Tuesday, 28 June 2022

‘स्वराज्य ७५’ लेखमाला- कवी ग.दि. माडगूळकर

 

      स्वराज्य ७५ लेखमाला

स्वातंत्र्यपूर्व काळातील राष्ट्रीय कवी

लेखन – डॉ.नयना कासखेडीकर

लेखांक  - २०



ग.दि.मा. (गजानन दिगंबर माडगूळकर)

 (१९१९ ते १९७७)

गदिमा हे प्रसिद्ध मराठी कवी, पटकथा लेखक व संवाद लेखक होते. सातारा जिल्हयातले माण तालुक्याचे रहिवासी.गीतरामायण ही त्यांची मराठीतली अजरामर साहित्यकृती. त्यांनी बालगीते, भक्तिगीते, लावण्या, समरगीते, शाहीरी कविता, पोवडे, कलगी तूरा,सवाल जबाब ,डफगाणे अशी विविध प्रकारची गीते लिहिली. त्यांनी कादंबरी, आत्मचरित्र, कथा, कविता , नाटक अशा सर्व साहित्य प्रकारात लिखाण केले आहे. गदिमांनी  स्वातंत्र्य लढ्यात पण भाग घेतला होता. पण कौटुंबिक जबाबदारी मुळे प्रत्यक्ष लढ्यात न उतरता त्यांनी शाहीरी कवने, पोवाडे लिहून जनजागृती केली. सातारा सांगली या भागांमध्ये प्रती सरकारचा प्रचार करण्यासाठी शाहिरांनी गदिमांची कवने गाऊन लढ्यात रान उठवले.देशभक्तीने प्रेरित होऊन काम करीत असताना त्यांच्या शाहीरी कवितेची सुरुवात झाली. शंकर निकम यांना गदिमा यांनीच शाहीर होण्याची प्रेरणा दिली. सर्व पुढारी आणि त्यांच्या कार्याची रचना गुंफून प्रत्स्मरान लिहून दिले आणि शेवटी देशार्थ जगेन,देशार्थ मरेन, देशार्थ करेन सर्वदान अशी प्रतिज्ञा पण लिहून दिली.अनेक पोवाडे लिहिले.

बेचाळीस च्या लढ्यात मरूनी अमरपदी गेले

या,ते तुम्ही वीर मर्द हो दरबारी सगळे,

या दरबारी जागा,तुमच्या खास राखलेल्या,

तुमच्या पायी पायघड्या ह्या प्राणांच्या केल्या.

ही  त्यांची एक पोवाडा रचना .

 

उचललेस तू मीठ मूठभर

उचललेस तू मीठ मूठभर

साम्राज्याचा खचला पाया

भारतास का मानवमात्रा

स्फुरणदायि ती दांडीयात्रा

सत्याग्रहि नवनीर निघाले

अन्यायाचे मूळ हराया

मिठास होता महाग भारत

तुज मुंगीचे कळे मनोगत

तुझ्या हृदयिचा उठला ईश्‍वर

दास्यमुक्‍त हा देश कराया

मीठ त्या क्षणि ठरले अमृत

निद्रित जनता झाली जागृत

नमली सत्‍ता, सरले शोषण

काय नाव या दयावे विजया

लोकसेवका, लोकनायका

लोकशक्‍तिच्या धन्य मांत्रिका

देशोन्नतिचे सत्पथ सारे

भिडती येउन तुझ्याच पाया||

-----------

आ चंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे

हे राष्‍ट्र देवतांचे, हे राष्‍ट्र प्रेषितांचे

आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे ॥धृ०॥

कर्तव्यदक्ष भूमी, सीतारघूत्‍तमाची

रामायणे घडावी, येथे पराक्रमाची

शिर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे

आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे ॥१॥

येथे नसो निराशा, थोडया पराभवाने

पार्थास बोध केला, येथेच माधवाने

हा देश स्तन्य प्याला, गीतासख्य अमृताचे

आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे ॥२॥

येथेच मेळ झाला, सामर्थ्य संयमाचा

येथेच जन्म झाला, सिद्‌धार्थ गौतमाचा

हे क्षेत्र पुण्यदायी, भगवान् तथागताचे

आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे ॥३॥

हे राष्‍ट्र विक्रमाचे, हे राष्‍ट्र शांततेचे

सत्यार्थ झुंज घ्यावी, या जागत्या प्रथेचे

येथे शिव-प्रतापी, नरसिंह योग्यतेचे

आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे ॥४॥

येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे

जनशासनातळींचा पायाच सत्यआहे

येथे सदा निनादो, जयगीत जागृताचे

आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे ॥५॥

----------------

जय जवान जय किसान

एक सूर, एक ताल, एक गाऊ विजयगान !

जय जवान, जय किसान !!

अखिल देश पाठिशी, ’जवानव्हा रणी चला

किसान होऊनी कसा, भूमि सस्य श्यामला

यौवनास योग्य रे, शौर्य आणि स्वाभिमान

जय जवान ॥१॥

शत्रु मित्र जाणुनी, सावधान सर्वदा

आपुल्या श्रमे करु, प्रसन्न देवि अन्नदा

उभ्या जगात आपुली, सदैव उंच ताठ मान !

जय जवान ॥२॥

अजिंक्य सैन्य आमुचे, गाजवी पराक्रमा

भूमिदास दाखवी, निर्मितीत विक्रमा

स्वतंत्र हिंद देश हा, स्वतंत्र सिंधु आसमान ।

जय जवान ॥३॥

----------

लोकमान्य टिळकांनी जेंव्हा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही गर्जना केली. तेंव्हा गदिमा यांची राष्ट्रीय कविता तयार झाली. ते असंतोष या कवितेत लिहितात,

गिरी सिंहगडावर घेऊन अल्प विसावा

नरसिंह परतती टिळक आपुल्या गावी

मस्तकी अजून होते, भूत स्वराज्य,

शिवभूत तयाचे धर्माधिष्ठित राज्य.

यात त्यांनी पूर्वी घडलेल्या प्रसंगांचे सद्य स्थितीतल्या घटनांशी मेळ घालून प्रेरणा देणारी कविता लिहिली. याच प्रमाणे त्यांनी युद्धानंतर’, सह्या जहाल्या तहनाम्यावर’, नवकाव्य’, कृष्णाकाठी ओसाड रानात अशा कविता लिहिल्या. १९४२ च्या लढ्यात तर अनेक राष्ट्रीय पुढारी अटकेत होते. भारतभर दडपशाही होती. हजारो लोक या लढ्यात ठार झाले होते. याचा परिणाम म्हणून क्लेश झाला आणि त्यातून कविता लिहिली ती अशी,

   

वेदमंत्राहून आम्हां वंद्य, वंदे मातरम् ॥

वेदमंत्राहून आम्हां, वंद्य वंदे मातरम्‌ , वंद्य वंदे मातरम्‌ ॥ध्रु॥

माउलीच्या मुक्ततेचा, यज्ञ झाला भारती ।
त्यात लाखो वीर देती, जीविताच्या आहुती ।
आहुतींनी सिद्ध केला, मंत्र वंदे मातरम्‌ ॥१॥

याच मंत्राने मृतांचे, राष्ट्र सारे जागले ।
शस्त्रधारी निष्ठुरांशी, शांतीवादी झुंजले ।
शस्त्रहीना एक लाभे, मंत्र वंदे मातरम्‌ ॥२॥

निर्मिला हा मंत्र ज्यांनी, आचरीला झुंजुनी ।
ते हुतात्मे देव झाले, स्वर्गलोकी जाउनी ।
गा तयांच्या आरतीचे, गीत वंदे मातरम्‌ ॥३॥

 हे गीत १९४८ च्या वंदे मातरम या चित्रपटात घेतले आहे. त्यांच्या कवितेत प्राचीन परंपरेचा अभिमान, समाज प्रबोधन, देशभक्ती, देशप्रेम, देशाभिमान हे सगळेच दिसते.याच चित्रपटात त्यांचे आणखी एक स्फूर्तीगीत आहे, झाडल्या भेरी झाडल्या डंका,पुढचे पाऊल पुढेच टाका. युद्ध कशासाठी? हा विचार गदिमा आपल्याला अंतर्मुख करायला लावतात. युद्धात मरू, पण युद्ध जिंकू, पण जिंकल्यानंतर पुढे काय?

 

माणुसकीच्या शत्रुसंगे
युद्ध आमुचे सुरू
जिंकू किंवा मरू

लढतिल सैनिक, लढू नागरिक
लढतिल महिला, लढतिल बालक
शर्थ लढ्याची करू, जिंकू किंवा मरू

देश आमुचा शिवरायाचा, झाशीवाल्या रणराणीचा
शिर तळहाती धरू, जिंकू किंवा मरू

शस्त्राघाता शस्त्रच उत्तर, भुई न देऊ एक तसूभर
मरू पुन्हा अवतरू, जिंकू किंवा मरू

हानी होवो कितीहि भयंकर, पिढ्या-पिढ्या हे चालो संगर
अंती विजयि ठरू, जिंकू किंवा मरू||

पण युद्धांनंतर शांती मिळणार का याचे उत्तर गदिमा देतात ,

युद्धानंतर काय जगावर

राज्य नांदणे शांतीचे ?

युद्धानंतर चढतील गगनी,

काय मनोरे नीतीचे?

युद्धांनंतर नंदनवन का

होईल अवघ्या विश्वाचे?

छे छे: नाही ! युद्धोत्तर मग

प्रयत्न दुसर्‍या युद्धाचे !

-------------------------------

अशीच सैनिक हो तुमच्या साठी ही कविता – आशा भोसले यांच्या स्वरातली ही कविता गाणं बनून रसिक श्रोत्यांना आपल्या सैनिकांची सतत आठवण करून देतं.त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता-  

भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी

सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी

वावरतो फिरतो आम्ही, नित्यकर्म अवघे करतो
राबतो आपुल्या क्षेत्री, चिमण्यांची पोटे भरतो
परि आठव येता तुमचा, आतडे तुटतसे पोटी
सैनिक हो तुमच्यासाठी

शेवटच्या कडव्यात गदिमा म्हणतात,

रक्षिता तुम्ही स्वातंत्र्या, प्राणांस घेऊनी हाती
तुमच्यास्तव अमुची लक्ष्मी, तुमच्यास्तव शेतीभाती
एकट्या शिपायासाठी, झुरतात अंतरे कोटी
सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी

१.    अशोक चक्रांकिता ध्वजा ही राष्ट्राची देवता ,देश हीच माता देश जन्मदाता, २. घडो देशसेवा ऐसी बुद्धी दे अनंता  3.सैनिक माझे नाव,अशी स्फूर्ति गीते आहेत .

 भारत माता की जय !

-----

समारोप 

नमस्कार ,स्वराज्य ७५  स्वराज्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सुरू केलेल्या या राष्ट्रीय कवी लेखमालेचा आजचा भाग शेवटचा होता. यात २० भाग प्रसारित केले. आपण सर्वांनी त्याला अत्यंत हृद्य प्रतिसाद दिलात .मनापासून आभारी आहे.आणखी अनेक राष्ट्रीय कविता लिहिलेले कवी आहेत.शाहीर आहेत, काही अज्ञात पण आहेत. ज्यांच्या कविता इंग्रजांनी जप्त केल्या असे वीर वामनराव जोशी,ब.ग.खापर्डे, आपटे गुरुजी, गोपाळ मोडक, रेव्ह. ना. वा. टिळक ,कवी बी. आनंदराव टेकाडे, नारायण भिडे, ना.घ. देशपांडे,वासुदेव यार्दी,वसंत सबनीस, तसेच शाहीर आत्माराम तनय, शाहीर अमर शेख, शाहीर आण्णा भाऊ साठे. या सर्वांना शतश: नमन, यांनी स्वातंत्र्याची ज्योत मनामनात पेटती ठेवली. असं हे काव्य राष्ट्रीय जागृतीचं साधन झालं होतं. स्वातंत्र्यपूर्व काळातील कवितेत राष्ट्रभक्ती ,पारतंत्र्य, अन्याय, प्रतिकार, याबरोबरच, कष्टकरी, कामकरी, मजूर, स्त्रिया, पददलित, उपेक्षित आणि अनाथ स्त्रिया यांच्या प्रश्नांना कवितेतून वाचा फोडण्याचं काम केलं गेलं.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा (७५ वर्षे) निमित्त स्वातंत्र्यपूर्व काळातील राष्ट्रीय कवी व त्यांच्या कविता अभ्यासणे. यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी व राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी महत्वाचे साधन ठरलेल्या कविता व कवी लोकांसमोर आणून ती राष्ट्रीय जाणीव पुन्हा जागविणे. या कविंचा नव्या पिढीला परिचय करून देणे आणि आपले साहित्य क्षेत्रातले देशासाठीचे योगदान काय होते याची जाणीव करून देणे , राष्ट्रीयतेचे महत्व लक्षात आणून देणे .हाच उद्देश होता.

ही मालिका कशी वाटली आणि आणखी काय अपेक्षा याबद्दल जरूर प्रतिक्रिया द्याव्यात ही विनंती.

हा संग्रह पुस्तक रूपात उपलब्ध आहे. संस्कार भारती तर्फे स्वराज्य ७५ या अभियानात हा विषय मी अभ्यासला. यात विनीता देशपांडे यांनीही काही लेखन केले आहे. हे पुस्तक भारतीय विचार साधना ने प्रकाशित केले. विक्रीसाठी उपलब्ध आहे.



धन्यवाद ,

आपलीच  

डॉ.नयना कासखेडीकर.

-------------

 

 

 

 

Monday, 27 June 2022

‘स्वराज्य ७५’ लेखमाला-कवी कुंजविहारी

 

      स्वराज्य ७५ लेखमाला

स्वातंत्र्यपूर्व काळातील राष्ट्रीय कवी

लेखन – डॉ.नयना कासखेडीकर

लेखांक  - १९



कुंजविहारी (हरिहर गुरूनाथ कुलकर्णी – सलगरकर)

 (१८९६ ते १९७८)

कवी कुंजविहारी यांचा जन्म अक्कलकोटमधील सलगर या गावी झाला. वडील लवकर स्वर्गवासी झाल्याने त्यांचे फार शिक्षण होऊ शकले नाही, त्यामुळे सोलापूर येथील लक्ष्मी विष्णु कापड गिरणीत ते काम करू लागले. त्यांना काव्याचा छंद लहानपणापासूनच होता. कधी रे आता भेटसी रामराया ही पहिली कविता १९१८ मध्ये त्यांनी लिहिली. १९२० साल त्यांच्यासाठी महत्वाचे आणि राष्ट्रीय बाणा घडवण्याचे ठरले. सोलापूर येथे मुंबई प्रांतिक परिषदेला लोकमान्य टिळक आले होते. त्याचा अनुभव घेऊन हरिहर यांना देशभक्तीची प्रेरणा मिळाली, स्वत:ला त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिले.

ध्येय एक निश्चित झाले | मी सेवक या राष्ट्राचा ||

मातृभूमीची सेवा करण्याची प्रतिज्ञा घेणार्‍या कुंजविहारी यांनी आपल्या नमो मायभूमी या कवितेत मातृभूमीला वंदन केले आहे ,ते म्हणतात,

आम्हा देव तू धर्म तू मायभूमी ,आम्हा स्फूर्ती तू मायभूमी,

आम्ही न कुणी सर्व तू मायभूमी, नमो मायभूमी,नमो मायभूमी |

आयुष्याचे ध्येय त्याचे एकची ठरलेले|

परक्याला मुळी  येऊ न देणे प्राण जरी गेले ||

लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर, भारतास, गोंधळ, नोकरशाहीची आरती, या कविता लिहिल्या. गोंधळ कवितेत ते स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आंबा माता आम्हाला एक नवा शिवाजी दे अशी मागणी देवीकडे करतात.

हक्काची मागणी पुरवी ही दान नका देऊ |

हिमतीने गतवैभव अमुचे परत आम्ही मिळवू ||

समशेरिसह नवा शिवाजी एक आम्हा देई |

कुंजविहारी विनवी अंबिके अन्य आस नाही ||

त्यावेळच्या राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळी आणि कामगार आंदोलन यामुळे त्यांची प्रतिभा आणखीन बहरली. त्याचे रूपांतर चळवळीसाठी काव्य करण्यात झाले. वृत्तपत्रात त्यांनी हरिजनांवर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जो लेख लिहिला होता, त्याच सुमारास त्यांनी मामा वरेरकर यांचे कुंजविहारी हे नाटक पाहिले आणि हेच आपले टोपण नाव घेऊन हा लेख लिहिला. तेंव्हापासून ते हरिहरचे कुंजविहारी झाले. १९१९ साली सोलापूरला मजुरांचा मोठा संप झाला, त्यावेळी त्यावर गोळीबार झाला. त्याचा निषेध करण्यासाठी आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी कविता लिहिल्या. त्या इतक्या लोकप्रिय झाल्या की त्यानंतर कुठल्याही जाहीर सभेचा प्रारंभ याच कवितांनी तेंव्हा होऊ लागली.सुरूवातीला त्रिशूल आणि हरीहर य नावाने ते काव्य लेखन करत असत. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतल्यामुळे त्यांची नोकरी गेली.

स्वातंत्र्य पूर्व काळात थोर ऐतिहासिक व्यक्तींवर कुंजविहारी यांनी ज्वलंत राष्ट्रीय काव्य लिहिले. तानाजीच्या  पराक्रमावर त्यांनी मराठा गडी यशाचा धनी हे काव्य रचले. १९१९ साली महात्मा गांधींच्या चौरीचौरा येथील सत्याग्रहात पकडलेल्या एकोणीस देशभक्तांना फाशी दिले गेले. एका देशभक्ताने फासावर जाताना आपल्या आईला लिहिले की मातृभूची सेवा करण्यासाठी आई मी पुन्हा तुझ्याच पोटी जन्म घेईन. तेव्हा, “मातृभूमीच्या सेवेसाठी आई, मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन” असे सांगणारी भेटेन नऊ महिन्यांनी ही कविता कुंजविहारी यांनी लिहिली आणि आता फाशी दिली तरी पुनर्जन्म घेऊन मातृभूमीची सेवा करायला पुन्हा येईन अशी इच्छा असलेला  धैर्यशाली क्रांतिवीर त्यांनी आपल्या कवितेतून  रंगवला. भारताच्या स्वातंत्र्ययुद्धात प्राणाची आहुति देणार्‍या हुतात्म्यांच्या जीवनाचे रहस्य आणि तत्वज्ञान कुंजविहारी यांनी भेटेन नऊ महिन्यांनी या कवितेत सांगितले आहे.

१९२१ सालच्या मुळशी सत्याग्रहावर मुळशीचा पाळणा लिहिला. या कवितेने ते सर्वपरिचित झाले. धरणासाठी जमिनी ताब्यात घेतल्यावर शेतकर्‍यांची अवस्था काय होते ते त्यांनी लिहिले. ही कविता डिसेंबर १९२२  ला गया येथील कॉग्रेसमध्ये वाचून दाखवली गेली.    

भेटेन नऊ महिन्यांनी ..

मनी धीर धरी शोक आवरी, जननी !
भेटेन नऊ महिन्यांनी !!
या न्यायाची रीत मानवी असते !
खरी ठरते, केंव्हा चुकते !!
किती हुतात्मे असतील असले !

जे अपराधाविन मेले !!
लाडका बाळ एकुल
ता
फाशीची शिक्षा होता
कवटाळून त्याला माता
अति आक्रोशे रडते केविलवाणी !
भेटेन नऊ महिन्यांनी !!

तुज सोडुनि मी जाइन कां गे इथुन ।

परि देह परस्वाधीन

बघ बोलति हे, बोल मुक्या भावाचे ।

मम दोरखंड दंडाचे

अन्नपाणि सेवुनि जिथले

हे शरीर म्यां पोशियले

परदास्यिं देश तो लोळे

स्वातंत्र्य मला, मिळेल मग कोठोनी । भेटेन नऊ महिन्यांनी ॥

लाभेल जया वीरमरण भाग्याचे !
वैकुंठ्पदी तो नाचे !!
दे जन्म मला मातृभूमीचे पोटी !

पुनपुन्हा मरण्यासाठी !!
मागेन हेच श्री हरीला
मातृभूमी उद्धारण्याला
स्वातंत्र्यरनी लढण्याला
तव शुभ उदरी जन्म पुन्हा घेऊनी !
भेटेन नऊ महिन्यांनी !!
(गीतगुंजारव )

(संदर्भ- मराठ्यांची संग्रामगीते कविता संग्रह-)

 

१९३१ साली सोलापूर येथे मार्शल लॉ मध्ये फाशीची शिक्षा झालेले हुतात्मा कुर्बान हुसेन यांची व कवी कुंजविहारी यांची शेवटची भेट झाली तेंव्हा कुंजविहारी यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यावर कुर्बान हुसेन म्हणाले की, आपके आंखोमे आसूं? भेटेन नऊ महिन्यांनी ही कविता तुमचीच ना? मग हे अश्रु कशासाठी? मी फाशी गेलो तर माझे जीवन सार्थकी लागेल आणि तुमची मनि धीर धरी...  ही तुमची कविता गातच मी फासावर जाईन. एव्हढी ही कविता परिणामकारक ठरली होती.

१२ मे १९३० ला जेंव्हा इंग्रज सरकारने मार्शल लॉं पुकारला त्यावेळी धरपकड झाली. त्यात कुन्जविहारी यांनाही अटक झाली व एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा आणि दंड झाला. आधीच नोकरी गेली होती, किराणा दुकानही लिलावात काढायला लागले. जेंव्हा १९४६ साली सेनापति बापट यांना जहाल भाषणा बद्दल रत्नागिरी येथे सरकारने पकडले  आणि ७ वर्षांची शिक्षा केली.  यावरही कुंजविहारी मत व्यक्त करतात.   तयाला तुरुंग भिवविल किती?’ या कवितेत ते म्हणतात ,

देशास्तव सर्वस्व समर्पिण ध्येय जायचे निके,

तया गृह कारागृह सारिखे ||

१९४६ मध्ये सुभाषचंद्र बोस यांचा गौरव करणारी जयहिंद कविता त्यांनी लिहिली. स्वातंत्र्यप्राप्ती त्यांनी स्वत: अनुभवली. त्या नंतर १९४७ मध्ये त्यांनी स्वराज्य सोहळा’, स्वराज्यसुख स्वराज्य नारायण’,या कविता लिहिल्या. स्वातंत्र्योत्तर चिरंजीव होवो जागी लोकशाही ,उद्याचा देव कसा असावा?, सैन्य चालले पुढे,बंडखोर स्फूर्ति, अशा कविता लिहिल्या.  

 

  भारत माता की जय !

 © डॉ. नयना कासखेडीकर