षा भक्तिमार्ग सोपा आहे, मोक्षासाठी तो पुरेसा आहे असे त्त्यांनी सांगितले आहे.

चतु:श्लोकी भागवत  ही नाथांची पहिली रचना. भागवत पुराणाच्या नवव्या अध्यायातील श्लोकांवरील हे भाष्य १०३६ ओव्यांचे आहे. आध्यात्मिक स्वरुपाच्या स्फुटात हस्तामलक वरील ६७४ ओव्यांची रसाळ  टीका ,शुकाष्टक हे संस्कृत अष्टका वरील ४४७ ओव्यांचे विवरण, ४० हजार ओव्यांचे भावार्थ रामायण लिहिले त्याचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. लघु गीता ,स्वात्म बोध, हरिपाठ, एकनाथी भागवत, ही एकनाथांची सर्वश्रेष्ठ रचना मनाली जाते. हे चिरंजीवी पद, आनंदलहरी, अनुभवानंद ,अभंग, गौळणी, भारुडे त्यांनी लोइहिले . रुक्मिणी स्वयंवर हे भागवत संप्रदायातील पहिले आणि पारंपरिक आख्यान समजले जाते. भावार्थ रामायण मध्ये त्यांनी बाल अयोध्या, अरण्य, किष्किंधा, सुंदर ही कांडे लिहिली आहेत. सहावे युद्ध कांड अर्धवट लिहून झाले. कारण त्यांनी यावेळीच आपण समाधी घेणार असल्याचे जाहीर केले.  

यावरील एक प्रसंग आहे, गावोबा हा गोदाकाठच्या कुलकर्ण्यांचा मुलगा. पुरणपोळी आवडते म्हणून रोज त्यासाठी आईकडे हट्ट करणारा. परिस्थितीमुळे रोज पुरण पोळी देणं शक्य नसल्याने, आईने त्याला नाथांकडे पाठवले आणि हरिपंडिताप्रमाणे यालाही आपण सांभाळावे असे गिरीजा बाई आणि नाथांना सांगितले. गावोबास आता रोज पुरण पोळी मिळू लागली. तिथे पडेल ते काम तो करत असे. थोडासा वेडसर होता. पण रोज नाथांचे कीर्तन ऐकायचा. नाथांनी त्याला मंत्रोपदेश दिला तेंव्हा तो म्हणाला मी एकनाथ या शब्दाशिवाय दुसरा मंत्र म्हणणार नाही. आणि जेंव्हा भावार्थ रामायणाच्या युद्धकांडाचा ४५वा भाग पूर्ण होण्याधीच नाथांनी समधीचा निर्णय जाहीर केला, तेंव्हा ते लिहिणार्‍या एका रामायण कर्त्याने त्यांना अकरा दिवस मागितले होते. तेंव्हा नाथांनी मरण अकरा दिवस लांबवले होते आणि सांगितले की मी जरी नसलो तरी राहिलेले रामायण गावोबा पूर्ण करेल. नाथांनी विनोदच केला असे वाटून लोक हसले. पण नाथ जे बोलतात ते खरे होतेच. नाथांनी गावोबाच्या मस्तकावर हात ठेवला आणि आश्चर्य म्हणजे गावोबाने नाथांसमोरच ४५ वा अध्याय लिहून काढला. हे लिखाण नाथांचे कोणते आणि गावोबाचे कोणते हा फरक सुद्धा लक्षात येत नाही. असे अनेक प्रसंग चरित्रात दिले आहेत.            

याशिवाय त्यांनी बहुजन लोकांसाठी पुराणकथा लिहिल्या, त्यात तुळशी माहात्म्य, सीता मंदोदरीची एकात्मता, हळदुली आणि कृष्णदान या श्रीकृष्ण कथा, ध्रुव, प्रल्हाद, उपमन्यु, सुदामा यांची नाट्यमय लघु चरित्र कथा, संतांच्या संक्षिप्त जीवनकथा लिहिल्या. १२५ विषयांवर त्यांनी जवळजवळ ३०० भारुडे लिहिली आहेत. त्यांच्या अभंगाचे विषय गुरुभक्ती, परमार्थ, सामाजिकता असे आहेत. एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा होती. एका जनार्दन म्हणून स्वत:चा ते उल्लेख करीत.

औरंगाबाद /संभाजीनगर जिल्ह्यात पैठण येथे नाथषष्ठीचा सोहळा म्हणजे महाराष्ट्रातील दुसर्‍या क्रमांकाची यात्रा समजली जाते. पंढरपूर च्या खालोखाल इथे भाविक येतात. मोठा उत्सव होतो. पैठण हे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते.

    एकनाथांची विठ्ठलभक्ती एवढी श्रेष्ठ होती की साक्षात पांडुरंग श्रीखंड्याच्या रूपाने पाण्याच्या कावडी एकनाथांच्या घरी आणत असत अशी श्रद्धा आहे. पाण्याचा तो हौदही या वाड्यात अजून आहे. मंदिराच्या गाभाऱ्याध्ये एकनाथांच्या पूजेतला बाळकृष्ण ठेवला आहे. नाथषष्ठीचा इतिहास आहे. फाल्गुन वद्य षष्ठीला पाच घटना घडल्या होत्या। नाथ स्वत: आपल्या गुरुंचा जन्मदिवस व पुण्यतिथी म्हणून यादिवशी उत्सव साजरा करीत. पुढे नाथांनीही ह्याच दिवशी जलसमाधी घेतल्याने श्रीएकनाथषष्ठी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येवू लागला.

संत एकनाथांच्या काही रचना

काम क्रोध लोभ दंभ मद मत्सर
षड् वैरी तत्पर हे चि येथें,
क्षुधा तृषा मोह शोक जरा मरण
षड् ऊर्मि पूर्ण देही हे चि
आशा मनीषा कल्पना इच्छा तृष्णा वासना
हे अठरा गुण जाणा देहामाजीं
एका जनार्दनी त्यजुनि अठरा
तो चि संसारामाजीं शुध्द

भावार्थ:
अनिवार वासना, रागीटपणा, हवरटपणा, दांभिकपणा,गर्विष्टपणा, मत्सर हे माणसाचे सहा शत्रू असून ते माणसाचा विनाश करण्यासाठीं अत्यंत तत्पर असतात. भूक, तहान, मोह, शोक, वार्धक्य या सहा माणसाच्या नैसर्गिक ऊर्मी आहेत. आशा (भविष्य -कालीन ईच्छा) मानसिक ईच्छा, कल्पना, शारिरीक वासना, अनावर ओढ असे अठरा मानवी देहाचे गुण आहेत असे समजावें या अठरा गुणांचा त्याग करणारा या जगांत शुध्द, सात्विक समजला जातो असे एका जनार्दनी या भजनांत स्पष्ट करतात.

उदार धीर -निधि । श्रीविठ्ठल -नाम आधीं
पतित-पावन सिध्दि ।श्रीविठ्ठल - नाम आधीं
सुख-सागर-निधि ।श्रीविठ्ठल -नाम आधीं
एका जनार्दनी बुध्दि । श्रीविठ्ठल-नाम आधीं
भावार्थ:

जो औदार्य व धैर्य यांचा ठेवा आहे अशा विठ्ठलाचे नामस्मरण आधी करावे.ज्याच्याकडे पतितांना पावन करणारी सिध्दि आहे अशा विठ्ठलाला आधीं स्मरावें.जो सुख देणारा सागरनिधी आहे अशा विठ्ठलाचे नाम आधीं जपावे.एका जनार्दनी म्हणतात,विठ्ठलनामस्मरण करण्याची बुद्धी सद्गुरूंकडे मागावी.

 हरिपाठ

आवडीनें भावें हरि-नाम घेसी। तुझी चिंता त्यासी सर्व आहे
नको खेद धरूं कोणत्या गोष्टीचा। पति तो लक्ष्मीचा जाणतसे
सकळ जीवांचा करितां सांभाळ। तुज मोकलील ऐसें नाहीं
जैसी स्थिति आहे तैशा परि राहे। कौतुक तूं पाहें संचिताचें
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा। हरि-कृपें त्याचा नाश झाला

भावार्थ:

लक्ष्मीचा पति सर्व जीवांचे पालन-पोषण, सांभाळ करणारा व सर्वांची चिंता करणारा आहे,सर्व कांही जाणणारा आहे. या परमेश्वरी शक्तिवर विश्वास ठेवून ज्या परिस्थितीत आहे तिचा स्विकार करावा व भविष्यात जे घडेल त्याचा संचित म्हणून अंगिकार करावा.या घटना आपल्या प्रारब्धाचा भोग आहेत असे मानावे.कोणत्याही गोष्टीचा खेद न करता मनापासून हरिचे नामस्मरण करावे.त्यामुळे हरिकृपा होऊन प्रारब्धातील दु:खांचा नाश होईल असे एका जनार्दन सांगतात.

  || जय जय रामकृष्ण हरी ||  

 © डॉ.नयना कासखेडीकर,पुणे .

                                            ---------------------------------------------

 

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

  

                                       || निर्गुण वारी अभंगमाला ||

                           राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (माणिक नामदेव इंगळे)

                           (जन्म- १९०९ – यावली,अमरावती. निर्वाण- १९६८-मोझरी)

                                आई- मंजुळामाय, वडील- बंडोपंत(नामदेव)

                            
तुकडोजी महाराज महाराष्ट्रातील एक आधुनिक संत. आध्यात्मिक क्षेत्रातले महान योगी, नेतृत्व करणारा नेता, कुशल संघटक, वक्ता आणि संगीतकार.

  खंजिरीच्या ठेक्यावर मराठी व हिन्दी पद गाऊन श्रोत्यांना तल्लीन व्हायला लावत, जातिभेद पळू नका, अस्पृश्यता गाडून टाका, दारू पिऊ नका, देशावर प्रेम करा, व्यसने त्यागा या विषयावर ते प्रबोधन करत असत.  घरची अत्यंत गरीबी, शिक्षण फक्त प्राथमिक चौथी पर्यंतच. पण लहान पणापासूनच ते गुलाब महाराज, हरीबुवा, अशा संतांच्या सान्निध्यात आले. वरखेड इथले समर्थ आडकोजी महाराज हे त्यांचे गुरु.  खंजिरीवर गाणी म्हणण्याचा त्यांना लहान पणापासूनच नाद. आत्मज्ञानाची अनुभूती घेण्यासाठी घर सोडून रामटेक, रामदिघी आणि सालबर्डी इथल्या घनदाट जंगलात जाऊन ते राहिले.

   आडकोजी बाबा जेंव्हा समाधिस्त झाल्याचे कळले तेंव्हा त्यांना खूप धक्का बसला. मग ते पुन्हा घरी जाऊन आई वडिलांच्या सेवेत राहू लागले, पण मनात वैराग्य भावना कायम होतीच. जंगलात ल्या वास्तव्यात त्यांनी ध्यानधारणा आणि योगाभ्यास केला होता. भजनाच्या निमित्ताने त्यांनी तिर्थस्थळांचे दर्शन घेतले होते. तर समाजाचे जवळून परीक्षण केले होते. देशाची प्रगती व्हायला हवी असेल तर सामान्य लोकांची स्थिति सुधारली पाहिजे असे त्यांना वाटले. देशातल्या खेड्यांचा कायापालट झाला पाहिजे. त्यासाठी समाजात शिस्त आली पाहिजे, स्वच्छतेचे महत्व वाटले पाहिजे, ते मनावर बिंबवले तर खेडी लख्ख होतील .त्यासाठी सूत कताई. शाळा, जागोजागी दवाखाने, व नियमित प्रार्थना याची जोड द्यायला हवी हे त्यांच्या लक्षात आले.

भजनाच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण लोकांचे प्रबोधन केले. मनी नाही भाव देवा मला पाव... सारखी उत्स्फूर्त आणि प्रेरणा देणारी हजारो भजने त्यांनी लिहिली.

    मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव
देव अशान, भेटायचा नाही हो।
देव बाजारचा भाजीपाला नाही हो ॥धृ o

मातीचा देव, त्याला पाण्याचं भेव ।
सोन्या-चाँदीचा देव, त्याला चोराचं भेव ।
लाकडाचा देव,त्याला अग्नीचं भेव ।
देव बाजारचा… ….॥१॥

 देवाच देवत्व नाही दगडात ।
देवाच देवत्व नाही लाकडात ।
सोन्या चांदीत नाही देवाची मात
देव बाजारचा………॥२॥

भाव तिथ देव ही संताची वाणी
आचारा वाचून पाहिला कोणी?
शब्दांच्या बोलानं शांति नाही मनी ।
देव बाजारचा… ……॥३॥

देवाचं देवत्व आहे ठायी ठायी ।
मी-तू गेल्याविण अनुभव नाही।
तुकड् यादास म्हणे ऐका ही ग्वाही ।
देव बाजारचा……….॥४॥

   आत्मज्ञानाची अनुभूति झाल्यावर ते पुन्हा लोकांमध्ये येऊन राहिले. त्यांची सहज आणि सोप्या शब्दातली गाणी लोकांच्या हृदयाला भिडत. खंजिरीच्या तालावर जीवनाचं वास्तव सांगणारी, शिक्षण देणारी, गाणी हे त्यांचा वैशिष्ट्य होतं. अंधश्रद्धा निर्मूलन,जातिभेद निर्मूलन, देवावरची डोळस श्रद्धा, शिक्षणाचे महत्व, सर्व धर्म समभाव, असे विषय त्यांनी गाण्यातून जनतेला समजविले. त्यासाठी भजन- कीर्तनाचा मार्ग निवडला.  

भोग हा चुकेना कोणा, देव-दानवा ।

सृष्टि भोग भोगी देही, मागचा नवा ॥धृ॥

संत-साधु योगी-मौनी, प्राक्तना चुकविना कोणी ।

मृत्युपरी पावे ग्लानी, दुःख या जिवा ॥कोणा०॥१॥

 सामाजिक बंधुभावाचे महत्व सांगणारे गीत सर्वांना माहिती आहे . या भारतात बंधुभाव नित्य वसू दे.... चौथीच्या बालभारती पुस्तकातली लहान मुलांवर संस्कार करणारी ही कविता --

                                          या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे

हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे ||

 नांदोत सुखे गरीब-अमीर एक मतांनी

मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी

स्वातंत्र्य-सुखा या सकलांमाजि वसू दे

दे वरचि असा दे ||

सकळांस कळो मानवता, राष्ट्रभावना

हो सर्व स्थळी मिळुनी समुदाय प्रार्थना

उद्योगी तरुण शीलवान येथ असू दे

दे वरचि असा दे

जातिभाव विसरूनिया एक हो आम्ही

अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी

खलनिंदका मनीही सत्य न्याय वसू दे

दे वरचि असा दे ||

 सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीयापरी

ही नष्ट हो‍उ दे विपत्ती भीती बावरी

तुकड्यास सदा या सेवेमाजी वसू दे

दे वरचि असा दे ||

याच बरोबर शाळेत आम्ही शिकलेली कविता, राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली,

ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या ||  ही सर्वांना ज्ञात आहेच. अशा त्यांच्या प्रासादिक रचनात लोककल्याणाची त्यांची तळमळ, समाजहित सांगणारा स्पष्टपणा दिसतो.

   संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यासारख्या संतांच्या काळची सामाजिक परिस्थिति वेगळी होती. मात्र तुकडोजी महाराजांच्या काळात देश पारतंत्र्याच्या जोखडाखाली पिचून गेला होता. त्यांच्या भजनात राष्ट्रीय ऐक्य, स्वातंत्र्य, विषमता, दु:ख हेही विषय असायचे. त्यांनी सुरूवातीला तुकड्यादास या नावाने काही रचना लिहिल्या. त्यांच्या रचनांमध्ये सामाजिक परिस्थितीचे चित्रण असायचे. आपल्या देशाचे सुजलाम सुफलाम चित्र त्यांनीही रंगविले होते. खेड्यातल्या लोकांचा विकास हाच त्यांचा ध्यास होता.

त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ म्हणजे लोकशिक्षणाचा आदर्श  वस्तूपाठ आहे. त्यांच्या कल्पनेतले गावाचे आणि ग्रामसंस्कृतीचे रूप आपल्याला ग्रामगीतेत दिसते. त्यांनी खेडोपाड्यात प्रत्यक्ष जाऊन ग्रामसंस्कृतीचे उत्कट दर्शन घेतले. ते त्यासाठी आयुष्यभर भटकत राहिले. ते म्हणत, “माझा देव साधनारूपाने देवळात व रानात असला, अनुभवरूपाने तो मनात व चिंतनात असला तरी कार्यारूपाने तो जनात आहे. विस्तीर्ण रूपात पसरलेली गावे हीच माझी दैवते आहेत. ग्रामसेवा हीच माझी पूजा आहे”.

   त्यांनी ग्रामशुद्धी, ग्रामनिर्माण, ग्रामआरोग्य, ग्रामशिक्षण, ग्रामकुटुंब, ग्रामप्रार्थना, ग्रामसेवा, ग्राममंदिर, ग्रामसंस्कार, ग्रामउद्योग, ग्रामसंघटन, ग्रामआचार यांचा असा सूक्ष्मविचार त्यांनी ग्रामगीतेत सांगितला आहे. गाव सुखी व्हावा, समृद्ध व्हावा, सुसंस्कृत व्हावा, सुशिक्षित व्हावा ,परस्परस्नेहभाव जागवावा, श्रमप्रतिष्ठा वाढावी अशी तळमळ व्यक्त करून ही ग्रामगीता त्यांनी ग्रामदेवतेलाच अर्पण केली आहे. या ग्रामगीतेचे वचन खेडोपाड्यातून अत्यंत आदराने केले गेले, आजही केले जात आहे.

     जसं समर्थ रामदासांनी कसं लिहावं ? हे एका समासात सांगितलं आहे तसं,संत तुकाडोजी यांनी काय वाचावं आणि कशासाठी वाचावं हे ग्रामगीतेत सांगितलं आहे. आपण जे वाचतो त्याच मर्म आपल्याला कळायला हवं. ज्या प्रकारच आपलं जीवन आहे त्याला उपयुक्त असेच वाचन आपण केले पाहिजे.

 लोक त्यांना तुकडोजी म्हणून ओळखू लागले. स्वातंत्र्यलढ्याची चळवळ त्यांनी ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचविली. १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांची प्रेरणा महत्वाची ठरली. चिमुर, आष्टी व बेनोडा यातील चळवळीचे ते प्रेरणास्थान होते.

बोल बोल बा ! बोल भारता ! चिंतातुर का असा ?

हाल-बेहाल तुझी लालसा ॥धृ॥

स्वातंत्र्याच्या उन्नत शिखरी निर्भय सेना तुझी ।

सोडुनी आज दशा का अशी ?

वेदांताची उंच गर्जना, भार ऋषींचे तसे ।

सोडुनी वन-वन का फिरतसे ?

भारतमय श्रृंगार तुझा तो काय कुठे लोपला ?

बावरा फिरशी का एकला ?

दे हाक रामकृष्णासम व्हाया उभे ।

तुझि सत्य हाक ही कळेल त्यांच्या सभे

धावतील ओढाया असुरांच्या जिभे ।

तुकड्यादास म्हणे पाहवेना, अम्हा त्रास हा असा ।

मिळो स्वातंत्र्य पुन्हा जगदिशा !

     या लढ्यात त्यांनी सांस्कृतीक व आध्यात्मिक कार्यक्रमांतून चळवळीबद्दल लोकांचे प्रबोधन केले. यावेळी त्यांना चंद्रपूरला अटक करून नागपुर व रायपूर येथील तुरुंगांत १०० दिवस ठेवले होते. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी सामाजिक चळवळीचे काम हाती घेतले. नागपूरजवळील मोझरी गावांत गुरुकुंज आश्रम स्थापन केला. त्यांनी ग्रामीण पुन:र्निर्माणाचे मूलभूत व रचनात्मक  काम हाती घेतले. महात्मा गांधी, डों. राजेंद्रप्रसाद आदींनी त्यांच्या या कामाची वाखाणणी केली व गौरव केला. एका भव्य कार्यक्रमात देशाचे प्रथम राष्ट्रपति डॉक्टर राजेंद्रप्रसाद यांनी “...आप संत नही, राष्ट्रसंत है” असे सदगतीत होऊन उद्गार काढले आणि तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी देऊन गौरविले. तेव्हापासून ते लोकांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून माहीत झाले. आवेशपूर्ण, भावनांनी ओतप्रोत भरलेले व मनाचा ठाव घेणारे त्यांचे खंजिरीभजन हा वैशिष्ठ्यपूर्ण व परिणामकारक उदबोधनाचा प्रकार ठरला.

   १९५५ मध्ये जपान येथे संपन्न झालेल्या विश्वधर्मपरिषदेत भारतातून तुकडोजी महाराजांना आमंत्रीत केले गेले. त्यावेळीही लोकांनी त्यांची खूप वाहवा केली.या प्रसंगी त्यांचे भजन सादर झाले होते ते दिल्ली च्या राजघाटावर नेहमी ऐकवले जाते.ते असे- 

                                          हर देश में तू ...

हर देश में तू , हर भेष में तू , तेरे नाम अनेक, तू एकही है ।

तेरी रंगभुमि यह विश्वंभरा, सब खेलमें, मेलमें तु ही तो है ॥धृ॥

सागर से उठा बादल बनके, बादल से फ़टा जल हो कर के ।

फ़िर नहर बनी नदियॉं गहरी,तेरे भिन्न प्रकार तू एकही है ॥१॥

चींटी से भी अणु-परमाणुबना,सब जीव जगत् का रूप लिया ।

कहिं पर्वत वृक्ष विशाल बना, सौंदर्य तेरा,तू एकही है ॥२॥

यह दिव्य दिखाया है जिसने, वह है गुरुदेवकी पूर्ण दया ।

तुकड्या कहे कोई न और दिखा, बस! मै और तू सब एकही है ॥३॥

    १९५६ मध्ये त्यांनी राष्ट्रातील विविध जाती, पंथ, धर्माच्या संस्थांचे प्रमुख व साधू यांचे मोठे संघटन केले. अश्या प्रकारचे संघटन प्रथमच होत होते. यापूर्वीही त्यांनी सालबर्डी येथे महारुद्र योजना आयोजीत केली होती. त्यातही तीन लाखांपेक्षा जास्त लोक सहभागी झाले होते. सर्व धर्मांकडे सारख्याच नजरेने पहा असे सांगणार्‍या तुकडोजी महाराजांनी आपली वाणी, लेखणी, शक्ती आणि भक्ती याचे सर्व सामर्थ्य एकवटून समाजजागृतीचे कार्य केले.

  १९४५ चा बंगालचा दुष्काळ, १९६२ चे चीनचे आक्रमण, १९६५ मधील पाकीस्तानबरोबरचे युद्ध, (या दोन्ही युद्ध प्रसंगी त्यांनी सीमेवर जाऊन सैन्याला धीर देण्यासाठी विरगीते गायली होती.) १९६२ मधील कोयनाचा भूकंप अशा विविध राष्ट्रसंकटाच्या वेळी त्यांनी प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मदत केली.त्यांनी आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत भाग घेतला होता. त्यांनी अनेक महत्वाच्या सम्मेलनांचे अध्यक्षपद भूषविले. भारत सेवक समाज, हरिजन सम्मेलन, भारतीय वेदान्त सम्मेलन, आयुर्वेद सम्मेलन अश्या अनेक प्रसंगी त्यांनी व्याख्यानातून प्रबोधन केले. महिलांची उन्नती हा त्यांच्या प्रबोधनाचा एक महत्वाचा विषय होता. कुटुंब व्यवस्था, राष्ट्र व्यवस्था आणि समाज व्यवस्था ही स्त्री वर कशी अवलंबून असते हे ते कीर्तनातून मांडत. देयशातले तरुण हे राष्ट्राचे आधार स्तंभ असतात त्यामुळे ते बलोपासक असावेत नीतिमान व सुसंस्कृत असावेत तेंव्हाच ते राष्ट्राचे संरक्षण करू शकतील असेही ते प्रबोधनपर सांगत. त्यांनी ब्रम्ह, नाशिवंत देह, संसार वं परमार्थ, मानवी प्रयत्न, ईश्वर, विश्व धर्म आणि प्रार्थना हे तत्वज्ञान विषय मांडले.     

 संत तुकडोजी महाराज यांचे साहित्यिक योगदानही मोठे आहे. मराठी व हिन्दी भाषांमध्ये त्यांनी रचना केल्या आहेत. मराठीत सुमारे ३००० भजने, २००० अभंग, ५००० ओव्या, तसेच धार्मिक, सामाजिक व राष्ट्रीय विषयांवरील तसेच औपचारिक व अनौपचारिक शिक्षणासंबंधीचे ६०० पेक्षा जास्त लेख लिहिले आहेत. मराठी भाषेत त्यांची ३० पुस्तके आहेत. उदा. ओवीबद्ध ग्रामगीता, अनुभवसागर भजनांजली, लोकशाहीचे पोवाडे, दारूबंदी, अरुणोदय, भक्तीकुंज, राष्ट्रीय नवजागृती ,लहर की बरखा ,अनुभव प्रकाश इत्यादि. त्यांनी ग्रामगीतेतून लोकांना भोंदूबाबांपासून दूर नेण्याचा प्रयत्न केला आहे. खुळ्या कल्पनांवर ताशेरे ओढले आहेत.

 शेवटच्या दिवसात ते कॅन्सरने आजारी झाले आणि या आजारातच त्यांचे दि. ११ ऑक्टोबर, १९६८ रोजी निधन झाले. त्यांच्या मोझरी गावच्या गुरुकुंज आश्रमासमोरच त्यांची समाधी आहे. ती आजही सर्व सामान्यांना जीवन जगण्याची योग्य दिशा आणि प्रेरणा देते.

                                                || जय जय रामकृष्ण हरी ||  

 

© डॉ.नयना कासखेडीकर,पुणे .

                                            -------------------------------

वेण्णा स्वामी

  

                                         || निर्गुण वारी अभंगमाला ||

                                                           वेण्णा स्वामी

                                     (जन्म- १६२७-२८,  समाधी-सज्जनगड ,१६७८)

                                      आई- राधिकाबाई, वडील- गोपाजीपंत गोसावी               

                                          

एक स्त्री असूनही मठाधिपती झालेली ,संस्कृती विचार धारेचा प्रसार करणारी, विपुल लेखन करणारी ,आध्यात्मिक अधिकार मिळवलेली वेणाबाई. वैदिक काळात स्त्रीला उच्च तात्विक अधिष्ठान होतं. पण पुढे परंपरा आणि रूढींमुळे त्यांचे काही अधिकार काढून घेतले गेले. त्या आध्यात्मिक ज्ञानापासून वंचित राहिल्या. यादवकाळात मात्र धर्मभक्ति चळवळ सुरू झाली आणि स्त्रियांना आणि क्षुद्रांना भक्तीचा अधिकार मिळाला. इथूनच मराठी साहित्यात संत कवयित्री तयार झाल्याचं दिसतं. आध्यात्मिक उन्नतीची ही संधी या स्त्री संतांनी घेतली.

मध्ययुगाच्या अंधकारमय परिस्थितितून बाहेर पडून महिला संतांनी विचारांचे जागरण घडवले ते ऐतिहासिक ठरले आहे. संतांच्या परंपरेत स्त्री संतांचा मौलिक वाटा आहे. सामाजिक कुचंबणा, घरची परिस्थिति, दारिद्र्य, कौटुंबिक छळ या गोष्टी सहन करून त्यांनी योगदान दिले आहे. यातल्या पहिल्या स्त्री संत महादाईसा तर शेवटची स्त्री संत वेणाबाई . मध्ये मुक्ताबाई, जनाबाई, लाडाई, आऊबाई, लिंबाई, सोयराबाई, निर्मळा,कान्होपात्रा, बहिणाबाई, बयाबाई अशा स्त्री संत होऊन गेल्या.

मिरजच्या देशपांडे घराण्याची सून वेणाबाई बालविधवा झाली, त्यामुळे सोळाव्या शतकात विधवा स्त्रीने घरकाम करणे, देवाचे नामस्मरण करणे, धार्मिक ग्रंथांचे वाचन करणे अशी बंधने पाळावी लागत. दुसरे अधिकार नव्हते. वेणा लहानपणापासूनच विरक्त, बुद्धीमान, जिज्ञासू, वाचन कीर्तनाची आणि श्रवणाची  आवड असणारी होती. समर्थ मिरज आणि कोल्हापूर येथे नेहमी किर्तनासाठी जात. त्यांचे कीर्तन ऐकायला वेणा आवर्जून जाई. तिचे आई वडील समर्थांचे अनुग्रह घेतलेले होते आणि सासू सासरे संत एकनाथांचे अनुग्रहीत होते. तिच्या आध्यात्मिक जीवनाला घरातून विरोध नव्हताच.पण निन्दकच जास्त होते. गुरु समर्थ रामदासांची आणि वेणाबाईची पहिली भेट तिचे जीवन बदलणारी झाली. एकदा समर्थ रामदास स्वामी भिक्षा मागायला घरी आले तेंव्हा,

सदा सर्वदा योग तुझा घडावा,

तुझे कारणी देह माझा पडावा

उपेक्षू नको गुणवंता अनंता

रघुनायका मागणे हेची आता || जय जय रघुवीर समर्थ ||

हे धीरगंभीर आवाजात कानावर पडले आणि अगदी ओझरते दर्शन झाले होते पण, पुन्हा काही दिवसांनी ते आले असता वेणाबाई तुळशीजवळ एकनाथी भागवत वाचत बसल्या होत्या. समर्थांनी विचारले,

समर्थ- काय वाचतेस बाळ ?

वेणाबाई - एकनाथी भागवत.

समर्थ- जे वाचते ते कळते का ?

वेणाबाई- महाराज, मनाच्या आकाशात शंकांचे तारे उगवतात,पण कोणाला विचारू?

समर्थ- तुला असलेल्या शंका मला विचार !

मग काय वेणाबाईंनी दहा कडव्यात पंचवीस प्रश्न विचारले. त्यात त्यांनी जीव कोण, आत्मा कसा असतो, प्रपंच म्हणजे काय, विद्या म्हणजे काय, बद्ध कोण आणि मुक्त कोण, सगुण निर्गुण म्हणजे काय, ज्ञानी कोण, चैतन्य कसे असते. समाधान कोणते असे मार्मिक प्रश्न विचारले. 

वेणाबाई -- वक्तयासी पुसे जीव हा कवण |
शिष्याचे लक्षण सांगा स्वामी ||
.सांगा स्वामी आत्मा कैसा तो परमात्मा |
बोलिजे अनात्मा तपो कवण ||
 आहे कैसे शून्य कैसे ते चैतन्य |
समाधान अन्य ते कवण ||
 सांगा ब्रह्मखूण सगुण निर्गुण |
पंचवीस प्रेष्ण ऐसे केले ||

समर्थांनी वेणाबाईच्या प्रश्नांची उत्तरे दिली , जीव म्हणजे अज्ञान, आत्मा आणि परमात्मा म्हणजे आपल्या देहात जो वास करतो तो आत्मा, सर्व विश्वात चराचरात वास करतो तो अंतरात्मा आणि विश्वाला पुरून उरतो तो परमात्मा असतो.

प्रपंच म्हणजे पाचांच्या समुदायाचे नियंत्रण .हा प्रपंचही खरा नसतो ,आपला कुटुंब, घर,संपत्ति, याला आपण प्रपंच म्हणतो, मायेनेच निर्माण होतो आणि मायेनेच नष्ट होतो.

समाधान तेंव्हाच मिळते जेंव्हा आपण आपली देहबुद्धी ,सोडू मी पणा सोडून देऊ.

ब्रम्ह म्हणजे श्रीराम, श्रीकृष्ण या सारख्या देवतांच्या मूर्ती . त्यांच्यात प्रत्यक्ष देवता शक्तीरूपाने आहे असे आपण मानतो, तेंव्हा ते सगुण ब्रम्ह आहे अशी आपली भावना असते. पंढरीचा विठुराया हा सगुण रूपच आहे त्याच्याच आधारे आपण निर्गुण ब्रह्म मिळवायचा प्रयत्न करत असतो. निर्गुण म्हणजे जे निर्विकार आहे निराकार आहे ते ,

या प्रश्नांची उत्तरे वेणाबाईंना मिळाली आणि त्या खूप प्रभावित झाल्या. हेच आपले गुरु असे त्यांच्या मनात आले.       
 वेणाबाईंनी लिहिलेला श्रीरामाचा अभंग
बंदविमोचन राम ।
माझा बंदविमोचन राम ॥ धृ ॥

सकळही ऋषिमुनी भजती जयासी ।
एकचि तो सुखधाम ॥१॥

सद्गुरुकृपा ओळखिला जो ।
कौसल्येचा राम ॥२॥

भावभक्तीच्या सुलभसाधनी ।
पुरवी सकळही काम ॥३॥

शरण ही वेणा आत्मारामा ।
पावली पूर्णविराम ॥४॥

 आपल्या आवडीचा परमार्थ मार्ग शोधण्यासाठी लोकांच्या निंदेची पर्वा न करता, आपल्या आईवडिलांचा व कुटुंबाचा त्याग केला. मठ जीवन पत्करले, स्वत:चा प्रपंच नव्हता, पण मठाचा प्रपंच त्यांनी सांभाळला. जीवनाचे मार्गदर्शक म्हणून त्यांना समर्थ रामदासांसारखे श्रेष्ठ गुरु लाभले होते. त्यांनी त्यांचे व्यक्तिमत्व घडवले होते. समर्थांनी ११०० मठ स्थापन केले होते. त्यातल्या एका मठाची म्हणजे मिरजेच्या मठाची जबाबदारी वेणाबाईंना दिली. तेंव्हा गावात एकच चर्चा, की मिरजेत समर्थांनी रामदासी मठ स्थापन केला आहे आणि त्याची मठाधिपती स्त्री आहे. त्यातून ती विधवा आहे, मग कसा चालेल हा मठ? महंत होणं कसं चालेल विधवा असून? मग रुढींचे काय? समर्थांनी वेण्णा स्वामींना परमार्थ आणि वैराग्याचा उपदेश करूनच, पूर्ण विचार करून हा निर्णय घेतला होता. त्यांना खात्री होती की माझ्या या शिष्येचं वर्तनच लोकांच्या या चर्चेला उत्तर देईल. समर्थ स्वत: सुधारकांचे अग्रणी होते, क्रांतिकारक होते, परंपरागत रूढी आणि यवनांच्या आक्रमणामुळे हिंदू समाज खचून गेला होता, त्यामुळे समर्थांना सामाजिक सुधारणा अपेक्षित होती. ते वैज्ञानिक दृष्टीकोन असलेले होते. स्त्रीयांना शिष्यत्व देऊन, त्यांना शिक्षित करण्याचं समर्थांनी धाडसी आणि क्रांतिकारक पाऊलच उचललं होतं. ही खरी स्त्री मुक्ति म्हणावी. समर्थप्रताप ग्रंथकर्ते गिरीधर गोसावी यांनी वेणाबाई बद्दल म्हटले आहे,

"वेणाबाई मुख्य भक्तीसंस्थान। सदासर्वदा समर्थध्यान।।
बाहेक्षेत्री समर्थांसि जाले हनुमंतदर्शन। श्रीरामलिंगीं देवाल्यीं ते वेळी।।"

समर्थांच्या सर्व स्त्री शिष्या त्यांना स्वत:च्या मुलीप्रमाणे होत्या. समर्थांनी वेणाबाईला आशीर्वाद दिला होता की, “जनसेवा करा, ज्ञानदान करा, राष्ट्रधर्म जागवा आणि शक्तीची प्राणप्रतिष्ठा करा”.त्यांना माहिती होत की वेण्णा राममय होऊन काम करत आहे. गेली सात वर्षे गुरूंच्या बरोबर राहून काम केलं होतं आता मठाचं काम सुरू केल्याने पितृतुल्य सद्गुरूंचा, समर्थांचा सहवास आपल्याला लाभणार नाही याचं वेणाला खूप वाईट वाटलं, या विचाराने डोळे पाणावले. गुरूंनी मठ सोपवल्यानंतर, ते परत जाताना वेणाबाई ने साश्रू नयनांनी निरोप दिला, पण एक गोष्ट मागितली ती म्हणजे समर्थांच्या खडावा मागितल्या. समर्थ म्हणाले, “साक्षात रघुपतींचा इथे वास असताना दासांच्या पादुका हव्यात कशाला?” वेणाबाई म्हणतात, “रामरायांनी दिल्याच होत्या ना ? आमच्या मनी गुरु आणि देव एकच आहेत”. या बरोबर आणखी एक मागणी केली की, आपल्या अजाण वेणाला अंत:काळी आपल्या पायाशी आसरा द्यावा. गुरूचे चरण हेच शिष्याला वंदनीय असतात, आदरणीय असतात, वेणाबाईंनी प्रभू श्रीराम आणि भरताचा दाखला दिला आहे. 

परमार्थाशिवाय केलेला प्रपंच उपयोगाचा नाही. समर्थांनी अनुभवावर आधारित जे ज्ञान आहे ते सर्वश्रेष्ठ मानले होते. भोंदू गुरू व बावळट शिष्य हे परस्परांचे नुकसान करतात, असेही त्यांनी ठासून सांगितले. कर्म, भक्ती, ज्ञान या मार्गांचे अनुसरण करून मुक्त होण्याचे सर्वोच्च लक्ष्य त्यांनी शिष्यांपुढे ठेवले, अनेक दंडक त्यांनी घालून दिले. गुरूंच्या कसोटीला वेणाबाई उतरल्या होत्या तेंव्हाच त्यांना मठात प्रवेश मिळाला होता. त्यांचे आराध्य दैवत त्यांनी श्रीराम मानले होते.

काव्य निर्मितीचे श्रेय वेणाबई समर्थांनाच म्हणजे आपल्या गुरूंनाच देतात.

समर्थ देवे वेणाबाईसी वरदणे दिधली,

सीता स्वयंवरे रामायणे वदविली|

वेणाबाईंनी आपला शिष्यवर्ग जमविला होता. पूर्वी स्त्रियांनी आपल्या काव्यासाठी ओवी छंद वापरला आहे. संत मुक्तबई आणि जनाबाई यांची गीते ओवीबद्ध आहेत, तशीच वेणाबाईंच्या रचना आख्यान, काव्य प्रकारातल्या आहेत. वेणाबाईंनी सीतास्वयंवर हे आख्यान काव्य रचलेले आहे. हे श्रेष्ठ आख्यान काव्य  मानल जातं. उच्च दर्जाचे मानले जाते. त्या सीता स्वयंवराची फलश्रुति सांगताना म्हणतात,

भक्ती करीता याचे पठण, अथवा करिता श्रवण |

ज्याचे मनोरथ पूर्ण, करता राम समर्थ |

जे रघोत्तमाचे चरित्र, ते सर्व भावे पवित्र |

ज्याच्या श्रवणे सत्पात्र, धन्य  होई जे त्रिजगी ||

काव्यातून सांगितलेली कथा याचा अभिमान त्यांना होता. पण आख्यान काव्याच्या कसोटीला उतरलेले हे काव्य सुरस बनवण्याचा प्रयत्न वेणाबाईंनी केला होता. आख्यान काव्य प्रकार हा पंडिती काव्याची मिरासदारी मनाली जाते. पण महादंबा आणि वेणाबाई या स्त्री संतांनी आख्यान प्रकारातून संत साहित्यात ,कथा, काव्याचे बीज रुजवल्याचे दिसते. सगळ्याच स्त्री संतांनी भक्तिमार्गाचा अवलंब करून मोक्षप्राप्तीसाठी  धडपड केलेली दिसते. परंपरेने नाकारलेले आध्यात्मिक ज्ञान मिळवण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. आणि अर्थातच त्या स्त्री असल्याने त्यांच्या लिखाणामध्ये त्यांचे स्त्री मन डोकावते. स्त्री सुलभ भावना जाणवतात. हळुवारपणा, कोमलता सुद्धा दिसतेच. त्याच बरोबर आर्तता, उत्कंठता आणि तृप्ती पण त्यात दिसते. सीता स्वयंवर ही एका स्त्रीचीच गोष्ट ना. त्यांनी त्याचा सखोल अभ्यास केला आहे .

सीता स्वयंवरात वेणाबाई सीतेच्या अंगावरील दागिन्यांचे वर्णन करतात,

हिरव्या रत्नाचे अलंकार, भोवर्‍या कारले भांगार,

जानकी वाहता सुंदर, सभा हिरवी भासली,

हिरव्या कनकाच्या कीळा, हिरवे दावी रविमंडळा.

चंद्र आणि नक्षत्र माळा, भूगोल हिरवा भासला.

हिरवे कनक तेजोरासी,  हिरवी रत्ने कोंदणासी.

सुंदर भूषणे जिनसजिनसी, माता कौसल्या वाहातसे ||

वेणा बाईंना जणू हिरव्या रंगाची भुरळ पडली होती. तर एका ठिकाणी वेणा बाई रामाच्या सौंदर्याचे वर्णन करताना रामाच्या मूर्तीत दुर्वांच्या जुडीचे दर्शन घेतात.    

वेणा बाई महंतपदाला पोहोचलेली पहिली स्त्री, वेणाबाईंनी इतर संतांप्रमाणेच मोक्षप्राप्ती साठी  भक्तिमार्गाचा अवलंब केला आहे. ईश्वराला शरण गेल्या आहेत.  म्हणूनच त्या म्हणतात,

तुझी तुझी तुझी तुझी पावना रामा,

भावे अभावे कुभावे , परी तुझी पावना रामा.

सगळ्याच स्त्री संत त्यांच्या कर्तृत्वाने अजरामर ठरल्या आहेत. वेणा बाईंनी भक्तीकरता विषाचा प्याला पचवला अशी आख्यायिका आहे,स्वत:च्या वैधाव्याला मोठ्या धीटपणे, धैर्याने सामोरे जाऊन स्वत:ची आध्यात्मिक उन्नती त्यांनी करून घेतली.त्यांनी उपदेश रहस्य, कौल, वेदांतावर पंचीकरण, रामायणाची दीड हजार श्लोकांची कांडे, संहासन, सीतास्वयंवर चे चौदा समास.त्यात १५६८ ओव्या आहेत आणि अभंग, पदे असे स्फुट लेखन केले आहे.त्यांचा मुळातच व्यासंग होता, रामायण महाभारत भागवत याचं वाचन झालं होतं.संतांची चरित्र वाचली होती. कीर्तन करणार्‍या त्या एकमेव स्त्री शिष्या होत्या.      

मिरज येथे वेणाबाईंचा मठ आहे तो रामदास स्वामींनी १६५६ मध्ये बांधला आहे. वेणाबाईची समाधी सज्जनगडला आहे.  

                                            || जय जय रामकृष्ण हरी ||  

 

© डॉ.नयना कासखेडीकर,पुणे .

                                            -------------------------